लिव्हिंग्स्टन : पूर्व आफ्रिकेतील झँबियाचे दक्षिणेकडील एक प्रवेशबंदर व दक्षिण प्रांताच्या राजधानीचे शहर. ते झँबीझी नदीच्या काठावर ऱ्होडेशियाच्या (झिंबाब्वे) उत्त्तर सीमेला लागून लूसाकाच्या नैर्ऋत्येस ३६४ किमी. वर वसलेले आहे. त्याला ‘मराम्बा’ असेही म्हणतात. लोकसंख्या ७१, ९८७(१९८०).

ब्रिटीश वसाहतवाल्यांनी १९०५ मध्ये लिव्हिंग्स्टनची स्थापना केली आणि उत्तर ऱ्होडेशियाची (झिंबाब्वे) राजधानी येथे वसविली (१९०७-३५) पुढे शहराच्या सुखसोयींसाठी तेथे १९२७ मध्ये नगरपालिका स्थापण्यात आली आणि शहरास प्रसिद्ध स्कॉटिश समन्वेषक डेव्हिड लिव्हिंग्स्टनचे नाव देण्यात आले. शहराच्या नैर्ऋत्येस जवळच झँबीझी नदीवर जगप्रसिद्ध ‘व्हिक्टोरिया धबधबा’ (उंची १०८मीटर) आहे. लिव्हिंग्स्टन हे देशातील एक प्रमुख उद्योगकेंद्र असून तेथे शेतमालाची बाजारपेठ आहे. शिवाय येथे लाकूड कटाईच्या गिरण्या, फर्निचर, अन्नप्रक्रिया व तंबाखू प्रक्रिया उद्योग, तसेच कातडी कमावण्याचे व ब्लँकेट विणण्याचे व्यवसाय चालतात. देशातील प्रमुख शहरांशी ते रस्त्यांनी जोडले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

शहराच्या परिसरातील व्हिक्टोरिया धबधबा, करिबा सरोवर, लिव्हिंग्स्टन क्रीडाउद्यान, इतर राष्ट्रीय उद्याने इ. प्रेक्षणीय स्थळांमुळे ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. व्हिक्टोरिया धबधब्यावर एक लहान जलविद्युत्‍निर्मितिकेंद्र आहे. शहरात एक वस्तुसंग्रहालय असून त्यात इतर प्राचीन ऐतिहासिक अवशेषांबरोबर मानवजातिविषयक तसेच लिव्हिंग्स्टन याने जमविलेल्या काही दुर्मिळ वस्तू यांचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह आहे.

सावंत, प्र. रा.