सेबू : ताओ मंदीरसेबू : फिलिपीन्सच्या सेबू प्रांताची राजधानी व इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर. लोकसंख्या ८,६६,१७१ (२०११). हे मानिलाच्या आग्नेयीस ५३० किमी.वर सेबू बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे. हे हवाई व सागरी प्रवासी वाहतुकीचे केंद्र आहे. येथील लाहुग व माक्टान बेटावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ हवाईवाहतुकीसाठी अग्रगण्य आहेत. तसेच हे किनारी लोहमार्गाने दानाओ, कारकार या शहरांशी जोडण्यात आलेले आहे. ७ एप्रिल १५२१ मध्ये पोर्तुगीज नाविक ⇨ फर्डिनंड मॅगेलन येथे आला होता. त्याची सेबूच्या राजाशी मैत्री झाली होती. त्याची माक्टान बेटावर हत्या झाली. त्यानंतर २७ एप्रिल १५६५ मध्ये मीगेल लोपेस दे लेगास्पी व अँद्रेस दे ऊरदानेटा हे सेबू येथे आले होते. त्यांनी येथे वसाहत केली. ही फिलिपीन्स द्वीपसमूहातील स्पॅनिशांची पहिली वसाहत होती. १५७१ पर्यंत स्पॅनिश वसाहतीची राजधानी येथे होती. हे मध्य व्हीसायन प्रदेशाचे सांस्कृतिक व व्यापाराचे प्रमुख ठिकाण होते. परराष्ट्रीय व्यापारासाठी हे १८६० मध्ये खुले झाले व १९३६ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. दुसऱ्या महायुद्धात याची हानी झाली होती. मात्र यावेळी बंदर सुरक्षित होते.

मानिला औद्योगिक क्षेत्रातील अनेक औद्योगिक व व्यापारी कंपन्यांच्या शाखा येथे आहेत. येथे कपडे, पादत्राणे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, खोबरेल तेल, फर्निचर, साखर, सिमेंट, मोटारगाड्या दुरुस्ती, सौंदर्यप्रसाधने, जडजवाहीर तयार करणे, रबरी वस्तू, शीतपेये, मद्यनिर्मिती, जहाजदुरुस्ती इ. उद्योग चालतात. येथे सान कार्लोस विद्यापीठ (१५९५), सेबू तंत्रविज्ञान संस्था (१९४६), साउथ वेस्टर्न विद्यापीठ (१९४६), युनिव्हर्सिटी ऑफ द सदर्न फिलिपीन्स (१९२७), विसायास विद्यापीठ (१९१९) या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. सान ऑगस्टीन चर्च, सोळाव्या शतकातील सान पेद्रो या स्पॅनिश किल्ल्याचे अवशेष, ताओ मंदीर, ओस्मेना पार्क कॅपिटॉल इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.