वॉकीगन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी इलिनॉय राज्यातील लेक परगण्याचे मुख्यालय. औद्योगिक केंद्र व प्रसिद्ध बंदर. लोकसंख्या ६७,६५३ (१९८०). मिशिगन सरोवराच्या पश्चिम काठावर वसलेले हे शहर शिकागोच्या उत्तरेस सु. ६४ किमी. अंतरावर आहे. पूर्वी या ठिकाणी पोतावातोमी इंडियनांची वसती होती. १६९५ मध्ये जलप्रवास करणाऱ्या काही फ्रेंचांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यावेळी त्यांनी ही जागा कुंपण उभारून बंदिस्त व सुरक्षित केली. १७६० पर्यंत ते लहानसे फ्रेंच व्यापारी ठाणे होते. त्याकाळी हे ठिकाण ‘लिट्ल फोर्ट’ या नावाने ओळखले जात होते. १८३५ मध्ये येथे गोऱ्या लोकांनी पहिली वसाहत स्थापन केली, १८४९ मध्ये या वसाहतीचे खेड्यात रूपांतर झाले आणि त्याला ‘वॉकीगन’ (पोतावातोमी इंडियन भाषेत ‘लिट्‌ल फोर्ट’) असे नाव प्राप्त झाले. १८५९ मध्ये त्याला शहराचा दर्जा मिळाला. १८४६ पासून हे ‘सेंट लॉरेन्स सी वे’ वरील प्रवेशद्वार व उत्कृष्ट बंदर म्हणून ओळखले जात असून सागरगामी तसेच सरोवरात वाहतूक करणाऱ्या जहाजांना येथून सर्व सुविधा पुरविण्यात येतात. वॉकीगन हे हवाई, सरोवरीय जहाजवाहतूक तसेच रेल्वे या वाहतूकमाध्यमांनी देशातील अन्य शहरांशी जोडण्यात आले आहे.

शहरात पोलाद व पोलादाच्या वस्तू, ॲस्बेस्टस, बांधकामाचे साहित्य, कथिल, औषधे, रसायने, चामड्याच्या वस्तू, मोटारगाड्यांचे सुटे भाग, लोखंडी सामान, क्रीडासाहित्य, अवजारे, प्रशीतके, बाह्यचलित्रे (आउटबोर्ड मोटार), लाख, खडीसाखर, लाटण यंत्रे, मद्ये यांचे निर्मितीउद्योग आहेत. यांशिवाय येथे गुरांचे संगोपन, दूध व तज्जन्य पदार्थ, कुक्कुटपालन इ. व्यवसायही चालतात.

वॉकीगन हा मिलवॉकी-शिकागो या नागरी औद्योगिक संकुलाचाच एक भाग आहे. शहराच्या ‘दक्षिणेस नौसेना-प्रशिक्षण केंद्र’ असून, उत्तरेस ‘इलिनॉय बीच स्टेट पार्क’ हे निसर्गरम्य उपवनक्षेत्र आहे. शहराजवळील ‘चेन ऑफ लेक्स स्टेट पार्क’ ह्या नावाने ओळखला जाणारा सु. १,६२० हे. क्षेत्राचा उद्यानपरिसर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथे ‘वॉकीगन मिमॉरिअल विमानतळ’ (स्था. १९६१) आहे. शहराचा कारभार महापौर व परिषद सभासदांमार्फत चालविण्यात येतो. अमेरिकन नभोवाणी व दूरचित्रवाणी या दोन प्रसारमाध्यमांद्वारा दोन दशकांहूनही अधिक काळ ‘द जॅक बेनी प्रोग्रॅम’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम चालू ठेवणारा बेंजामिन कबेल्स्की ऊर्फ जॅक बेनी (१८९४-१९७४) हा अमेरिकन मनोरंजनकार वॉकीगन येथेच लहानाचा मोठा झाला.

देशपांडे, सु. चिं.