सूव्हा : फिजी देशाची राजधानी, दक्षिण पॅसिफिक महासागरातील फिजीचे व्यापारी केंद्र व बंदर. लोकसंख्या १,७२,३९९ (२०१२) अंदाजे. फिजीमधील व्हीटी लेव्हू बेटाच्या आग्नेय किनाऱ्यावर १८४९ मध्ये सूव्हा वसविण्यात आले. १८८२ पासून फिजी वसाहतीची राजधानी येथे झाली. १९५२ मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला व सध्या त्याची दक्षिण पॅसिफिक द्वीपसमूहातील मोठ्या शहरांत गणना होते. पश्चिमेस व्हीटी लेळू बेटाच्या किनाऱ्यावरील नांदी या आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहराशी सूव्हा शहर रस्ते व हवाईमार्गाने जोडलेले आहे. हे शहर ऑस्ट्रेलिया व उत्तर अमेरिका यांच्यामधील प्रवासी व मालवाहतुकीच्या जहाजांच्या थांब्याचे प्रमुख ठिकाण आहे. दुसऱ्या महायुद्घात मित्र राष्ट्रांचा लष्करी तळ येथे होता.

येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. येथे अन्नप्रक्रिया उद्योग, सिगारेट, साबण, खोबरेल तेल, लहान बोटी इत्यादींचे निर्मिती उद्योग आहेत. शहरात आकाशवाणी केंद्र असून त्याचे कार्यक्रम हिंदी, इंग्रजी व फिजीयन भाषेत प्रसारित होतात. येथे यूरोपीय, भारतीय, चिनी, पॉलिनेशियन, फिजी लोक वास्तव्यास आहेत. फिजी स्कूल ऑफ मेडिसिन अँड नर्सिंग (१९२८), युनिव्हर्सिटी ऑफ द साउथ पॅसिफिक (१९६८), फिजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, तंत्रशिक्षण संस्था, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय इ. संस्थांमुळे येथे उच्च शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शहरात अद्ययावत वैद्यकीय सुविधा आहेत. येथील फिजी संग्रहालयात ऐतिहासिक व मानवजातिशास्त्रविषयक वस्तूंचा संग्रह आहे.

राऊत, अमोल