हिंगोली जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील, औरंगाबाद या प्रशासकीय विभागातील एक जिल्हा. १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याची विभागणी करून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. लोकसंख्या ११,७७,३४५ (२०११). क्षेत्रफळ ४,८२७ चौ. किमी. राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सु. १.५७% क्षेत्र व लोकसंख्येच्या १.०७% लोकसंख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा विस्तार १९⁰५’उ. ते २०⁰५’उ. या अक्षांश आणि ७६⁰३०’पू. ते ७७⁰३०’ पू.या रेखांशाच्या दरम्यान आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस बुलढाणा आणिवाशिम, पूर्वेस यवतमाळ आणि नांदेड, दक्षिणेस नांदेड आणि परभणी, तर पश्चिमेस परभणी या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमा आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत (बसमथ) असे पाच तालुके आहेत. हिंगोली हे जिल्ह्याचे मुख्यालयअसून लोकसंख्या ८५,१०३ (२०११) होती. 

 

भूवर्णन : हा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात दख्खन पठारावर वसलेला आहे. जिल्ह्याचे भूरूप प्रामुख्याने नैसर्गिक घटकांच्या प्रभावामुळे आणि झीजेमुळे तयार झालेला अपखंडीत पठारी प्रदेश आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्याच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. त्यांना ‘जिंतूर–हिंगोली टेकड्या’ हे स्थानिक नाव आहे. जिंतूर ही जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीची डोंगररांग असून ह्या रांगेतील शिखराची सस.पासून सर्वसाधारण उंची ५३३ मी. आहे. रांगेतील माथ्याचे काही भाग सपाट, तर काही गोलाकार आहेत. या डोंगररांगेतील सपाट पठारी प्रदेशात काही खेडी वसली आहेत. डोंगररांगांच्या पायथ्याचा भूप्रदेश माळरानासारखा आहे. हा प्रदेश खडकाळ असून निकृष्ट गवत व झुडपे यांनी व्यापला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी एकाकी टेकड्या आढळतात. जिल्ह्यातील या पठाराची सस.पासूनची उंची साधारण ५०० मी. आहे. माळहिवरा परिसरात ती ५९८ मी. पर्यंत उंच आहे. जिल्ह्याच्या सर्व भागांत डेक्कन ट्रॅप या नावाने ओळखले जाणारे बेसाल्ट खडकाचे आडवे पसरलेले थर पाहावयास मिळतात. या जिल्ह्यातील मृदा काळी, कसदार व बारीक पोताची आहे. ती रेगूर नावाने ओळखली जाते. या मृदेमध्ये चुनखडी, मॅग्नेशियम, लोह, अल्कली अशी पोषकद्रव्ये आढळतात. वर्गीकरणानुसार येथील जमिनीचे खरवड, मध्यम काळी आणि चोपणी असे प्रकार आढळतात. खरवड जमीन जिल्ह्याच्या उत्तर भागातील डोंगर उताराच्या भागात असून त्यातून पाण्याचा निचरा लवकर होतो. जिल्ह्यातील नदी-खोऱ्यांतील सखल प्रदेशांत मध्यम व काळी मृदा असून तिची ओलावा धारण करण्याची क्षमता अधिक असल्याने ती सुपीक म्हणून गणली जाते. 

 

सामान्यतः आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची खनिजे जिल्ह्यात आढळून येत नाहीत. इमारतींच्या बांधकामासाठी लागणारा दगड व रस्त्यासाठी लागणारी खडी हेच मुख्यतः खाणींतून मिळतात. हिंगोली जिल्ह्याचा बहुतांश भागहा गोदावरी नदीखोऱ्यात मोडतो. या जिल्ह्यातून पैनगंगा, पूर्णा व कयाधू( केनाड) या तीन महत्त्वाच्या नद्या वाहतात. पैनगंगा नदी अजिंठा डोंगरात बुलढाणा शहराच्या पश्चिमेला उगम पावते व नंतर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात प्रवेश करून जिल्ह्याच्या ईशान्येकडील सीमेवरूनसु. ८० किमी.चा प्रवास करून पुढे यवतमाळ जिल्ह्याकडे वाहत जाते. या नदीमुळे हिंगोली जिल्ह्याची वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांशी असलेली सीमा आखली गेली आहे. अवखात प्रकारची नागमोडी वळणे हे या नदीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या नदीवर इसापूर येथे धरण बांधण्यात आले आहे. कयाधू ही पैनगंगेची मुख्य उपनदी असून जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. ही नदी वाशिम जिल्ह्यातील रिसोड गावाजवळच्या डोंगरकड्याच्या भागात उगम पावून आग्नेयीस हिंगोली जिल्ह्याकडे वाहत येते. जिल्ह्यातील या नदीची लांबी सु. ८० किमी. आहे. कयाधूचा प्रवाह हंगामी स्वरूपाचा असून उन्हाळ्यात नदीचे पात्र जवळजवळ कोरडे असते. हिंगोली शहर कयाधू नदीच्या तीरावर वसलेले आहे. पैनगंगा आणि कयाधू यांच्या खोऱ्यांतील भूभाग उंचसखल व विच्छेदित असा आहे. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असलेली पूर्णा नदी हिंगोली जिल्ह्यात साधारणतः १०० किमी. पेक्षा जास्त प्रवास करून पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. हिंगोली जिल्ह्यातीलपूर्णा नदीच्या प्रवाहात अवखाती नागमोडी वळणे आढळतात. या नदीवर येलदरी आणि सिद्धेश्वर येथे धरणे बांधण्यात आली आहेत. येथील पूर्णा(येलदरी) हा प्रकल्प मराठवाड्यातील पहिला जलसिंचन व जलविद्युत् प्रकल्प आहे. पूर्णा नदीचे खोरे सिंचनाच्या सोयीमुळे आर्थिक दृष्ट्या संपन्न असून या परिसरात केळी, हळद, कापूस इ. महत्त्वाची पिके घेतली जातात. 

 

हवामान : पठारावरील स्थानामुळे जिल्ह्यातील हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे. हा प्रदेश उष्णकटिबंधात मोडत असल्यामुळे येथील उन्हाळा कडक असतो. येथील उच्चतम तापमान सरासरी ४१.९⁰से. असते. उन्हाळ्यात कधीकधी तापमानात वाढ होऊन ते ४४⁰ते ४५⁰से. पर्यंत वाढते. हिवाळ्यातील तापमान कमी असते. या वेळी सरासरी किमान तापमान १२.६⁰से. असते. हिवाळ्यात उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे येथील तापमान ५⁰से. ते ६⁰से.पर्यंत खाली येते. हिंगोली जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ९५ सेंमी. आहे. जिल्ह्यात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याखेरीज ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत ईशान्येकडील परतीचा पाऊस पडतो. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होतो. 

 

वनस्पती व प्राणी : जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २९१ चौ. किमी. क्षेत्रावर वने आढळतात मात्र जिल्ह्यात कुठेही घनदाट वनक्षेत्र नाही. सर्व वनक्षेत्र विरळ आहे. उत्तरेकडील डोंगराळ भागात वनक्षेत्र आढळते.या वनांमध्ये पानझडी आणि काटेरी झाडेझुडपे आढळतात. जिल्ह्यातसाग, धावडा, ऐन, खैर, मोह, टेंबुर्णी इ. प्रकारचे वृक्ष असून पावण्या, कुसळी, राज, रोशा इ. प्रकारचे गवत आढळते. बोर, बाभूळ, आयोनी, कोणा इ. काटेरी झाडेही आढळतात. तेंडूपाने (विडीपत्ता), डिंक, मोह फुले व फळे, मध आणि चारोळी इ. वनउत्पादने गोळा करण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो. रोशा या गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते. 

 

पाण्याची कमतरता आणि जंगलाची विरळता यांमुळे जिल्ह्यात जंगली प्राणी व पक्षी फार कमी प्रमाणात आढळतात. बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी येथे आढळतात. खडकाळ व टेकड्यांच्या जंगलभागात बिबळ्या आढळतो. इतरत्र अभावाने आढळणारा रोही हा प्राणी येथे विपुलतेने आढळतो. पक्ष्यांमध्ये कबूतर, सफेद तितर, काळे तितर तसेच अल्प प्रमाणात मोर आढळतात. येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणांच्या बाजूला स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने हिवाळ्यात आढळतात. या परिसरात हिरवे कबूतर (हरोळी) हा महाराष्ट्राचा राज्यपक्षीही आढळतो. हिंगोली जिल्हा सापांच्या प्रजातींबाबत संपन्न असून त्यात मण्यार, पट्टेरी मण्यार, नाग, घोणस, फुरसे, गवत्या, हरणटोळ, पाणसाप, मांजरसाप इ. सापांचे बहुसंख्य प्रकार आढळतात. 

 

इतिहास : प्राचीन काळात विंगुली, विंग मुल्ह, लिंगोली असा उल्लेख हिंगोलीबद्दल आढळतो. इ. स. ४९० मध्ये वाकाटक घराण्या-तील सर्वसेन या राजाने वत्सगुल्म नावाची एक शाखा स्थापन केली. या शाखेची राजधानी तत्कालीन वत्सगुल्म (आताचे वाशिम) राज्यातील नर्सी परगण्यातील हिंगोली एक गाव होते. नंतरच्या काळात कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव या घराण्यांच्या सत्ताही या प्रदेशात राज्य करीत होत्या. जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रास आमर्दकक्षेत्र म्हटले जात असे, असा उल्लेख राष्ट्रकूटांच्या ताम्रपटात आढळतो. मध्ययुगीन काळात या प्रदेशावर मोगल, इमादशहा, आदिलशहा, निजामशहा यांचे आधिपत्य होते. शिखांचे दहावे व अंतिम गुरू गुरुगोविंदसिंह हे पंजाबमधून मोगल बादशहा बहादूरशहा याच्यासमवेत दक्षिणेत आले असता १७०८ मध्ये त्यांनी जिल्ह्यातील वसमत येथे तळ (डेरा) उभा केला. 

 

सालारजंग या निजामाने ब्रिटिशांसमवेत केलेल्या तहानुसार १८५३ मध्ये परभणी जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यात हिंगोली जिल्ह्यातील प्रदेशाचा समावेश होता. १८५९ मध्ये जिल्ह्यातील वसमत येथे रोहिल्यांचे आणि ब्रिटिशांचे युद्ध झाले. हैदराबादचा निजाम व ब्रिटिश यांच्या राज्याच्या सीमा सांप्रतच्या हिंगोली जिल्ह्यात परस्परांना स्पर्श करीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हैदराबाद संस्थानाने येथे लष्करी छावणी उभारली होती. १९०३ पर्यंत ही छावणी हिंगोली शहरात अस्तित्वात होती. १९३६ पर्यंत हिंगोली जिल्ह्याचा समावेश नरसी परगण्यात होत होता. १ मे १९९९मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीय सोयींसाठी जिल्ह्यात दोन उपविभाग असून हिंगोली उपविभागात हिंगोलीसह कळमनुरी व सेनगाव या तालुक्यांचासमावेश होतो, तर वसमत उपविभागात वसमत आणि औंढा नागनाथ यातालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्याच्या निर्मितीबरोबरच जिल्हा परिषदेची स्थापना झाली असून पाचही तालुक्यांमध्ये पंचायत समित्या कार्यरत आहेत. हिंगोली, वसमत व कळमनुरी या तीन नगरपरिषदा आहेत. जिल्ह्यात एकूण ७१० महसुली गावे असून ५६५ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात विधानसभेचे तीन, तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. 


आर्थिक स्थिती : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने २००६ मध्ये देशातील सर्वाधिक मागासलेले म्हणून जे २५० जिल्हे घोषित केले होते, त्यांपैकी हिंगोली हा एक जिल्हा होता. सध्या मागासक्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्याला निधी मिळतो. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या येथील ८३% लोक शेतीवर व शेती आधारित व्यवसायांवर अवलंबून आहेत. त्यांमध्ये ४५% शेतकरी व ३८% शेतमजूर यांचा समावेश होतो. जिल्ह्याच्या एकूण उत्पादनात कृषी उत्पादनाचा वाटा ३०% आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके घेतली जातात. एकूण शेतीक्षेत्राच्या २८% भागावर सोयाबीनचे, तर २२% क्षेत्रात कापसाचे पीक घेतले जाते. ज्वारी, तूर, हरभरा, तांदूळ, सूर्यफूल ही पिकेही येथे घेतली जातात. जिल्ह्यात शेतीयोग्य क्षेत्र ४,४६,९०५ हे. असून त्यांपैकी केवळ ६४,२४९ हे. क्षेत्र सिंचनाखाली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत वसमत व कळमनुरी या तालुक्यांत सिंचनक्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यात २ मोठे प्रकल्प, ४० लघुप्रकल्प, १५० कोल्हापुरी बंधारे, ५९ पाझर तलाव यांद्वारे सिंचनाची सोय केली जाते (२०११-१२). जिल्ह्यातील काही प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे : (उत्पादन मे. टनामध्ये) – गहू-८,२९५, ज्वारी-६,३५९, बाजरी-८६०, हरभरा-४,१६५, तूर-३,९१२, उडीद-२,७५०, मूग-२,३०९, कापूस-३,९४६, ऊस-१,७८,४५९ (२०११-१२). जिल्ह्यातून बाहेरच्या बाजारपेठेमध्येप्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर व इतर कडधान्ये इ. कृषी उत्पादने पाठविली जातात. 

 

२००८ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ५,२९,४४० पशुधन होते. जिल्ह्यात ५ पशुवैद्यकीय चिकित्सालये, १८ पशुवैद्यकीय दवाखाने, ४६पशुवैद्यकीय प्रथमोपचार केंद्रे, ६९ कृत्रिम पशुगर्भधारणा केंद्रे आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायास ४,२२९ हे. क्षेत्र अनुकूल असून२२ सहकारी संस्थांमार्फत ३,९४८ हे. क्षेत्रावर मत्स्यव्यवसाय केला जात होता (२०१३). 

 

औद्योगिक दृष्ट्या हिंगोली इतर जिल्ह्यांपेक्षा मागासलेला आहे.जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नाहीत. छोटे उद्योग विखुरलेले आहेत.बहुतांश उद्योग प्राथमिक क्षेत्रातील असून त्यांमध्ये कृषी आधारित उद्योगांचा भरणा जास्त आहे. नोंदणीकृत उद्योग फक्त ९८ असून ३८ अनोंदणीकृत उद्योग आहेत. त्यांमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग, सरकी काढणे व गाठीबांधणे आणि जोडकाम यांचा अंतर्भाव होतो. जिल्ह्यातील १३६उद्योगांपैकी १३१ लघुउद्योग असून फक्त ५ उद्योग मध्यम प्रकारचे आहेत. या पाचमध्ये तीन साखर कारखाने, एक सूतगिरणी व एक तेलशुद्धीकरण कारखाना यांचा समावेश आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहती हिंगोली, वसमत, कळमनुरी येथे असून येथे कृषिसंलग्न उद्योग चालतात. 

 

जिल्ह्याच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय चालतो. त्यातून मिळणाऱ्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा व्यवसाय हिंगोली शहरात केला जातो. कातडी कमाविणे आणि त्यापासून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनविणे याचे प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे आहे. वसमत हे व्यापारी शहर औरंगाबाद-नांदेड महामार्गावर असून येथे हातमाग व यंत्रमागावर कापड विणण्याचा व्यवसाय चालतो. बहुतेक तालुक्यांच्या ठिकाणी कापसापासून सरकी काढून कापसाच्या गासड्या तयार करण्याचा उद्योग चालतो. सोयाबीनचे उत्पादन पुष्कळ होत असल्याने सोयाबीन तेल काढण्याचे कारखाने जिल्ह्यात उभारले जात आहेत. जिल्ह्यात अग्रणी बँक म्हणून भारतीय स्टेट बँक काम पाहते. त्याचबरोबर व्यापारी बँकांच्या २१ शाखा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या२२ शाखा आणि मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ शाखा कार्यरत आहेत. 

 

जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी ३,६०२ किमी. असून त्यांपैकी ३० किमी. राष्ट्रीय महामार्ग, ४९१ किमी. राज्य महामार्ग, ७५४ किमी. जिल्हा रस्ते, ४८७ किमी. इतर मार्ग व १,८३८ किमी. लांबीचे ग्रामीण रस्ते होते (२०११-१२). हिंगोली-कळमनुरी-नांदेड, हिंगोली-औंढा नागनाथ-जिंतूर, हिंगोली-वाशिम हे महत्त्वाचे मार्ग आहेत. 

 

लोक व समाजजीवन : भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या ११,७७,३४५ या एकूण लोकसंख्येत ६,०६,२९४ पुरुषव ५,७१,०५१ स्त्रिया होत्या. लिंग गुणोत्तर दर हजारी ९४२ आहे. राज्यातील सिंधुदुर्ग व गडचिरोली जिल्ह्यांखालोखाल हा तिसऱ्याक्रमांकाचा कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. लोकसंख्येची घनता दरचौ.किमी.स २४४ व्यक्ती अशी आहे. २००१–११ या दशकातीललोकसंख्या वाढीचा दर १९.२७% होता. नागरी लोकसंख्या १५.१८% आहे. सरासरी साक्षरता ७८.१७% असून त्यात पुरुषांची साक्षरता ८६.९४%, तर स्त्रियांची साक्षरता ६८.९५% आहेत. मराठा समाजाबरोबरच बंजारा समाजाचे लोकही येथे पुष्कळ आढळतात. 

 

हिंगोलीला वाङ्मयीन पार्श्वभूमी लाभली असून येथील नाटककार व नट श्रीपाद नृसिंह बेंडे प्रसिद्ध आहेत. मराठी कथेत मोलाची भरघालणारे बी. रघुनाथ हे मूळचे हिंगोलीचे होत. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, कीर्तनकार व प्रभावी वक्ते राम शेवाळकर यांचे मूळ गाव हिंगोलीजिल्ह्यातील शेवाळे हे होय. एकोणिसाव्या शतकातील सुप्रसिद्ध संत पूर्णानंद महाराज यांचे वास्तव्य शेवाळे येथे होते. ख्यातनाम मराठी साहित्यिक व विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे जन्मस्थळ वसमत तालुक्यातील कुरुंदा हे आहे. वासुदेव, वाघ्यामुरळी, गोंधळी या समाजघटकांद्वारे जिल्ह्यात लोकसाहित्य जपले गेले आहे. येथील समाजजीवनावर वर्‍हाडी वळणाचा प्रभाव असून भाषेवर वर्‍हाडी भाषेचा प्रभाव आहे. मुसलमानी अमलाखाली हा प्रदेश राहिल्याने येथील भाषेत उर्दू शब्द आढळतात. 

 

महत्त्वाची स्थळे : भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ मंदिरासाठी औंढा नागनाथ हे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. मंदिराचे बांधकाम देवगिरीच्या यादवांच्या काळातील म्हणजे तेराव्या शतकातील आहे. मंदिराचा सर्वांत प्राचीन भाग त्याचे अधिष्ठान (जोते) असून ते चार थरांमध्ये आहे. कीर्तिमुख, गज, अश्व, व नर असा थरांचा क्रम असून नर थरात मानवी शिल्पाकृती व देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे गर्भगृह, अंतराळ, सभामंडप असे भाग दिसतात. बाहेरील बाजूस अर्थमंडप व मुखमंडप असून त्यांच्या पायऱ्यांच्या कठड्यावर हत्ती व घोडे यांच्या शिल्पाकृती आहेत. त्यामुळे देऊळ मिरवणुकीच्या रथाप्रमाणे दिसते. प्राचीन काळी वसुमती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत येथे सुन्नी पंथीय मुशाफीर शहाचा दर्गा तसेच शुकानंद महाराजांचा मठ आहे. शिरड शहापूर येथे मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. जिल्ह्यातील नर्सी हे संत नामदेवांचे जन्मस्थान म्हणून पर्यटकांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांचे वास्तव्य औंढा नागनाथ येथे होते. यांशिवाय हिंगोली, कळमनुरी, कुरुंदा, गिरगाव, डोंगरकडा, वसमत, एरंडेश्वर, शेवाळे ही इतर महत्त्वाची स्थळे आहेत. 

 

पहा : परभणी जिल्हा. 

भटकर, जगतानंद अमृते, विद्याधर


 

 


दक्षिणमुखी महादेव मंदिर, अंजनवाडा. नागनाथ मंदिर, औंढा नागनाथ.
   
सिद्धेश्वर धरण, सिद्धेश्वर. जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.
   
श्री मल्लिनाथ दिगंबर जैनमंदिर, शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ. संत नामदेवांचे जन्मस्थळ, नार्सी, तालुका हिंगोली.
   
गुरु गोविंदसिंग गुरुद्वारा, वसमत. नागनाथ मंदिरातील भिंतीवरील शिल्पपट्ट, औंढा नागनाथ.