कुकडी : पुणे जिल्ह्यातील एक नदी व प्रकल्प. जुन्नर शहराच्या पश्चिमेस सु. २२१ किमी. असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्रीमाथ्यावर कुकडीचा उगम झाला आहे. ओझर, जुन्नर या गावांजवळून वाहत ती जुन्नर तालुक्यातून शिरूर तालुक्यात शिरते. येथे ती पुणे व अहमदनगर जिल्ह्यांची सीमा बनते. शिरूर शहराच्या वायव्येस कुकडी घोड नदीस मिळते. उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती ही कुकडीची प्रमुख उपनदी. ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेस असलेल्या येडगावजवळ मिळते. अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतील दुष्काळी  भागांसाठी शासनाने कुकडी प्रकल्पाची योजना हाती घेतली आहे. कुकडी नदीवर माणिकडोह (१२९ चौ.किमी.) व येडगाव (६८६ चौ.किमी.) ही धरणे, घोड नदीवरील डिंभे धरण (४१२ चौ.किमी.), मीना नदीवर वडज धरण, बस्ती-सावरगाव येथे एक पिकअप विअर आणि आर नदीवर पिंपळगाव-जोगे येथे एक धरण या सर्वांचा कुकडी प्रकल्पात समावेश असून या योगे एकूण ३७,६०० हे. क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल.

शाह, र. रू.