यंग्झटाउन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ओहायओ राज्यातील माहोनिंग परगण्याचे मुख्य ठिकाण आणि प्रसिद्ध लोह-पोलाद उत्पादक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या १,१५,४२९ (१९८०). ओहायओ राज्याच्या ईशान्य भागात पेनसिल्व्हेनिया राज्याच्या सरहद्दीजवळ माहोनिंग नदीकाठी हे वसले आहे. वायव्येकडील क्लीव्हलँड आणि आग्नेयीकडील पिट्सबर्ग या दोन्ही शहरांपासून सारख्याच अंतरावर (१०५ किमी.) हे शहर आहे. जॉन यंग या न्यूयॉर्कच्या सर्वेक्षकाने १७९७ मध्ये ‘कनेक्टिकट लँड कंपनी’ कडून जमिनीचा एक भाग विकत घेऊन त्या ठिकाणी या नगराची स्थापना केली. त्याच्या नावावरूनच या नगराला ‘यंग्झटाउन’ हे नाव देण्यात आले. या नगराचा प्रारंभिक विकास घडवून आणण्यात कर्नल जेम्स हिलमन या स्थानिक व्यापाऱ्याचा सिंहाचा वाटा आहे. नगराच्या परिसरात लोह खनिजाचे साठे सापडल्यावर जेम्स व डॅनिएल हिटन यांनी धातूंचा रस करण्याची वाऱ्याच्या झोताने चालणारी राज्यातील पहिली भट्टी येथे बांधली (१८०५). त्यानंतर याच्या जवळपास कोळसा व चुनखडीचे साठे सापडले. त्यांचा लोह खनिज वितळविण्यासाठी उपयोग करण्यात येऊ लागला. परिणामत यंग्झटाउन हे प्रमुख लोहउत्पादक केंद्र बनले. येथे पहिला पोलाद कारखाना सुरू होऊन १८९५ मध्ये अल्पावधीतच लोहउत्पादनाऐवजी पोलाद उत्पादनासाठी यंग्झटाउन प्रसिद्धीस आले. सांप्रत माहोनिंग नदीकाठी पोलाद उत्पादनाचे अनेक कारखाने स्थापन झाले असून यंग्झटाउनचे एका विस्तृत पोलाद उद्योगसमूहात रूपांतर झाले आहे. या समूहात वॉरन, नाईल्झ, कँबेल, स्ट्रघर्झ व जिरार्ड या शहरांचा समावेश होतो. पोलाद उद्योगाशिवाय ॲल्युमिनियम, उत्सर्जित अस्फाल्ट, फरशी, विमाने, स्वयंचलित यंत्रे व त्यांचे सुटे भाग, रबरी व कागदी वस्तू, वादळापासून संरक्षण करणारे दरवाजे व खिडक्या, कार्यालयीन फर्निचर, सिमेंट व सिमेंटच्या वस्तू, विजेचे दिवे, पन्हाळी पत्रे, शिक्के, लाटणयंत्र उपकरणे, छायाचित्र उपकरणे इत्यादींचेही कारखाने येथे आहेत. यंग्झटाउनला १८०२ मध्ये वसाहतीचा, १८४८ मध्ये नगराचा, तर १८६७ मध्ये शहराचा दर्जा देण्यात आला. येथे ‘यंग्झटाउन स्टेट युनिव्हर्सिटी’ असून सुरुवातीला (१९०८) ती केवळ एक रात्रशाळा होती. निसर्गसुंदर ‘मिल क्रीक पार्क’ (क्षेत्र ९९० हेक्टर) हे लोकांचे मुख्य आकर्षण असून तीत सरोवरे व एक धबधबा असलेल्या १० किमी. लांबीच्या एका निदरीने या उद्यानाचे दोन भाग केले आहेत. शहरात संगीत, नाट्य, रंगचित्रकला, शिल्पकला इत्यादींबाबतच्या सुविधा पुरविणाऱ्या ‘बटलर इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकन आर्ट’, ‘यंग्झटाउन प्लेहाउस’, ‘यंग्झटाउन सिंफनी सेंटर’, ‘मंडे म्युझिकल क्लब’ इ. संस्था आहेत. ‘आर्म्स म्यूझीयम’ हे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, ‘ऱ्यूबन मॅकमिलन फ्री लायब्ररी’, ‘फोर्ड नेचर एज्युकेशन सेंटर’ व लँटरमन मिलसारखी काही ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे येथे पहावयास मिळतात.

चौधरी, वसंत