अंदमान व निकोबार : बंगालच्या उपसागरात उ. अक्षांश ६ ४५’ ते १३ ४५’ व पू. रेखांश ९२१५’ ते ९४ १३’ यांच्या दरम्यान वसलेला भारताचा केंद्रशासित प्रदेश. अंदमान (६,३४०) व निकोबार (१,९५३) मिळून एकूण क्षेत्रफळ ८,२९३ चौ.किमी. व  लोकसंख्या ११५,०९० (१९७१). याच्या पूर्वेकडील समुद्रास ‘अंदमान समुद्र’ म्हणतात. उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, बाराटांग व रटलंड या पाच बेटांनी मिळून झालेले मोठे अंदमान, त्याच्या दक्षिणेचे छोटे अंदमान, पूर्वेकडील रिची द्वीपसमूह व इतर लहानमोठी धरून एकूण २५७ बेटे मिळून अंदमान बेटे होतात. १० उत्तर अक्षवृत्ताच्या दक्षिणेस, छोट्या अंदमानपासून ९६ किमी. वरील कारनिकोबार, तेरेसा, कामोर्ता, त्रिंकत, नानकवरी, काचाल, छोटेनिकोबार, मोठे निकोबार इ. एकूण ६२ बेटे मिळून निकोबार बेटे होतात. अंदमान बेटांची एकूण लांबी ३५२ व निकोबारांची २३२ किमी. आहे. सरासरी रुंदी सु. २५ किमी. आहे. हुगळीच्या मुखापासून आग्नेयीस ही बेटे ९५० कि.मी. ब्रह्मदेशातील नेग्राईस भूशिराच्या दक्षिणेस १९३ किमी. व सुमात्रा बेटाच्या ॲचिनहेड टोकाच्या पश्चिमेस १४६ किमी. अंतरावर आहेत. त्यांचे हे स्थान भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याचे आहे. पोर्ट ब्लेअर हे राजधानीचे शहर कलकत्ता व मद्रासपासून अनुक्रमे १,२५५ व १,१९१ किमी. दूर आहे. अंदमानला शहीद द्वीप व निकोबारला स्वराज्य द्वीप अशी नवी नावे सुचविली आहेत.

भूवर्णन : ही बेटे म्हणजे समुद्रतळावरील सुं. ७,००० मी. उंचीच्या पर्वतश्रेणींचा माथ्याचा भाग असून त्यांची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची सु. ३३५ मी. आहे. कारनिकोबार व छोटे अंदमान ही बहुतेक सपाट आहेत. बाकी सर्व डोंगराळ आहेत. उत्तर अंदमानामधील सॅडल शिखर ७३१⋅५ मी. व ग्रेट निकोबारमधील मौंट थुलियर ६४२ मी. उंच आहे. टेकड्याटेकड्यांमधील सखल भागांत काही ठिकाणी समुद्राचे फाटे आलेले आहेत, तर काही ठिकाणी सपाट मैदानी प्रदेश आहेत. किनारा अतिशय दंतुर असून त्यावर अनेक खाड्या व सुरक्षित बंदरे आहेत. बेटांचा कोणताही भाग समुद्रापासून १६ किमी. पेक्षा अधिक दूर नाही. अंदमानच्या उत्तरेकडील प्रिपॅरिस खाडी (सु.१,००० मी. खोल), अंदमान व निकोबार यांमधील १० अक्षांश (टेन डिग्री) खाडी (सु. ८०० मी. खोल) व ग्रेरेट निकोबार आणि सुमात्रा यांमधील ग्रेट खाडी (सु. १,५०० मी. खोल ) यांखेरीज बेटांजवळचा समुद्र उथळ (सु. २०० मी. खोल) आहे. पश्चिमेस सु. ५० किमी. पलीकडे बंगालचा उपसागर व पूर्वेस सु. १५० किमी. पलीकडे अंदमान समुद्र हे सु. ४,००० मी. खोल आहेत. मुख्य बेटांपासून सु. १००-१२५ किमी. दूर असलेली बेटे म्हणजे पश्चिमेस सेंटिनल बेटे व पूर्वेस बॅरन आणि नारकोंडम ही बेटे होत. बॅरन बेट हा एक सुप्त ज्वालामुखी १५३ मी. उंच आहे. १९ व्या शतकाच्या सुरवातीस त्याचा स्फोट झाला होता. नारकोंढम हा ७१० मी. उंचीचा एक मृत ज्वालामुखी असून त्याच्या मुखाचा भिंतीसारखा भाग पार नाहीसा झाला आहे.

अंदमान व निकोबार बेटांतील भूस्तरांचे अनुक्रमे आराकान योमाशी व सुमात्रामधील भूस्तरांशी बरेच साम्य दिसते. इओसीन कालातील वालुकाश्म, त्यांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घुसलेले डाइक, झिजेमुळे धारदार व टोकदार स्वरूप आलेले चुनखडक काही ठिकाणी सर्पेटाइन खडक, निळसर झाक असलेले पंकाश्म, पिंडाश्म, प्रवाली खडक व उत्थानाने तयार झालेल्या पुळणी, असे येथील भूरचनेचे निरनिराळ्या भागांतील सामान्य स्वरुप आहे. समुद्रातही प्रवाली खडकांच्या ओळी आढळतात. या बेटांतील डोंगरकणे क्रेटेशियस कालखंडात तयार झाले असावेत. निकोबार बेटे व बॅरन आणि नारकोंडम बेटे यांना जोडणाऱ्या रेषेवर पृथ्वीचा पृष्ठभाग काहीसा अधू आहे त्यामुळे निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के वारंवार बसतात. 

अंदमानातील जलप्रवाह लहान, उन्हाळयात आटणारे, परंतु वेगवान आहेत. त्यातल्या त्यात दक्षिण अंदमानमधील प्रवाह थोडेसे लांब व बारमाही आढळतात. ग्रेट निकोबारमध्ये काही नद्या आहेत. 

एकंदर हवामान नेहमी दमट व उष्ण असते, परंतु खाऱ्या वाऱ्यांमुळे ते थोडेसे आल्हाददायक होते. जवळजवळ सर्व ठिकाणी कमाल तपमान २९ ते ३१ से. असून किमान तपमान २४ ते २५से. असते. नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे या बेटांत पाऊस पडतो. दक्षिण अंदमानमध्ये व निकोबार बेटांत तो जवळजवळ वर्षभर असतो. पर्जन्यमान दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. या बेटांवरील सरासरी पर्जन्यमान ३१२ सेंमी. आहे. वर्षभर येथे सोसाट्याचे वारे असतात व वर्षातून साधारणपणे ४५ दिवस झंझावातांचा त्रास होतो. 

एकूण जमिनीच्या ७७ टक्के भाग जंगलव्याप्त असल्याने सर्वत्र घनदाट वनस्पतीचे आच्छादन दिसते. अंदमानमधील वनस्पतींचे तीन भाग पडतात: सदाहरित, पानझडी  व किनारपट्टीवरील वृक्षराजी. अंदमानमधील जंगलसंपत्ती भारतीय अर्थकारणाच्या-परकीय चलन मिळविण्याच्या-दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. फणस, बांबू, पळस, नारळ, सुपारी, सागाच्या काही जाती, शिसवी, गरजन, सॅटीनवुड, कोको, पडाउक, मार्बलवुड, चुई, पपीता वगैरे झाडे आहेत. बांधकाम व रेल्वे स्लीपर्सकरिता यांपैकी काही झाडे उपयोगी आहेत. बऱ्याच ठिकाणी एकाच जातीची झाडे जवळजवळ आढळतात, हे व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरते. कठिण व मऊ दोन्ही प्रकारचे लाकूड मिळते आणि प्लायवुड (गरजन) व आगकाड्या (पपीता) यांना उपयुक्त लाकूडही पुष्कळ मिळते. निकोबारमध्ये नारळ प्रमुख असून सुपारी, अनेक प्रकारचे सुंदर ताडवृक्ष  व काही इमारती लाकूड देणारे वृक्ष येथे आढळतात.


पावसाच्या परिणामामुळे ६०० ते ९०० मी. उंचीच्या प्रदेशात जांभ्या दगडापासून तयार झालेली जमीन आढळून येते. नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या जमिनी आढळतात, तर किनारपट्टयांवरील जमिनीत रेतीचे प्रमाण जास्त असते. दमट व उष्ण प्रदेशात तयार होणाऱ्या जांभ्या दगडाच्या जमिनीत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी आढळून येते व पावसामुळे त्यांची धूपही जास्त होते. गाळाच्या जमिनीत मात्र चिकण मातीचे प्रमाण ५०% असून ती सिलिका द्रव्याने युक्त असते. किनाऱ्यावरील जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त आहे.   अंदमान व निकोबार

अंदमान बेटांतील खनिजसंपत्तीची अजून योग्य प्रकारे भूवैज्ञानिक दृष्टया पाहणी झालेली नसून ज्ञात असलेली खनिजे आर्थिक दृष्ट्या  किफायतशीर नाहीत. रेतीच्या खडकांत व चुनखडकांत निकृष्ट प्रकारचा दगडीकोळसा आढळत असून पोर्ट ब्लेअरच्या आसपास क्रोमियम, तांबे, लोखंड व गंधकाचे थोडेसे साठे आहेत. थोडे अभ्रक व संगमरवरही आहे. निकोबारमध्ये थोडे तांबे सापडते. बाराटांग व हॅवलॉक बेटांत तेल व गॅस मिळण्यासारखा आहे. माकडे व सरपटणारे प्राणी विपुल असून सर्पांच्या वेगवेगळ्या जाती येथे आढळतात. रानडुक्करे, हत्ती, पाणघोडे, मगरी, सुसरी, कासवे, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, जळवा व पक्षी येथे विपुल आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : भारत, ब्रह्मदेश आणि अतिपूर्व यांमधील दळणवळणाच्या वाटेवर असल्यामुळे या बेटांची काही माहिती प्रवासी, व्यापारी व चाचेलोकांकडून मिळत असे. तथापि बराच काळापर्यंत ती दुर्लक्षितच राहिली. नेग्रिटो वंशाच्या लोकांना ही बेटे प्रथम ज्ञात झाली असावीत. प्राचीन अरब व भारतीय व्यापाऱ्यांच्या लिखाणांत यांचा निर्देश आढळतो. दुसऱ्या शतकात टॉलेमीने या बेटांचा उल्लेख ‘विविध प्रकारचे शंखशिंपले मिळणारे बेट’ म्हणून केलेला आढळतो. सातव्या शतकातील इत्सिंग, तेराव्या शतकातील मार्कोपोलो, १४ व्या शतकातील फ्रायर ओडोरिक व १५ व्या शतकातील निकोलो काँटी इत्यादिच्या प्रवासवृत्तांतून बेटांचा उल्लेख सापडतो. ‘अंदमान’ हे नाव हनुमान यावरून व निकोबार हे १०५० मधील तंजावर शिलालेखात उल्लेखिलेल्या नेक्कावरम् (विवस्त्र लोकांची भूमी) यावरून आले असावे असे मानतात. १७ व्या शतकात त्यांकडे यूरोपीय लोकांचे लक्ष वेधलेले दिसते. त्यांनी तेथे वसाहती करून तेथील मूळच्या लोकांचे धर्मांतर करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पोर्तुगीज व फ्रेंच धर्मप्रचारकांनंतर १७५६ मध्ये डेन लोकांनी या बेटाचा ताबा घेतला. मोराव्हियन मिशनची मदत घेऊनही यश न आल्यामुळे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ मध्ये येथून काढता पाय घेतला. अंदमान बेटांच्या इतिहासाचे चार कालखंड पडतात : १७८८ पर्यंतचा चाच्यांच्या उपद्रवाचा काल १७८८-१९४१ ब्रिटिश राजवटीचा काल १९४१-४५ जपानी अंमलाचा काल व १९४७ नंतरचा भारतीय काल. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातल्या कैद्यांपासून सावरकरांपर्यंत अनेक देशभक्तांना येथील कुप्रसिद्ध बंदिशाळेत ठेवण्यात आल्यामुळे ब्रिटिशकालात ही बेटे म्हणजे काळ्या पाण्याची सजा भोगण्याचे ठिकाण मानण्यात येऊ लागले. जपान्यांनी १९४२ मध्ये या बेटांचा कब्जा घेतला व या द्वीपांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. १९४७ नंतर ही बेटे स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली.

भारतीय संविधानाप्रमाणे या बेटांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा आहे. पोर्ट ब्लेअर हे कारभाराचे मुख्य ठाणे आहे. एक प्रशासक काही अधिकाऱ्यांच्या साहाय्याने या बेटांचा कारभार पाहतो. निकोबार बेटांसाठी एक साहाय्यक प्रशासक असतो. त्याचे कार्यालय कारनिकोबार येथे असते. १९६७ पासून ह्या बेटांचा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला एक प्रतिनिधी लोकसभेत असतो. प्रशासकाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी निवडतात. अंदमानमध्ये २६ ग्रामपंचायती व ३१ न्यायपंचायती आहेत. निकोबारमध्ये परंपरागत पंचायतपद्धती आहे. येथील न्यायालये कलकत्ता हायकोर्टाच्या अधिकारकक्षेत आहेत.

आर्थिक स्थिती : घनदाट झाडी व जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनी असल्याने येथे फारच थोडी जमीन शेतीकरिता उपलब्ध आहे. डास व जळवा या दोन्हींचा उपद्रव येथे होतो. उपलब्ध असलेल्या जमिनीपैकी फारच थोडी जमीन विरळ लोकवस्तीमुळे कसली जाते. एकूण ७,४४१ हेक्टर जमीन भाताच्या लागवडीखाली असून भात व नारळ ही दोन मुख्य पिके आहेत. केळी, चिकू, अननस ही फळे होतात. निकोबार बेटांत पोपया, मोसंबी, संत्री, लिंबे ही फळे होतात. येथे स्पंजही सापडतो. कॉफी,कोको,रबर,लाख व मसाल्याचे पदार्थ यांचे उत्पन्न काढण्याचे  भारत सरकारचे प्रयत्न आहेत. लाकूड हेच महत्वाचे उत्पन्न आहे. दरसाल ६०,००० मेट्रिक टन लाकडाचे उत्पादन होऊ लागले आहे. किनारपट्टीवर मच्छीमारी चालते. परंतु मच्छीमारीची पद्धत मात्र जुनीच आहे. शंख-शिंपले गोळा करणे, कासवे पकडणे हे इतर उद्योग आहेत. अंतर्गत भागातील जंगलात शिकार करून रानटी टोळ्या पोट भरतात.

पोर्ट ब्लेअर, रंगत, मायाबंदर, दिगलीपूर, नानकवरी वगैरे ठिकाणी मिळून १,५०० किवॅ. वीज-उत्पादन-सामग्री १९५०-६८ या काळात बसविलेली आहे.

येथील प्रमुख उद्योग जंगलावर अवलंबून आहेत. लाकूडउद्योगाशिवाय व्यवस्थापन, संरक्षण इ. व्यवसायांत साडेचार हजार लोक आहेत. सामान्य अभियांत्रिकी, आगपेट्या, वीजनिर्मिती इ. औद्योगिक क्षेत्रात सु. १,६०० लोक आहेत (१९५९). पोर्ट ब्लेअरला  लाकूड कापण्याची गिरणी व आगपेट्या आणि प्लायवुड यांचे कारखाने व एक छापखाना आहे. कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन, नावा बांधणे, मासेमारी या उद्योगांची वाढ करण्यात येत आहे. सहकारी संस्थांची वाढ करण्यात येत असून १९६८ पर्यंत १८२ सहकारी संस्था, २ शेतीसहकारी संस्था आणि २२ मळे-सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या. शेतकरी व कामगार कुटुंबास परतफेडीचे कर्ज व आर्थिक साहाय्य दिले जाते.


भारत सरकारच्या पुनर्वसन-मंत्रालयातर्फे येथे वसाहती वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. १९६८ पर्यंत बांगला देशीय २,६१४, केरळी १४३, मद्रासी ४७, बिहारी १८४, ब्रह्मी ५ अशा एकूण २,९९३ कुटुंबांत १०,१७४ माणसे होती. १९६१-१९६८ पर्यंत ५४५ सरकारी नोकर व त्यांची कुटुंबे मिळून २,९११ माणसे व राष्ट्रीय विकास दलाचे अधिकारी येथे आले. येथील मुळचे लोक, गुन्हेगार वसाहतीनंतर येथे स्थायिक झालेले लोक व पुनर्वसनासाठी आलेले लोक या सर्वांस सर्व प्रकारची मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे.

येथील मुख्य व्यापार लाकूड व नारळ यांचा आहे. निकोबारमधून काही प्रकारचे मासे, सुपारी, काही पक्ष्यांची खाण्यास योग्य अशी घरटी पूर्वीपासून मुख्यतः चीनकडे जातात. तांदूळ, तंबाखू, कापड, हत्यारे इ. वस्तू आयात होतात.विकासासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू, हत्यारे, यंत्रे, खाद्यपदार्थ वगैरे भारतातून आणाव्या लागतात.

पोर्ट ब्लेअर येथे स्टेट बँकेची शाखा आहे. ती सरकारी तिजोरीचाही कारभार पहाते. १९६६ पासून राज्य सहकारी बँकाही कार्य करीत आहेत. १९६८-६९ च्या अर्थसंकल्याप्रमाणे या बेटांचा मुलकी खर्च ७,१६,२५,००० रु., भांडवली खर्च ३,२८,९७,००० रु. व मुलकी जमा २,४७,२५,००० रु. होती.

या बेटांवर एकूण ३३८ किमी. लांबीचे चांगले रस्ते आहेत. १९६० मध्ये मोटारी, ट्रक, बस वगैरे मिळून २८५ वाहने होती. १९६८ मध्ये पोर्ट ब्लेअरमध्ये २० प्रवासी बसगाड्या होत्या त्या शहरात व ग्रामीण भागातही वाहतूक करतात. बेटाबेटांतील दळणवळणासाठी बोटींचे धक्के बांधले जात आहेत. भारताच्या मुख्य भूमीशी दळणवळण ठेवणाऱ्या तीन आगबोटी आहेत. अंदमानमध्ये पोर्ट कॉर्नवालिस, मायाबंदर ही चांगली बंदरे आहेत. निकोबारमध्ये कामोर्ता, त्रिंकत व  नानकवरी या बेटांनी वेढलेले नानकवरी हे उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहेत. ते पूर्वेकडील एक उत्तम बंदर समजले जाते. कलकत्ता ते रंगूनमार्गे पोर्ट ब्लेअर अशी आठवड्यातून दोनदा विमानवाहतूक सुरू आहे. डाक घरे, दूरध्वनी या सोयीही उपलब्ध आहेत. आकाशवाणी-केद्र १९६१ मध्ये सुरू झाले.

लोक व समाजजीवन : अंदमानमधील मूळ लोक नेग्रिटो वंशाचे आहेत. मलायामधील सेमंग, फिलिपीन्समधील आएटा व सीलोनमधील वेद्द लोकांशी त्यांचे साधर्म्य आढळते. जारवा, ओंगी, सेंटिनेली व शॉमपेन ह्या त्यांच्यापैकी प्रमुख पोटजाती असून त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होतात. टोळीच्या प्रमुखाकडे न्यायनिवाडा, नेमणुका वगैरे गोष्टी असतात. घुमटासारखी घरे, धनुष्यबाण, भाषा, स्त्रियांचे पोषाख व दागिने या बाबतींत जरी साम्य असले तरी प्रत्येक जातीची खास अशी वैशिष्ट्ये आढळतात. उष्ण हवामानामुळे लोक लज्जारक्षणापुरती झाडाची पाने वापरतात. ते अत्यंत सोशिक असून त्यांचा रंग काळा व कातडी तुकतुकीत असते. त्यांच्या बुद्धीची वाढ विशेष झालेली आढळून येत नाही. रानमांजर, कासव, मासे, किडे, कंदमुळे, नारळ, मध हे त्यांचे खाणे आहे. स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षा कमी समजला जातो. घटस्फोटाची चाल त्यांच्यात कमी आढळते. एकपत्नीकत्व, एकपतित्व व पुनर्विवाह या चालीही त्यांच्यात आढळून येतात. पुलुगा या दैवताने सारे जग व्यापलेले आहे असे ते मानतात. वन, सागर व पूर्वजांच्या भुतांची त्यांना भीती वाटते. अंदमानमधील या आदिवासी लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. काही जमाती तर नामशेष होत आहेत किंवा झाल्या आहेत.

निकोबारी लोक अंदमानी लोकांपेक्षा सर्वच बाबतीत भिन्न आहेत. निकोबारी आदिवासी लोक पॉलिनेशियन गटाचे आहेत. ते बसक्या नाकाचे, पिवळसर काळ्या रंगाचे आहेत. निकोबारी लोकांत जातीजमाती अशा नाहीत. निरनिराळ्या बेटांवर राहणारे म्हणून त्यांच्यात फरक असतो, परंतु त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होतो. नारळ हे प्रमुख उत्पन्न असून देण्याघेण्याचे व्यवहार नारळांच्या संख्येत होतात. त्यांचे सर्व व्यवहार त्यांच्या रूढ समजुतीप्रमाणे होतात. काही बंधने कडकपणे पाळतात. उदा., उत्तरेकडील बेटांवरील लोकांनी नावा बांधावयाच्या नाहीत चौरा व तेरेसा बेटांवर चुना तयार करावयाचा नाही, फक्त चौरा बेटावरच मातीची भांडी तयार करावयाची इत्यादि. केवडीची फळे, नारळ, मासे, पादानाऊची फळे, आयात केलेला तांदूळ हे त्यांचे मुख्य अन्न असते. डुकरे, कोंबड्या व बदके वगैरे खास मेजवानीसाठी असतात. या लोकांना पानतंबाखूचा मोठा शोक आहे. तंबाखू ओढतातही. ताडी व दारू पिणे भरपूर प्रचलित आहे. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. जमिनीत रोवलेल्या खांबांच्या आधारावर उभारलेल्या फळ्यांच्या व पानाफांद्याच्या घुमटाकार झोपड्यात पुष्कळ लोक राहतात. संगीत व नुत्य यांची त्यांस आवड आहे. अलीकडे कारनिकोबारमध्ये फूटबॉल हा खेळ लोकप्रिय होऊ लागला आहे. भांडी बनविणे, टोपल्या विणणे, लोखंडाची हत्यारे बनविणे, चटया बनविणे इ. व्यवसाय येथे चालतात.

अंदमान व निकोबार बेटांतील या मूळ रहिवाशांखेरीज तेथील गुन्हेगार वसाहती बंद झाल्यानंतर त्यांपैकी राहिलेले लोक, भारताच्या इतर भागांतून वसाहतीसाठी आलेले निर्वासित, कारभारासाठी आलेले लोक यांची तेथे वस्ती आहे. त्यांचीच संख्या आता मोठी आहे. सु. ६३,००० लोकांपैकी १५,००० लोक आदिवासी असून त्यांतील १४,००० निकोबारमध्ये आहेत. जारवा व सेंटिनेली मिळून ५००, ओंगी आणि शॉमपेन प्रत्येकी शंभराहून थोडे अधिक व अंदमान २३ आहेत (१९६१). नेग्रिटो लोकांची मूळ भाषा अंदमानमधील लोकांच्या भाषेची जननी असून तिचे न्यूगिनीमधील पापुअन व फिलिपीन्समधील आएटा भाषांशी साम्य आढळते. इतर लोकांत हिंदी भाषा प्रमुख आहे. निकोबारी लोकांना एकमेकांच्या भाषा समजत नसल्या म्हणजे ते हिंदी, ब्रह्मी, इंग्रजी इ. भाषा वापरतात.

१९६० मध्ये ७९ शाळांत मिळून ३,६४४ मुले व १,५३५ मुली होत्या. १२२ शिक्षक व ४३ शिक्षिका होत्या. माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मोफत आहे. १९६९ मध्ये ११५ प्राथमिक शाळा, १ शिक्षण-प्रशिक्षण शाळा, १ पूर्व प्राथमिक शाळा, १ सेंट्रल शाळा, १ सरकारी महाविद्यालय होते. विद्यार्थ्यांना भारतात जाऊन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्या दिल्या जातात.  

मलेरिया-निर्मूलनासाठी गावाजवळच्या दलदली नष्ट करण्यात येत आहेत. लोकांना औषधपाणी व शस्त्रक्रियासुद्धा मोफत मिळते. १९६० मध्ये रुग्णालयांत ४१८ खाटा होत्या व २९ दवाखाने होते. तेथे २० डॉक्टर, ६५ परिचारिका, १६ दाया व २१ कंपाउंडर होते. १९६८ मध्ये खाटा ४६१ व दवाखाने ४२ झाले. जनावरांसाठी एक रुग्णालय व चार दवाखाने आहेत. पोर्ट ब्लेअर येथे एक नवीन रुगणालय व ५० खाटांचे क्षयरोगरुग्णालय झाले आहे. त्याशिवाय कारनिकोबार, नानकवरी, बांबूफ्लॅट, मायाबंदर, लाँग आयलंड, रंगत आणि दिगलीपूर येथे रुग्णालये आहेत.


  एक प्राथमिक आरोग्यकेंद्रही चालू आहे. निकोबारच्या मध्य द्वीपसमूहात राष्ट्रीय आरोग्ययोजनेखाली एक मलेरिया व फिलेरिया पाहणी व नियंत्रण-केंद्र आणि एक गुप्तरोग-केंद्र चालू आहे.

पोर्ट ब्लेअर व कारनिकोबार येथे माहितीकेंद्र व ग्रंथालये आहेत. विमान-वाहतुकीमुळे कलकत्याहून ताजी वर्तमानपत्रे मिळू शकतात. पोर्ट ब्लेअरला सरकारी विवरणपत्रिका निघते.

पर्यटनाच्या दृष्टीने ही बेटे आकर्षक आहेत. पोर्ट ब्लेअर व कार्बिन्स कोव्ह येथे पर्यटकगृहे स्थापन झालेली आहेत. पोर्ट ब्लेअर शहर व तेथील कुप्रसिद्ध वर्तुळाकार तुरुंग, बेटावरील रम्य वनश्री, धबधबे, नौकाविहार, जलक्रीडा, बॅरन व नारकोंडम ही ज्वालामुखी बेटे, कारनिकोबार बेट व नानकवरी बंदर, आकर्षक पुळणी, प्रवाळ अशा कितीतरी गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतील अशा आहेत.

भागवत, अ. वि.

कला व क्रिडा : या प्रदेशातील रहिवाशांच्या दैनंदिन गरजा व उपलब्ध सामग्री यांमुळे येथील कला व हस्तव्यवसाय वैशिष्टयपूर्ण ठरले आहेत. येथे गरजनसारख्या लाकडाचे वैपुल्य असल्याने त्याचा वापर घरे, नौका वगैरेंच्या बांधणीत होतो. यातूनच लोकांचे सुतारकामातील नैपुण्यही दिसून येते. जोडनौका व जमिनीपासून उंचावर बांधलेली गोलाकार घरे ही खास वैशिष्ट्ये. नित्योपयोगी लहान कुऱ्हाडी (डाह) तयार करण्यात लोहारकामातील कौशल्य दिसते. येथे स्वतंत्र शिंपी-व्यवसाय नसल्याने स्त्रिया शिवण करतात व कशिदाकामात पारंगत असतात. लोक वेतापासून सफाईदार व मजबूत टोपल्या बनवितात. नारळाच्या शाखा व पाने यांच्या बारीक

पट्टयांनी चट्या विणतात व करवंटीपासून भांडी करतात. केवड्याच्या पानांच्या रंगीबेरंगी चटया अधिक दिखाऊ असतात. कुंभारी चाकाचा वापर न करता बनविलेली घाटदार, सुडौल व रंगविलेली मातीची भांडी हे एक वैशिष्टय. भुताखेतांपासून रक्षण व्हावे म्हणून स्त्रीपुरुषांच्या तसेच पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या लाकडी आकृत्या तयार करुन व रंगवून त्या घरात ठेवतात. यांपैकी काही मूर्तीची मुखे चित्रविचित्र मुखवट्यांसारखी असतात काही अर्धमानवी व अर्धपाशवी असतात. मूर्तीऐवजी कित्येकदा सपाट लाकडी फळ्यांवर चित्रे रंगवून ते फळे घरात ठेवतात. या प्रदेशातील लोकांचा कल भडक रंग वापरण्याकडे असला, तरी रंगसंगतीची जाण त्यांना चांगली असते. डोळ्यांना सुखवणारी व कलात्मक सुसंवादित्व असलेली रंगरचना त्यांच्या नित्योपयोगी व कारागिरीच्या वस्तूंमधून दिसते. केवडा, नारळ, केळी, बांबू इत्यादींच्या पानांचे व फुलांचे हार, चांदण्या, क्रॉस, यांसारखे निरनिराळे आकृतिबंध व अनेकविध वस्तू कारागीर तयार करतात. तिरंदाजीसाठी वा शिकारीसाठी आडव्या दांड्यावर बांधलेली चापाची धनुष्ये बनवितात. संगीत व नृत्य पारंपरिक असते व बहुधा प्रत्येक उत्सवा-समारंभासाठी ठराविक असते. प्रादेशिक संगीत एकसुरी व कंटाळवाणे असते व नृत्य अगदी सामान्य असते. या प्रदेशातील पुरुषांचा प्राचीन पोषाख म्हणजे सिंहाच्या कातड्याचे, कंबरेला बांधावयाचे ‘किसान’ वस्त्र होय. स्त्रिया प्राचीनकाळी गवती झगे वापरीत. हल्ली हे पोषाख फारसे वापरात नाहीत. मात्र गवत व रंगीत कापड यांपासून बनविलेल्या टोप्या अजूनही वापरतात. पादत्राणे फक्त विशेष प्रसंगी वा प्रवासामध्येच वापरली जातात. हे लोक दु:ख, आजार, आनंद, कौमार्य वगैरे अवस्था दर्शविण्यासाठी अंगाला विशिष्ट तऱ्हेने गेरू, रंगीत माती व तेल फासतात. तारेमध्ये नाणी ओवून बनविलेले चांदीरुप्याचे अलंकार विशेषत्वाने वापरात आहेत. फुले व केळीनारळाच्या पानांचेही अंलकार बनवितात. रुपेरी जडावकाम केलेल्या कूर्मपृष्ठाच्या अंगठ्या वगैरे करतात. ओंगी जमातीत मेलेल्या व्यक्तीच्या हाडांपासून दागिने करून ते मृताच्या आठवणीदाखल वापरण्याची प्रथा आहे. सामूहिक नौकाशर्यती, डुकराशी झोंबी वगैरे खास प्रादेशिक खेळ विशिष्ट प्रसंगी खेळले जातात. लाठीमार, कोंबड्यांच्या झुंजी हे देखील आवडते खेळ आहेत. यांखेरीज फुटबॉल, व्हॉलीबॉल यांसारखे परकीय खेळही अलीकडे लोकप्रिय होत आहेत.

महाम्बरे, गंगाधर

संदर्भ: 1. Mathur, K. K. Nicobar Islands, Delhi, 1967.

           २. राजवाडे, माधव, अंदमान ते आनंदमान, मुंबई १९६७.