जगन्नाथपुरी : पुरी. भारतातील चार धामांपैकी एक आणि ओरिसा राज्यातील पुरी जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ७२,६७४ (१९७१). हे महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस समुद्रकाठी वसले असून कटकपासून सु. ७२ किमी. व भुवनेश्वरपासून सु. ३२ किमी. वर आहे.

जगन्नाथ मंदिर, जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरामुळेच पुरीला विशेष महत्त्व आले आहे. हिंदूंच्या या पवित्र व प्रसिद्ध यात्रास्थानाचा उल्लेख श्रीक्षेत्र किंवा पुरुषोत्तम क्षेत्र म्हणूनही पुराणांत  आला असून येथील जगन्नाथाचे मंदिर कलिंगचा राजा चोडगंगाने आणि अनंग भीमदेवाने सु. बाराव्या शतकात बांधले, असे मानले जाते. हे मंदिर जगन्नाथाचे (कृष्णाचे) असले तरी येथे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती असून त्यांस फक्त डोळे, नाक, तोंड एवढेच अवयव आहेत. त्या दर बारा वर्षांनी नवीन करतात. या मूर्तींविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. काही पाश्चात्त्य विद्वानांच्या मते या त्रिमूर्ती बौद्ध धर्मातील तीन तत्त्वे-बुद्ध, संघ, धर्म यांच्या सूचक आहेत. तसेच काहींच्या मते येथे पूर्वी बौद्ध स्तूप असण्याची शक्यता आहे. हे मंदिर नीलाचल पर्वतावर असून मंदिराच्या महाद्वारी सु. ८ मी. उंचीचा काळ्या पाषाणाचा अरुणस्तंभ आहे. मंदिराभोवती सु. ६ मी. उंचीची संपूर्ण दगडी तटबंदी असून चारी दिशांस चार प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वार सिंहद्वार म्हणून ओळखले जाते. हेच महाद्वार होय. पूर्वेकडील तटाची लांबी १९५ मी. व दक्षिणेकडील तटाची लांबी ८० मी. आहे. या तटबंदीच्या आत दुसरी एक तटबंदी असून तिच्या आत मुख्य मंदिर आहे. देवालयाच्या आवारात इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. त्यांत तेरा शिवमंदिरे असून एक सूर्यमंदिरही आहे. मुख्य मंदिराचे चार स्वतंत्र विभाग असून गर्भगृहाव्यतिरिक्त सभामंडप, नृत्यमंडप व भोगमंडप आढळतात. गर्भगृहावर सु. ६१ मी. उंचीचे ‘विमान’ असून त्यावर गरुडध्वज व सुदर्शनचक्र आहे. विमानावर व मंदिरावर विविध प्रकारची सुंदर चित्रे कोरलेली आहेत. त्यांत काही कामशिल्पेही आहेत. मंदिराची व्यवस्था राज्य शासनाने नेमलेल्या समितीकडे आहे.

जगन्नाथ मंदिरात पंचामृताभिषेक, अग्निपूजा, महापूजा, महानैवेद्य, वस्त्रालंकारादी राजभोग इ. कार्यक्रम अहोरात्र चालू असतात.जगन्नाथाची रथयात्रा विशेष प्रसिद्ध असून ती आषाढ शु. द्वितीयेला सुरू होते. कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिघांच्याही रथांची यात्रा असते. यात्रेसाठी भारतातून लाखांवर भाविक जमतात. या रथाखाली सापडून मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, अशी भाविकांची समजूत आहे. जगन्नाथाचा जड रथ हजारो लोक ओढून नेतात, यावरून पुष्कळ लोकांच्या श्रमांमुळेच पूर्ण होऊ शकणाऱ्या कामाविषयी ‘जगन्नाथाचा रथ’ असा वाक्‍प्रचार रूढ झाला.

फाल्गुन शुद्ध द्वादशीला गोविंद द्वादशी म्हणतात व तो जगन्नाथाचा जन्मदिवस मानतात. या तिथीला पुष्य नक्षत्र असल्यास पुरीला समुद्रस्नानासाठी मोठी यात्रा जमते. मार्कंडेय सरोवर, कृष्णवट, बलराम समुद्र, इंद्रद्युम्न कुंड ही येथील मुख्य तीर्थस्थाने होत.

येथे धर्मशाळा, पुरीच्या राजाचा राजवाडा, महाविद्यालय, वेधशाळा व अनेक विश्रामगृहे आहेत. पुरीचा समुद्रकिनारा हे तर प्रवाशांचे खास आकर्षण आहे.

कापडी, सुलभा