नेगेव्ह वाळवंटातील बिंदुजलसिंचन

नेगेव्ह : (नेगेब). दक्षिण इझ्राएलमधील वाळवंटी प्रदेश. ह्याचे नाव हिब्रू भाषेतील पुसणे किंवा कोरडे करणे यास असलेल्या न-ग-ब या मूळ रूपावरून पडले असावे. हा त्रिकोणाकृती प्रदेश बीरशीबापासून ईलॅथपर्यंत पसरला आहे. याच्या पश्चिमेस सिनाई द्वीपकल्प, पूर्वेस जॉर्डनची खचदरी, उत्तरेस हर यहुदा (ज्यूडीयन टेकड्या) व दक्षिणेस अकाबाचे आखात असून या सु. १२,१७३ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या प्रदेशाची लांबी १९३ किमी आणि रुंदी ८ ते ९७ किमी. आहे. याचा पश्चिमेकडील भाग डोंगराळ असून सरासरी उंची १,०३५ मी. आहे. वायव्य भाग वाळवंटी झुडुपे, वालुकागिरी यांनी व्यापला आहे. दक्षिणेकडील मध्य व पूर्व भाग हा हंगामी प्रवाहांनी (वाडींमुळे) विच्छिन्न झालेला  आहे. १९४९ पासून या प्रदेशाच्या विकासास सुरुवात झाली. येथे जलसिंचनाच्या सोयी केल्या जात असल्यामुळे पश्चिम व दक्षिण भागांत आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. खनिजांच्या दृष्टीने हा भाग समृद्ध असून येथे पोटॅशियम, सोडियम, मॅंगॅनीज, जिप्सम, केओलीन, खनिज तेल इ. खनिजे सापडतात. सडोम येथे पोटॅश व ब्रोमीन यांचे उत्पादनमृत समुद्रातील पाण्याच्या बाष्पीभवानाद्वारे केले जाते. फॉस्फेट, तांबे व नैसर्गिक वायू अनुक्रमे ओरॉन, तिग्ना व रोश जोहार येथे सापडतात. बीरशीबा हे या प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण असून आराद, दिमोना, ईलॅथ ही येथील महत्त्वाची शहरे आहेत. ईलॅथ हे अकाबाच्या आखातावरील उत्कृष्ट बंदर आहे.

गाडे, ना. स.