कार्डिफ : ग्रेट ब्रिटनच्या वेल्स विभागातील सर्वांत मोठे आणि वेल्सच्या राजधानीचे शहर. लोकसंख्या २,७८,२२१ (१९७१). हे उद्योगधंद्यांचे व जागतिक व्यापाराचे बंदर ग्लॅमॉर्गन परगण्याचे मुख्य ठाणे असून, टॅफ नदीच्या मुखाशी ब्रिस्टलच्या खाडीवर वसलेले आहे. ते लंडनपासून सु.२४० किमी. पूर्वेस आहे. अटलांटिक महासागरातील उष्ण प्रवाह व त्यावरुन सतत येणारे दमट पश्चिमी वारे, यांमुळे येथील हवा वर्षभर उबदार व दमट असते. येथील ‘कॅथेज पार्क’ मध्ये न्यायालये, सिटी हॉल, युनिव्हर्सिटी कॉलेज, ग्लॅमॉर्गन काउंटी हॉल, वेल्स कॉलेज ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इ. महत्त्वाच्या व प्रेक्षणीय इमारती आहेत. येथील जुना नॉर्मन किल्ला शहराच्या मध्यभागी आहे. तेथे आता संगीत व नाट्य यांचे महाविद्यालय आहे. शहराजवळच्या मोकळ्या जागांत फुटबॉल, क्रिकेट, मैदानी व मर्दानी खेळ, सायकलिंग इ. खेळ चालतात. टॅफ नदीवर दोन महत्त्वाचे पूल आहेत. गावात अनेक ऐतिहासिक प्रार्थनामंदिरे आहेत. १९४१ मध्ये हवाई हल्ल्यात शहराची फार हानी झाली. परंतु आता त्याची पुनर्रचना झाली आहे. १९५८ मध्ये येथे ब्रिटिश एम्पायर अ‍ँड कॉमनवेल्थ गेम्सचा सहावा मेळावा भरला होता. येथील कथील, लोखंड, पोलाद, तांबे, ॲल्युमिनियम आदी धातुकाम व यंत्रांचे सुटे भाग उत्तम दर्जाचे असतात. धातुशुध्दीच्या कारखान्यांबाबत वेल्समधील स्वान्झीच्या बरोबरीने कार्डिफचे नाव घेतले जाते. त्यासाठी धातुके आयात केली जातात. शिवाय पशुपालन, बिस्किटे, यंत्रे, प्लॅस्टिक, रसायने, कापड, विद्युत्‌ यंत्रे, जहाजबांधणी व दुरूस्ती इ. व्यवसाय आहेत. किनाऱ्याजवळच लोखंड व पोलादाचा मोठा कारखाना आहे. आजूबाजूच्या प्रदेशातील कोळशाच्या खाणींमुळे व त्याच्या निर्यातीमुळे कार्डिफ प्रथम औद्योगिक दृष्ट्या उदयास आले. कोळसा निर्यात करणाऱ्या जगातील प्रमुख बंदरांत कार्डिफची गणना होते.

यार्दी, ह.व्यं.