धुळे शहर : महाराष्ट्र राज्याच्या धुळे जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,३७,१२९ (१९७१). हे मुंबई–दिल्ली लोहमार्गावर चाळीसगाव स्थानकापासून वायव्येस ५७ किमी.वर चाळीसगाव–धुळे लोहमार्ग फाट्यावर व मुंबई–आग्रा महामार्गावर मुंबईपासून सु. २९० किमी.वर पांझरा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मराठेशाहीत पुण्याहून उत्तरेकडे हिंदुस्थानात जाण्याच्या मार्गावरील याचे स्थान महत्त्वाचे होते. याच्या दक्षिणेस लळींग टेकड्या व पूर्वेस आणि पश्चिमेस काहीसे उजाड, ऊर्मिल माळरान आहे. देवपूर, नेहरूनगर, विष्णुनगर, कुमारनगर, मोगलाईपुरा, माधवपुरा, जुने धुळे, नवी पेठ इ. या शहराचे भाग आहेत. नदीवर दोन बांधीव घाट आहेत.

प्राचीन अश्मयुगात अशोकाच्या व सातवाहनांच्या काळात येथे वस्ती होती असे दिसून आले आहे. चालुक्य, राष्ट्रकूट व यादव यांच्यानंतर येथे खल्‌जीचा व नंतर फारूकी राजांचा अंमल आला. मलिक राजा फारूकी याने देवपूर व जुने धुळे येथील गढ्या बांधल्या. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे व इंग्रज यांच्या सत्ता होऊन गेल्यावर धुळे स्वतंत्र भारतात आले. १८०३ च्या दुष्काळात धुळे पार ओस पडले होते. विंचूरकरांच्या पदरचा बाळाजी बळवंत याने ते पुन्हा वसविले. त्याने देवपूर गढीची दुरुस्ती केली व जुन्या धुळ्यात गणेशपेठ वसविली. १८१९ नंतर कॅप्टन ब्रिग्ज या पहिल्या ब्रिटिश रेसिडेंटने धुळ्याचे महत्त्व ओळखून ते जिल्ह्याचे ठाणे केले. त्याने नवे धुळे व (ब्रिग्ज) पेठ हे भाग वसविले. त्याने लोकांना घरांसाठी फुकट जागा दिल्या, कर माफ केले, बाहेरून कारागीर आणविले आणि मग व्यापारी व दुकानदार येऊन उद्योगधंदे वाढले व शहराची भरभराट सुरू झाली.

धुळे शहराचे दृश्य

शहरात दक्षिणोत्तर गेलेले सात प्रमुख समांतर रस्ते असून त्यांतच मुंबई–आग्रा महामार्ग आहे. वाढत्या गर्दीमुळे त्यावरील रहदारी आता बाजूला वळविली आहे. पूर्व–पश्चिम जाणाऱ्या उपरस्त्यांनी बनविलेल्या चौकांपैकी गांधीचौक मध्यवर्ती व गर्दीचा आहे. शहराच्या उंच पश्चिम भागात शासकीय कार्यालये, सार्वजनिक व धनिकांच्या इमारती, शैक्षणिक संस्था इ. आहेत. मानव्यविद्या व शास्त्र महाविद्यालय असलेले देवपूर उपनगर नदीवरील पुलापलीकडे आहे. तेथून दक्षिणेकडे दूरवर लळींग टेकड्या व पुलापलीकडे झाडीतून डोकी वर काढणारी धुळ्याच्या देवळांची शिखरे, घरांची छपरे, बागा, आमराया व हिरवी शेते यांचे मनोरम दृश्य दिसते.

धुळ्याचे हवामान हिवाळ्यात सुखकारक (सु. १६° से.) व उन्हाळ्यात अत्यंत उष्ण (सु. ४५° से.) असते. वार्षिक पाऊस सरासरीने सु. ६१·७ सेंमी. पडतो. त्यापैकी ५१·८ सेंमी. जून ते सप्टेंबर या काळात पडतो. याच्या भोवतीच्या प्रदेशात कापूस, ज्वारी, बाजरी, गहू, तेलबिया इ. पिके तसेच आंबे आणि इतर फळे होतात. त्यांची खरेदी–विक्री धुळ्यात होते.

पारोळे रस्त्यावर इमारती लाकूड कापण्याच्या गिरण्या व त्यांची गुदामे आहेत. मुंबई–आग्रा व धुळे–चाळीसगाव रस्त्यांवर मोटारदुरुस्तीचे कारखाने, कापूस पिंजण्याच्या व गठ्ठेबांधणीच्या गिरण्या, सूत कातण्याच्या व कापड विणण्याच्या गिरण्या, हातमाग, यंत्रमाग, विड्या वळणे, लाकडी सामान, छापखाने, तेलाच्या मोठ्या गिरण्या इ. आहेत. एक शेतमाल बाजार समिती आहे. शहरानजीक लोहमार्गस्थानक आहे. बसस्थानकापासून राज्यपरिवहन महामंडळाच्या बसगाड्या अनेक महत्त्वाच्या गावी जा-ये करतात.

धुळ्याला डेडरगाव व पांझरा पाणीपुरवठा केंद्रांतून गाळलेल्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरात बांधीव उघडी गटारे असून भुयारी गटारांची योजना मंजूर झालेली आहे. १८६२ मध्ये स्थापन झालेली नगरपालिका शहराचा कारभार पाहते. शहरात कापडबाजार, धान्यबाजार आणि फळे व भाजीपाला बाजार असून पांझरा नदीवरील मोठ्या पुलाखेरीज देवपूरला जोडणारा एक सांडवाही बांधलेला आहे.

शहरात एक आयुर्वेदीय दवाखाना व पाच दवाखाने पाश्चात्त्य वैद्यकाचे असून शासकीय मुलकी रुग्णालय, एक मिशन रुग्णालय, क्षयरोग चिकित्सा केंद्र, अनेक खाजगी दवाखाने, शुश्रुषागृहे, प्रसूतिगृहे व कुटुंबनियोजन केंद्रे आहेत. जिल्हा परिषदेचा गुरांचा दवाखाना असून साथीचे रोग व त्यांचा प्रसार यास आळा घालण्याच्या सोयी उपलब्ध आहेत.

नगरपालिकेच्या व खाजगी शिक्षणसंस्थांच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यामिक शाळा असून येथील गरुड हायस्कूल सर्वांत जुने आहे. मानव्यविद्या व शास्त्र, वाणिज्य, शेतकी, मूलोद्योग प्रशिक्षण, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण, माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण इत्यादींची महाविद्यालये, औद्योगिक व तांत्रिक शिक्षण संस्था इ. शैक्षणिक सोयी भरपूर आहेत.

राजवाडे संशोधन मंदिर व श्रीसमर्थ वाग्‌देवता मंदिर या धुळ्याला भूषणभूत संस्था असून त्यांची ग्रंथालये व नगरपालिकेचे ग्रंथालय, उर्दू ग्रंथालय, प्राणिरक्षक संस्थेचे ग्रंथालय, गरुड ग्रंथालय व इतरही ग्रंथालये आहेत. मंडळे, मनोरंजनसंस्था व क्रिडासंस्था, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, नगरपालिकेचे खुले नाट्यगृह व क्रीडागृह, सरदार पटेल उद्यान व इतर तीन उद्याने तसेच विठोबाचे, रामाचे, गणपतीचे, ज्ञानेश्वरांचे, नवग्रंहांचे, आग्रा रोडवरील पट्टाभिरामाचे, जुन्या धुळ्यातील एकवीस देवांचे व जैनांची दोन अशी मंदिरे, नारायण महाराजांचा मठ, नवीनच झालेले त्रिविक्रम मंदिर, मशिदी, चर्च इ. सांस्कृतिक व धार्मिक महत्त्वाची स्थाने आहेत. पश्चिमेकडील पाच किमी. वरील नकना तलावाचे पाणी शेतास पुरविणारा पाट शहराच्या ऐन मध्यातून जातो. गावात म. गांधी, म.ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप यांचे प्रेक्षणीय पुतळे आहेत.

कुमठेकर, ज. ब.