अंकोर : कंबोडियामधील (सध्याचे ख्मेर प्रजासत्ताक) ऐतिहासिक ⇨ख्मेरसंस्कृतीच्या वास्तू असलेले जगप्रसिद्ध स्थळ. टॉनले सॅप सरोवराच्या उत्तर तीरावरील सीएमरीप शहरापासून सु. सात किमी. वर हे वसले अंकोरथोम व अंकोरवात ह्या दोहोंचाही समावेश ह्यामध्ये होतो. 

८०२ मध्ये दुसऱ्या जयवर्मनने जावाच्या शैलेंद्र राजांची सत्ता झुगारून कंबोडियात स्वतंत्र राज्य स्थापले व अंकोरला लागून हरिहरालय येथे आपली राजधानी वसविली. त्याचा मुलगा इंद्रवर्मन (८७७-८९९) ह्याने अंकोरची स्थापना केली व त्याचा मुलगा यशोवर्मनने शहर पूर्ण केले. दहा लाख लोकवस्तीला पुरेल इतक्या सु. ४०९ हेक्टर जागा व्यापणाऱ्या या शहराभोवती मजबूत भिंती होत्या. शहरात सु. ६०० देवळे, अनेक राजवाडे, पूल इ. उत्तम वास्तू बांधल्या होत्या. शहरापासून दोन किमी. अंतरावर नंतर अंकोरवाताची स्थापना केली गेली. शहराचे मूळ नाव यशोधरपूर, परंतु ख्मेर भाषेत राजधानीला थोम व नगर या संस्कृत शब्दांचा अपभ्रंश अन्‌गर-अंगर-अंकोर होऊन ‘अंकोरथोम’ ह्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. ख्मेर संस्कृतीच्या उतरत्या काळात मूळची ब्रह्मा, शिव इ. हिंदू देवळे बुद्धाची मंदिरे बनली. थायलंडकडून वारंवार हल्ले होऊ लागल्याने पंधराव्या शतकाच्या शेवटी ख्मेर राजांनी आपली राजधानी नॉम पेन्ह येथे नेली व अंकोर जंगलमय झाले. या पुरातन वास्तूंचा शोध प्रथम हेन्‍री मोहौत या फ्रेंच अभियंत्याला १८६० साली लागला. आज ते जगातील प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.

शाह, र. रू.

अंकोर येथील मणिमंदिराचे द्दश्य.

विष्णुमंदिरातील अप्सराशिल्पे, अंकोर.