अम्मान: जॉर्डन देशाची राजधानी. उ. अक्षांश ३१५७’ व पू. रेखांश ३५५६’. लोकसंख्या ५,८३,००० (१९७०). काही टेकड्या व त्यांमधील दऱ्‍या यांवर हे वसलेले आहे. यातील एका टेकडीवरूनच अम्मानजवळून वाहणारी वाडीझर्का अथवा जाबोक ही नदी उगम पावते. हे शहर समुद्रसपाटीपासून ७३३ मी. उंच असून मृत समुद्राच्या ईशान्येस ४० किमी. आहे. सुमारे ३,००० वर्षांपूर्वी ॲमोनाइट्स या सेमिटिक लोकांची ही राजधानी होती व तिचे नाव राब्बात अम्मान होते. इ.स.पू. अकराव्या शतकात डेव्हिडने ॲमोनाइटांचा पराभव करून शहराचा नाश केला. इ.स.पू. तिसऱ्‍या शतकात दुसऱ्‍या टॉलेमीने शहराची पुनर्रचना करून त्यास फिलाडेल्फिया हे नाव दिले. रोमन काळातही हे भरभराटलेले शहर होते. ६,००० प्रेक्षक बसू शकतील असे एक त्या काळचे प्रेक्षागृह व ससानियन काळात बांधलेला एक प्रदर्शन-मंडप यांचे भग्नावशेष येथे सापडले आहेत. सातव्या शतकात अरबांनी हे शहर जिंकले व त्याचे अम्मान हे नाव रूढ झाले. पहिल्या महायुद्धानंतर राजा अब्दुल्लाने ही आपल्या ट्रान्सजॉर्डन राज्याची राजधानी बनविली व दुसऱ्‍या महायुद्धानंतर ही स्वतंत्र जॉर्डन देशाची राजधानी बनली.

 

अम्मान हे जॉर्डनमधील उद्योग व व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. येथे कापडाच्या गिरण्या असून तंबाखू, सिमेंट, कातडी वस्तू, बिस्किटे, फरशा इ. उद्योग चालतात. येथून निर्यात होणाऱ्‍या मालामध्ये फळे, भाजीपाला, ऑलिव्ह तेल, फॉस्फेट आणि रंगीत संगमरवर महत्त्वाची असून खनिज तेल, मोटारी, साखर, रेशमी व सुती कापड, यंत्रे इत्यादींची आयात होते. येथे मोठा विमानतळ असून रेल्वेने व सडकेने हे देशातील प्रमुख स्थळांशी जोडलेले आहे याशिवाय सिरियामधील दमास्कस, लेबाननमधील बेरूत व सौदी अरेबियातील मान या शहरांशी अम्मान रेल्वेने जोडलेले आहे. जेरूसलेम, जेरिको, जरॉश, पेत्रा या बायबलकालीन शहरांना भेट देण्याकरिता येथे प्रवासी येतातच परंतु मक्केच्या यात्रेसाठी जाणाऱ्‍या-येणाऱ्‍या मुस्लिम प्रवाशांची येथे नेहमीच मोठी वर्दळ असते.

 

लिमये, दि. ह.

अम्मान : जॉर्डनची राजधानी