अरबस्तान: आशिया खंडाच्या नैर्ऋत्य टोकावरील प्रचंड द्वीपकल्प. याच्या दक्षिणेस अरबी समुद्र व एडनचे आखात. पश्चिमेस तांबडा समुद्र व सिनाई द्वीपकल्प, पूर्वेस इराणचे आखात, आग्नेयीस ओमानचे आखात व उत्तरेकडे जॉर्डन व इराक देश आहेत. मात्र उत्तरेकडे अरबस्तानचे वाळवंट कोठे संपते व सिरिया-इराकचे कोठे सुरू होते हे सांगणे कठीण असले तरी कुवेत व

अरबस्तान

सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेपर्यंतच अरबस्तानचे द्वीपकल्प पसरले आहे असे सामान्यतः मानले जाते. अरबस्तानची जास्तीत जास्त लांबी १,९३० किमी., रुंदी २,०९० किमी., क्षेत्रफळ २५,९०,००० चौ.किमी. व सर्व विभागांतील एकूण लोकसंख्या सु. ७.७४ दशलक्ष (१९७०) आहे. अरबस्तान व आफ्रिका खंड सिनाई द्वीपकल्पाने जोडलेले असून, दक्षिणेकडील ३५४ किमी. अंतरावरील सोकोत्रा बेट राजकीय दृष्ट्याच नव्हे तर मानवशास्त्रदृष्टीनेही अरबस्तानचा भाग समजण्यास हरकत नाही. राजकीय दृष्ट्या सौदी अरेबिया, येमेन, मस्कत व ओमान, दक्षिण येमेन, ओमानच्या परिसरातील संयुक्त अमीर राज्ये म्हणून संबोधली जाणारी सात ट्‌रूशिअल राज्ये, कुवेत, बहारीन व कॉटार यांचा अरबस्तानच्या द्वीपकल्पात समावेश होतो.

अरबस्तान हा एक प्रचंड पठारी प्रदेश असून याच्या पश्चिम, दक्षिण व आग्नेय सीमेलगत उंच पर्वतश्रेणी आहेत. हे पठार अतिप्राचीन अग्निजन्य खडकांचे बनलेले असून त्यावर वालुकाश्मांचे व चुनखडकांचे थर पसरलेले आहेत. भूपृष्ठाखालील हालचालींमुळे ह्या पठाराच्या पश्चिमेस वळ्या पडून उंच डोंगर तयार झाले आणि पश्चिमेकडील पठार उचलले जाऊन पूर्वेकडे उतार झाला तसेच बऱ्याच ठिकाणी द्रोणी तयार झाल्या. उत्तरेकडील सिरहान वाडी ही अशीच तयार झाली असून ती ३२० किमी. लांब, ३२ ते ४८ किमी. रुंद आणि सु. ३०० मी. खोल आहे. हनिफा, रीमा, दवासिर ह्या दुसऱ्‍या वाड्या त्यांपैकीच समजल्या जातात. तांबड्या समुद्राला लागून छोटी तिहामाची किनारपट्टी असून तिची जास्तीत जास्त रुंदी मध्यभागी ८० किमी. आहे. हिला लागून असलेल्या पर्वतश्रेणीचे तीन भाग पडतात उत्तरेकडील हेजॅझ (जास्तीत जास्त उंची सु. २,८९० मी.) त्याच्या दक्षिणेकडील असीर (२,७५० मी.) आणि दक्षिणेकडील येमेन (३,६५० मी.). ह्या पर्वतश्रेणीत मक्का व मदीनाजवळ खिंडी असून त्या मार्गाने तांबड्या समुद्राद्वारे दळणवळण चालते. अरबस्तानच्या दक्षिणेकडील पर्वतश्रेणी कौर नावाने ओळखल्या जातात आग्नेय भागातील जबल अल् अख्दर (सु. २,९८६ मी.) इराणमधील झॅग्रॉस पर्वतश्रेणीचा फाटा समजला जातो.

पठाराचा अंतर्भाग सु. ६००-९०० मी. उंच आहे. हा प्रामुख्याने वाळवंटांनी व्यापलेला असून मधूनमधून स्टेपसारखा गवताळ प्रदेश आढळतो.

उत्तर भागातील अकाबाच्या आखातापासून जाऊफ व कुवेत अशी रेषा काढल्यास ह्या रेषेच्या उत्तरेला सपाट मोकळा मैदानी प्रदेश असून यातील काही भाग गवताळ व बाकीचा वालुकामय आहे. याला ‘बडिएत एश् शाम’ म्हणजे ‘उत्तरेकडील गवताळ प्रदेश’ असे अरबी नाव आहे. याच्या दक्षिणेस म्हणजे जाऊफ व हाइल या शहरांच्या मधील भागात ‘नफूद’ असे अरबी नाव असलेले वाळवंट आहे. याचाच एक चिंचोळा पट्टा रियादच्या पश्चिमेस ‘नफूद दाही’ नावाने ओळखला जातो. रियादच्या पूर्वेस दक्षिणोत्तर १,३०० किमी. पसरलेले दाहनाचे वाळवंट आहे. त्याच्या पूर्वेस इराणच्या आखाताला लागून असलेली किनारपट्टी आहे. या भागात गोड्या पाण्याच्या विहिरी व झरे आहेत म्हणून येथे लोकवस्तीचे प्रमाण जास्त आहे. याच भागात सापडणाऱ्‍या तेलामुळे आधुनिक बंदरे बांधली गेली आहेत. दक्षिणेस ‘रब-अल्-खली’ नावाचे (‘शून्यालय’ किंवा ‘शून्य रण’) भयाण वाळवंट आहे. याच्याइतके अन्वर्थक नाव क्वचितच एखाद्या भूभागाला दिले गेले असेल. नफूद व रब-अल्-खलीच्या मधोमध पश्चिमेस असलेल्या मुलुखाला ‘नेज्द’ म्हणतात. यात मरुभूमीबरोबर हिरवळीचे विभाग असून तुलनेने ह्या भागास सुपीकच म्हटले पाहिजे. हिवाळ्यात या भागात क्वचित पाऊस पडून सर्वत्र हिरवळ वाढते व त्यावर भटक्या अरबांच्या शेळ्या, मेंढ्या, उंट यांचे काही दिवस भरणपोषण होते.

अरबस्तान अतिउष्ण व कोरडा देश आहे. उन्हाळ्यातील तपमान पुष्कळदा ५४ से. ही असते. वर्षाकाठी फार तर ८-१० सेंमी. किंवा त्याहून कमी पाऊस पडतो. वाळवंटी भागात क्वचित वादळी पाऊस व गारा पडतात व नद्यानाल्यांना पूर येतो. लागोपाठ तीनचार वर्षे पाऊस नाही असेही अनेकदा होते परंतु दक्षिण व नैर्ऋत्य विभागात मोसमी वाऱ्यांमुळे ५० ते १०० सेंमी. पाऊस पडतो व त्याचा शेतीला उपयोगही होतो.

‘नदी’ म्हणता येईल असा एकही प्रवाह अरबस्तानात नाही परंतु प्राचीन काळी वाहणाऱ्या व आता कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रातून क्वचित आलेल्या पुराचे पाणी वाहून जाते. या पात्राला  ⇨वाडी असे म्हणतात. याच्या परिसरात भूपृष्ठाखाली क्वचित पाणी सापडते. या वाड्यांवरून प्राचीन काळचे लमाणी तांड्यांचे व यात्रेकरूंचे वाहतूक मार्ग ठरविता येतात.

पावसाचा अभाव व मृदेतील क्षार यांमुळे अरबस्तानात मोठे वृक्ष नाहीत. लहानसहान झुडपांनाच येथे झाडांची संज्ञा प्राप्त झाली आहे. दक्षिण भागात व पाणथळीच्या जागी गहू, बार्ली, कडधान्ये व काही ठिकाणी भातही होते. येमेनमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने व अन्य अनुकूल परिस्थितीमुळे कॉफीचे उत्पादन होते. मोचा बंदरातून कॉफीची निर्यात होते. खजूर हे अरबस्तानातील सर्वांत महत्वाचे उत्पादन. खजुराच्या शंभरांवर जाती असून सर्वांत उत्तम खजूर ओमानमध्ये व मदीनाच्या परिसरात होतो. ऊद, हिराबोळ, लाजाळू, बाभळीचे काही प्रकार, कोरफड, कण्हेर, झाऊ ह्या वनस्पती व वाटोळे अळुंब सर्वत्र होतात. अरबस्तानात भाज्या फारशा होत नाहीत. पण डाळिंब, जरदाळू, लिंबू, कलिंगड, केळी, सफरचंद, बदाम इ. फळे बऱ्‍याच ठिकाणी होतात.

बिबळ्या वाघ, चित्ता, तरस हे वन्य पशू कुत्रा, मांजर, शेळ्यामेंढ्या, गाढव, घोडा व उंट हे पाळीव पशू आणि गरुड, माळढोक, ससाणा, शिकरा, हुप्पी (सुतार पक्ष्यासारखा), चंडोल, नाइटिंगेल, कबूतर, तित्तिर हे पक्षी अरबस्तानात सर्वत्र आढळतात. टोळांचे थवेच्या थवे अरबस्तानात दिसतात व अरबी आहारात त्यांचा समावेशही झालेला आहे. घोडा व उंट हे तर अरबांना केवळ जीव की प्राण. अरबी घोड्यांची आजही जातिवंत प्राण्यांत गणना होते. उंटावर तर अरबांचे जीवनच अवलंबून असते. उंटांच्या निरनिराळ्या जाती व त्यांच्या वयपरत्वे होणाऱ्या अवस्था दर्शविणारे सु. एक हजार शब्द अरबी भाषेत आहेत. यावरून उंटाला अरबांच्या जीवनात किती महत्व आहे हे दिसून येते. सरपटणाऱ्‍या प्राण्यांत सरडा व शिंगांचा व्हायपर-नाग-व पट्टेवाले विषारी पाणसापही अरबस्तानात दिसतात. मॅकेरेल, ट्यूना, पोर्गी, सारडाइन इ. मासे, शिंपा, सुसरी व क्वचित देवमासेही अरबस्तानच्या परिसरातील समुद्रात आढळतात.

प्राचीन काळी अरबस्तानात चांदीसोन्याच्या खाणी असल्याचे तत्कालीन अवशेषांवरून दिसते. हेजॅझमधील जुन्या खाणीतून सोने-चांदी इ. खनिजे अलीकडे काढण्यात आली होती. इराणचे आखात पूर्वी मोत्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. परंतु १९३० नंतर जपानी कृत्रिम मोत्यांच्या प्रसारामुळे अरबस्तानातील मोत्यांचे उत्पादन मागे पडले. मात्र इराणी मोत्याच्या मौलिक गुणामुळे ह्या व्यापाराला उज्ज्वल भविष्यकाळ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. विसाव्या शतकात अरबस्तानचे महत्व वाढले ते तेलसाठ्यामुळे. १९३२ मध्ये बहारीनच्या परिसरात तेल सापडल्यापासून अरबस्तानात तेलशोधकार्याला विशेष गती मिळाली पुढील काही वर्षांत कुवेत, कॉटार, सौदी अरेबिया वगैरे भागांत प्रचंड तेलसाठे सापडले. जगातील तेलसाठ्यांपैकी एकतृतीयांश अरबस्तानात असल्याचा अंदाज आहे. तेलाप्रमाणेच अरबस्तानात नैसर्गिक वायूचेही प्रचंड साठे असून त्यांपैकी हल्ली फार थोडा वायू वापरला जातो. या वायूचा उपयोग करण्यासाठी फार मोठा भांडवली खर्च करावा लागेल.तेलाच्या व वायूच्या साठ्यांमुळे आजच्या जागतिक राजकारणात अरबस्तानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

इतिहास: अतिप्राचीन अरबस्तानची फारशी माहिती उपलब्ध नाही. विंक्लर व चेटॅनी यांच्या मतानुसार सेमिटिक वंशाचे मूळ स्थान येथे होते. तथापि हे मत सर्वमान्य नाही. प्राचीन काळी हा देश अतिसुपीक होता. हळूहळू मध्य अरबस्तानातील नद्या, झरे वगैरे सुकून सर्वत्र वाळवंट पसरले. उत्पादनातील घट, लोकसंख्येची वाढ इत्यादींमुळे तेथील लोकांनी सिरिया, मेसोपोटेमिया आदी जवळपासच्या सुपीक प्रदेशांत स्थलांतर केले व सिरियन, कॅननाईत, ॲरेमियन, फिनिशियन, हिब्रू अशी नावे त्यांना मिळाली.

अरबस्तानातील दंतकथांनुसार मूळ अरबांचे उत्तर व दक्षिण असे दोन गट होते. बायबलच्या ‘जेनेसिस’ मध्ये ‘शेम’ नावाच्या मूळ पुरुषापासून ह्या दोन गटांची उत्पत्ती झाली असे म्हटले आहे.

इ.स.पू. १० व्या शतकातील सबा (बायबलमधील शेबा) हेच दक्षिण अरबस्तानातील प्राचीन राज्य असावे. इ.स.पू. ७५० च्या सुमारास सबाच्या राजाने मारिब धरण बांधले. त्यामुळे शेती व व्यापार यांचा उत्कर्ष झाला. पुढे सबाची सत्ता हिम्यराइट जमातीकडे गेली. यांचा शेवटचा राजा धुनुवास याने यहुदी धर्म स्वीकारला व वायझंटिनमधल्या ख्रिस्ती रोमन सम्राटाने ज्यूंचा छळ केल्यामुळे त्याने अरबस्तानातील ख्रिस्ती धर्मीयांविरुद्ध शस्त्र उपसले. पुढे हिम्यराइट सत्ता संपुष्टात येऊन येमेनमध्ये ख्रिस्ती राज्य स्थापन करण्यात आले. पण कालांतराने ह्यापैकी बराच प्रदेश इराणच्या आधिपत्याखाली गेला.

सबाव्यतिरिक्त हल्लीच्या उत्तर येमेनमधील मा-इन (मईन) म्हणजे पूर्वीचे कर्नाऊ (कर्नाव) येथील मिनियन जमातीचे राज्य, तिम्ना येथील काताबानियन (जमातीचे) राज्य, शाबवाह येथील हथ्रामौत राज्य व झुफार येथील हिम्यर जमातीचे राज्य ही प्राचीन दक्षिण अरबस्तानातील प्रमुख राज्ये होत. त्यांच्यावर प्रमुख शासक म्हणून वंशपरंपरेनुसार गादीवर येणारा राजा असे. त्याला सल्ला देण्यासाठी सुज्ञांचे एक मंडळ असे. प्राचीन अरबी लोक अनेक देवदेवता मानीत. देवतांची मंदिरे म्हणजे सामाजिक जीवनाची महत्वाची केंद्रेच असून देवळांचे उत्पन्न मोठे असल्याने श्रीमंत पुरोहितवर्गाचे बरेच वर्चस्व असे.

दक्षिण अरबस्तानच्या मानाने प्राचीन मध्य व उत्तर अरबस्तानविषयीची माहिती अल्प व त्रोटक आहे. इ.स.पू. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘आरिबा’ नावाने ओळखली जाणारी  ⇨ बेदूईन टोळ्यांची अनेक लहान राज्ये मध्य व उत्तर अरबस्तानात अस्तित्वात होती. त्यानंतर सु. सहा शतकांनी दीदन, लिह्यान, नाबाता (हल्लीचे दक्षिण जॉर्डन) व पामिरा ही राज्ये उदयाला आली. सुरुवातीस नाबाताचे रोमन सम्राटांशी सलोख्याचे संबंध होते. पण ते पुढे बिघडले व पहिल्या शतकात सम्राट ट्रेजन याने रोमन साम्राज्यास नाबाता जोडून त्याला पॅलेस्टिना टर्टिया असे नाव दिले. पामिराचेही रोमनांशी मित्रत्वाचे संबंध होते. तेथील राजा ऊदीनेने सम्राट गॅलिईनसला इराणविरुद्ध मदत दिली. त्याचे बक्षीस म्हणून गॅलिईनसने पामिराच्या स्वतंत्र राज्याला मान्यता दिली. ऊदीनेच्या मृत्यूनंतर त्याची पत्‍नी झैनब राज्यकारभार पाहू लागली. ती कर्तबगार व महत्वकांक्षी होती. आपला मुलगा वाह बल्लात हा प्रतिसम्राट असल्याची तिने घोषणा केली. तेव्हा सम्राट ऑरीलियसने पामिरावर स्वारी करून ते राज्य नष्ट केले व झैनबला कैद करून रोमला पाठविले.

चौथ्या शतकाच्या अखेरीस पश्चिम अरबस्तानातील खुष्कीचे व्यापारी मार्ग मागे पडून तांबड्या समुद्रातून व्यापार होऊ लागला. मारिव धरण फुटले व पाण्याच्या अभावी जिकडे तिकडे वैराण मरुभूमी पसरली आणि अनेक लोक भटक्या जमातीचे जीवन जगू लागले. बेदूईन जमातीच्या नीतिनियमांनुसार ह्या भटक्या जमातीत व्यक्तीला महत्त्व नसून गटाला होते. जमातीचे जीवन गुराढोरांच्या व मेंढरांच्या कळपावर व लुटालुटीवर अवलंबून असे. कुरणे, मरूद्याने इत्यादींवर सामाईक हक्क असे. जमातीच्या प्रमुखाला ‘साय्यिद’ किंवा ‘शेख’ म्हणत. जमातीच्या मतानुसार त्याला कारभार करावा लागे. त्याची निवड करण्याचा अधिकार जमातीतील वयस्कर माणसांचा असे व सामान्यतः विशिष्ट कुटुंबातूनच शेखची निवड होई. शेखला सल्ला देण्यासाठी अनुभवी माणसांचे मंडळ असे.त्याला ‘मजलिस’ म्हणत. जमातीचे जीवन परंपरेनुसार चाले. या परंपरांना ‘सुन्ना’ (सुन्नह) म्हणत. ह्या अरबी जमाती विविध निसर्गशक्तींची पूजा करीत. त्यांच्या श्रेष्ठ देवाला ‘अल्ला’ (अल्लाह) व प्रमुख दुय्यम देवतांना ‘मनात’, ‘उज्जा’ व ‘अल्लात्’ म्हणत.

अशा भटक्या जमातींपैकी एखादी जमात एखाद्या मरूद्यानात स्थायिक होई व आसपासच्या प्रदेशावर अधिराज्य चालवी. क्वचित एखाद्या जमातीची सत्ता दोनतीन मरूद्यानांवरही चाले व वाळवंटी साम्राज्ये निर्माण होत. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात व सहाव्याच्या पूर्वार्धात विस्तारलेले किंदा (किंदह) हे अशा वाळवंटी साम्राज्याचे उत्कृष्ट उदाहरण होय. मरूद्यानाच्या परिसरातील जमातींनी काही शहरेही स्थापन केली. हेजॅझ प्रांतातील मक्का (मक्कह) हे अशांपैकीच एक होय. अशा शहरात प्रत्येक जमातीची मजलिस व देवतांचे वास्तव्य असलेले पाषाण असत. पुढे शहरातील सर्व जमातींचे पवित्र पाषाण एकाच ठिकाणी ठेवण्यात येऊ लागले. मक्का येथील काबा (कअबह) हे याचे प्रसिद्ध उदाहरण होय. शहरातील सर्व जमातींच्या मजलिसींच्या प्रतिनिधींची ‘माला’ नावाची सभा असे. या मालांमार्फत शहराचे शासन प्रमुख कुटुंबांच्या सल्ल्यानुसार चाले.

अशा रीतीने अरबस्तान विविध टोळ्यांच्या लहान-लहान राज्यांत विभागला गेला. मात्र चौथ्या-पाचव्या शतकांत तो बाह्य जगापासून पूर्ण तुटलेला नव्हता. भिन्नभिन्न भागांतील ख्रिस्ती व ज्यू लोकांच्या वसाहतींद्वारा त्यांच्यात एकेश्वरी कल्पना रूढ होत होती. तसेच सीमेवरील घस्सान (गस्सान) व हिरा ह्या अनुक्रमे बायझंटिन व इराणच्या मांडलिक राज्यांमार्फत नवी शस्त्रास्त्रे, लष्करी तंत्र व डावपेच, विविध खाद्यपदार्थ, मद्ये इत्यादींशी अरबांचा परिचय झाला.

सहाव्या शतकात इराण-बायझंटिन-संघर्षामुळे इराणी आखात व युफ्रेटीस नदीच्या परिसरातील व्यापारी मार्ग असुरक्षित झाले. ईजिप्तमध्येही अराजक माजले. त्यामुळे तांबड्या समुद्रातून नाईल नदीकडे जाणारे मार्गही असुरक्षित झाले. म्हणून व्यापाऱ्‍यांचे लमाणी तांडे त्रासदायक पण सुरक्षित येमेन मार्ग पुन्हा वापरू लागले. साहजिकच हेजॅझमधील ताईफ, मक्का, मदीना (मदीनह) इ. शहरांचे महत्त्व वाढले. मक्का शहरात कुरैश जमात प्रबल होती आणि शहराचे शासन कुरैशी व्यापाऱ्यांच्या संघटनेकडे होते. साहजिकच त्यांच्याविरुद्ध कोणीही उठाव करीत नसे. या परिस्थितीला ⇨मुहंमद पैगंबराला पुढे तोंड द्यावे लागले.

इस्लामच्या स्थापनेने अरबस्तानावर दूरगामी परिणाम झाले. इस्लामपूर्वी कोणत्याही सत्तेला अरब जमाती जुमानीत नसत. मुहंमद पैगंबराने बहुतेक जमातींना इस्लामची दीक्षा दिली व त्यांना आपल्या शासनयंत्रणेचा स्वीकार करण्यास भाग पाडले. परंतु पैगंबराच्या मृत्यूनंतर (६३२) अरबस्तानातील अनेक भागांत इस्लामी सत्तेविरुद्ध बंडे झाली. खलीफा ⇨ अबू बकर (अबू बक्र) ह्याने ह्या बंडाळीचा बीमोड केला इतकेच नव्हे, तर इस्लामी सत्तेचा फार मोठ्या प्रमाणावर विस्तार केला व शासनाची घडी नीट बसविली. त्यानंतरचा खलीफा पहिला उमर (कार. ६३४–४४) याने ईजिप्त, सिरिया, इराक, इराण इ. देशांत इस्लामचा प्रसार केला. पण राज्यकारभारात अरबांना प्राधान्य देण्याच्या त्याच्या धोरणामुळे अरबेतर इस्लामधर्मीयांत असंतोष निर्माण झाला. नंतरचा खलीफा उस्मान याच्या राजवटीत (६४४–५६) कुरैश जमातीतील अंतर्गत भांडणांमुळे प्रत्यक्ष यादवी युद्धाला सुरुवात झाली व त्याचे पर्यवसान उस्मानचा खून, पैगंबराचा जावई अली याची खलीफा म्हणून नियुक्ती, अली व उस्मानचा पुतण्या मुआविया यांच्यातील संघर्ष, अलीचा खून, दमास्कस येथे उमय्या (उमय्यह) खिलाफतीची स्थापना (६६१), अलीचा मुलगा हुसेन याचा करबलाच्या लढाईत झालेला मृत्यू व शिया (शीअह) व सुन्नी या इस्लामी पंथांची स्थापना इ. अनेक घटनांत झाले. दमास्कसच्या उमय्या खिलाफतीचा ७५० मध्ये अंत होऊन बगदादच्या ⇨ अब्बासी खिलाफतीची स्थापना झाली, तरीही अरबस्तानात शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही. मात्र निरनिराळ्या जमातींची फुटीर वृत्ती बळावून अल् जुलान्दा इब्‍न मसूदचे ओमान येथे कारमेथियनांचे पूर्व अरबस्तानात हसनच्या (अलीचा मुलगा) वंशजांचे मक्केला व हुसेनच्या वंशजांचे मदीनेला, अशी स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. कालांतराने ईजिप्तच्या अय्यूबी वंशाचा संस्थापक सलाउद्दीन याने अरबस्तानातील अनेक राज्ये नष्ट करून अय्यूबी सत्तेचा विस्तार केला. अय्यूबी वंशानंतर मक्का येथे सुभेदार अली इब्‍न रसूल याने येमेन व अन्य अरबी विभागांत रसूल वंशाची स्थापना केली. हे राज्य सु. दोनशे वर्षे टिकले. शेवटच्या अब्बासी खलीफाचा मंगोल योद्धा हुलागूखानाने शिरच्छेद केला, तेव्हा या रसूली सुलतानाने आपणच खलीफा असल्याचे जाहीर केले. परंतु रसूली घराण्याकडे हे पद फार काळ राहिले नाही. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात ईजिप्तच्या मामलूक तुर्कांनी अरबस्तानच्या बऱ्याच भागावर आपला अंमल बसविला. पण सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस कॉन्स्टँटिनोपलच्या ऑटोमन तुर्कांनी त्यांचाही पाडाव केला. ऑटोमन तुर्कांची अरबस्तानवरील सत्ता पहिल्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत टिकली, तरी त्यांचा अंमल नाममात्र होता. प्रत्यक्षात येमेन, हेजॅझ ओमान, अल् हसा इ. लहान राज्यांचा स्वतंत्र कारभार देशाच्या निरनिराळ्या भागांत चालू राहिला.

वरील हकिगतीवरून अरबांच्या विधायक कामगिरीची नीट कल्पना येत नाही. पण इस्लामच्या प्रसाराबरोबरच मध्य आशिया, उत्तर आफ्रिका, स्पेन, फ्रान्स, इटली व भूमध्य समुद्राच्या परिसरातील देशांत पूर्वेचे ज्ञानविज्ञान पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य अरबांनी केले आहे. तत्वज्ञान, गणित, भौतिकी, रसायन, वैद्यक, भूगोल, ज्योतिष, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रांत अरब विद्वानांची कामगिरी उपेक्षणीय खासच नाही. अज्ञानांधकारात चाचपडणाऱ्या यूरोपीय लोकांना धर्मयुद्धाच्या दीड-दोन शतकांत या समृद्ध अरबी जीवनाचे जवळून दर्शन घडले व त्याच्या विशालतेने ते भारावून गेले. पूर्वपश्चिमेच्या या संपर्कातून कालांतराने प्रबोधनकालीन नवजीवनास यूरोपात सुरुवात झाली.

अरबस्तानात तुर्की सत्तेचा विस्तार होत असतानाच १५०८ मध्ये पोर्तुगीजांनी ओमान घेतले. यानंतरचे एक शतक पोर्तुगीज-डच-संघर्षात गेले. पुढे दोन्ही सत्ता मागे पडून ह्या विभागावर इंग्रजांची सत्ता आली.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीस मुहम्मद इब्‍न अब्दुल वह्‌हाब (१७०३–९२१) याने सुरू केलेल्या ⇨वहाबी पंथामुळे अरबस्तानच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. इस्लामची खरी शिकवणूक व प्राचीन परंपरा पुन्हा रूढ करण्याचे कार्य करणाऱ्या ह्या प्रवर्तकाला सुरुवातीस अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले. पण मुहम्मद इब्‍न सौदच्या मुलुखात (हल्लीचा सौदी अरेबिया) आश्रय मिळवून त्याने आपल्या तत्त्वांचा हिरिरीने प्रसार केला आणि पूर्व व मध्य अरबस्तानात वहाबी पंथाची वाढ केली. या नव्या प्रेषिताच्या साहाय्याने मुहम्मद इब्‍न सौद व त्याचा मुलगा अब्दुल अझीझ यांनी वहाबी राज्याचा खूपच विस्तार केला. तेव्हा अरबस्तानातील आपला अंमल टिकविण्यासाठी तुर्की सुलतानाने ईजिप्तचा सुभेदार मुहंमद अली याला अब्दुल अझीझविरुद्ध पाठविले. सुरुवातीस काही वर्षे सौदी सैन्याने मुहंमद अलीला दाद दिली नाही पण नंतर मुहंमद अलीचा मुलगा इब्राहिम पाशा याने अरब टोळ्यांत फितुरी माजविल्याने सौदी सैन्याला अनेक ठिकाणी हार खावी लागली. पुढे दारिया हे राजधानीचे शहर इब्राहिमच्या हाती पडल्यावर राजा पहिला अब्दुल्ला याचा शिरच्छेद करण्यात आला. सौदी कुटुंबियांपैकी कित्येकांना तुरुंगात टाकण्यात आले व काही परागंदा झाले. अशा रीतीने पैगंबराच्या शिकवणुकीनुसार इस्लामचा पुनरुद्धार करण्याचे कार्य व ते करणारे सौदी साम्राज्य नष्ट झाल्यासारखे दिसले. तरीही अरबस्तानात अनेक ठिकाणी वहाबी चळवळ चालू राहिली व तुर्की साम्राज्याला कधी गुप्त तर कधी उघड विरोध होत राहिला. एकंदरीत १८२० पासून सुमारे नव्वद वर्षांचा अरबस्तानचा इतिहास सौदच्या कुटुंबियांचे आपापसांतील हेवेदावे, तदानुषंगिक भांडणे व निरनिराळ्या अरब गटांतील यादवी ह्यांनी भरलेला आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी अरबस्तानकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. कारण एडन त्यांच्या ताब्यात आले होते व हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व होते. रशियाचा मध्यपूर्वेतील विस्तार, रशिया-तुर्कस्तानचे वैमनस्य व तदानुषंगिक पूर्वेच्या प्रश्नाची गुंतागुंत इ. कारणांमुळे ब्रिटिशांना ह्या मुलुखाकडे लक्ष देणे आवश्यक झाले. साहजिकच १८६५ मध्ये ब्रिटिशांनी सौदी राजा फैसलची भेट घेऊन तहाची बोलणी केली. पुढे तुर्कस्तान जर्मनीकडे झुकू लागल्याचे पाहून ब्रिटिशांचे तुर्कानुकूल धोरण बदलले व त्यांनी अरबांना उत्तेजन देण्यास सुरुवात केली.

ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन १९०२ मध्ये अब्दुल अझीझने [⟶ इब्‍न सौद] मोठ्या साहसाने रिआद शहर काबीज करून सौदी सत्तेचे पुनरुज्जीवन केले. लवकरच शम्मार, अल् हसा, हेजॅझ व येमेन हे तुर्की प्रांत सोडून बाकीच्या सर्व अरबस्तानात इब्‍न सौदची सत्ता मान्य झाली. पुढील काही वर्षांत त्याने आपल्या राज्याची घडी नीट बसविली. एवढे होईतो पहिल्या महायुद्धाच्या ज्वाला भडकल्या व मध्यपूर्वेच्या राजकीय जीवनात मोठीच क्रांती झाली. पहिले महायुद्ध सुरू होताच अरबस्तानात तुर्कांविरुद्ध बंडाळी सुरू झाली. टी. ई. लॉरेन्ससारख्या इंग्रजांनी अरबांना संघटित केल्याने तुर्कस्तानचे बरेच सैन्य मध्यपूर्वेत अडकून पडले व त्याचा यूरोपातील जर्मन-तुर्क-युद्ध-प्रयत्‍नावर प्रतिकूल परिणाम झाला. या युद्धात इब्‍न सौद तटस्थ राहिला व अरबांचे नेतृत्व हेजॅझच्या हुसेनने केले. परिणामतः युद्धाच्या अखेरीस सिरिया, पॅलेस्टाइन, इराक इ. अरबी राज्ये अस्तित्वात आली आणि इंग्‍लंड-फ्रान्सच्या विश्वस्त-व्यवस्थेत त्यांची स्वातंत्र्याकडे वाटचाल चालू झाली.

युद्ध संपताच इब्‍न सौदने संपूर्ण अरबस्तान आपल्या अंमलाखाली आणण्याच्या धोरणानुसार हालचालींना सुरुवात केली. त्याने हेजॅझच्या हुसेनचा तुराबा येथे पराभव केला व त्याचा मुलगा फैसल याने आसीर प्रांत आपल्या पित्यास मिळवून दिला. सौदने रशीदी वंशाचा शेवटचा अमीर इब्‍न रशीद याचा पराभव करून सर्व उत्तर अरबस्तान आपल्या राज्यास जोडला. कुवेतचा अमीर अहमद इब्‍न जाबिरने सौदशी मैत्रीचा तह केल्याने त्याला पुष्कळ स्वस्थता मिळाली. परंतु ब्रिटिशांच्या साहाय्याने हेजॅझच्या अमीराचे मुलगे फैसल व अब्दुल्ला यांना इराक व ट्रॅन्सजॉर्डनची राज्ये मिळाल्यामुळे सौदी अरेबियाच्या उत्तर व पश्चिम सीमेवर ब्रिटिशसंरक्षित अरबी राज्यांचा विळखाच पडला. साहजिकच हेजॅझ, इराक, ट्रॅन्सजॉर्डन व सौदी अरेबिया यांच्यात सतत कुरबुरी होत राहिल्या-१९२३ मध्ये ब्रिटिशांनी या अरबी राज्यांची एक परिषद कुवेतमध्ये बोलाविली पण हेजॅझ व सौदी अरेबियात कोणत्याही बाबतीत एकमत होऊ शकले नाही. १९२४ मध्ये इब्‍न सौदने हेजॅझवर स्वारी केली आणि ताईफ, मक्का, मदीना, जद्दा, इ. शहरे त्याने एकामागोमाग काबीज केली. तेव्हा हेजॅझच्या हुसेनने राज्यत्याग करून आपला मुलगा अली याला गादीवर बसविले. अशा रीतीने इब्‍न सौदची सत्ता खूपच वाढल्याने ट्रॅन्सजॉर्डनवर त्याची धाड पडू नये म्हणून ब्रिटिश सैन्याने उत्तर हेजॅझमधील अकाबा व मेन हे जिल्हे व्यापले. तरीही १९२६ मध्ये इब्‍न सौदने ‘हेजॅझचा राजा’ हा किताब धारण केला. १९२७ मध्ये त्याच्याशी तह करून ब्रिटिशांनी भांडण मिटविले. रशियानेही इब्‍न सौदला मान्यता दिली. साहजिकच त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात मान मिळू लागला. त्यानंतर अनेक अडचणींना तोंड देऊन १९३२ मध्ये इब्‍न सौदने नव्या सौदी अरेबियाच्या राज्याची घोषणा केली. याच कालावधीत अरबस्तानच्या अनेक भागांत तेलाच्या खाणी सापडल्याने अरबांच्या जीवनावर व मध्यपूर्वेच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी अरबी एकतेचा पुरस्कार केला व ⇨ अरब लीगच्या स्थापनेस बरेच साहाय्य केले. सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रांत या संघाने महत्त्वाचे कार्य केले असले, तरी अरबी जगाचे राजकीय ऐक्य मात्र अद्याप असाध्यच राहिले आहे.

१९४८ व १९६७ मधील अरब-इझ्राएल-संघर्षांच्या वेळीही अरब देशांत इष्ट तेवढे ऐक्य दिसून आले नाही. या संघर्षांमुळे निर्माण झालेल्या अरब निर्वासितांची समस्या व मध्यपूर्वेतील अनेक अन्य ज्वलंत प्रश्न अनिर्णितच आहेत. अरबस्तानातील तेलसाठ्यांमुळे मात्र अरबस्तान भावी काळात वैभवसंपन्न होईल असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योजनापूर्वक उपयोग झाल्यास समाईक विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित होऊन अरबांची उन्नती होईल अरब विकासबँक ही गेली काही वर्षे त्या दिशेने प्रयत्‍न करीत आहे.

लोक व समाजजीवन: अरबस्तानचा व अरबांचा बायबलच्या जुन्या करारात अप्रत्यक्ष उल्लेख आढळतो. इ.स.पू. ८५३ मधील ॲसिरियाच्या एका शिलालेखात राजा शॅल्मानीझर तिसरा याने गिंडिब अरिबीकडून खंडणी वसूल केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ॲसिरियाबॅबिलोनिया येथील शिलालेखात अरिबी, अराबू, उर्बी असे अनेक उल्लेख येतात. त्यांवरून हल्लीच्या सिरिया-अरबस्तानच्या वाळवंटातील भटक्या जमातींचा बोध होतो. अनेक ग्रीक, लॅटिन लेखकांनी नाईलपासून इराणी आखातापर्यंत पसरलेल्या भूभागाचा ‘अरबस्तान’ व त्यावरील जमातीचा ‘अरबी’ असा उल्लेख केलेला आहे.

अरब हे सेमिटिक वंशाचे लोक असून अरबी भाषेचे प्राचीन ॲसिरियन, बॅबिलोनियन, हिब्रू व फिनिशयन भाषांशी साम्य आहे. मध्य अरबस्तानातील भटक्या जमातीला प्राचीन काळी अरब हे नाव दिलेले आढळते. पुढे दक्षिणेकडे स्थायिक होऊन शेती करणाऱ्‍यांना अरब व मध्य अरबस्तानातील भटक्यांना बेदूईन अशी नावे मिळाली. कालांतराने अनेक अरबी जमाती उत्तरेकडे सरकल्या व मध्यपूर्वेतील तसेच उत्तर आफ्रिकेतील कित्येक प्रदेशांत त्यांनी वस्ती केली. आज अरब म्हणजे अरबी भाषी व अरबी संस्कृतीचा वारसा सांगणारी व्यक्ती असे मानले जाते व तदनुसार मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया, लिबिया, सूदान, ईजिप्त, जॉर्डन, लेबानन, सिरिया, इराक, कुवेत, सौदी  अरेबिया, बहारीन, कॉटार, इराणच्या आखाताच्या परिसरातील शेखांची राज्ये–संयुक्त अमीर राज्ये–ओमान, एडन व येमेन या देशांचा अरब-गटात समावेश होतो [⟶ अरब लीग].

वरील अरब देशांत आज सर्वत्र अरब लोक आहेत असे नाही. कॉप्‍ट, बर्बर, कुर्द व ज्यू जमातींचे हजारो नागरिक विविध अरब देशांत राहतात. पैकी ज्यू मात्र आता बहुतांशी ⇨ इझ्‍राएलमध्ये केंद्रित झाले आहेत.

निरनिराळ्या अरब देशांतील श्रीमंत, शिक्षित व शहरी लोक पाश्चात्य धर्तीच्या सुटाबुटात वावरताना दिसले तरी बहुतेक अरब लोक ‘गलबिया’ नावाचा जुन्या पद्धतीचा सुती पायघोळ झगा, विजार व फेझ टोपी किंवा पागोटे वापरतात. स्त्रिया सामान्यतः कुडत्यासारखा काळा किंवा निळ्या रंगाचा खमीस, साधा पायजमा, ओढणी व बुरखा वापरतात.

धर्माने बहुसंख्य अरब मुसलमान आहेत. पण त्यांच्यात पंथभेद आहेतच. काही अरब ख्रिस्तीही आहेत. मूर्तिपूजा करणारे अनेक अरब अजूनही दिसतात. धर्मावरून अरब-गटांत तंटेबखेडे होतात. मात्र धर्मपंथभेद असूनही बहुतेक सर्व लोक अरबी भाषेचे व अरबी संस्कृतीचे अभिमानी आहेत.

आज अरब देशांत निरक्षरतेचे प्रमाण फार असले, तरी प्राचीन काळात खगोल, भूगोल इ. शास्त्रांत त्यांनी चांगली प्रगती केलेली होती. व्यापारानिमित्त अनेक अरबांचा पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतींशी संबंध आला व दोन्हीकडील ज्ञानाची देवाणघेवाण त्यांच्यामार्फत झाली. तथापि मध्ययुगात ही प्रगती थंडावली. हल्ली पारंपरिक पद्धतीने व अनुकरणाने जातिरिवाजांचे सर्वांना शिक्षण मिळते व अरबी संस्कृती अंगी बाणते. कुटुंबसंस्थेला अरबी जीवनात मानाचे स्थान असून कुटुंबाच्या अब्रूचा अभिमान जाज्वल्य असतो. कित्येक निरक्षर अरबांनादेखील प्राचीन अरबी काव्ये व कुराणातील भाग मुखोद्गत असतात. एकंदरीत बहुसंख्य अरबी लोक अशिक्षित पण सुसंस्कृत आहेत. अलीकडे शिक्षणाचे महत्त्व पटल्याने अरब देशांत शिक्षणप्रसाराचे प्रयत्‍न कसोशीने होऊ लागले आहेत.

अरबी देशांतील भौगोलिक परिस्थितीचा तेथील लोकजीवनावर साहजिकच प्रभाव पडला आहे. उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंटापासून मध्य आशियातील गोबी वाळवंटापर्यंत सर्वत्र वालुकामय मुलूख असल्याने यातील पाणथळ भागात वाढणाऱ्‍या गवताळ प्रदेशाच्या व खजुराच्या झाडांच्या आश्रयाने भटके धनगरी तांडे राहतात. क्वचित पाणीपुरवठा असल्यास लहान-लहान शहरेही विकास पावलेली दिसतात. अरबस्तानच्या दक्षिण, आग्नेय व अन्य सुपीक भागांतील लोक सामान्यतः कृषिव्यवसायी आहेत. यांना शेतीचे ज्ञान पुष्कळच असून ते कामसू व हुषार आहेत. जवळपासच्या विहिरी, ओढे, नाले इत्यादींच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करून घेण्यात ह्यांची बुद्धिमत्ता दिसून येते. त्यांनी म्हैस, उंट इ. प्राण्यांचा मोट हाकण्यासाठी उपयोग केलेला दिसतो. बहुतेक शेतकरी खेड्यांत राहतात. खेडी म्हणजे लहान-लहान मातीच्या झोपड्यांचा समूह. यांतील बहुतेक व्यवहार परंपरेनुसार चालतात. मुलामुलींची लग्ने लहानपणी होतात.

अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारात बरेच अरब गुंतलेले आहेत. त्यामुळे मोठमोठी अरबी शहरे पाश्चात्य पद्धतीने वाढत आहेत. परंतु लहान-लहान शहरांतील वातावरण मात्र सर्वस्वी जुनेपुराणेच आहे. कित्येक अरबी शहरांत धातूचे घडीव काम, विणकाम, कातडीकाम इ. हस्तोद्योग प्रसिद्ध असून या अरबी ग्रामोद्योगांना उज्ज्वल भविष्यकाल आहे.

संदर्भ : 1. Hitti, Philip K. History of the Arabs, London, 1960.

           2. Philby, J. B. The Heart of Arabia, London, 1922.

ओक, द. ह.