हातकणंगले : महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील याच नावाचे तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २५,५६९ (२०११). हे कोल्हापूरच्या ईशान्येस २१ किमी.वर वसलेले आहे. कोल्हापूर-मिरज लोहमार्गावरील हे महत्त्वाचे स्थानक असून रस्त्यांद्वारे हे राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. पूर्वी येथील एका व्यक्तीने उकळत्या तेलामध्ये आपले हात बुडवून आपण निष्पाप आहोत असे दाखविण्याचे दिव्य केले. त्यावरून या गावास हातकणंगले नाव पडले असावे, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. याच्या परिसरात ऊसाची शेती केली जाते. येथे नजीकच सूत गिरण्या, साखर कारखाना व पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र आहे. येथे सर्व शैक्षणिक सुविधा आहेत. येथील गोरीसाहेब पीर दर्गा परिसरात प्रसिद्ध आहे. या दर्ग्यात तांब्याच्या पत्र्यावर कोरण्यात आलेला फार्सी भाषेतील लेख आहे. येथे शासकीय विश्रामगृह आहे. हातकणंगलेनजीकच्या आळते येथील विपश्यना केंद्र आणि लिंगायत साधू शिदोबा, आलम प्रभू धुळोबा, रामलिंग ही मंदिरे प्रेक्षणीय आहेत. तसेच शहरानजीकची कुंथूगिरी व कुंभोज ही जैन तीर्थक्षेत्रे प्रसिद्ध आहेत. कुंभोज येथे बाहुबलीचा भव्य पुतळा आहे.

 

गाडे, ना. स.