अल्बेनिया : (रिपब्‍लिका पॉप्युलोरे इ श्‍वियप्रीझे). यूरोप खंडातील बाल्कन द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील व एड्रिॲटिक समुद्राच्या पूर्वकिनाऱ्यावरील देश. ३९°३८’ ते ४२°४१’ उ. अक्षांश व १९°१६’ ते २१°४३’ पू. रेखांश. क्षेत्रफळ २८,७५० चौ. किमी. लोकसंख्या २०,७५,००० (१९६९). याच्या उत्तरेस व पूर्वेस यूगोस्लाव्हिया, दक्षिणेस ग्रीस व पश्चिमेस एड्रिॲटिक समुद्र आहे. देशाची दक्षिणोत्तर लांबी ३३८ किमी., सरासरी रुंदी ९६ किमी. व किनारा २४० किमी. आहे. राजधानी ⇨तिराना, लोकसंख्या १,६९,३०० (१९६७).

भूरचना : अल्बेनियाचा बहुतेक भाग दिनारिक आल्प्स पर्वताच्या शाखांनी व्यापलेला असून दक्षिणेला पिंडस पर्वताचा भाग येतो. देशाला चिंचोळा दलदलीचा किनारी प्रदेश आहे. उत्तरेकडील पर्वत व पठारे १,५०० ते २,४०० मी. उंच असून त्यांतील सर्वोच्च शिखर येझेरत्से २,६९४ मी. उंच आहे. हा प्रदेश वालुकाश्म, चुनखडक, पिंडाश्म, शेल यांनी युक्त असून येथे उत्थान आणि हिमानीक्रिया झालेली आहे. द्रिन नदीच्या उत्तरेचा भाग ९०० ते १,५०० मी. उंचीचा आहे. देशाच्या पूर्वेकडील मध्य भाग उंच, पठारी, काही ठिकाणी कार्स्ट भूमिस्वरूपाचा, मुख्यत: सर्पेटाइन या रूपांतरित खडकांचा आहे. यातील कोराब (२,७६४ मी.) हे अल्बेनियातील सर्वोच्च शिखर अाहे. या भागात क्रोम व तांबे ही आर्थिक द‌ृष्ट्या महत्त्वाची खनिजे सापडतात. पूर्वेकडील पर्वत सामान्यत: दक्षिणोत्तर असून त्यात श्वेत व कृष्ण द्रिन नद्यांच्या खोल दऱ्या आणि ऑक्रीद, प्रेस्पा ही सरोवरे आहेत. प्रेस्पाचे पाणी जमिनीखालून ऑक्रीद या अत्यंत खोल सरोवरात व ऑक्रीदचे पाणी द्रिन नदीत जाते. येथील रूपांतरित खडकांत जिप्सम व संगमरवर आढळतो. याच्या दक्षिणेस मोराव्हा व ग्रामोस पर्वत आहेत. मध्यवर्ती पठारी प्रदेश वलीकरणाने झालेल्या समांतर डोंगररांगा व दऱ्या यांनी बनलेला, चुनखडकाचा व कार्स्ट भूमिस्वरूपाचा आहे. दक्षिणेकडील उंच प्रदेश हा गट विभंगाचा, चुनखडकाबरोबरच वालुकाश्म वगैरेंचा आहे. नैर्ऋत्येकडील सुसंरक्षित किनारा अल्बेनियाच्या इतर किनाऱ्‍यापेक्षा वेगळा, चुनखडकाचे तुटलेले कडे व स्वच्छ पाणी यांनी युक्त असलेला,‘आयोनियन रिव्हिएरा’ म्हणून ओळखला जातो. देशाच्या पश्चिमेकडील मैदानांपैकी श्कोडर अथवा स्कूटारी, तिराना व एल्बासान यांचे अलग सुपीक प्रदेश श्कूम्बी नदीच्या उत्तरेस आहेत. किनाऱ्यावर वाळूच्या टेकड्या असून वाळूच्या दांड्यांमुळे दलदलीचे खारकच्छ बनलेले आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने किनारा सोयीचा नाही.

मैदानाच्या उत्तर भागात तेथील श्कोडर सरोवरातून निघून जवळच्या समुद्रास मिळणारी आणि वाहतुकीला काहीशी उपयोगी पडणारी एकुलती एक नदी बोयाना ही आहे. उत्तरेकडून श्वेत द्रिन व दक्षिणेकडून कृष्ण द्रिन एकत्र येऊन पश्चिमेकडे ‘द्रिन’ नावाने जातात. मात, श्कूम्बी, सेमेनी व वियोसे या आणि इतर नद्या उत्तरेकडील व पूर्वेकडील पर्वतांतून येऊन एड्रिॲटिकला मिळतात. श्कूम्बीमुळे देशाचे उत्तर व दक्षिण असे भाग झाले आहेत. नद्या लांब, एकदम वळण घेणाऱ्या, घळ्या आणि द्रुतवाहांनी युक्त आहेत. मैदानी भागात त्यांच्या काठचे प्रदेश जलोढांनी सुपीक झाले आहेत. श्कोडर व ऑक्रीद ही सरोवरे यूगोस्लाव्हिया, अल्बेनिया व ग्रीस यांत समाईक आहेत.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या मैदानी भागात भूमध्यसागरी हवामान असून तेथे हिवाळ्यात सरासरी १०० सेंमी. पाऊस पडतो आणि उन्हाळा कडक असतो. पर्वतीय प्रदेशात २५० सेंमी. पाऊस मुख्यत: उन्हाळ्यात पडतो. तपमान जानेवारीत १° से. ते सु. ६° से. असते. तर जुलैत ते सु. २१° से. ते २६° से. असते.

अटलांटिक, भूमध्यसमुद्र व एड्रिॲटिकवरूनही तेथे वादळे येतात. उत्तरेकडील पर्वतभागात हिवाळ्यात बर्फ पडते आणि उन्हाळ्यात वादळी पाऊस येतो. अंतर्भाग आणि किनारा येथील तपमानातील व वायुभारातील फरकांमुळे येथे हिवाळ्यात ‘बोरा’ नावाचे कोरडे वारे जोराने वाहतात.

अल्बेनियाची ४७% जमीन जंगलव्याप्त आहे. त्यापैकी ३८% ओक, ३६% एल्म व १८% पाइन व बर्च यांची जंगले आहेत. १,५०० ते १,८०० मी. उंचीपलीकडील भागात अल्पाईन गवताचा प्रदेश आहे. तेथे उन्हाळ्यात गुरे, मेंढ्या चारता येतात. किनाऱ्याजवळील भागात माकी ही भूमध्यसामुद्री सदाहरित वनस्पती आढळते. ९०० मी. उंचीपर्यंत स्ट्रॉबेरी, ज्युनिपर, मर्टल, रानगुलाब व इतर काटेरी झुडुपे आढळतात. चराईसाठी आणि जळणासाठी भरमसाट उपयोग केल्यामुळे बरीच अरण्ये नाहीशी होऊन तेथे काटेरी झुडपांचे जंगल माजले आहे. रानडुकरासारखे काही थोडे रानटी प्राणी व काही हिंस्र श्वापदे आहेत परंतु त्यांची संख्या थोडी आहे. किनाऱ्याजवळील जंगलात मात्र पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी आढळतात.

इतिहास : स्वत:ला ‘गरुडाची पिले’ म्हणविणारे अल्बेनियन लोक मूळचे इंडो-यूरोपीय असून त्यांच्याचपैकी इलिरियन व थ्रेसियन या आदिम जमातींनी अल्बेनियाच्या डोंगरदऱ्या व्यापल्या व इ.स.पू. ३ऱ्‍या शतकात आपले राज्य स्थापन केले. त्यांच्यानंतर ग्रीकांनी किनाऱ्या‍यालगत आपल्या अनेक वसाहती वसविल्या परंतु या मूळ जमातींचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. इ.स.पू. १९७ मध्ये रोमन लोकांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्‍न केले. परंतु त्यांनाही ते साधले नाही. चौथ्या शतकाच्या सुमारास अल्बेनियाचा काही भाग बायझंटिन साम्राज्याच्या स्वामित्वाखाली गेला. या बायझंटिनांनीच अल्बेनियातील आदिम जमातींना सध्याचे ‘अल्बेनियन’ हे नाव दिले. यानंतरच्या काळात गॉथ, स्लाव्ह, बुल्गेर व सिसिलियन इत्यादिकांची क्रूर आक्रमणे या मूळ जमातींनी आपल्या शूर व धाडसी वृत्तीने परतवून लावली व आपली मातृभाषा, चालीरीती व अस्मिता शेवटपर्यंत टिकवून धरली. १४४३ ते ६८ या अल्पकाळात जॉऱ्याज कॅस्ट्रिओटा ऊर्फ इस्कंदरबेग (अपभ्रंशाने स्कँडरबेग) या शूर राष्ट्रीय नेत्याच्या आधिपत्याखाली त्यांनी स्वातंत्र्याचा खराखुरा उपभोग घेतला. बेगच्या निधनानंतर मात्र तुर्कांनी १४७९ मध्ये संपूर्ण देश काबीज करून सर्वत्र इस्लामचा प्रसार केला. १८७८ नंतर अल्बेनियन लोकांमध्ये राष्ट्रीय जागृती झाली. त्यांनी आपल्या मूलभूत राष्ट्रीय हक्कांच्या संरक्षणार्थ संघटनेची स्थापना केली. १९१२च्या पहिल्या बाल्कन युद्धाच्या प्रसंगी ऑस्ट्रिया व हंगेरी या देशांच्या मदतीने अल्बेनियाने स्वातंत्र्याची घोषणा केली आणि लगेच आंतरराष्ट्रीय मंडळाच्या मदतीने १९१३ मध्ये देशाच्या सीमारेषा निश्चित केल्या. ७ मार्च १९१४ रोजी लंडनच्या परिषदेने ठरविल्याप्रमाणे जर्मनीमधील वीडचा प्रिन्स विलियम याने डुर्रेस येथे येऊन राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली, परंतु देशात अराजक व बेबंदशाही माजल्यामुळे त्याला ३ सप्टेंबर १९१४ रोजी परत जावे लागले. त्यानंतर २६ एप्रिल १९१५ रोजी लंडन येथील गुप्त कराराप्रमाणे अल्बेनियाची फाळणी करण्याचा प्रयत्‍न करण्यात आला परंतु इटलीच्या हस्तक्षेपामुळे तो बारगळला. पुढे इटलीने अल्बेनियाचे स्वतंत्र राज्य घोषित केले असले, तरी अहमद बेग झोग याने यूगोस्लाव्हियाच्या मदतीने देशाची सत्ता आपल्या हातात घेतली व अध्यक्ष या नात्याने १९२५ मध्ये स्वतंत्र प्रजासत्ताक राज्याची घोषणी केली परंतु १९२८ मध्ये तोच स्वत: राजा बनून अल्बेनिया राजसत्ताक असल्याचे त्याने जाहीर केले. एप्रिल १९३९ मध्ये इटलीने पुन: देश आपल्या ताब्यात घेतला त्यामुळे झोग इंग्‍लंडला पळून गेला. तथापि झोगच्याच अमदानीत देशाला स्थैर्य आले व सैन्य, शिक्षण, कारभार, केंद्राची सत्ता व राष्ट्रीय ऐक्य यांच सुधारणा झाल्या. मध्यंतरी १९३९ ते ४४ या काळात देश इटालियन व जर्मन सैन्यांच्या ताब्यात होता परंतु दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी जनरल एन्व्हर होजा याने या सैनिकी कारकिर्दीला विरोध करून १९४४ मध्ये इंग्‍लंड व रशियाच्या मदतीने देशातील निवडणुका घेऊन देशाच्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्या कम्युनिस्ट पक्षाच्या हातात दिली.

११ जानेवारी १९४६ रोजी अल्बेनिया स्वतंत्र प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित झाले व तेथे रशियन पद्धतीचे संविधान अंमलात आले. त्यानंतर ब्रिटन व अमेरिका यांनी अल्बेनियाशी राजकीय संबंध तोडले व त्याला संयुक्त राष्ट्रांत येऊ दिले नाही. १९५५च्या डिसेंबरमध्ये अमेरिका तटस्थ राहिल्यामुळे अल्बेनिया संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला. शेजारील यूगोस्लाव्हियाचे रशियाशी संबंध दुरावले, तरी अल्बेनिया रशियाचा मित्र राहिला. स्टालिनच्या मृत्यूनंतर अल्बेनियाने चीनची बाजू घेतली. १९६७च्या निवडणुकीनंतरही होजा कम्युनिस्ट पक्षाचा सचिव व मेहमद शेहू हे पंतप्रधान म्हणून राहिले.

राजकीय स्थिती : सध्या अल्बेनियाच्या राज्यकारभाराची सर्व सूत्रे ८ नोव्हेंबर १९४१ ला स्थापन झालेल्या ‘अल्बेनियन लेबर पार्टी’ या कम्युनिस्ट संघटनेच्या हाती आहेत. अल्बेनिया हे प्रजासत्ताक राज्य आहे. येथे दर चार वर्षांनी निवडणुका होतात व मंत्रिमंडळात बदल करण्यात येतो. १८ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना मताधिकार आहे. राष्ट्राध्यक्ष नामधारी प्रमुख असून प्रशासनाचे प्रत्यक्ष अधिकार कम्युनिस्ट पक्षाचा सचिव, प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ यांच्याकडे असतात. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे जिल्हे, त्यांचे उपविभाग आणि गावे व शहरे असे विभाग केलेले आहेत. जिल्ह्यासारख्या मोठ्या विभागाचे प्रशासन राज्याकडे असून उपविभागांचे प्रशासन त्या त्या विभागाच्या दर तीन वर्षांनी बदलणाऱ्‍या स्थानिक सल्लागार-मंडळाकडून होते. १९५० च्या संविधान-सुधारणेनुसार राज्यातील न्यायव्यवस्था सर्वोच्च न्यायालय, सैनिकी न्यायसभा व स्थानिक न्यायपंचायती या तीन स्तरांत विभागलेली आहे. सर्वोच्च न्यायाधिशाची नेमणूक दर चार वर्षांसाठी लोकसभेकडून करण्यात येते. गुप्त मतदानपद्धतीने लोक जिल्हापातळीवरील न्यायाधिशांची निवड करतात. सैनिकी न्यायसभेला राष्ट्रद्रोहासारख्या राज्याच्या किंवा राष्ट्राच्या विरुद्ध कारस्थान करण्याच्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेण्याचा व शासन करण्याचा अधिकार आहे. १९५२ मध्ये सोव्हिएट कायद्याच्या धर्तीवर काही भयंकर गुन्ह्यांकरिता एक नवीन विधेयक मान्य करण्यात आले. त्यानुसार ४१ प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांबद्दल फाशीची शिक्षा देण्यात येते. १४ ते १८ वर्षांपर्यंत वयाच्या मुलांना मात्र ते शिक्षेस पात्र असले, तरी देहान्ताची शिक्षा देत नाहीत.

देशाच्या रक्षणार्थ १९६६ मध्ये अल्बेनियात एकूण ३०,००० सशस्त्र सैन्य होते. त्यात अंतर्गत सुरक्षासैनिक व राष्ट्राच्या सरहद्दीवरील सैन्यदल मिळून १२,५०० आणि नाविक व वैमानिक अनुक्रमे ३,००० व ६,००० होते. देशातील १९ ते ३५ वर्षांच्या नागरिकांना सक्तीची सैनिकी चाकरी असून ती लष्करात दोन व विमान, आरमार इत्यादींमध्ये तीन वर्षे करावी लागते.


आर्थिक स्थिती : अल्बेनिया हा मागासलेला व कृषिप्रधान देश आहे. देशातील ७० टक्क्यांवर जमीन डोंगराळ आहे. येथील जंगले व पडित जमिनी सरकारी मालकीच्या असून लागवडीखालील ४,९२,१०० हेक्टर जमिनीपैकी १४% सरकारी, ६६% सहकारी संस्था, ९·५% खाजगी शेतकरी व २% जमीन २५० स्थानिक शेतकी-मंडळांकडे आहे. किनारपट्टीजवळील दलदलीच्या भागात बहुतेक शेती परंपरागत औजारांनी व जुन्या पद्धतीने करण्यात येत असली, तरी बऱ्याच ठिकाणी नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. शेतीसाठी नदीच्या पाण्याचा व विद्युत् पुरवठ्याचा उपयोग करण्यात येतो. मका, गहू, बीट, कापूस, बटाटे, तांदूळ, तंबाखू, ओट, राय, बार्ली व फळे ही येथील मुख्य उत्पन्ने होत. देशातील ७,१४,७०० हेक्टर जमीन चराऊ असल्याने येथे पशुपालन मोठ्या प्रमाणात आहे. देशात उद्योगधंद्यांचा विकास होण्यापूर्वी शेतीला जोडधंदे म्हणून पिठाच्या गिरण्या, ऑलिव्हपासून तेल काढणे, खवा तयार करणे इ. नित्याचे गृहोद्योग चालत असत. त्यांच्याच जोडीला समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचा मासेमारी हा एक प्रमुख धंदा होता. येथे डबाबंद मासळी-निर्मितीचे केंद्र स्थापन झाले आहे. जंगलापासून इमारती लाकूड मिळते. खनिज संपत्तीचे वैपुल्य ही अल्बेनियाची एक दैवी देणगी आहे. लिग्नाइट कोळसा, क्रोमियम, तांबे व लोहधातुक ही येथील प्रमुख खनिजे होत. क्रूड ऑइलचा साठा असून स्टालिन, गोरिक इ. खनिजतेल-निर्मितिकेंद्रांपासून १९६८ मध्ये १०,४६,००० मे. टन तेलनिर्मिती झाली होती.

अल्बेनियात १९५१ ते १९७० पर्यंतच्या कालावधीसाठी चार पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या असून पहिल्या तीन योजनांमुळे खाद्यपदार्थकेंद्रे, कापडगिरण्या, सिमेंट कारखाने, इंजिनिअरिंग, रासायनिक धातुकाम, यंत्रसामग्री इत्यादींचे कारखाने, विद्युत्-निर्मितिकेंद्रे, तेलोत्पादन इ. प्रमुख उद्योगधंदे सुरू करण्यात आले असून चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कृषिउत्पादन-केंद्रे, खाणकाम, खते, नैसर्गिक वायू, खनिज तेल इत्यादींचे कारखाने उभारण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी लागणारा विद्युत् पुरवठा देशातील विविध ठिकाणच्या ५ जलविद्युत्-निर्मिति-केंद्रांपासून होतो. सु. २,८८,००० किलोवॉट तास निर्माण होणारी वीज देशाच्या शहरी व ग्रामीण भागांतून पुरविली जाते. कृषी व इतर सहकारी क्षेत्रांतून काम करणाऱ्या मजुरांची संख्या १९६३ मध्ये सु. २,५४,७०७ असून त्यांपैकी विविध उद्योगधंद्यांतून काम करणाऱ्यांची संख्या ४५,१३५ होती, तर बांधकाम व शेतमजुरांची संख्या ४७,४२२ होती. निर्यात होणाऱ्या मालात जळण, खनिजे, धातू, तंबाखू, मद्ये, फळे, लाकूड व लोकर या प्रमुख वस्तू आहेत. यांपैकी १९६३ मध्ये ४९ टक्के चीनकडे, ४२ टक्के रशिया वगळून पूर्व यूरोपीय कम्युनिस्ट देशांकडे व ६·५ टक्के पश्चिम यूरोपीय राष्ट्रांकडे निर्यात होती आयात होणाऱ्या मालात खाद्यपदार्थ, शेती व औद्योगिक यंत्रसामग्री, जळण व कच्चा माल इ. वस्तू असून त्यांपैकी ५९ टक्के चीनकडून, ३२ टक्के रशिया वगळून पूर्व यूरोपीय कम्युनिस्ट देशांकडून व ६ टक्के पश्चिम यूरोपीय राष्ट्रांकडून आयात होतात. देशाचा अंतर्गत आर्थिक व्यवहार अल्बेनियन स्टेट बँक व तिच्या देशभर पसरलेल्या शाखांमधून चालतो. एकूण आयात (१९६४) ९·८ कोटी डॉलर व निर्यात ६·८ कोटी डॉलर होती. येथील चलन : १ लेक = १०० किंटार व १९६५ पासून १ नवा लेक = १० जुने लेक आहे. येथील चलनाचा अधिकृत दर १ डॉलर = ५ नवे लेक, १ पौंड = १२ नवे लेक, १ रूबल = ५·५५ नवे लेक असा आहे. १९६७ मधील देशाचा अर्थसंकल्प आय ३७३ कोटी नवे लेक व व्यय ३६० कोटी नवे लेक होता. १९६० पर्यंत रशियाची मदत १०० कोटी रूबल झाली. ती पुढे बंद झाली. १९६६ पर्यंत चिनी मदत १६·८ कोटी पौंड झाली. ती पुढे चालू आहे.

देशाच्या उत्तरेकडील उंच पर्वताच्या चढणीवर खेचरे, घोडे व गाढवे इ. प्राण्यांच्या साह्यानेच ओझे वाहून न्यावे लागते. १९६० मध्ये फक्त ३,१०० किमी. लांबीच्या पक्क्या सडका होत्या. रेल्वेमार्ग १९४७ नंतरच तयार झाले असून १९६४ पर्यंत त्यांची लांबी १५१ किमी. होती. एड्रिॲटिक समुद्रकिनाऱ्यावर डुर्रेस, व्लोना ही महत्त्वाची बंदरे आहेत. तिराना हे राजधानीचे शहर असून तेथे विमानतळ आहे. १९६३ साली पोस्ट ऑफिसांची संख्या २१८, दूरध्वनींची १०,१५० असून ध्वनिक्षेपण-केंद्रे १७ होती. तिराना व कोर्च यांखेरीज पेकिंगचेही एक ध्वनिक्षेपण-केंद्र येथे आहे. रेडिओ संच १,५०,००० (१९६८) व टेलिव्हिजन संच १,२०० होते.

लोक व समाजजीवन : लोकसंख्येच्या ९७ टक्के लोक मूळ जमातींचे असून त्यांपैकी एक घेग व दुसरी टोस्क असून पहिली देशाच्या उत्तर भागात तर दुसरी दक्षिण भागात वास्तव्य करते. घेग शरीराने धट्टेकट्टे, कणखर, धीट व करारी असून उत्कृष्ट योद्धे आहेत. टोस्क उत्साही, आनंदी व सुसंस्कृत असून उद्योगी आहेत. या दोन जमातींत पूर्वीपासून चालत आलेली वैरभावना अलीकडे जवळजवळ नष्टच झालेली आहे. यांच्याखेरीज आपापसांतले हाडवैर, भांडखोरपणा व एकलकोंडा स्वभाव असलेल्या, गिरिकंदरांतून राहणाऱ्या जमाती आहेत. ग्रीक, सर्ब, बुल्गेरियन, व्ह्‌लॉच व जिप्सी यांच्याही वसाहती किनाऱ्यालगत असून या सर्वांचे प्रमाण फक्त २·५ टक्केच आहे. १९४६च्या सुमारास कम्युनिस्टांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी देशाची स्थिती अत्यंत हलाखीची होती. डोंगराळ प्रदेशामुळे अन्नधान्याची निपज कमी व त्यातच दर वर्षी पडणारी लोकसंख्येची भर यांमुळे देशात भूकबळी ही नित्याचीच बाब होती. १९६० साली येथील लोकसंख्या १६,२५,००० होती, ती १९६४ मध्ये अवघ्या चार वर्षांनी १८,१४,४३२ वर पोचली. १९६७ मध्ये ती १९,६४,००० झाली. अल्बेनियातील जननप्रमाण दर हजारी ३३ पडत असून ते यूरोपातील देशांच्या तुलनेने सर्वांत जास्त आहे. लोकसंख्येपैकी ७० टक्के मुसलमान (बहुसंख्य सुन्नी), २० टक्के ग्रीक ऑर्थोडॉक्स व १० टक्के रोमन कॅथलिक आहेत. संविधानात मात्र सर्वांनाच धर्मस्वातंत्र्य दिले आहे. या विविध प्रकारच्या लोकांचे व्यवहार व सरकारी कामकाज अल्बेनियन भाषेतून चालते. ही भाषा अल्बेनियन राष्ट्राच्या एकीकरणाची एक प्रमुख शक्ती आहे. श्कूम्बी नदीच्या उत्तरेकडे घेग व दक्षिणेकडे टोस्क या अल्बेनियन भाषेच्या बोलभाषा प्रचलित असून त्यामुळे एकेका ठिकाणाला दोन दोन नावे आढळतात. अन्य यूरोपीय देशांच्या तुलनेने येथे निरक्षरतेचे प्रमाण खूपच आहे. ते कमी करण्यासाठी १९४६ पासून देशामध्ये प्रौढ साक्षरतेचा प्रसार सर्वत्र करण्यात आला आहे. तसेच ६ ते १३ वर्षे वयाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले असून १९६४ मध्ये ४५० बालकमंदिरे, ३,३३२ प्राथमिक शाळा, ४८ माध्यमिक शाळा व ८ उच्च विद्यालये उघडण्यात आली. १९५७ मध्ये तिराना येथे विद्यापीठ स्थापन झाले आहे. देशात १४ वाचनालये, ३ दैनिके व ४० नियतकालिके असून ७५ चित्रपटगृहे आहेत. १४५ रुग्णालये व स्वास्थ्य केंद्रे असून त्यांत १०,२१२ खाटांची व्यवस्था आहे. १९६३ मध्येच देशात ६९७ डॉक्टर होते. राष्ट्रीय विमा-योजनेत आजार, अपघात, विकृती, वृद्धपणा, प्रसूती, सेवा-निवृत्ती इत्यादींची सोय करण्यात आली आहे.

अल्बेनियातील साहित्यनिर्मितीचा काळ १८व्या शतकानंतरचा आहे. काँस्टँटिनोपलचा नाइम फ्रेशेरी (१८४६-१९००) हा राष्ट्रीय कवी समजला जातो. फैक कोनित्झा (१८७५-१९४२) या लेखकाचे राजकीय दृष्टिकोनातून लिहिलेले परीक्षणात्मक लेख अल्बेनियाबाहेरील लोकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. ग्येर्गी फिश्ता (१८७१-१९४०) या कवीचे Lahuta e Malois हे अल्बेनियन महाकाव्य उच्च दर्जाचे असून शेक्सपिअर, इब्सेन इत्यादींची बिशप नोलीने केलेली भाषांतरे प्रसिद्ध आहेत.

महत्त्वाची स्थळे : अल्बेनियात मोठी शहरे नाहीतच. डुर्रेस हे देशातील प्रमुख बंदर, औद्योगिक, व्यापारी व ऐतिहासिक शहर असून दळणवळणाचे केंद्र आहे. (लोकसंख्या : १९६०-४५,९३५). श्कोडर (४५,९२५) उत्तरेकडील प्राचीन इलिरियाची राजधानी व सध्याचे औद्योगिक व्यापारी शहर आहे. व्लोना (४५,३५०) हे बंदर तेलनिर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. कोर्च (४२,५५०) व एल्बासान (३४,१००) ही शेतमालाची केंद्रे आहेत. 

संदर्भ : Skendi, S. Ed. Albania, Tirana, 1964.

जोशी, चंद्रहास



१. अल्बेनियातील प्रमुख खनिज तेलक्षेत्र. २. पुरातन ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च. ३. अल्बेनियातील एक गिरिग्राम. ४. अल्बेनियाची राजधानी तिराना.