सरहिंद कालवा : भारताच्या पंजाब राज्यातील बाराही महिने वाहणारा एक प्रमुख कालवा. वायव्येस सतलज आणि आग्नेयीस घग्गर या नदयांदरम्यानचा राज्याचा दक्षिण भाग याने जलसिंचित झाला आहे. सतलज नदीवरील रूपार या राज्याच्या पूर्व सरहद्दीजवळील ठिकाणापासून हा कालवा काढण्यात आला असून याचे इ. स. १८६७ साली प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले होते. कालव्यासाठी सतलज नदीवर सु. ७२२ मी. लांबीचा बंधारा बांधण्यात आला आहे. सुरूवातीच्या दोराहपर्यंतच्या सु. ६२ किमी. लांब प्रमुख कालव्याची तळाशी रूंदी सु. ६१ मी. व खोली ३·४ मी. असून त्याची दर सेकंदाला २२६·५३ घ. मी. पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. या कालव्याची पश्चिमेस अबोहर, मध्यभागी भतिंडा आणि पूर्वेस पतियाळा अशा प्रमुख तीन शाखांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. १८८२ साली प्रमुख कालवा औपचारिक दृष्टया सुरू करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात १८८३ मध्ये यातून पाणी सोडण्यात आले. प्रमुख कालवा व त्याच्या शाखोपशाखांची एकूण लांबी सु. ६,००० किमी. असून त्यांव्दारे सांप्रत सु. ६ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यात आले आहे.

सुरूवातीच्या काळात पतियाळा, नाभा, जिंद, फरीदकोट संस्थानांना व अन्य ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशाला याचा फायदा होत असे. सांप्रत या कालव्यामुळे लुधियाना, फिरोझपूर, हिस्सार, पतियाळा इ. जिल्ह्यांना पाणीपुरवठा होतो. पश्चिमेस जाणारी अबोहर शाखा सतलज नदीला समांतर लुधियाना व फिरोझपूर जिल्ह्यांतून पुढे गोविंदगढपर्यंत नेण्यात आली आहे. भतिंडा शाखा लुधियाना व भतिंडा जिल्ह्यांतून नैऋर्त्येस राजस्थानच्या सरहद्दीपर्यंत, तर पतियाळा शाखा राज्याच्या आग्नेय भागातून गेली आहे. कोटला, घग्गर व अन्य विस्तारित शाखांव्दारे राज्याचा आग्नेय भागही बहुतांश सिंचनाखाली आणण्यात आला आहे. भाक्रा-नानगल प्रकल्पामुळे सरहिंद कालवा प्रकल्पांतर्गत सिंचन क्षेत्रातही मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

फिरोझपूर, पतियाळा इ. भागांत या कालव्याचा जलवाहतुकीसाठीही वापर करण्यात आला आहे. या कालव्यामुळे राज्यातील गहू, भात, मका, बाजरी यांशिवाय ऊस, तेलबिया, तंबाखू व कापूस इ. पिकांच्या शेतीस मोठया प्रमाणात उपयोग झाला आहे.

चौंडे, मा. ल.