द्वीना : (१)(सेव्हर्नया). यूरोपीय रशियातील उत्तरेकडील मोठी व जलवाहतुकीस उपयुक्त असलेली नदी. सूखॉन आणि यूक या नद्या व्हिल्यीकी ऊस्त्‌यूक येथे एकमेकीस मिळतात व यांच्या संयुक्त प्रवाहासच (उत्तर) द्वीना म्हणतात. कॉटलसपासून ती वायव्येकडे वाहत जाऊन श्वेत समुद्रात द्वीना आखातास मिळते. लांबी सु. ७४४ किमी. असून जलवाहनक्षेत्र ३,५७,००० चौ. किमी. आहे. ही वार्षिक स. दर सेकंदाला ३,५३० घ.मी. जलवाहन करते. हिला डाव्या बाजूने व्हाग, येमत्स तर उजव्या बाजूने व्हिचिग्द, पीन्येग या नद्या मिळतातद्वीनाची रुंदी सु. २ ते ५ किमी. व आर्केंजलजवळ तिची रुंदी ७ किमी. पेक्षाही जास्त आहे. तसेच पाण्याची खोली सु. ५ ते १४ मी. आहे. हिच्या खोऱ्यात राय, ओट, बार्ली ही पिके होतात व लाकूडतोड, मच्छीमारी हे व्यवसाय चालतात. उत्तर द्वीनाच्या तीरावर आर्केंजल, कॉटलस, मॉलटफ्‌स्क इ. शहरे वसलेली आहेत.

(२) (झापदनया). रशियातील पश्चिमेकडील एक नदी. अन्द्रे-आपलच्या उत्तरेस व्हाल्दाई हिल्समध्ये (पश्चिम) द्वीना उगम पावते. प्रथम ती दक्षिणेकडे वाहते आणि बेलोरशियन प्रजासत्ताकातून नैर्ऋत्येकडे वाहते व व्हीटेप्स्क शहरापासून ती वायव्येकडे वाहत जाऊन रीगा आखातास मिळते. हिची लांबी १,०२० किमी. असून जलवाहनक्षेत्र ८७,९०० चौ.किमी. आहे. हिला उजवीकडून द्रिस, आयव्ह्येक्स्ते, ओग्रे व डावीकडून कास्पल्य, ऊल द्यिस्ना, ल्यूचेसा या नद्या मिळतात. ही वार्षिक स.दर सेकंदाला ६७० घ.मी. जलवाहन करते. हिच्या खोऱ्यात लाकूडतोड हा महत्त्वाचा व्यवसाय असून त्येगूम्स येथे जलविद्युत् केद्र आहे. पॉलत्स्क, व्हीटेप्स्क, रीगा, दाउगाफ्‌पील्स इ. शहरे या नदीखोऱ्यात वसली आहेत.

यार्दी, ह. व्यं., गाडे, ना. स.