वर्धा शहर : वर्धा जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण, लोकसंख्या ८८,४९५ (१९८१). हे शहर नागपूरच्या वायव्येस ७२ किमी.वर असून पूर्वी येथे पालकवाडी (भाजी पिकवणारी वाडी) नावाची लहान वस्ती होती. या पालकवाडीचा नियोजनबद्ध विस्तार करून वाढलेल्या वस्तीस वर्धा नदीवरून वर्धा हे नाव देण्यात आले. स्थानिक लोक अजूनही याचा पालकवाडी म्हणून उल्लेख करतात. हे शहर १८६६ पासून जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र करण्यात आले. १८७४ मध्ये या शहरात नगर परिषदेची स्थापना झाली.

महात्मा गांधींनी १९३४ मध्ये आपल्या सेवा-कार्यासाठी वर्धा शहराची निवड केली. त्यानंतर त्या शहराचे महत्त्व वाढले. जवळच असलेल्या सेवाग्राम व पवनार येथे महात्मा गांधी व विनोबाजींनी वास्तव्य केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील अनेक राजकीय नेते वर्धा शहरास भेट देऊ लागले. गांधींनी ‘छोडो भारत’ची चळवळ येथेच सुरू केली. जे. सी. कुमारप्पा, आचार्य आर्यनायकम्, कृष्णदास जाजू, विनोबा भावे व इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी वर्धा येथे येऊन सेवा-कार्य केले.

वर्धा हे राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्य कार्यालय असून हिंदुस्थानी प्रचार सभाही (स्था. १९६२) येथे आहे. येथील मगन संग्रहालय (स्था. १९३८) प्रसिद्ध असून त्यात खादी व ग्रामोद्योगांच्या विविध वस्तू व त्या वस्तू तयार करण्याच्या पद्धती, त्या वस्तूंना लागणारे साहित्य इत्यादींची माहिती पहावयास मिळते.

वर्धा शहरात बजाज मंदिर, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, तसेच गृहविज्ञान व समाजकल्याणविषयक प्रशिक्षण देणारा महिलाश्रम असून जवळच दत्तपूर कुष्ठधाम (स्था. १९३६) आहे. येथील लक्ष्मीनारायण मंदिर (स्था. १९०५), बालमंदिर, ग्रामसेवा मंडळ व विविध शिक्षणसंस्था कार्यरत आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेत्यांचे काँग्रेस परिषदा व सभांच्यावेळी जवळील बजाजवाडी येथेच वास्तव्य असे.

वर्धा शहर हे विदर्भातील प्रमुख वाहतूक व व्यापारी केंद्र आहे. मुंबई-हावडा व दिल्ली-मद्रास या प्रमुख लोहमार्गांवर वर्धा हे शहर आहे. येथील कापसाचा व्यापार मोठा आहे. शहरात १० स्थायी चित्रपटगृहे व ६ फिरती चित्रपटगृहे, तसेच एक शासकीय रुग्णालय आहे. यांशिवाय हातमाग उद्योग, बांबूकाम, कापूस वटण-दाबणी कारखाने व तेलगिरण्या आहेत. धाम (पवनार) नदीचे पाणी वर्धा शहरास पुरविण्यात येते. वर्ध्यातून ४ दैनिके, ८ साप्ताहिके व दोन मासिके प्रसिद्ध होतात. सेवाग्राम रस्त्यावर औद्योगिक वसाहत आहे.

मगर, जयकुमार