पुनाखा : भूतानची पूर्वीची हिवाळी राजधानी. हे गाव दार्जिलिंगच्या ईशान्येस सु. १६० किमी. संकोश नदीकाठी असून, त्याची स्थापना १५७७ मध्ये झाली. १८३२ मध्ये आगीच्या तडाख्यात सापडल्याने त्याचे बरेच नुकसान झाले. येथील प्राचीन किल्ला, बौद्ध विहार, राजवाडा इ. वास्तू उल्लेखनीय असून, त्या भूतानी वास्तुशैलीच्या निदर्शक आहेत. पुनाखाचा आसमंत सृष्टिसौंदर्याने विनटलेला आहे.

चौधरी, वसंत