बर्न्स, सर अलेक्झांडर :(१६ मे १८०५-२ नोव्हेंबर १८४१). ब्रिटिश अंमलदार व प्रवासी. स्कॉटलंडच्या फॉरशर (अँगस) काउंटीतील माँट्रोझ येथे जन्म. १८२२ च्या सुमारास तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाला आणि सुरत येथील वखारीत दुभाष्याचे काम पाहू लागला. नंतर त्याच्या कर्तबगारीमुळे कच्छचा राजदूत म्हणून त्याची नेमणूक झाली. तेथील वास्तव्यात (१८२३-२९) अफगाणिस्तान व मध्य आशिया यांच्या इतिहास-भूगोलासंबंधी त्याने बराच अभ्यास केला. पुढे ब्रिटिश सम्राट चौथा विल्यम याच्यातर्फे पंजाबचा रणजितसिंग यास घोडा नजर करण्याची कामगिरी बर्न्सकडे सोपविण्यात आली (१८३१). यामुळे त्यास लाहोरला जाण्याची संधी मिळाली. नंतर १८३२ मध्ये तो पेशावर , काबूलमार्गे प्रवास करीत हिंदुकुश पर्वत पार करून बूखारा, मेशेदमार्गे कॅस्पियन समुद्रकिनारी आला. तेथून तो तेहरान, बूशीरमार्गे इराणच्या आखातापर्यंत गेला. नंतर तो इंग्लंडला परतला (१८३३). १८३४ मध्ये त्याने ट्रव्हल्स इंटू बूखारा मॅप ऑफ सेंट्रल एशिया या पुस्तकांद्वारे आपला प्रवास वृतांत प्रसिद्ध केला. बर्न्सला १८३६ मध्ये अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाकडे राजकीय मसलतीसाठी पाठविण्यात आले. हिंदुस्थानचा तत्कालीन गव्हर्नर जनरल ऑक्लंड (कार. १८३५-४२) याने बर्न्सच्या सल्ल्याविरूद्ध अफगाणिस्तानमध्ये अप्रिय असलेल्या अमीर शाह शुजाला पाठिंबा देऊन त्याला गादीवर बसविण्यासाठी मॅकनॉटनबरोबर बर्न्सला पाठविले. १८३९ मध्ये त्याची काबूल येथे पोलिटिकल एजंट म्हणून रीतसर नेमणूक झाली. तेथे असतानाच त्याचा खून झाला. [⟶ इंग्रज-अफगाण युद्धे].  

शाह, र. रू. गाडे, ना. स.