स्कॉटलंड : युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड या देशाचा एक विभाग. क्षेत्रफळ ७८,७७२ चौ.किमी. देशाच्या एकूण भागापैकी एक तृतीयांश क्षेत्र स्कॉटलंडने व्यापलेले आहे. लोकसंख्या ५२,९४,९४० (२०११). याच्या दक्षिणेस देशाचा इंग्लंड हा भाग, पश्चिम व उत्तरेस अटलांटिक महासागर आणि पूर्वेस उत्तर समुद्र आहे. वायव्येस रॅथ भूशिर ते नैर्ऋत्येस मल ऑफ गॅलवेपर्यंतची याची कमाल लांबी ४४१ किमी. व पश्चिम भागातील हामलँडमधील ॲपलक्रॉस ते पूर्वेकडील ग्रॅम्पियन पर्वतातील बुकन नेसपर्यंतची कमाल रुंदी २४८ किमी. आहे. याच्या किनारी भागात सु. १,००० बेटे असून त्यांपैकी सु. १५० बेटे  निर्मनुष्य आहेत. या बेटांचे प्रमुख चार समूह आहेत. अगदी उत्तरेकडे  शेटलंड बेटे, उत्तर किनार्‍याजवळ ऑर्कनी बेटे, पश्चिम किनार्‍याजवळ व अटलांटिक महासागरात औटर हेब्रिडीझ व इनर हेब्रिडीझ ही बेटे आहेत. स्कॉटलंड व इंग्लंड यांदरम्यानची सरहद्द ट्वीड नदी, चेव्ह्यट टेकड्या व सॉल्वे फर्थ यांनी बनली आहे. एडिंबरो ( लोकसंख्या ४,८२,६४०—२०११) ही स्कॉटलंडची राजधानी आहे. 

भूवर्णन : स्कॉटलंडचे प्राकृतिक दृष्ट्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश (हायलँड्स ), मध्यभागातील सखल प्रदेश ( लोलँड ) व दक्षिणेकडील उंचवट्याचा प्रदेश (अपलँड्स) असे तीन भाग होतात.

  उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश हा लहान-मोठ्या, रुंद व अरुंद दर्‍यांनी अलगअलग झालेला असून त्यावर हिमक्रियांचा परिणाम झालेला दिसून येतो. स्कॉटलंडच्या पूर्व किनारी भागातील इन्व्हर्नेस परगण्यापासून पश्चिम किनार्‍यावरील फोर्ट विल्यमपर्यंत पसरलेल्या ग्रेट ग्लेन ( दरी ) ऑफ स्कॉटलंड या दरीमुळे याचे दोन भाग होतात. लॉक ( सरोवर ) नेस हे येथील मोठे सरोवर आहे. ग्रेट ग्लेनच्या नैर्ऋत्येस ग्रॅम्पियन पर्वत- प्रदेश आहे. या पर्वतात बेन नेव्हिस (उंची १,३४३ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतप्रदेशाच्या उत्तरेकडील भागातील केर्नगॉर्म पर्वताची चार शिखरे १,२०० मी. पेक्षा जास्त उंचीची आहेत. याच भागात सु. ५४३ लहानलहान टेकड्या ९०० मी. पेक्षा जास्त उंच आहेत. ग्रेट ग्लेनच्या उत्तरेस प्राचीन पठार असून येथे जमिनीची धूप, हिमनद्यांचे कार्य यांमुळे सामान्यतः सारख्या उंचीची शिखरे तयार झाली असून तीगोलाकार आहेत. तसेच याच्या ईशान्य भागात हिमकार्यामुळे ‘ हमकी ’ (बर्फाच्या क्षेत्रातील उंचवटा / टेकाड ) भूप्रदेश तयार झालेला आहे. या डोंगराळ प्रदेशाच्या दक्षिणेस, स्कॉटलंडच्या मध्यभागी इतर भागांच्या तुलनेने सखल भाग आहे. हा प्रदेश ग्लासगो ते ईशान्येस ॲबर्डीन व दक्षिणेस एर शहरापासून ईशान्येकडे डुनबार शहर यांदरम्यान पसरलेला आहे.  या प्रदेशात अनेक लहानलहान टेकड्या असून त्यांपैकी कँपसिस, पेंटलंड्स, सिडलॉ, ओखिल इ. प्रमुख आहेत. या भागाची सर्वसाधारण उंची ५७९ मी. आहे. बेन क्लूक ( उंची ७२० मी.) ही या भागातील सर्वोच्च टेकडी आहे. सिडलॉ टेकड्यांच्या भागात सखल मैदानी भाग व एडिंबरो शहराभोवती लोदीअन्झ मैदानी प्रदेश असून काही ठिकाणी मूरलँड (पाणथळ ) आहे.

  स्कॉटलंडचा अगदी दक्षिणेकडील भाग उंचवट्यांचा व लहानलहान टेकड्यांचा आहे. निथ नदीच्या पूर्वेकडील भागात रुंद, गोलाकार, कमी उताराच्या टेकड्या असून त्या गवताळ आहेत. या भागातील मौंट मेरिक हे ८४३ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. या टेकड्या मेंढीपालनासाठी उपयुक्त आहेत. तसेच या क्षेत्रात क्लाइड, फोर्थ व टे नद्यांची  खोरी आहेत.

  स्कॉटलंडमध्ये समुद्राचे अरुंद फाटे भूभागाच्या आतपर्यंत येऊन आणि ‘ यू ’ दर्‍यांचे खोल भाग पाण्याने भरून सरोवरे तयार झालेली आहेत. अशा काही दर्‍या – ग्लेन – जोडून आरपार मार्ग तयार केलेले आहेत. अशा प्रकारे ग्रेट ग्लेन ऑफ स्कॉटलंडचा उपयोग कॅलिडोनियन कालव्या- साठी केलेला आहे.

  येथील मृदाप्रकारांत विविधता आढळते. स्कॉटलंडच्या वायव्य भागात व हेब्रिडीझ, शेटलंड बेटांवर जमीन खडकाळ आणि कमी प्रतीची आहे. नदीमुखे, सखल किनारी भाग व ग्लेन यांमध्ये तसेच ऑर्कनी बेटे आणि हेब्रिडीझ बेटांच्या प. किनारी लागवडयोग्य  जमीन आहे. डोंगरी भागात व मूरलँडमध्ये पीट प्रकारची मृदा आढळते.

स्कॉटलंडचा प्रदेश नदी व तळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील पूर्व-वाहिनी नद्या पश्चिमवाहिनी नद्यांपेक्षा लांब आहेत. डी, डॉन आणि स्पे या नद्या नागमोडी वळणे घेत पूर्वेकडे व नंतर ईशान्येकडे वाहत जाऊन उत्तर समुद्रास मिळतात. टे व फोर्थ या नद्या ग्रॅम्पियन पर्वतात उगम पावून मध्यवर्ती सखल प्रदेशातून पूर्वेकडे वाहत जाऊन उत्तर समुद्रास मिळतात. क्लाइड व ट्वीड या नद्या दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशात उगम पावतात. क्लाइड पश्चिमेकडे वाहत जाऊन फर्थ ( खाडी ) ऑफ क्लाइडद्वारे अटलांटिक महासागरास मिळते, तर ट्वीड नदी पूर्वेकडे वाहत जाऊन उत्तर समुद्रास मिळते. तसेच निथ, ॲनन या येथील अन्य नद्या आहेत. सेंट मेरी, लेव्हन, लोमंड कॅट्रन, अर्न, मरी, लॉकी, नेस, नेव्हिस, ऑइक ही येथील प्रमुख सरोवरे आहेत.

  हवामान : स्कॉटलंडचे हवामान थंड, सागरी व सौम्य आहे. नैर्ऋत्य अटलांटिक वार्‍यांमुळे व स्कॉटलंडच्या पश्चिम किनार्‍यावरील उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळे हिवाळ्यातील तापमान किंचित उबदार असते परंतु उन्हाळ्यातील तापमानातील बदल अनियमित आहेत. पश्चिम किनार्‍या- वरील टाइरी बेटावरील हिवाळ्याच्या अती थंड महिन्यातील तापमान ५° से., तर पूर्व किनार्‍यावरील डंडी येथील तापमान ३° से. असते. तसेच उन्हाळ्यात टाइरी बेटावरील कडक उन्हाळ्याच्या महिन्यात तापमान १४° से., तर डंडी येथे १५° से. असते. स्कॉटलंडच्या सु. दोन तृतीयांश भागात वार्षिक सरासरी १०° सेंमी. पाऊस पडतो. पश्चिम किनारी भागात  –  विशेषतः डोंगराळ भागात – पूर्व किनारी भागापेक्षा जास्त पाऊस पडतो. फोर्ट विल्यमजवळील पर्वतीय भागात वार्षिक सरासरी ३८° सेंमी., तर पूर्व किनारी भागातील मरी पोर्ट येथे ६३.५ सेंमी. इतकाच पाऊस पडतो. बेन नेव्हिस भागात व कोईक लॉकजवळ वार्षिक सरासरी ३६° सेंमी. पर्जन्यमान आहे. येथे हिवाळ्यात बर्फ पडते त्याचे प्रमाण अक्षांश व सस.पासूनची उंची यांनुसार बदलत जाते. येथील डोंगराळ भागात नैसर्गिक जंगले टिकून आहेत. त्यांमध्ये देवदार ( पाइनवुड ), अल्पाइन व आर्क्टिक प्रकारांपैकी पाषाणभेदी ॲझेलेआ इ. वनस्पती आढळतात. या प्रदेशात  हरिण, कोल्हा, बिजू, ऊद मांजर इ. प्राणी आहेत. सोनेरी  गरुड, बहिरी ससाणा, ग्राउझ, तीसा ( बझर्ड ) हे पक्षी व समुद्रकिनारी गॅनिट, गल, गिलिमॉट, फलमर इ. समुद्रपक्षी आढळतात.

  इतिहास : स्कॉटलंडमध्ये मध्य अश्मयुगापासूनच्या ( इ. स. पू. सु. ८,००० वर्षांपूर्वी ) मानवी वसाहतीचे फार थोडे पुरावे मिळतात. हे सर्व लोक शिकार व मासेमारीच्या निमित्ताने या प्रदेशात येत असावेत. नवाश्म-युगात ( इ. स. पू. सु. ४०००–२०००) या भागात वसाहतीच्या दृष्टीने प्रयत्न झाले असावेत. त्यांपैकी भूमध्य सागरी प्रदेशातील लोकांनी भूमध्य समुद्र ते बाल्टिक समुद्र या जुन्या व्यापारीमार्गाने बिस्के उपसागरातून येऊन स्कॉटलंडच्या पश्चिम व उत्तर किनारी भागात, तर यूरोप खंडातील लोकांनी उत्तर समुद्रमार्गे येऊन याच्या पूर्व किनार्‍यावर वसाहत केली होती. हे लोक गुरे पाळत व शेती करीत. इ. स. पू. पहिल्या शतकात येथे ⇨ केल्ट लोकांनी डोंगराळ भागात वसाहती केल्या. पुढे स्कॉटलंड जिंकण्यात रोमनांना अपयश आल्यानंतर रोमनांनी या लोकांपासून संरक्षणासाठी इंग्लंडमधील टिन नदी ते सॉल्वे फर्थ आणि क्लाइड नदी ते फर्थ ऑफ फोर्थपर्यंत संरक्षक भींत बांधली होती. रोमनांनी नंतरही स्कॉटलंडवर स्वार्‍या केल्या परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही.

 स्कॉटलंडच्या प्रदेशात इ. स. सु. ६०० मध्येे हायलँडभागात पिक्ट, डॅलरीॲडा ( अर्गेल ) भागात स्कॉट, पश्चिमेकडील लोलँड ( स्ट्रेथक्लाइड ) भागात रोमनधार्जिणे ब्रिटॉन व दक्षिणेकडील लोलँड  (लोथियन ) भागात अँजेल्स यांच्या वसाहती होत्या. पहिला केनेथ (केनेथ मॅकॅल्पिन ) याने पिक्ट-स्कॉट संयुक्त राज्य ( ॲल्बन ) स्थापन केले ( सु. ८४३). या राज्यात कॅरहॅम युद्धानंतर (१०१६ किंवा १०१८) अँजेल्स लोकांचे लोथियन भाग समाविष्ट झाला. १०३४ मध्ये प. लोलँडमधील ब्रिटॉनांच्या स्ट्रेथक्लाइड राज्याचा युनायटेड किंग्डम ऑफ स्कॉटलंडमध्ये समावेश झाला. कॅथनेस व सदरलंड हे भाग नॉर्मनां-कडून विल्यम दी लायन ( पहिला  विल्यम ११६५—१२१४) याने  जिंकून घेतले. तसेच ऑर्कनी व शेटलंड ही बेटे जेम्स विल्यमच्या विवाहात डेन्मार्ककडून स्कॉटलंडला मिळाली (१४६८-६९). सहाव्या शतकाच्या दुसर्‍या मध्यास रोमनांच्या शेवटच्या कालावधीत सेंट निनिअन, सेंट केंटिगेर्न, सेंट कोलुंबा यांनी स्कॉटलंडमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी येथे केल्टिक चर्च ही महत्त्वाची धर्मप्रसारक संस्था होती. त्यांचे रोमनांशी संबंध चांगले नव्हते. व्हिट्बी येथील धर्माचारी सभेतील पराभवानंतर स्कॉट व पिक्ट लोकांनी रोमन सत्ता आणि त्यांच्या चालीरीती मान्य केल्या (६६४). सेंट अँड्र याने डंकेल्ड येथील धर्मपीठाचे प्रमुख केंद्र बरखास्त केले. मार्गारेट या इंग्लंडच्या राजकुमारीने तिसरा मॅल्कम याच्याशी विवाह केला होता. हिने अकराव्या शतकाच्या शेवटी रोमन कॅथलिक चर्च व स्कॉटिश चर्च यांच्या जवळीकतेसाठी प्रयत्न केले होते. मार्गारेट राणीचा मुलगा पहिला डेव्हिड ( कार. ११२४—५३ ) याने अँग्लो-नॉर्मन धर्तीवर स्कॉटिश चर्चची पुनर्रचना केली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा हेन्री याने इंग्लंडच्या स्कॉटलंड-मधील भागाचा कब्जा घेतला. हा इंग्लंडचा प्रदेश पुन्हा घेण्याच्या प्रयत्नात असताना विल्यम दी लायनला ॲमिक येथे ११७४ मध्ये अटक झाली आणि त्यास फालेझचा तह करावा लागला. या तहान्वये स्कॉट-लंडमधील त्याचे राज्य ही इंग्लंडची जहागीर आहे हे लायनला मान्य करावे लागले मात्र इंग्लंडचा पहिला रिचर्ड याने ११८९ मध्ये स्कॉटलंडचे राज्य धर्मयुद्धातील मदतीच्या आर्थिक साहाय्याच्या बदल्यात लायनला परत केले.

याप्रमाणे तेराव्या शतकात इंग्लंड व स्कॉटलंड यांदरम्यानची ट्वीड नदी, चेव्ह्यट टेकड्या, सॉल्वे फर्थ यांना अनुसरून सरहद्द निश्चित करण्यात आली. त्यानंतर स्कॉटलंड व इंग्लंड यांदरम्यानचा बराच काळ शांततेचा होता. स्कॉटलंडच्या विल्यम दी लायनचा वारसदार दुसरा अलेक्झांडर (१२१४ — ४९) व तिसरा अलेक्झांडर (१२४९—८६) यांच्या कार-कीर्दीचा  कालावधी स्कॉटलंडचा सुवर्णकाळ मानण्यात येतो. या काला-वधीत केंद्रीय प्रशासन पद्धत कार्यरत करण्यात आली. व्यापार व शेती व्यवसायात भरभराट झाली व हेब्रिडीझ ही बेटे स्कॉटलंडला परत घेण्यात यश मिळाले. जॉन बेल्यल ( कार. १२९२—९६) याची स्कॉटलंडचा राजा म्हणून निवड झाली. त्याने पहिला एडवर्ड याचा सार्वभौम उमराव म्हणून सन्मान केला. बेल्यल याने इंग्लडचा शत्रू फ्रान्सशी मैत्री करून १२९५ मध्ये इंग्लंडशी स्वातंत्र्याचे युद्ध सुरू केले मात्र पहिला एडवर्ड याची स्कॉटलंडमधील १२९६ ची मोहीम पूर्ण यशस्वी झाली व बेल्यल यास सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. तद्नंतर विल्यम वॉलेस याने इंग्लंडचा स्टिर्लिंग ब्रिज येथे पराभव केला (१२९७) मात्र पुढच्याच वर्षी तो फॉलकर्क येथे पराभूत झाला व एडवर्डने स्कॉटलंडवर पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. रॉबर्ट द ब्रूस ( पहिला  रॉबर्ट कार. १३०६ — २९) याने १३०६ मध्ये बंड केले व स्वतःस राजा म्हणून घोषित केले. त्याला स्कॉटिश पाद्री  व स्कॉटिश जनतेने पाठिंबा दिला. याचवेळी १३०७ मध्ये इंग्लडचा राजा  पहिला एडवर्ड मरण पावला होता व दुसर्‍या एडवर्डच्या कारकीर्दीत इंग्लंडमध्ये अंतर्गत तंटे सुरू होते. त्याचा फायदा रॉबर्ट द ब्रूसने घेऊन हळूहळू स्कॉटलंडमध्ये सत्ता प्रस्थापित केली. त्याने इंग्लंडचा बॅनॉकबर्न येथे १३१४ मध्ये पराभव केला व स्कॉटलंड इंग्लंडपासून स्वतंत्रकरून १३२८ मध्ये नॉर्दॅम्पटनचा तह केला. १३२९ मध्ये रॉबर्ट द ब्रूस मरण पावला. याचवेळी इंग्लंडमध्ये तिसरा एडवर्ड गादीवर आला होता. त्याने रॉबर्ट द ब्रूसचा मुलगा दुसरा डेव्हिड ( कार. १३२९—७०) याच्या विरुद्ध एडवर्ड बेल्यल ( राजा बेल्यलचा मुलगा ) यास सहकार्य केले व युद्ध सुरू केले. एडवर्ड बेल्यलने दुसर्‍या डेव्हिडचा पर्थ येथेऑगस्ट १३३२ मध्ये पराभव केला व तो गादीवर आला. त्याने तिसरा एडवर्ड यास सरंजाम मानले. त्याने १३३४ मध्ये हॅडिंग्टन ते डम्फ्रीसपर्यंतचा स्कॉटलंडचा प्रदेश तिसर्‍या एडवर्डला दिला. दुसरा डेव्हिड फ्रान्समध्ये निघून गेला होता. स्कॉटिश राष्ट्रवादींनी बेल्यलचा पराभव केला मात्र  दुसर्‍या डेव्हिडला इंग्लंडने नेव्हिल्ले युद्धात कैद केले (१३४६) परंतु १३५७ मध्ये त्यास मुक्त केले मात्र त्यासाठी स्कॉटलंडला मोठी खंडणी द्यावी लागली. दुसरा डेव्हिड १३७१ मध्ये मरण पावला. इंग्लंड व स्कॉटलंडच्या एकीसाठी त्याने प्रयत्न केले होते मात्र स्कॉटिशांचा त्यास विरोध होता.


 

 दुसर्‍या डेव्हिडनंतर स्ट्युअर्ट राजघराण्याची राजसत्ता १३७१— १४४६ या काळात दुर्बल झालेली होती. पंधराव्या व सोळाव्या शतकांच्या पहिल्या मध्यापर्यंत राजसत्ता व जनता यांमध्ये संघर्ष झाले. रॉबर्ट घराण्या- तील पहिला जेम्स ते चौथा जेम्स यांच्या कारकीर्दीत (१४०६—१५१३)  स्कॉटलंडच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. पाचवा व सहावा जेम्स सज्ञान होईपर्यंत स्कॉटलंडचा कारभार रिजंटमार्फत पाहण्यात येत होता. सहावा जेम्स सज्ञान होताच त्याने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. तो सहाव्या एलिझाबेथ राणीच्या मृत्यूनंतर (१६०३) पहिला जेम्स ( कार. १६०३—२५) म्हणून इंग्लंडचा राजा झाला. त्याच्यामुळे इंग्लंड व स्कॉटलंड ही राज्ये एकत्र आली. जेम्सची राज्याच्या विशिष्ट हक्कांबाबत काही ठाम मते होती. त्याने पार्लमेंट व चर्च या दोनही सत्ता आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला चार्ल्स ( कार. १६२५—४८). गादीवर आला याच्या कारकीर्दीत जनता व राजसत्ता यांमधील धर्मविषयक वादास तीव्र्र स्वरूप प्राप्त झाले. स्कॉटलंडमधील जनतेने राजास विरोध करण्यासाठी सर्वसमावेशक राष्ट्रीय करार केला (१६३८). तद्नंतर चार्ल्सची स्कॉटलंडबरोबर धर्मयुद्धे चालूच होती मात्र चार्ल्सला यश मिळाले नाही. इंग्लंडमधील यादवी युद्धावेळी स्कॉटलंडच्या जनतेने राजाच्या विरोधकांना मदत केली. इंग्लंडला पार्लमेंटमध्ये पाठिंबा दिला. यादवी युद्धामध्ये चार्ल्सचा पराभव झाला व १६४९ मध्ये चार्ल्सला देहांताची शिक्षा झाली. त्यानंतर स्कॉट लोकांनी त्याचा मुलगा दुसरा चार्ल्स यास गादीवर बसविले. इंग्लंडच्या ऑलिव्हर क्रॉमवेलने इंग्लंडच्या पार्लमेंट-मध्ये स्कॉटलंडला काही प्रमाणात प्रतिनिधित्व आणि इंग्लिश वसाहतींत व्यापारास सवलत देऊन स्कॉटलंड व इंग्लंड यांमध्ये एकी घडवून आणली. ही एकी फार काळ टिकली नाही मात्र भविष्यातील एकीचा हा पाया होता.

चार्ल्सचा भाऊ सातवा जेम्स नावाने स्कॉटलंडच्या व दुसरा जेम्स (कार. १६८५—८८) म्हणून इंग्लंड व आयर्लंडच्या सत्तेवर आला. तो कॅथलिक पंथीय होता. त्यास जनतेचा पाठिंबा होता मात्र त्याच्या कारकीर्दीत १६८८ मध्ये बंड होऊन तिसर्‍या विल्यमची राणी मेरी इंग्लंडच्या राजपदी आली. १६९४ मध्ये मेरीच्या निधनानंतर विल्यम एकटाच राज्यकारभार पाहत होता.  त्याच्या  निधनानंतर (१७०२) मेरीची धाकटी बहीण ॲन (कार. १७०२—१४) गादीवर आली. हिच्या कालावधीत ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्ससाठी ४५ सभासद व ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्डसाठी १६ सदस्य याप्रमाणे स्कॉटलंडला प्रतिनिधित्व मिळाले व इंग्लंड आणि स्कॉटलंड पार्लमेंटचे एकत्रीकरण झाले (१७०७). त्यामुळे स्कॉटलंडचा आर्थिक व सांस्कृतिक विकास झाला. व्यापार, कृषी व्यवसायात वाढ झाली. ग्लासगो, एडिंबरो ही शहरे भरभराटीस आली मात्र जॅकबाइटांचा या एकीस विरोध होता. त्यांनी १७१५ व १७४५ मध्ये उठाव केले मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे इंग्लंड व स्कॉटलंड यांचे एकीकरण बळकट झाले.

पहिल्या महायुद्धाचा फार मोठा परिणाम स्कॉटलंडवर झाला होता. यामध्ये ७४,००० लोक मरण पावले, तसेच उद्योगधंदे व अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. आर्थिक संकट राजकीय जहाल सुधारणावादी मतांना जन्म देणारे ठरले. उदारमतवादाची अधोगती झाली. युनियननिस्ट ( संयुक्त मतवादी ) व लेबर ( मजूर ) या दोन प्रमुख पक्षांत १९२२ मधील निवडणुकीत लढत झाली. लेबर  पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडला गेला. आर्थिक संकटामुळे स्कॉटिश नॅशनल पार्टीची ( एस. एन. पी. ) स्थापना झाली. पुढे दुसर्‍या महायुद्धात प्रतिकार करताना ३४,००० सैनिक व ६,००० नागरिक मारले गेले. लेबर सरकारने १९४७ — ५१ या कालावधीत बेकारी दूर करण्यासाठी महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण व राज्याच्या कल्याणासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. कॉन्झर्व्हेटिव्हांच्या कारकीर्दीतील (१९५१—६४) अर्थव्यवस्थेतील अडथळे लेबर पक्षाला १९६४ व १९६६ मधील निवडणुकीत पाठिंबा वाढीस साहाय्यभूत ठरले. १९७० मध्ये स्कॉटिश नॅशनल पार्टीस निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळाले.

  तेलाच्या किमतीच्या घसरणीमुळे १९८० मध्ये मोठे औद्योगिक प्रकल्प बंद पडले तेव्हा विद्युत् कंपनीच्या वाढीसाठी सरकारने विशेष प्रयत्न केले. त्यामुळे १९९० मध्ये स्कॉटलंड यूरोपातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले. याचवेळी पर्यटनासही महत्त्व प्राप्त झाले. स्कॉटलंडमध्ये लेबर पक्षाची लोकप्रियता टिकून होती तसेच स्कॉटलंड नॅशनल पार्टीने आपले महत्त्व जाणून घेण्यास भाग पाडले होते. मे १९९७ च्या पार्लमेंट निवडणुकीत लेबर पक्षास विजय मिळून कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव झालेला होता. टोनी ब्लेअर यांच्या लेबर सरकारने स्कॉटिश पार्लमेंटच्या अधिकार वाढीसाठी व शिक्षण, आरोग्य यांवर स्कॉटिश पार्लमेंटला अधिकार देण्याबाबत जननिर्देश घेतले. जननिर्देश बहुमताने मिळाल्यानंतर सरकारने स्कॉटिश पार्लमेंट-साठी निवडणुकीत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत स्वीकारली. १९९९ च्या पहिल्या पार्लमेंट निवडणुकीच्या निकालानुसार लेबर व लिबरल डेमॉक्रॅट्स यांचे संमिश्र सरकार स्थापन झाले. इंग्लंड, उत्तर आयर्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड यांना एकत्रितपणे ‘ युनायटेड किंग्डम ’ म्हणून ओळखले जाते. नोव्हेंबर २०१३ ला स्कॉटलंडने या युनायटेड किंग्डममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ मध्ये या दृष्टीने सार्वमत घेण्यात येणार असून, या देशाची जनता ब्रिटिश राष्ट्रकुलाचा घटक राहील, पौंड हेच या देशाचे वित्तीय चलन असेल मात्र स्कॉटलंडला  स्वतंत्र संरक्षण दल असेल. करपद्धती, कररचना आणि करवसुलीची यंत्रणा या तीनही आर्थिक बाबी स्कॉटलंड स्वतंत्रपणे अंमलात आणेल, अशी श्वेतपत्रिका स्कॉटलंड शासनाने प्रसिद्ध केली आहे. 

  राज्यव्यवस्था : स्कॉटलंड शासनाचा प्रमुख देशाचा पंतप्रधान असतो व राज्य प्रमुख वैधानिक राजसत्ता असते. १९९९ पासून स्कॉटलंडसाठी संसद ( पार्लमेंट ) अस्तित्त्वात आली असून संसद एडिंबरो येथे आहे. आरोग्य, शिक्षण, गृहबांधणी, प्रादेशिक दळणवळण, पर्यावरण, शेती, पोलीस, अग्निशमन सेवा यांसंबंधीच्या धोरणांचे अधिकार व स्कॉटलंडमधील ब्रिटिश प्राप्तिकराच्या दरात ३% कपात अथवा वाढ करण्याचे अधिकार स्कॉटिश संसदेला आहेत. १८ वर्षे वयाच्यास्कॉटिश नागरिकांना मतदानाचा हक्क आहे. स्कॉटिश संसदेचे १२९ सदस्य असून त्यांमध्ये ७३ सदस्य सार्वत्रिक मतदानाने व ४६ सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्वाने घेतलेले असतात. या सदस्यांचा कालावधी पाच वर्षांचा असतो.

न्यायव्यवस्था : स्कॉटलंडमधील न्यायव्यवस्था रोमन कायद्यावर आधारित आहे. लॉर्ड ॲडव्होकेट व सॉलिसिटर जनरल हे स्कॉटिश एक्झिक्युटिव्ह लॉ ऑफिसर्स स्कॉटलंडचे कार्यकारी विधी अधिकारी असून स्कॉटिश सरकारची बाजू न्यायालयात मांडतात. यांची नेमणूक ब्रिटिश राजसत्तेमार्फत स्कॉटलंडचा प्रथम मंत्री व स्कॉटिश पार्लमेंटच्या शिफारशीने होते. ॲडव्होकेट जनरल फॉर स्कॉटलंड हा ( ग्रेट ब्रिटनचा ) देशाचा विधी अधिकारी असून तो ब्रिटिश सरकारचा स्कॉटिश लॉर्ड ॲडव्होकेट व सॉलिसिटर जनरलचा सल्लागार असतो. स्कॉटलंडमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट, शेरीफ कोर्ट, द कोर्ट ऑफ सेशन, हायकोर्ट, हाऊस ऑफ लॉर्ड्स ( कोर्ट ऑफ अपील ) याप्रमाणे न्यायालये आहेत. डिस्ट्रिक्ट कोर्ट ( जिल्हा न्यायालये ) न्यायाधिशांस किरकोळ अपराधाबद्दल/आरोपाबाबत न्यायदानाचे अधिकार आहेत. स्कॉटलंडमध्ये दंडाधिकारी न्यायालये असून त्यांना किरकोळ शिक्षा, द्रव्यदंड आणि तुरुंगवास इ. शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. स्कॉटलंडचे सहा शेरीफडॉममध्ये ( विशिष्ट सीमांतर्गत केलेला भाग ) विभाजन केलेले आहे. यांमध्ये ४९ शेरीफ न्यायालये आहेत. यांमध्ये शेरीफ व १५ ज्युरी असतात. येथे फौजदारी व दिवाणी दाव्यांबाबत कार्यवाही होते. द कोर्ट ऑफ सेशनमध्ये इनर हाऊस व औटर हाऊस असे दोन भाग आहेत. इनर हाऊसमध्ये पाच न्यायाधिशांचा एक याप्रमाणे दोन विभाग असतात. येथे औटर हाऊसमधून व खालील न्यायालयातून दाखल अपिल दाव्यांवर सुनावणी होते. औटर हाऊसमध्ये २२ न्यायाधीश असतात. दिवाणी दाव्यांबाबतचे हे सर्वोच्च न्यायालय आहे.

  उच्च न्यायालय हे स्कॉटलंडमधील सर्वोच्च फौजदारी न्यायालय आहे. या न्यायालयात लॉर्ड जस्टिस जनरल, लॉर्ड जस्टिस क्लार्क व इतर ३० न्यायाधीश असतात. हे एडिंबरो येथे आहे. तथापि हे न्यायालय स्कॉटलंडमधील शहरांस प्रत्यक्ष भेटी देऊनही न्यायदान करते. कोर्ट ऑफ सेशनमधील दाव्यांबाबतचे अपिल हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये दाखल करण्यात येते. 

  आर्थिक स्थिती : येथील शासनाने अवलंबलेल्या विशिष्ट योजना, उत्तर समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या साठ्यांचा शोध, उच्च तांत्रिक ज्ञानाचा अवलंब यांमुळे येथील अर्थव्यवस्थेत १९८० पासून सुधारणा झाली. ग्रेट ब्रिटनला निर्यातीमुळे मिळणार्‍या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या एक द्वितीयांश उत्पन्न स्कॉटलंडचे आहे. ग्रेट ब्रिटनच्या इतर भागांपेक्षा स्कॉटलंडचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. तसेच बेकारीचे   प्रमाणही कमी आहे. ब्रिटिश पार्लमेंटचे येथील सूक्ष्म आर्थिक धोरणावर, केंद्रीय अनुदानावरील खर्चावर, व्याजदर व सांपत्तिक विषयावर बंधन असले, तरी स्कॉटिश पार्लमेंटला स्थानिक अर्थव्यवस्था सुधारणा, शिक्षण व प्रशिक्षण यांबाबतचे अधिकार आहेत. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेच्या विकासास झाला आहे.

  अर्थस्रोत म्हणून जंगली प्राणी, पक्षी, नद्यांतील मासेमारी यांना फारच कमी महत्त्व आहे परंतु हरणे व ग्राउझ पक्ष्यांची शिकार, मासेमारी यांमुळे लोकांना काही प्रमाणात व्यवसाय उपलब्ध होऊ शकतात. हरणांचे मांस यूरोपातील देशांत निर्यात केले जाते.


कृषी : दुसर्‍या महायुद्धानंतर उत्पन्नाच्या दृष्टीने कृषिक्षेत्रात विशेष प्रगती झालेली नाही. कृषिक्षेत्रात कष्टकरी लोकांचे प्रमाण कमी आहे. २००५ मध्ये कृषिक्षेत्र ५५,१६,६९३ हे. होते. त्यापैकी ३३,४२,३१५ हे. क्षेत्र चराऊ कुरण आणि १८,५५,७५६ हे. क्षेत्र पिके व गवता-खाली होते. येथे गुरे पाळणे, दुग्धव्यवसाय, मेंढ्यापालन, डुकरे व कुक्कुट-पालन हे व्यवसाय चालतात. येथे बार्ली, गहू , बटाटे, ओट, टोमॅटो ही प्रमुख पिके घेतली जातात.

जंगले : ग्रामीण भागातील जनतेला व्यवसाय उपलब्ध करून देणारा घटक म्हणून वनांना महत्त्व आहे. स्कॉटलंडमध्ये १३,२७,००० हे. वनक्षेत्र होते (२००३). ग्रेट ब्रिटनच्या एकूण लाकूड उत्पादनातील ५०% लाकडाचे उत्पन्न स्कॉटलंडमध्ये होते. वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी फॉरेस्ट कमिशन आहे. येथील जंगलात स्प्रूस, स्कॉटिश पाइन, यूरोपियन लार्च, डग्लस, फर यांचा अंतर्भाव आहे.    मासेमारी : मासेमारी हा व्यवसाय स्कॉटलंडच्या अर्थव्यवस्थेस साहाय्यभूत ठरलेला आहे. ग्रेट ब्रिटनच्या एकूण मासेमारीपैकी दोन तृतीयांश मासेमारी स्कॉटलंडमधील बंदरांतून होते. ॲबर्डीन, ॲबर्डीनशर ही मत्स्यप्रक्रिया करणारी ग्रेट ब्रिटनमधील प्रमुख केंद्रे येथे आहेत. हॅडॉक कॉड, हेरिंग, सोल, मॅकॅरेल, नॅपर्पेक, कॅलॉप, लॉब्स्टर, क्रॅब इ. प्रमुख जलचर येथे आढळतात. प. किनार्‍यावरील अर्गेल ते शेटलंड बेटापर्यंतचा भाग सॅमन माशांच्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

नैसर्गिक साधनसामग्री : खाणकाम व विद्युत्शक्ती यांचा स्कॉटलंडच्या वार्षिक उत्पादनात एक दशांश पेक्षा कमी हिस्सा आहे. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत कोळसा हे येथील प्रमुख खनिज होते. १९१३ मध्ये  कोळसा उद्योगातील ४३ द. ल. टन इतके अत्युच्च उत्पादन  झाले होते मात्र तद्नंतर हे उत्पादन कमीकमी होऊ लागले.  खोल खाणीतून कोळसा काढणे हे कमी आर्थिक फायद्याचे होते. त्यामुळे कोळसा खाणी कमी झालेल्या आहेत. कोळशाशिवाय येथे सोने, चांदी, क्रोमाइट, डायटोमाइट, डोलोमाइट ही खनिजे मिळतात.

उत्तर समुद्रातून खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे उत्पादन १९७० पासून सुरू झालेले आहे. तेलक्षेत्रे ही प्रामुख्याने स्कॉटिश जल क्षेत्रात आहेत मात्र यावर मालकी व याचा महसूल ग्रेट ब्रिटनकडे जमा होतो. तेलक्षेत्रात अमेरिकन तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक कंपन्या कार्यरत आहेत. ॲबर्डीन हे खनिज तेल उद्योगाचे केंद्र आहे तसेच येथील नैसर्गिक वायूंचे उत्पादनही महत्त्वाचे आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूंच्या उत्पादनावर आधारित उद्योगांमुळे हजारो लोकांना व्यवसाय उपलब्ध झालेला आहे. विसाव्या शतकापासून अनेक धरणांद्वारे पाणीसाठा करून त्या आधारे जलविद्युत्-निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. औष्णिक विद्युत्निर्मिती केंद्र एडिंबरोजवळील टॉर्नेस येथे आहे.  

उद्योगधंदे : स्कॉटलंड हा उद्योगप्रधान प्रदेश आहे. स्कॉटलंडच्या एकूण वार्षिक उत्पादनात वस्तुनिर्मिती व बांधकाम उद्योगांचा वाटा एक चतुर्थांशपेक्षा जास्त आहे. फर्थ ऑफ फोर्थ आणि फर्थ ऑफ क्लाइड यांमधील भाग हे स्कॉटलंडचे प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत. पूर्वापार प्रस्थापित असलेला लोह-पोलाद उद्योग, छपाई व प्रकाशन व्यवसाय, मद्यनिर्मिती, कापड उद्योग, खनिज तेल रसायने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोटारगाड्यानिर्मिती इत्यादींचे उद्योग येथे चालतात. शासनाने स्कॉटिश उद्योगांच्या स्वरूपात विविधता व आधुनिकीकरणाचा उपयोग करून, उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांकडे लक्ष वळविले आहे. येथील स्कॉच, व्हिस्की ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पेये असून त्यांचा निर्यातीत मोठा सहभाग आहे. एडिंबरो, ग्लासगो ही प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. ग्लासगो येथे जहाज-बांधणी व अभियांत्रिकी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. डंडी येथे तागाच्या वस्तू , घड्याळे, शीतकपाटे, विद्युत्साहित्य इ. निर्मिती उद्योग आहेत.

स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटनचाच भाग असल्याने पौंड, स्टर्लिंग हे अधिकृत चलन आहे. बँक ऑफ स्कॉटलंड व द रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड यांना चलन वितरणाचे अधिकार आहेत.

वाहतूक व संदेशवहन : स्कॉटिश रस्ते व पूल यांमध्ये पुष्कळशी सुधारणा झालेली असून रस्त्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण केलेले आहे. रस्ते बांधणी व त्यांची निगा राखण्याची जबाबदारी स्कॉटलंड शासनाची आहे. २००६ मध्ये ५४,९०० किमी. लांबीचे सार्वजनिक रस्ते होते. तसेच २००६-०७ मध्ये २,७३६ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. यातील बहुतेक लोहमार्गांचे विद्युतीकरण झालेले आहे.

स्कॉटलंडमध्ये ग्लासगो, ग्रेंज्मथ, कीथ, डंडी, ॲबर्डीन, ग्रिनक ही महत्त्वाची बंदरे आहेत. या बंदरांतून होणार्‍या निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाण जास्त आहे. शेटलंड व ऑर्कनी बेटांवरील बंदरे आणि पूर्व किनार्‍यावरील बंदरे खनिज तेल वाहतुकीस महत्त्वपूर्ण आहेत.

ग्लासगो, एडिंबरो, ॲबर्डीन, प्रेस्टविक येथे विमानतळ आहेत. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ( बीबीसी ) आकाशवाणी व दूरचित्रवाणीवरील बातम्या व कार्यक्रम प्रसारित करते. द डेली रेकॉर्ड, द सन, डेली मेल, दे हेरॉल्ड, द स्कॉट्समन, द प्रेस अँड जर्नल  ही येथील जास्त खपाची व प्रसिद्ध दैनिके आहेत.

लोक व समाजजीवन : स्कॉटलंडची लोकसंख्या ग्रेट ब्रिटनच्या लोकसंख्येच्या एक दशांश पेक्षा कमी आहे. स्कॉटलंडची लोकसंख्या ५२,९४,९४० होती. यामध्ये २५,४१,६०० पुरुष व २७,५३,३४० स्त्रिया होत्या (२०११ अंदाजे). लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ६६ होती (२०११). जननदर दर हजारी १०.९ व मृत्युदर १०.८ होता.  मध्यवर्ती सखल भागात ग्लासगो ते उत्तर समुद्रापर्यंतच्या किनारी प्रदेशात एडिंबरो ते ॲबर्डीन या परिसरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. स्कॉटलंडचे लोक हे मिश्र वंशाचे आहेत. पिक्टस, फर्थ ऑफ फोर्थ व क्लाइडच्या उत्तरेकडील भागात ब्रिटॉन, अर्गेलजवळ अँजेल्स, स्कॉट-लंडच्या उत्तर व पश्चिम भागात स्कँडिनेव्हियन तसेच नॉर्मन, फ्लेमिश लोकही येथे आहेत. तसेच काही भागात आशियाई लोक आहेत. स्कॉट-लंडचे बहुतांशी लोक ख्रिस्त प्रेस्बिटेरिअन असून त्यांवर चर्च ऑफ स्कॉटलंडचा अंमल आहे. सुमारे दोन तृतीयांश लोक स्कॉटिश चर्चचे सदस्य आहेत. रोमन कॅथलिक धार्मिक समूहाचेही बहुसंख्य लोक आहेत. यांशिवाय  येथे असलेल्या इतर ख्रिश्चन संप्रदायांच्या लोकांत काँग्रिगेशनॅलिस्ट,बॅप्टिस्ट, मेथडिस्ट, यूनिटेअरिअन्स यांचा समावेश होतो. तसेच चर्च ऑफ इंग्लंडशी संलग्न असलेल्या एपिस्कोपल चर्च ऑफ स्कॉटलंडशी संबंधित लोकही येथे आहेत.

आरोग्य : स्कॉटलंडमध्ये राष्ट्रीय आरोग्य सेवांमार्फत बहुतांशी आरोग्य सेवा मोफत दिल्या जातात. आरोग्य, समाजकल्याण व गृहनिर्माण याची जबाबदारी स्कॉटिश पार्लमेंटकडे आहे. स्कॉटलंडमध्ये हृदयरोग व फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त आहे.

शिक्षण : स्कॉटलंडची शिक्षण पद्धती परंपरेत बद्धमूल होती. मध्ययुगीन काळात चर्चनी सुरू केलेली विद्यालये आणि पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धातील तीन विद्यापीठे येथे होती. येथे १९६० मध्ये शिक्षण पद्धतीत ठळकपणे सुधारणा करण्यात आल्या. पूर्व प्राथमिक ते  उच्चशिक्षणापर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्कॉटिश पार्लमेंटकडे आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण हे ऐच्छिक व ते बालोद्यान आणि बालकमंदिरे या खाजगी शिशुपालन केंद्रांतून व अन्य संस्थांतून उपलब्ध आहे. स्कॉटलंड-मध्ये ५—१६ वर्षे वयोगटातील मुलांना शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे  आहे. पालकांना आपल्या मुलांनी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा याचा हक्क आहे. वयाच्या सु. बाराव्या वर्षानंतर विद्यार्थी प्राथमिकमधून माध्यमिक शिक्षणाकडे जातो. माध्यमिक शिक्षणानंतरच्या शिक्षणाची सोय उच्च माध्यमिक शिक्षण महाविद्यालये किंवा उच्च शिक्षण संस्थांत उपलब्ध आहे. उच्च माध्यमिक शिक्षण महाविद्यालयांत व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण व उच्च शैक्षणिक पाठ्यक्रमांची सुविधा आहे. फर्दर अँड हायर एज्युकेशन ॲक्ट (१९९२) अन्वये उच्च माध्यमिक शिक्षण महाविद्यालये केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. यांस स्कॉटिश फर्दर एज्युकेशन फंडीज कौन्सिलमार्फत अनुदान देण्यात येते. उच्च शिक्षण संस्थांना स्कॉटिश हाय्यर एज्युकेशन कौन्सिलमार्फत अनुदान देण्यात येत असून २००६ मध्ये येथे २१ उच्च शिक्षण संस्था होत्या. विद्यालयीन शिक्षणाला स्कॉटलंडमध्ये ऐतिहासिक महत्त्व आहे. पंधराव्या व सोळाव्या शतकात स्थापन झालेली सेंट अँड्रज , ग्लासगो, ॲबर्डीन, एडिंबरो येथील विद्यापीठे प्राचीन आहेत. तद्नंतर स्थापन झालेल्या विद्यापीठात स्ट्रॅथक्लाइड, हेरिऑट, स्टर्लिंग, डंडी, एडिंबरो, नेपियर, रॉबर्ट गॉर्डन, ग्लासगो कॅलाडोनियन, ॲबर्टे ही प्रमुख विद्यापीठे आहेत. यांशिवाय एडिंबरो कॉलेज ऑफ आर्ट, ग्लासगो स्कूल ऑफ आर्ट, रॉयल स्कॉटिश स्कूल ऑफ म्युझिक अँड ड्रामा ( ग्लासगो ) या अन्य प्रमुख उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत.

भाषा व साहित्य : स्कॉटलंडमध्ये बहुसंख्य लोक इंग्रजी भाषा बोलतात. याशिवाय गेलिक ही भाषा बोलली जाते. त्याचप्रमाणे उर्दू व पंजाबी या भाषा बोलल्या जातात. स्कॉटलंडमध्ये इंग्रजी, गेलिक व स्कॉटिश भाषेत लेखन झालेले आहे. सोळाव्या शतकातील स्कॉटिश कवी सर रॉबर्ट ॲटॉन यांनी इंग्रजी भाषेत, रॉबर्ट बर्न्स, ह्युग मॅकडिॲरमिड यांनी इंग्रजीच्या स्कॉटिश बोलीभाषेत कविता लिहून कीर्ती संपादन केली. तसेच रॉबर्ट गॅरिऑक, जॉर्ज ब्रूस, एडविन मूर, डेरिक थॉम्सन हेही येथील प्रसिद्ध कवी आहेत. यांशिवाय ⇨ सर वॉल्टर स्कॉट,  म्युरिएल स्पार्क, नेल मुन्रो, एरिक लिंकलेटर, क्रॉम्प्टन मॅकेंझी हे येथील प्रसिद्ध कादंबरीकार आहेत.

कला व क्रीडा : स्कॉटलंडमधील चित्रकला व शिल्पकला हीप्रगत होती. स्कॉटलंडमधील वास्तुरचनेत रोमन, गॉथिक, फ्रेंच, पॅलॅडियन स्थापत्यशैलीचा उपयोग झालेल्या अनेक वास्तू पाहावयास मिळतात. सर विल्यम ब्रूस, रॉबर्ट ॲडम, रेनी मॅकनतॉश या स्कॉटिश वास्तु-शिल्पज्ञांनी वास्तूरचनेत बहुमोल कार्य केलेले आहे. रॉबर्ट ॲडम व जेम्स ॲडम हे अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध स्कॉटिश वास्तुशास्त्रज्ञ होत.

स्कॉटलंडमध्ये प्रतिमाचित्र काढण्याची सुरुवात सतराव्या शतकात झाली. जॉन स्कूगॅल प्रारंभीच्या प्रतिमाचित्रकारांपैकी एक होता. त्यानेहेन्री प्रिन्स ऑफ वेल्सचे प्रतिमाचित्र १६१२ पूर्वी काढले होते. बॅप्टिस्ट मेदिना, हेन्री रिबर्न, डेव्हिड विल्की हे येथील प्रसिद्ध प्रतिमा-चित्रकार होत. जॉन थॉमस ऑफ डुंडीग्टन हा स्कॉटलंडमधील पहिला निसर्गचित्रकार होता. रॉयल स्कॉटिश ॲकॅडेमीचे (१८२६) स्कॉटिश चित्रकलेत महत्त्वाचे योगदान आहे.


स्कॉटलंडने चलचित्रपटात आपला ठसा उमटविला आहे. सीन कॉन्नेरी हा विख्यात नट स्कॉटलंडचा आहे. बिल फार्सीथ या दिग्दर्शकाला  लोकल हिरो  (१९८३), ब्रेव्ह हर्ट (१९९५), ट्रेन्स स्पॉटिग  (१९९६), ऑर्फन्स (१९९७) या चित्रपटांद्वारा आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्कॉटिश चित्रपट भाग घेत असतात. 

परंपरागत लोकसंगीतातही स्कॉटलंड प्रसिद्ध आहे. स्कॉटिश आर्ट कौन्सिलमार्फत सर्व कलांना साहाय्य करण्यात येते. परंपरागत वाद्यांबद्दल लोकांत आवड निर्माण होत असून यांमध्ये सुंदरी ( बॅगपाइप ), फिडल, क्लॅर्सॅक ( लहान केल्टिक वीणा ) ही वाद्ये समाविष्ट आहेत. लोनी डोनेगॅन, डोनोव्हॅन, आय. ई. हॅमिल्टन, सी. टी. डेव्ही, रॉबीन ऑर, एरिक सिझम यांनी स्कॉटिश संगीतक्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहे. एडिंबरो, ग्लासगोे या स्कॉटलंडच्या सांस्कृतिक राजधान्या आहेत. ग्लासगोे येथील रॉयल स्कॉटिश नॅशनल ऑर्केस्ट्रा, स्कॉटिश ऑपेरा, स्कॉटिश बॅले यांनी आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे. एडिंबरो येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय संगीत, नाटक महोत्सव साजरा करण्यात येतो.

खेळ हा स्कॉटिश लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. असोसिएशन फुटबॉल ( सॉकर ) हा येथील आवडता खेळ आहे. रग्बी हा खेळही येथे खेळला जात असून याच्या इंग्लंड, वेल्स व स्कॉटलंड येथील संघांमध्ये स्पर्धा होतात. डोंगरी भागात ( हायलँड्स ) शिंटी ( हॉकीसारखा खेळ ) हा खेळ लोकप्रिय आहे. गोल्फ हा खेळही येथे प्रसिद्ध असून सेंट अँड्रज येथे ब्रिटिश ओपन गोल्फ क्रीडामहोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

पर्यटन : स्कॉटलंडमध्ये पर्यटनास व्यवसाय म्हणून महत्त्व आहे. ग्रेटर ग्लासगो, क्लाइड खोरे व डोंगरी भागातील उपवने, ग्लासगो येथील कलावीथी, नॅशनल म्यूझीयम ऑफ स्कॉटलंड, एडिंबरो येथील राजवाडा, नॅशनल वॉर म्यूझीयम, रॉयल म्यूझीयम ऑफ स्कॉटलंड, नॅशनल लायब्ररी ऑफ स्कॉटलंड, स्कॉटलंड राष्ट्रीय चित्रवीथी, स्कॉटिश नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी, स्कॉटिश नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट तसेच होल्डीड हाउसची राजबाग, स्कॉटलंडमधील अनेक ऐतिहासिक घरे व स्टर्लिंग, उर्कूहर्ट ब्लेअर लोअर येथील राजवाडे ही पर्यटकांची विशेषत्वाने आकर्षणे आहेत. येथे दरवर्षी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इ. देशांतील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.      

गाडे, ना. स.