मसूरी : उत्तर प्रदेश राज्याच्या डेहराहून जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. समुद्रसपाटीपासून २,००६ मी. उंचीवर बाह्य हिमालयाच्या श्रेणीवर ते वसले आहे. लोकसंख्या १८,२४१ (१९८१). डेहराडूनपासून उत्तरेकडे ३५ किमी. अंतरावर असलेले हे शहर, दक्षिणेकडे

येथे आकृती आहे

मसूरी येथील रज्जुमार्ग 

दून नदीचे रमणीय खोरे व उत्तरेकडे हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगानी वेढलेले आहे. ओक, फर, ऱ्होडोडेंड्रॉन यांसारख्या वृक्षांच्या गर्द राई व रमणीय पर्वतदृश्ये ही मसूरीची वैशिष्ट्ये. येथील ‘मन्सूरी’ नावाच्या झुडुपांमुळे मसूरी हे नाव पडले असावे. १८११ मध्ये मेजर हर्से या युरोपीय गृहस्थाने हा प्रदेश खरेदी केला आणि १८१२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला विकला. १८२७ मध्ये कॅ. यंग या लष्करी अधिकाऱ्याने येथे प्रथम वस्ती केल्यावर आणि हरद्वार−डेहराहून हा लोहमार्ग झाल्यावर (१९०१) थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून मसूरी विकसित झाले. गिरिस्थानांची राणी म्हणून हे ओळखले जाते. हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून आरोग्यधाम म्हणूनही प्रसिद्ध आहे. १८५० साली येथे नगरपालिका स्थापन झाली. पर्यटनाच्या दृष्टीने येथे एप्रिल ते जून व सप्टेंबर ते नोव्हेंबर असे दोन मोसम असतात. मसूरीत गंधकयुक्त पाण्याचे झरेही आहेत. येथे १८५० सालापासून बिअरच्या उत्पादनास सुरुवात झाली.

लाल तिब्वा हे मसूरी प्रदेशांतील सर्वोच्च शिखर आहे. सहस्त्रधारा, मॉसी फॉल्स, भट्ट फॉल्स, केम्टी फॉल्स त्याचप्रमाणे कॅमल्स बॅक, कुलरी, चक्रता इ. मसूरीतील काही सहलीची ठिकाणे आहेत. गन हिल येथे जाण्यासाठी झौलाघर येथून ४०० मी. लांबीचा एक रज्जुमार्ग (रोपे वे ) आहे. भारतीय प्रशासन व संबद्ध सेवांतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी लाल बहादूर शास्त्री अकादमी ही देशातील सर्वांत मोठी संस्था येथे आहे.

पंडित, भाग्यश्री