पाचगणीची वनश्रीपाचगणी : महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्हातील एक थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या ६,९०६ (१९७१). हे वाई-महाबळेश्वर रस्त्यावर वाईपासून पश्चिमेस १२ किमी.वर सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम सोंडेच्या वातविमुख उतारावर वसले आहे. येथील भूस्तर-रचना दख्खनच्या पठाराप्रमाणेच ज्वालामुखी प्रकारची असून जमीन मुख्यतः लोहमिश्रित तांबडी आहे. परिसराची कमाल उंची १,३३५ मी. कमाल व किमान तपमान अनुक्रमे ३१·१° व १६° से. आहे. वार्षिक सरासरी पर्जन्य १८०·६ सेंमी. असून पार्श्वभागी असलेल्या विस्तीर्ण टेबललँडमुळे पूर्वेकडील वाऱ्यापासून पाचगणीचे संरक्षण होते. १८६२ मध्ये ब्रिटिशांनी येथे वसाहत केली आणि नंतर तिचा हळूहळू विस्तार झाला. १९१० पासून शहराची व्यवस्था नगरपालिका पाहते.

विविधरंगी फुलझाडे, हिरवीगार वनश्री, थंड, कोरडे असे आल्हाददायक व आरोग्यवर्धक हवामान ही पाचगणीची वैशिष्ट्ये. क्षयपीडितांसाठी ‘बेल एअर रुग्णालय’  व इतर सात आरोग्याधामे रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध आहेत. येथे विविध प्रकारच्या पन्हेरी बागा असून त्यांतून विलायती व इतर वनस्पती, इंग्लिश बटाटे, सप्ताळू, नासपती, कॉफी यांच्या लागवडीचे प्रयोग केले जातात. तसेच ब्लॅकबेरी, विलायती मेंदी, स्वीट हेलिओट्रोप, स्ट्रॉबेरी यांचेही उत्पादन होते. निलगिरी, सुरू, सिल्व्हर ओक, जांभूळ इ. वृक्षप्रकार आणि भारतात क्वचितच आढळणारी रानगुलाबाची फुले येथे आढळतात. शेतीशिवाय चर्मोद्योग, पर्यटकांसाठी हॉटेले, मुरंबे, खवा, मध इ. उद्योग चालतात.

टेबललँड, सिडनी पॉइंट, कांगा पॉइंट, कच्छबावडी पॉइंट, दांडेघर येथील केदारेश्वर, मॉरल रीआर्मामेंट सेंटर (एम्. आर. ए.) इ. पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. टेबललँडच्या दक्षिणेस असलेले ‘डेव्हिल्स किचन’ अद्‌भुत कथेशी निगडित आहे. पाचगणीच्या पूर्व आग्नेयीस ६·५ किमी.वर ‘राजपुरी’ नावाच्या गुहा असून त्यांतील कार्तिकस्वामींचे मंदिर प्रेक्षणीय आहे. उत्तर बाजूस कृष्णेच्या खोऱ्यातील धोम धरण आणि त्याचा जलाशय, नदीकाठांवरील छोटी खेडी व शेते यांचे विहंगम दृश्य आकर्षक दिसते. येथील सार्वजनिक उद्यान, बालोद्यान, क्लब व नाट्यगृहे ही सार्वजनिक रंजनाची स्थळे होत. एम्. आर. ए. चे नाट्यगृह आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. पाचगणीच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीकरणासाठी चित्रपटनिर्माते वारंवार येतात. एम्. आर. ए. केंद्रामुळे परदेशी प्रवशांचीही येथे वर्दळ असते.

विद्यानिकेतनाच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी मुख्यतः संजीवन, अंजुमन-इ-इस्लाम, सेंट पीटर्स, किमिन्स, बाथा इ. अकरा निवासी विद्यालये येथे असून महात्मा फुले विद्यालय व संजीवन ही मराठी माध्यमातून शिक्षण देतात. आधुनिक पद्धतीची निवासस्थाने व उपहारगृहे, नळाचे स्वच्छ पाणी, मंडई, दोन सार्वजनिक वाचनालये, चार बँका इ.सुविधांनी पाचगणी संपन्न आहे. येथे दरवर्षी माघ महिन्यात घाटजाई या गिरिदेवतेची यात्रा भरते. 

चौधरी, वसंत