फिलिपीन्स : पॅसिफिक महासागरातील द्विपप्रजासत्ताक. क्षेत्रफळ ३,००,००० चौ. किमी. लोकसंख्या ४,५०,३०,००० (१९७७ अंदाज). या द्विपसमूहात सु. ७,१०० बेटांचा समावेश आहे. ती आशिया खंडाच्या आग्‍नेयीस सु. ८०० किमी. अंतरावर असून ४° २५’ उ. ते २१° २०’ उ. अक्षांश व ११६° ५५’ पू. ते १२६° ४०’ पू. रेखांश यांदरम्यान पसरलेली  आहे. पूर्वेला फिलिपीन्स समुद्र, दक्षिणेला सेलेबीझ समुद्र आणि पश्चिमेस व उत्तरेस चिनी समुद्र असलेली ही बेटे, दक्षिणोत्तर १,८५५ किमी. व सु. १,१०८ किमी. पूर्व-पश्चिम परिसरात विखुरलेली आहेत. या समुहातील २,७७३ बेटांनाच नावे असून २·५ किमी.पेक्षा जास्त क्षेत्र व्यापणारी बेटे केवळ ४६२ आहेत. मोठ्या अकरा बेटांचे तीन समुहांत विभाजन करता येते : (१) लूझॉन समूह – उत्तरेकडील या समूहात लूझॉन (क्षेत्रफळ १,०४,६८८ चौ. किमी.), मिंदोरो (९,७३५) ही महत्त्वाची बेटे आहेत. (२) व्हिसायन समूह – हा समूह मध्यभागी असून यामध्ये बॉहॉल (३,८६५), सेबू (४,४२२), लेटी (७,२१४), मास्बाटे (३,२६९), नेग्रोस (१२,७०५), पालावान (११,७८५), पानाय (११,५१५), सामार (१३,०८०) ही बेटे अंतर्भूत होतात. (३) मिंदानाओ समूह- दक्षिणेकडील या समूहात मिंदानाओ (९४,६३०) या प्रमुख बेटाशिवाय सूलू द्विपसमूहाचा समावेश होतो. मिंदानाओ व लूझॉन ही बेटे फिलिपीन्सचे सु. दोन-तृतीयांश क्षेत्र व्यापतात. लूझॉन बेटावरील मानिला ही देशाची राजधानी असून तिची लोकसंख्या १४,७९,११६ (१९७५) आहे.

भूवर्णन : उत्तरेकडील लूझॉन व दक्षिणेकडील मिंदानाओ यांनी मर्यादित झालेली ही बेटे म्हणजे दक्षिणोत्तर पसरलेल्या, अंतर्गत हालचालींमुळे खंडित होऊन व क्षरण कारकांमुळे झिजलेल्या आणि अंशतः बुडालेल्या पर्वतांचा भाग होय. एके काळी आशिया खंडाच्या मुख्य भूमीचाच ती सलग भाग असावीत. ही बेटे ज्वालामुखी व प्रवाळद्वीपांनी बनलेली असून या बेटांवरील पर्वतरांगा या सर्वसाधारणपणे दक्षिणोत्तर पसरलेल्या आढळतात. या प्रदेशात अद्यापिही भूहालचाली होत असून येथील खडकांची निर्मिती तृतीयक व चतुर्थक कालखंडांतील उद्रेकांपासून झालेली आहे. 

लूझॉन बेटाच्या उत्तर भागात पूर्व व पश्चिम सागरी किनाऱ्यांस समांतर अशा सरासरी १,८३० मी. उंचीच्या दोन पर्वतरांगा आहेत. या बेटाच्या उत्तर-मध्यभागी कॉर्डिलेरा सेंट्रल ही पर्वतरांग असून तिच्या दक्षिण भागात पूलोग (२,९३४ मी.) हे या बेटावरील सर्वांत उंच शिखर आहे. बेटाच्या पूर्वेकडे सिएरा माद्रे ही सु. १,५२४ मी. उंचीची पर्वतरांग आहे. कॉर्डिलेरा सेंट्रल आणि सिएरा माद्रे या पर्वतरांगा दक्षिणेस एकत्र येऊन काराबायो पर्वत बनला आहे, तर बेटाच्या प. भागात साम्बालेस पर्वत लिंगाइयनच्या आखातापासून दक्षिणेस पसरला आहे. लूझॉनचा दक्षिण भाग ज्वालामुखी आणि लहानलहान टेकड्यांनी व्याप्त असून याच भागात लगॅस्पीजवळ मायोन हा ज्वालामुखी (२,४१६ मी.) आहे.

व्हीसायन समूहातील सामार व बॉहॉल या बेटांव्यतिरिक्त इतर बेटांवर दक्षिणोत्तर अशी एक तरी पर्वतरांग गेलेली आढळते. पालावान बेटावर सु. २४ किमी. रूंदीची व १,२१९ ते १,५२४ मी. उंचीची पर्वतरांग आहे. पानाय व नेग्रोस बेटांवर १,८२९ मी. पेक्षा जास्त उंचीची अनेक शिखरे असून नेग्रोस बेटावर कानलाओन (२,४६० मी.) हे सर्वोच्च ज्वालामुखी शिखर आहे. 

मिंदानाओ बेटावर अनेक पर्वतरांगा असून त्यांमध्ये ईशान्य किनाऱ्यावरील दीवाटा ही प्रमुख आहे. या बेटावरच पूलांगी नदीखोऱ्याच्या दक्षिणेकडे व डाव्हाऊ शहराच्या नैर्ऋत्येस असलेले आपो (२,९५४ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर आहे. 

फिलिपीन्सचा मैदानी प्रदेश पर्वतांदरम्यान आहे. उदा., लूझॉन बेटावरील सेंट्रल प्लेन व कागायान नदी खोरे तसेच पानाय बेटावरील सेंट्रल प्लेन, लूझॉन बेटावर लिंगाइयन आखातापासून दक्षिणेकडे मानिला उपसागरापर्यंत सु. १६१ किमी. लांबींचा पट्टा मैदानी असून दक्षिणेकडील पर्वतमय प्रदेशातही तसा प्रदेश आढळतो. या बेटाच्या ईशान्य भागी कॉर्डिलेरा सेंट्रल व सिएरा माद्रे पर्वतांदरम्यान अत्यंत सुपीक असे कागायान नदी खोरे असून ते भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. मिंदानाओ बेटावर आगूसान नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडे डाव्हाऊ मैदानी भाग आहे. तसेच कोटॅबाटो खोरे व त्याच्या उत्तरेकडे ६१० मी.पासून ९१४ मी. पर्यंत उंची असलेले बूकिडनॉन हे पठार आहे. यांव्यतिरिक्त इतर बेटांवरही लहानमोठे सुपीक व मैदानी भाग असून लोकसंख्याही याच भागात जास्त आढळते. 

फिलिपीन्स बेटे हा पॅसिफिक महासागराभोवती असणाऱ्या ज्वालामुखी पट्ट्याचाच भाग असून त्यात सु. ५० ज्वालामुखी आहेत. त्यांतील दहा ज्वालामुखी जागृत आहेत. यांशिवाय आपो, रागांग (२,८१५ मी.), कानलाओन, बानाहाऊ (२,१६५ मी.), माकीलिंग इ. प्रमुख ज्वालामुखी पर्वत होत. वारंवार होणाऱ्या ज्वालामुखींच्या उद्रेकांमुळे प्राणहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. मायोन ज्वालामुखीच्या १८९७ व १९६८ तसेच टाआल ज्वालामुखीच्या १९६५ मधील उद्रेकांचे स्वरूप अतिशय विध्वंसक होते. फिलिपीन्समधील नद्यांची लांबीही कमी आढळते. लूझॉन बेटावरील कागायान ही सर्वांत मोठी नदी (३५४ किमी. लांब) असून आग्‍नो, पाम्पांगा, पसीग व बीकोल या इतर नद्या होत. पूलांगी (३२२ किमी.) व आगूसान या मिंदानाओमधील प्रमुख नद्या होत. लूझॉनवरील पसीग या छोट्या नदीस जलवाहतुकीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. लागूना दे बाय हे अर्धचंद्राकृती, ४० किमी. रूंदीचे व ५० किमी. लांबीचे देशातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर लूझॉन बेटावर आहे. याशिवाय लूझॉनवरील टाउनल, मिंदानाओ, माईनित व लानाओ ही याच बेटावरील इतर महत्त्वाची सरोवरे होत.  


मृदा : फिलिपीन्स बेटे ज्वालामुखीजन्य असल्यामुळे त्यांमध्ये लाव्हापासून बनलेली काळी सुपीक मृदा आढळते. काही बेटांवर लॅरेराइट प्रकारची मृदा आहे. सेबू व नेग्रोस बेटांवरील जमिनीत चुनखडीचा अंश जास्त आढळतो. त्यामुळे पाण्याबरोबर विद्राव्य द्रव्ये निघून जातात व जमिनीचा कस कमी होतो. शेतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची मृदा नदीखोऱ्यांतून आढळते. अशी मृदा कागायन नदी खोरे, पानाय बेटाचा काही भाग, नेग्रोस बेटाचा पश्चिम भाग व मिंदानाओ बेटावरील कोटॅबाटो प्रातांत आहे. किनारी भागात वालुकामिश्रित मृदा आढळते. पावसामुळे आणि अन्य कारणांनी जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. तसेच डोंगर-उतारांवर केल्या जाणाऱ्या फिरत्या शेतीमुळे (स्थानिक नाव-काईजिन) जमिनीची धूप सतत होत असते.

खनिजे :खनिजांच्या बाबतीत हा देश समृद्ध आहे. सोने, चांदी यांसारखी खनिजे लूझॉन, मिंदानाओ, मास्बाटे या बेटांवर आढळतात. लोह, क्रोमियम, मँगॅनीज, तांबे, निकेल, शिसे यांसारखे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे धातू देशात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. हलक्या प्रतीचा कोळसाही येथे सापडतो. खनिज तेलाचे साठे सेबू, लूझॉन व लेटी बेटांवर सापडले आहेत. यांशिवाय जिप्सम, फॉस्फेट इ. अन्य खनिजेही उपलब्ध आहेत. ग्वानो हे नैसर्गिक खतही येथे मिळते.  

हवामान : फिलिपीन्सचे हवामान उष्ण प्रदेशीय सागरी प्रकारचे असले, तरी अक्षांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रसान्निध्य इ. गोष्टींमुळे प्रदेशपरत्वे त्यात विविधता आढळते. जून ते डिसेंबर या काळात होणारी सागरी वादळे या विविधतेत भरच घालतात. लूझॉनच्या उत्तरेकडील लहानलहान बेटांचे तपमान दक्षिणेकडील विषुववृत्ताजवळील सूलू द्वीपसमूहाच्या तपमानापेक्षा काहीसे कमी असते. परंतु देशाच्या एकूण तपमानात फार मोठी तफावत आढळत नाही. डोंगराळ भागातील तपमान समुद्रसपाटीवरील तपमानापेक्षा कमी असते. देशात जास्तीतजास्त तपमान ३८° से.पर्यंत वाढते. उन्हाळ्यात (मार्च ते जून) देशाचे सरासरी तपमान ३०° से.च्या आसपास असते. हिवाळ्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तपमान १६° से. पर्यंत खाली येते. देशातील पर्जन्याचे प्रदेशपरत्वे प्रमाण उंचसखल प्रदेश, ऋतूनुसार बदलणाऱ्या वाऱ्यांच्या दिशा यांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पूर्वेकडील भागात वर्षभर पाऊस पडतो व ऑक्टोबर ते एप्रिल या काळात त्याचे प्रमाण अधिक असते. याच वेळी पश्चिमेकडील भाग पर्जन्यछायेच्या क्षेत्रात आल्याने तेथील पावसाचे प्रमाण कमी असते. याउलट जूनपासून नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागल्यानंतर पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. 

टायफून वाऱ्यांच्या टप्प्यात फिलिपीन्समधील काही बेटे येतात. या वाऱ्यांना ‘बग्यूओस’ असे स्थानिक नाव आहे. या वाऱ्यांमुळे येथे भरपूर पर्जन्यवृष्टी होते, तसेच कधीकधी प्रचंड नुकसानही होते. १९७६ मध्ये या वाऱ्यांमुळे मिंदानाओ बेटावर फार हानी झाली होती.

वनस्पती व प्राणी : फिलिपीन्सची नैसर्गिक वनसंपत्ती विपुल आणि विविध प्रकारची आहे. देशातील सु. ४० टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असून त्यात सु. ६०० प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी सु. १०० प्रकारच्या वनस्पती व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पर्वतमय उंच प्रदेशात पाइन वृक्ष जवळजवळ सर्वत्र, तर इतरत्र बांबू व वेत हे वृक्ष आढळतात. नारळी, कच्छ वनस्पती आणि ‘नीपा’ नावाचे ताडवृक्ष, विशेषतः किनारी प्रदेशात, दिसून येतात. येथील जंगलांत ‘लऊआन’ (मॅहॉगनी वृक्षाचे स्थानिक नाव) विपुल प्रमाणात आहेत. परंतु शेती आणि कुरणे यांसाठी बराचसा डोंगराळ प्रदेश तोडून, जाळून साफ केल्याने ‘कोगोन’ नावाचे उष्ण कटिबंधीय निरूपयोगी गवत अशा ठिकाणी वाढलेले दिसते.

इतिहास: फिलिपीन्सच्या इतिहासाची प्रामुख्याने तीन कालखंडांत विभागणी केली जाते : (१) स्पॅनिश वसाहतपूर्वकाळ, (२) स्पॅनिश अंमल व (३)  अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा अंमल.  

(१) फिलिपीन्स बेटांवर खि. पू. २०,००० वर्षांपासून वस्ती असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. ‘नेग्रिटो’ हे येथील मूळ रहिवासी असावेत, असे इतिहासकार मानतात. मलाया गटाच्या लोकांचे आगमन येथे खि. पू. ३००० च्या नंतर सागरमार्गाने झाले. हे लोक मलाया व इंडोनेशियाच्या निरनिराळ्या भागांतून निरनिराळ्या वेळी आले असावेत. या लोकांना शेतीचे तंत्र अवगत होते, तरीसुद्घा समाजव्यवस्था लहानलहान गावांपुरती मर्यादित होती. इ. स. ७०० च्या सुमारास जपानी लोकांचे व नंतर व्यापारामुळे चौदाव्या शतकात मुस्लिमांचे येथे आगमन झाले. तसेच मिंग राजवटीच्या काळात ( १३६८-१६४४) चीनबरोबर व्यापारसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतरच्या काळात दक्षिणेकडील मिंदानाओ व इतर काही बेटांवर मुस्लिमांनी वर्चस्व प्रस्थापित केले.

मसाल्याच्या बेटांच्या शोधार्थ स्पेनतर्फे पोर्तुगीज दर्यावर्दी मॅगेलन सेबू बंदरात १५२१ मध्ये आला होता. त्याने सेबूच्या राजाशी मैत्री संपादन केली परंतु दुर्दैवाने त्याचा तेथेच अंत झाला. त्याच्यानंतरही मोलूकू बेटावरील वसाहतीच्या उद्देशाने १५१५ ते १५३६ यांदरम्यान स्पॅनिशांनी या विभागात तीन सफरी केल्या, परंतु पोर्तुगीज व डचांच्या प्रतिकारांमुळे त्या अयशस्वी ठरल्या. तिसऱ्या सफरीचे नेतृत्व रूय लोपेस दे व्हिल्लालोबोस याने केले होते आणि त्यानेच या बेटांस ‘फिलिपीन्स’ हे नाव स्पेनचा दुसरा फिलिप याच्या स्मरणार्थ दिले. दरम्यान मोलूकू बेटावर पोर्तुगीजांनी प्रभुत्व प्रस्थापित केले होते. तेव्हा पाचव्या चार्ल्‌सने फिलिपीन्सवर आपला हक्क सांगता यावा या उद्देशाने  मीगेल लोपेस दे लेगास्पी याच्या नेतृत्वाखाली एक तुकडी पाठविली होती. लेगास्पीने सेबू बेटावर पहिली स्पॅनिश वसाहत १५६५ मध्ये वसविली. त्यानंतर १५७१ मध्ये आपल्या वसाहतीचे मानिला हे मुख्य ठिकाण करून ती राजधानी बनविली. या शतकाच्या अखेरीस लूझॉन बेटापासून मिंदानाओपर्यंतचा बराचसा भाग स्पॅनिशांच्या अखत्यारीत आला. स्पॅनिश सत्ताविस्ताराच्या काळात मुस्लिमांखेरीज इतरांकडून त्यांना फारसा विरोध झाला नाही. 


(२) स्पॅनिश अंमलात मिशनऱ्यांनी स्थानिक लोकांचे ख्रिस्तीकरण करण्यास प्रारंभ केला. त्यांना मिंदानाओ व सूलू द्वीपसमूहांवरील मुस्लिमांनी प्रखर विरोध केला. स्पॅनिश काळात शेतीविषयक, शैक्षणिक व सांस्कृतिक सुधारणांना प्रारंभ झाला. 

स्पॅनिश अंमलाच्या पहिल्या शतकात शासनास कर व मजूरशक्ती ही स्पॅनिश अमेरिकेत चालत असलेल्या ‘एन्कोम्येन्दा’ पद्धतीन्वये मिळत असे. या पद्धतीमध्ये स्पेनचा राजा आपल्याजवळील इंडियन गुलाम स्पॅनिश वसाहतकारांना त्याच्या सेवेच्या मोबदल्यात पुरवीत असे. परंतु ही पद्धत सतराव्या शतकाच्या शेवटी सोडून द्यावी लागली.  येथील स्पॅनिशांनी द. अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींशी व्यापारास प्रारंभ केला. त्यावेळी चीनमधील रेशमास मेक्सिकोत व मेक्सिकोतील चांदीस चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मागणी होती. त्यामुळे ह्या पदार्थांची मानिला येथे चढ-उतार करून स्पॅनिश व्यापारी फार मोठा नफा मिळवू लागले. ही परिस्थिती एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कायम होती परंतु पुढे ग्रेट ब्रिटन व इतर यूरोपीय राष्ट्रांनी यामध्ये हस्तक्षेप केला. परिणामी स्पॅनिशांना मिळणाऱ्या नफ्यामध्ये घट झाली. स्पेनच्या फ्रान्सशी असणाऱ्या जवळिकीमुळे स्पेन सप्तवार्षिक युद्धात ओढला गेला. त्यामुळे ब्रिटिशांनी २३ सप्टेंबर १७६२ रोजी मानिला काबीज केले. १७६४ मध्ये स्पॅनिशांनी मानिलावर पुन्हा अंमल प्रस्थापित केला, तथापि ब्रिटिश व्यापारी कंपन्या तेथेच राहिल्या व १८३० मध्ये मानिला परदेशी व्यापाऱ्यांना खुले करण्यात आले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपात जे आर्थिक व राजकीय बदल झाले, त्यांचा परिणाम फिलिपीन्सवरही झाला. स्पॅनिशांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले. शेतीपासून मिळणाऱ्या पिकांना, उदा., ऊस, हेंप (ॲबका), तंबाखू, नारळ यांना परदेशांतून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. शेती करणाऱ्यांना परदेशी चलन भरपूर मिळू लागल्याने त्यांचे राहणीमान उंचावले. शैक्षणिक सुविधा वाढल्याने साक्षरता वाढीस लागली. बहुतेक लोक स्पॅनिश भाषा बोलू आणि लिहू लागले तसेच बहुतेक श्रीमंत लोकांची मुले यूरोपात उच्च शिक्षणासाठी जाऊ लागली. तेथील वातावरणात राष्ट्रीयत्वाची स्वतंत्र जाणीव निर्माण झाली. त्यांच्यातील काहींनी नेतृत्व करून ‘प्रॉपगँडा मूव्हमेंट’ सुरू केली. स्वातंत्र्यासाठी मासिके, कविता, भित्तिपत्रके इत्यादींद्वारा स्वातंत्र्याचा प्रचार सुरू झाला. होसे रिसाल हा या आंदोलनातील एक प्रमुख होता. त्याची राजकीय कादंबरी ( इं. शी. सोशल कॅन्सर) फारच लोकप्रिय होऊन तिचा लोकांवर मोठा प्रभाव पडला.

१८९२ मध्ये त्याने मायदेशी येऊन ‘लीग फिलिपीना’ नावाची संघटना स्थापून चळवळ आरंभिली. स्पॅनिशांनी त्यास अटक करून १८९६ मध्ये देहान्ताची शिक्षा दिली. परंतु स्वातंत्र्याची भावना लोकांच्या मनात खोलवर रूजली होती. त्यामुळे रिसालनंतर आंद्रेस बोनिफाचोच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘कटिपुनान’ या संघटनेने लढा चालूच ठेवला. या लढ्यातच बोनिफाचोचा अंत झाला आणि नेतृत्व एमील्यो आगिनाल्दोकडे आले. त्याच वेळी स्पॅनिशांनी बंडखोरांशी राजकीय चर्चा करण्याची तयारी दर्शविली, परंतु त्यासाठी त्यांनी लढा थांबविण्याची व त्यांच्या नेत्यांनी देश सोडण्याची अट घातली. त्या अटींनुसार आगिनाल्दो काही इतर नेत्यांबरोबर हाँगकाँगला गेला. इकडे स्पॅनिशांनी स्वातंत्र्य देण्याबाबत दिरंगाईचे धोरण स्वीकारले. अशा अवस्थेतच स्पेनचे अमेरिकेशी युद्ध सुरू झाले. त्यामध्ये स्पॅनिशांचा अमेरिकेने पराभव केला (१८९८) . त्याच वर्षीच्या मेमध्ये मानिला उपसागरात जॉर्ज द्यूईच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने सैन्य आणले. नंतर आगिनाल्दो मायदेशी परतला. त्याने अमेरिकनांच्या मदतीने सैन्याची उभारणी करून मानिला परिसरातील शहरे स्वतंत्र केली. १२ जून १८९८ रोजी फिलिपीन्सचे स्वातंत्र्य जाहीर करण्यात आले. आगिनाल्दोच्या पुरस्कर्त्यांनी  २३ जून रोजी त्यास क्रांतिकारी शासनाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून नेमले. अमेरिकन व फिलिपिनो सैन्यांनी १३ ऑगस्ट १८९८ रोजी मानिला जिंकले. त्यानंतर युद्धविराम होऊन येथील स्पॅनिश सत्तेचा शेवट झाला.

(३) स्पेन व अमेरिका यांमध्ये १० डिसेंबर १८९८ रोजी पॅरिस येथे झालेल्या करारान्वये ही बेटे स्पेनने अमेरिकेस दिली व त्यांवर अमेरिकन शासनाची कार्यवाही सुरू झाली. आगिनाल्दोस त्वरित स्वातंत्र्य हवे होते. त्यामुळे त्याने फिलिपीन्स प्रजासत्ताकाची घोषणा २३ जानेवारी  १८९९ रोजी केली व त्याच्या सैन्याने अमेरिकन सैन्यावर हल्ले करण्यास प्रारंभ केला ( ४ फेब्रुवारी १८९९). आगिनाल्दो यास अमेरिकन सैन्याने १९०१ मध्ये अटक केली. त्यानंतर त्याने अमेरिकन शासनास मान्यता दिली आणि फिलिपीन्स व अमेरिका यांमधील लढा संपुष्टात येऊन हा देश अमेरिकेच्या अखत्यारीत आला. 

अमेरिकेने आशियाशी हितसंबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने फिलिपीन्सचा उपयोग करून घेण्यास प्रारंभ केला, त्याचबरोबर फिलिपीन्सला लवकरच स्वातंत्र्य दिले जाईल, असे जाहीर केले.अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मॅकिन्ली याने जे. जी. शुर्मॉन याच्या नेतृत्वाखाली फिलिपीन्समधील लोकमानसाचा अंदाज घेण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले (१८९९). लोकांना  स्वातंत्र्य हवे असल्याचा अहवाल त्याने सादर केला. मॅकिन्लीने १९०० मध्ये डब्ल्यू. एच्. टॅफ्ट याच्या नेतृत्वाखाली दुसरे एक शिष्टमंडळ पाठविले. १९०१ मध्ये येथे नागरी शासनाची स्थापना होऊन टॅफ्ट हा फिलिपीन्समधील पहिला गव्हर्नर जनरल झाला. गव्हर्नर व त्याचे सहकारी यांचे वरिष्ठ गृह व निवडून आलेल्या प्रतिनिधींचे कनिष्ठ गृह अशी द्विसदनी संसद येथे अस्तित्वात आली (१९०७). १९१६ मध्ये ‘जोन्स ॲक्ट’नुसार लोकनियुक्त सीनेटची स्थापना होऊन अर्थ, लष्कर, परदेशी व्यवहार सोडून इतर कारभार लोकनियुक्त सीनेटकडे सोपविण्यात आला. अशा प्रकारे फिलिपीन्सला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया चालूच राहिली. १९३४ मध्ये १९४६ हे स्वातंत्र्य देण्याचे वर्ष म्हणून निश्चित करण्यात आले. १९३५ मध्ये मॅन्यूएल केसॉनच्या अध्यक्षतेखाली कॉमनवेल्थ सरकार स्थापन करण्यात येऊन फिलिपीन्सच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक योजना कार्यवाहीत आणल्या गेल्या.


 दुसऱ्या महायुद्धकाळात जपानने फिलिपीन्सवर हल्ले करण्यास प्रारंभ केला. त्याच्या प्रतिकारासाठी अमेरिकेने फिलिपीन्सला लष्करी साहाय्य दिले. १९४२ मध्ये जपानने लूझॉन बेट जिंकले. केसॉन तेथून पळून गेला व त्याने १३ मे १९४२ रोजी अमेरिकेत फिलिपीन्स सरकारची स्थापना केली. जपाननेसुद्धा जे. पी. लॉरेल यास अध्यक्ष बनवून नाममात्र प्रजासत्ताकाची घोषणा केली. दरम्यान १९४४ मध्ये केसॉन मरण पावला. त्याच्यानंतर फिलिपीन्सचे नेतृत्व सेर्ह्यो ओस्मेन्या याने केले.अमेरिकेने फिलिपीन्सच्या मुक्ततेसाठी प्रयत्‍न चालूच ठेवले १९४५ मध्ये जपानला शरणागती पतकरावी लागली. फिलिपिनोंनी मॅन्यूएल रॉहास यास राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले (एप्रिल १९४६) व तीन महिन्यांनंतर ४ जुलै १९४६ रोजी फिलिपीन्स स्वतंत्र होऊन फिलिपीन्स प्रजासत्ताक अस्तित्वात आले. रॉहास हाच त्याचा राष्ट्राध्यक्ष बनला.  

स्वतंत्र फिलिपीन्सचा कारभार पाहत असता रॉहासला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्याच्या निधनानंतर (१९४८) एल्‌पीद्यो कीरीनो हा राष्ट्राध्यक्ष झाला. १९४९ मध्ये पुन्हा त्याचीच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली (कार. १९४९-५४). याच वेळी येथील कम्युनिस्टांनी व काही शेतकऱ्यांनी बंड पुकारले, पण त्याचा बीमोड करण्यात आला. 

शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा अभाव, औद्योगिकीकरणाचा मंद वेग तसेच सततचे युद्ध यांमुळे सरकार कर्जाने बेजार झाले होते. या अडचणींवर मात करण्यासाठी अमेरिकन सरकारने फिलिपीन्सला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. याचा फायदा घेऊन कीरीनो, रामोन मागसायसाय (कार. १९५४-५७). सी. पी. गार्सीआ (१९५७-६१), दीओस्दादो माकापागाल (१९६१-६५) व नंतर फर्डिनंड ए. मार्कोस (१९६५-  ) यांनी देशास प्रगतिपथावर आणले. मार्कोसने दळणवळण, शिक्षण व कृषिक्षेत्रात विविध सुधारणा केल्या. १९६९ पासूनच्या त्याच्या दुसऱ्या अध्यक्षीय कारकीर्दीत अंतर्गत अशांतता निर्माण झाली. शासनातील भ्रष्टाचार, व्हिएटनामविषयक अमेरिकेच्या धोरणास मान्यता इत्यादींमुळे तसेच ‘न्यू पीपल्स पार्टी’ (एन्‌पा) या कम्युनिस्टांच्या व ‘मोरो नॅशनल लिबरेशन फ्रंट’ च्या गनिमी कारवायांनी आणि मुस्लिम-ख्रिश्चनांच्या वादामुळे देशात अशांतता निर्माण झाली. त्यामुळे मार्कोसने सप्टेंबर १९७२ मध्ये लष्करी कायदा पुकारला, विरोधी नेत्यांना अटक केली व वृत्तपत्रांवर अभ्यवेक्षण जारी केले. जानेवारी १९७३ मध्ये नवी राज्यघटना अंमलात आणून स्वतःला अनिर्बंध सत्ता मिळेल अशी व्यवस्था त्याने केली. यासाठी त्याने जुलै १९७३, फेब्रुवारी १९७५, ऑक्टोबर १९७६ व डिसेंबर १९७७ मध्ये सार्वत्रिक मतदान घेतले. त्यांतून स्वतःच्या लष्करी कायद्यास लोकमताचा अनुकूल कौल प्राप्त करून घेतला. तरीसुद्धा विरोधकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठविली. १९७७ मध्ये मार्कोसने लष्करी कायदा शिथिल करून एप्रिल १९७८ मध्ये निवडणुका घेतल्या. त्यांत मार्कोसच्या ‘न्यू सोसायटी मूव्हमेंट पार्टी ’स बहुमत मिळून तोच पंतप्रधान झाला. त्यानंतर त्याने एन्‌पा व मोरो नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजून सतत आठ वर्षे देशात चालू ठेवलेला लष्करी कायदा १७ जानेवारी १९८१ रोजी मागे घेतला. फिलिपीन्स हा ‘असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स’ (आसिआन) चा सदस्य आहे.

राजकीय स्थिती : १९३५ मध्ये तयार केलेली राज्यघटना संयुक्त संस्थानांच्या घटनेवर आधारित होती. तीनुसार राष्ट्राध्यक्ष हा सर्वोच्च अधिकारी असून त्याची मुदत चार वर्षे असे. त्याच्या मदतीला उपाध्यक्ष व मंत्री असत. सीनेट व प्रतिनिधिगृहाचे सभासद मिळून संसद बनते. सीनेटच्या चोवीस सभासदांची मुदत सहा वर्षे असे. परंतु १९७२ मध्ये मार्कोसने लष्करी कायदा पुकारून ही घटना रद्द केली १९७३ मध्ये नवीन घटना संमत केल्याचे जाहीर केले आणि तिच्या संक्रमणावस्थेच्या काळातील तरतुदींनुसार मार्कोस हा अध्यक्ष म्हणून राहिला. 

 फिलिपीन्सचा कारभार १९७३ च्या राज्यघटनेनुसार चालतो. या नवीन घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असून त्याची निवड संसदेने सहा वर्षांकरिता करावयाची असते. त्याचे किमान वय ५० वर्षे असावे लागते. कार्यकारी सत्ता पंतप्रधानाकडे असून तो सैन्यप्रमुखदेखील असतो. त्याच्या मदतीसाठी मंत्रिमंडळ असते. मंत्र्यांची नेमणूक करण्याचा व त्यांना काढून टाकण्याचा अधिकार पंतप्रधानास असतो. शासकीय धोरण ठरविणे, कायद्यांबाबत नकाराधिकार वापरणे, न्यायाधीशांची नेमणूक करणे, जरूर वाटल्यास संसद बरखास्त करण्याचा व पुन्हा निवडणूक घेण्याचा सल्ला राष्ट्राध्यक्षास देणे इ. अधिकार पंतप्रधानास असतात. राष्ट्रीय संसदेच्या सभासदांमधून पंतप्रधानाची निवड केली जाते. संसदेचे सदस्य सहा वर्षांसाठी निवडून दिवे जातात. १८ वर्षे वयाच्या व फिलिपीन्समध्ये किमान एक वर्ष वास्तव्य असणाऱ्या फिलिपिनोला संसदसदस्य निवडण्याचा अधिकार असतो. राष्ट्रीय संसदेचे २०० सदस्य असतात. त्यांपैकी १६५ लोकनियुक्त व इतर ३५ सदस्यांपैकी २१ मंत्रिमंडळामार्फत व १४ युवक, कृषी व कामगार यांच्या संघटनांमार्फत निवडले जातात. कारभाराच्या सोयीसाठी देशाचे १२ विभाग, ७२ प्रांत, ४ उपप्रांत, ३० नगरपालिकीय जिल्हे, ६० शहरे व ४२,००० खेडी असे विभाजन केलेले आहे.  

फिलिपीन्समध्ये राजकीय पक्षांची संख्या कमी आहे. प्रामुख्याने १९७२ पर्यंत ‘नॅसिओनॅलिस्ट पार्टी ’ व ‘लिबरल पार्टी ’ हे दोन प्रमुख पक्ष होते. परंतु लष्करी कायद्यांनंतर येथे ‘न्यू सोसायटी मूव्हमेंट’, ‘पीपल्स पॉवर मूव्हमेंट फाइट’, ‘पुसयॉन बिल्या पार्टी ’ हे तीन पक्ष निर्माण झाले त्यांतील पहिल्या दोहोंना पूर्वीच्या अनुक्रमे नॅसिओनॅलिस्ट पार्टी व लिबरल पार्टीतील नेत्यांचा पाठिंबा आहे.

न्याय : सर्वोच्च न्यायालय व अपील न्यायालय या प्रमुख न्यायालयांशिवाय फौजदारी, शहरी व नगरपालिकीय न्यायालयांमार्फत न्यायदानाचे काम पाहिले जाते. सर्वोच्च न्यायालयात एक प्रमुख न्यायाधीश व त्यास साहाय्य करणारे इतर १४ न्यायाधीश असून या सर्वांची नेमणूक राष्ट्राध्यक्षामार्फत होते. अपील न्यायालयात एक प्रमुख आणि अन्य ४४ न्यायाधीश असतात.  


संरक्षण : भू, हवाई, नाविक व पोलीस दलांमार्फत संरक्षणव्यवस्था पाहिली जात असून त्यांतील प्रत्येक विभागावर एक प्रमुख अधिकारी असतो. मार्च १९४७ मध्ये अमेरिका व फिलिपीन्स यांच्यात संरक्षणाबाबत करार झाला असून तो ९९ वर्षांसाठी केला आहे परंतु त्याची मुदत २५ वर्षांनी कमी केल्याने हा करार २०२१ पर्यंत अंमलात राहणार आहे. जुलै १९७८ च्या अंदाजानुसार देशात ९९,००० सैन्य होते. त्यांपैकी ६३,००० भूदलात २०,००० नाविक दलात व १६,००० हवाई दलात होते. स्थानिक संरक्षण व्यवस्था पोलिसांमार्फत पाहिली जाते. पोलिस दलात २७,००० लोक आहेत. १९७८-७९ सालातील संरक्षणावरील अंदाजे खर्च ५,८५० द. ल. पेसोंचा होता.

आर्थिक स्थिती : स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असलेले हे प्रजासत्ताक अद्यापही कृषिप्रधानच आहे. देशातील एकूण कामकऱ्यांपैकी ५१·५% लोक कृषिव्यवसायात गुंतले होते (१९७७). युद्धपूर्व काळात फिलिपीन्सची अर्थव्यवस्था अमेरिकेला आवश्यक असणाऱ्या ठराविक शेतमालाच्या उत्पादनावर निर्भर होती. साखरउद्योग सोडल्यास देशात फारसे औद्योगिकीकरण झालेले नव्हते. प्रामुख्याने अमेरिकेकडून मालाची आयात होत असे. दुसऱ्या महायुद्धकाळात देशाचे पुष्कळसे नुकसान झाले त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली. तिच्या संतुलनार्थ अनेक उपाय योजावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या प्रगतीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या परंतु वाढती लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय किंमतींतील चढ-उतार, सततची युद्धे इत्यादींमुळे देशाची प्रगती झपाट्याने होण्यात अडथळे निर्माण झाले. 

कृषी : देशातील बहुसंख्य लोक या व्यवसायावर अवलंबून असून एकूण जमिनीच्या ३४% जमीन लागवडीखाली आहे. निर्यातीमध्ये कमाल हिस्सा कृषीपदार्थांचा असतो. शेतीत आधुनिक तंत्राचा वापर केला जात असल्याने उत्पादन वाढत असून १९७६ मध्ये कृषिउत्पादनात ६% वाढ झाली होती. लूझॉन, पानाय, बॉहॉल व सेबू बेटाचा मध्यवर्ती मैदानी भाग, नेग्रोस बेटाचा वायव्य भाग शेतीबाबत अग्रेसर असून मिंदानाओ व पालावान बेटांवर शेतीपद्धतीत सुधारणा केल्या जात आहेत. भात हे प्रमुख पीक असून ७०% लोकांचे ते मुख्य अन्न आहे. लागवडयोग्य जमिनीच्या ४२% भागावर हे पीक घेतले जाते. सुधारित बियाणांमुळे हेक्टरी उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. १९७३ मध्ये ‘मॅसॅगना ९९’ या कार्यक्रमाद्वारे भाताचे उत्पादन वाढविण्याचे आणि याबाबत स्वावलंबी व्हावयाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यामुळे १९७८ मध्ये तांदळाची निर्यात करणे शक्य झाले. मका हे दुसरे प्रमुख पीक असून एक-चतुर्थांश लोकांचे ते प्रमुख अन्न आहे.याचे उत्पादन कागायान खोरे, पूर्व नेग्रोस, मिंदानाओ व सेबू बेटांवर मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अन्नपिकांबरोबर नगदी पिकांकडेसुद्धा लक्ष पुरविले जाते. नगदी पिकांमध्ये उसास प्राधान्य आहे. उसाची कमाल लागवड लूझॉन ३०% व नेग्रोस ६०% या बेटांवर केली जाते. यांशिवाय पानाय, लेटी व सेबू बेटांवरही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. नारळाने उत्पादनही महत्त्वाचे असून याखाली फक्त १४% क्षेत्र असले, तरी या जगात नारळाच्या निर्यातीत देशास प्रमुख स्थान आहे. ताग (अंबाडी) हेसुद्धा एक प्रमुख नगदी पीक असून दुसऱ्या महायुद्धापर्यंत याच्या निर्यातीत फिलिपीन्सची मक्तेदारी होती. याखाली फक्त २% क्षेत्र आहे. याचे उत्पादन प्रामुख्याने लूझॉनवरील बिकोल विभागात, मिंदानाओवरील डाव्हाऊ प्रांतात व सामार आणि लेटी बेटांवर घेतले जाते. तंबाखू हे पीकही महत्त्वाचे आहे. यांशिवाय केळी, आंबे, संत्री, पपई, सफरचंद, फणस, फळांच्या बागाही आहेत.

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा, खतांचा वापर केला जाऊ लागल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे. १९७६-७७ मधील प्रमुख पिकांचे उत्पादन हजार मे. टनांत : भात ६,४५६ मका २,८४३ तंबाखू ५२ ऊस ३२,४०० खोबरे २,११० व ताग १५१. 

उद्योग : फिलिपीन्सचा सु. ६०% भाग जंगलव्याप्त असल्याने लाकूडकाम हा एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. लाकूड उत्पादनाच्या दृष्टीने मिंदानाओ, नेग्रोस, पालावान व लूझॉनचा काही भाग इ. बेटे महत्त्वाची आहेत. मासे हे फिलिपीन्समधील लोकांच्या जेवणातील प्रमुख अन्न आहे. समुद्र, खाड्या, नद्या आणि तलाव यांतून सु. २,००० प्रकारचे विविध मासे सापडतात. त्यांपैकी अँकोव्ही, सार्डीन, ट्यूना, मॅकेरेल, हेरिंग इ. महत्त्वाचे आहेत. १९७६ मध्ये १३,९४,४८३ टन मासे सापडले. मत्स्योद्योगाच्या जोडीने देशाच्या दक्षिण भागात मोत्यांचे शिंपले गोळा करण्याचा व्यवसाय चालतो. सूलू द्वीपसमूहाच्या दक्षिणेस हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. बटणांच्या निर्मितीसाठी शिंपल्यांची निर्यात चीन, हाँगकाँग व अन्यत्र केली जाते, तर कासवांच्या पाठी आणि शिंपले यांची निर्यात विशेषेकरून सिंगापूर, मलाया इ. देशांकडे केली जाते. सोन्याच्या उत्पादनात फिलिपीन्सचा जगात आठवा क्रमांक लागतो. लूझॉनवरील बॅगीओ परिसराच्या डोंगराळ भागात सोन्याच्या खाणी असून देशातील ७५% सोने उत्पादन या भागातूनच होते. मिंदानाओवरील सूरीगाओ येथेही सोने सापडते. १९७७ मधील खनिजांचे उत्पादन हजार मे. टनांत : मँगॅनीज ८, तांबे २७३, क्रोम ५३१, सोने (हजार औंस) ५५८·३, चांदी १,६२१·१.

फिलिपीन्समध्ये शक्तिसाधनांचा अभाव आहे. उत्तम प्रतीचा कोळसा अत्यल्प प्रमाणात सापडतो. खनिज तेलही फारसे उपलब्ध नाही. १९६१ मध्ये सेबू बेटावर पहिली तेलविहीर खोदण्यात आली. मात्र १९७८ मध्ये पालावान बेटावरील खनिज तेलसाठ्याच्या शोधामुळे देशाच्या खनिज तेल उत्पादनात प्रतिदिनी १२,००० पिंपांनी वाढ होईल. जलविद्युत्‌निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध नाही. बिंगा व अम्बूक्लाओ या लूझॉन बेटावरील व मारीया क्रिस्तीना या मिंदानाओ बेटावरील प्रकल्पांद्वारे वीजनिर्मिती होते. तसेच पाम्पांगा या बहूद्देशी प्रकल्पाद्वारे वीजनिर्मितीशिवाय पूरनियंत्रण, जलसिंचन इ. कार्य शक्य झाले आहे. औष्णिक विद्युत्‌निर्मितीस प्रारंभ झाला असून त्यात बातान प्रकल्प प्रमुख आहे. वीजपुरवठा सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही कंपन्यांमार्फत होतो.   


दुसऱ्या महायुद्धापूर्वी येथे उद्योगधंद्यांचा फारसा विकास झालेला नव्हता. शेतमालाचे खाद्यपदार्थांत रूपांतर व साखर उद्योग एवढ्यावरच उद्योगांची मर्यादा होती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर त्यास चालना मिळून कागद, रसायने, तेलशुद्धीकरण, जहाजबांधणी इ. विविध उद्योगांना प्रारंभ झाला. उद्योगांचे केंद्रीकरण मानिलाच्या परिसरात झालेले आढळते. उद्योगधंद्यांत गुंतलेल्या लोकांपैकी ५३·२% कामगार याच भागात आहेत. अलीकडे ॲल्युमिनियम व सिमेंट उद्योगांची वाढ झाली आहे. यांशिवाय तंबाखूचे पदार्थ, कातडी वस्तू, लोखंड व पोलाद उद्योग वाढीस लागले आहेत. साखर उद्योगाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कुटिरोद्योगात मातीची भांडी, भरतकाम, चटया विणणे, बाटिक काम हे प्रमुख आहेत. देशात १९७४ मध्ये नारळापासून तेल काढण्याच्या आणि भात सडण्याच्या अनुक्रमे २० व ३१ गिरण्या तसेच सिगारेटचे २५, पादत्राणांचे ७४, साखरेचे ३५ व सिमेंटचे १८ कारखाने होते. येथील विविध उद्योगांना अमेरिकेकडून भांडवल पुरवठा होतो. १९७५ मध्ये कारखानदारीत कामगारांपैकी १५% लोक गुंतले होते, त्याच वर्षीचे कारखानदारीपासूनचे उत्पन्न राष्ट्रीय उत्पादनाच्या २५% होते. 

व्यापार : फिलिपीन्स हा देश अनेक बेटांचा मिळून झालेला असल्याने सलग वाहतुकीला मर्यादा पडतात. व्यापारी दृष्ट्या एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणे म्हणूनच अवघड झालेले आहे. यामुळेच जवळजवळ प्रत्येक बेटावर एकतरी बाजारपेठ आढळते. मात्र देशाची प्रमुख बाजारपेठ म्हणजे मानिलाच होय. पूर्वी व्यापारात चिनी लोकांची मक्तेदारी होती. मात्र १९५४ च्या राष्ट्रीयीकरण कायद्यानुसार अमेरिकनांव्यतिरिक्त इतर परदेशीयांना किरकोळ व्यापाराची परवानगी नाही. फिलिपीन्सच्या व्यापारात आयातीमध्ये पक्का माल व निर्यातीत शेतमालाचा प्रामुख्याने समावेश असतो. फिलिपीन्सवरील अमेरिकेच्या राजकीय वर्चस्वामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही देशाचा व्यापार बव्हंशी अमेरिकेशी चालतो. येथून निर्यात होणाऱ्या मालात खोबरे, खोबरेल तेल, लाकूड, तांबे, मानिला हेंप, साखर, अननस, प्लायवुड यांचा समावेश असतो तर आयातीत यंत्रसामग्री, खनिज तेल, विद्युत्‌साहित्य, रसायने इ. वस्तू प्रमुख असतात. व्यापार प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, स्पेन, इंडोनेशिया इ. देशांशी चालतो. १९७७ मध्ये आयात ४,२४५·३ द.ल. डॉलर व निर्यात ३,३४०·९ द.ल. डॉलर होती.

अर्थकारण : पेसो हे देशाचे अधिकृत चलन असून १, ५, १०, २५, ५० सेंटॅव्होंची आणि १, ५ पेसोंची नाणी, तर २, ५, १०, २०, ५०, १०० पेसोंच्या नोटा चलनात आहेत. डिसेंबर १९७८ मध्ये १०० पेसो = ६·६६ पौंड = १३·५५ डॉलर असा विनिमय दर होता. 

सरकारी मध्यवर्ती बँक ही देशातील बँकिंग व्यवहार पाहते. व्यापारी बँका, आंतरराष्ट्रीय बँका व पतपेढ्या यांवर तिचे नियंत्रण असते. देशात ४० पेक्षा जास्त व्यापारी बँका असून १९७७ मध्ये त्यांच्या १,१७६ शाखा होत्या ग्रामीण भागातही बँका आहेत. काही परदेशी बँका येथे असून त्यांत बँक ऑफ कॅलिफोर्निया (अमेरिका), बँक ऑफ नोव्हास्कोशा (कॅनडा), बँक ऑफ टोकिओ (जपान), लॉइड्‌स बँक इंटरनॅशनल (ग्रेट ब्रिटन), बँक नॅशनल द पॅरिस (फ्रान्स) या प्रमुख आहेत. 

नियोजन मंडळ, आर्थिक मंडळ व इतर काही संस्था यांच्यामार्फत देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने योजना आखल्या जातात. त्यांनुसार अंदाजपत्रकात तरतुदी केल्या जातात. सरकारच्या गंगाजळीत प्राप्तिकर, आयात व निर्यात कर, तसेच परवाना इ. करांद्वारे भर पडते. १९७७ च्या अंदाजपत्रकात २०,८२४·३ द. ल. पेसो जमा व २८,२४३·० द. ल. पेसो खर्च दाखविण्यात आला होता. 

दळणवळण : देशात जलवाहतूक प्रमुख असून सडका व लोहमार्गही आहेत. लोहमार्ग प्रामुख्याने लूझॉन व पानाय बेटांवर आहेत. १९७६ मध्ये लूझॉनवर १,०५७ किमी. व पानाय बेटावर ११५ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. १९७७ मध्ये रेल्वेद्वारे १,२७,९६,००० उतारूंची व ४९ द. ल. टन मालाची वाहतूक करण्यात आली. देशात १,१९,२२० किमी. लांबीचे रस्ते असून ९,८६,४२७ वाहने होती (१९७७). बेटांतर्गत वाहतुकीत मोटारसेवा महत्त्वाची आहे. देशात ९७ राष्ट्रीय व ५०२ नगरपालिकीय बंदरे होती (१९७८). आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या दृष्टीने मानिला हे प्रमुख बंदर आहे. शिवाय सेबू, ईलोईलो, डाव्हाऊ, लगॅस्पी, बाकोलोद, सांबोआंगा ही मोठी बंदरे आहेत. १९७८ मध्ये देशात ७९ विमानतळ होते. पैकी मानिला येथे व सेबू बेटावरील माक्टान येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. यांशिवाय लाकाग, ताक्लोबान, डाव्हाऊ सिटी, सांबोआंगा सिटी, प्वेर्तो प्रीन्सेसा हे काही प्रमुख विमानतळ होत. १९७७ मध्ये हवाई मार्गाने ३०,२१,०८५ उतारू वाहतूक व ५,४६,५५,००५ किग्रॅ. मालवाहतूक झाली. ‘फिलिपीन एअर लाइन्स’ (पाल)  ही देशातील प्रमुख विमानकंपनी आहे (स्था. १९४६). याशिवाय परदेशी विमानकंपन्यांमार्फत हवाई वाहतूक चालते. देशात १९७७ मध्ये १,६८२ टपाल कचेऱ्या, १,३५९ तार कचेऱ्या होत्या. खाजगी क्षेत्रातील ‘फिलिपीन लाँग डिस्टन्स’ कंपनीचे ४,६९,७४५ ‘रिपब्‍लिक टेलिफोन’ कंपनीचे २९,९१८ आणि सरकारी कंपनीचे १७,८६३ दूरध्वनी होते (१९७६). देशात १९७८ मध्ये एकूण २७७ रेडिओ केंद्रे आणी पाच दूरचित्रवाणी कंपन्या असून त्यांची १९ फिरती व सात सहक्षेपण केंद्रे होती. १९७५ मध्ये ८,७७,००० रेडिओसंच आणि ५,०१,४०० दूरचित्रवाणी संच होते.

लोक व समाजजीवन : आशियाई देशांपैकी सर्वाधिक ख्रिस्ती लोकसंख्या असलेला हा एकमेव देश आहे. देशातील जननमान हे मृत्यूमानापेक्षा अधिक आहे. १९७०-७५ मध्ये जननप्रमाण व मृत्युप्रमाण हे दर हजारी अनुक्रमे ४३·८ व १०·५ होते. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १४०·२ होती (१९७५). लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण ग्रामीण भागात कमी, तर शहरी विभागात जास्त आहे.  


फिलिपीन्समधील लोक ‘फिलिपिनो’ म्हणून ओळखले जातात. ते मलेशियन वंशाचे असून आग्‍नेय आशियातून येथे आले असावेत. चिनी व फिलिपिनो यांच्या संकराच्या लोकांना ‘मेस्तीसो’ म्हणत असून त्यांची संख्या १०% आहे. तसेच फिलिपिनो-स्पॅनिश आणि फिलिपिनो-अमेरिकन यांच्या संकरांचेही लोक येथे आढळतात. स्थूलमानाने फिलिपीन्समधील लोकांचे येथील मूळचे रहिवासी किंवा पेगन, ख्रिस्ती व मुस्लिम या तीन गटांत विभाजन केले जाते. देशात ९०% लोक ख्रिस्ती असून त्यांतील ८५% लोक रोमन कॅथलिक आहेत. व्हीसायन द्विपसमूहात त्यांचे प्रमाण अधिक आहे. फिलिपीन्समधील मुस्लिम एकूण लोकसंख्येच्या ५% असून ते ‘मूर’ म्हणून ओळखले जातात. त्यांची संख्या मिंदानाओ व सूलू द्विपसमूहांवर अधिक आहे. या मुस्लिमांमध्येही अनेक जमाती असून त्यांतील मॅरनॅऊ, ताऊसूग, समाल या जमातींचे आधिक्य आहे. येथील मूळचे रहिवासी ‘पेगन’ हे डोंगराळ किंवा जंगल भागांत आढळतात. या लोकांच्या अनेक जमाती आहेत. उत्तर लूझॉनच्या डोंगराळ भागातील लोकांना ‘ईगरोट’ म्हणतात. लूझॉन बेटावर ईबलॉई, ईफूगाऊ, बान्टाक, कलिंग, अपायाओ, ईलोंगोट इ. मिंदानाओवर बगोबो, बीलान, मांडाय, मनोबो, सूबानून इ. तर पालावानवर बटाक, पालावान इ. प्रमुख जमाती आहेत. नेग्रिटो लोक इटा किंवा आग्‍टा या स्थानिक नावानेही ओळखले जातात. ते प्रामुख्याने लूझॉन, मिंदानाओ, पानाय व नेग्रोस बेटांनर आहेत. या सर्व जमातींच्या प्रगतीसाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत.

फिलिपीन्समध्ये स्त्रीला पुरूषांच्या बरोबरीचे स्थान आहे. येथे एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे. ग्रामीण भागातील लोक पामची पाने व बांबूंपासून बनविलेल्या झोपडीत  राहतात. दलदलीपासून संरक्षण व्हावे म्हणून या झोपड्या जमिनीपासून उंचावर बांबूंच्या आधारे बांधलेल्या असतात. अशा झोपडीत जाण्यासाठी शिडीचा उपयोग करतात. शहरांत मात्र आधुनिक इमारती दृष्टीस पडतात. भात हे फिलिपिनोंचे मुख्य अन्न असून त्यांच्या आहारात मासे, भाजीपाला, फळे, कोंबडी, डुकरांचे मांस यांचाही समावेश असतो. भाजलेले डुकराचे  मांस व कोंबडी हे त्यांच्या विशेष आवडीचे पदार्थ होत. नारळीपासून ‘टूबा’ नावाची दारू बनविली जाते. शहरातील लोकांचा पोशाख पाश्चिमात्य धर्तीचा असून ग्रामीण भागातील लोकांच्या पोशाखात प्रदेश-जमातीपरत्वे फरक असतो.

आरोग्य व समाजकल्याण :  देशाच्या प्रत्येक प्रांतात व मोठ्या शहरांत रुग्‍णालये असून ग्रामीण भागात दवाखान्यांची सोय आहे. देशात ८१३ रूग्‍णालये (१९७३) व १९७६ मध्ये ८३,७०० खाटा आणि ३८,४९० डॉक्टर होते. विषमज्वर व देवी या रोगांचे जवळजवळ उच्चाटन झालेले आहे तर कुष्ठरोग, हिवताप इ. आटोक्यात आलेले आहेत. मात्र न्यूमेनिया, क्षय यांचा प्रादुर्भाव अद्यापि होतो. सरकारच्या समाजकल्याण खात्याव्यतिरिक्त काही खाजगी संस्थांमार्फतही लोकांच्या आरोग्याबाबत काळजी घेतली जाते. यांत फिलिपीन नॅशनल रेड क्रॉस, मेंटल हेल्थ असोसिएशन, कम्यूनिटी चेस्ट इ. प्रमुख आहेत.

मोठ्या स्थावर मिळकती विकत घेऊन त्या हप्तेपद्धतीने शेतकऱ्यांना विकणे, भूमिहीनांचे पुनर्वसन, गृहनिर्माण मंडळांना साहाय्य इ. कार्यक्रम शासनाने हाती घेतलेले आहेत. ग्रामसुधारणा करणे, बी-बियाणे वाटणे, खेड्यांत शाळा, रस्ते व दवाखान्यांच्या सोयी करणे इत्यादींसाठीही सरकार मदत करते 

शिक्षण : देशात साक्षरतेचे प्रमाण आधिक असून १९७० च्या जनगणनेनुसार ७२% लोक साक्षर होते. ७-१० वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व काही विषयांसाठी पिलिपिनो (तागालोग) आहे. प्राथमिक शिक्षण सहा वर्षांचे, माध्यमिक ४ वर्षांचे आणि महाविद्यालयीन ४ ते ९ वर्षांचे असते. १९७५ मध्ये ३०,८६९ प्राथमिक शाळांत ७५,२९,८८७ विद्यार्थी व २,६२,०२७ शिक्षक आणि ४,८३५ माध्यमिक शाळांत २१,८८,०३१ विद्यार्थी व ७०,३५८ शिक्षक होते. देशात ४४ विद्यापीठे असून ७,००० महाविद्यालये होती. सेंट टॉमस विद्यापीठ (स्था. १६११), युनिव्हर्सिटी ऑफ द फिलिपीन्स (१९०८), युनिव्हर्सिटी ऑफ मानिला, ॲडम्स युनिव्हर्सिटी, फिलिपीन विमेन्स युनिव्हर्सिटी ही काही प्रसिद्ध विद्यापीठे आहेत. १९७७ च्या अंदाजपत्रकात शिक्षणासाठी   २,६८८ द. ल. पेसो रक्कम राखून ठेवली होती.  

फडके, वि. शं. भागवत, अ. वि. गाडे, ना. स. 

भाषा व साहित्य : फिलिपीन्समध्ये पिलिपिनो, इंग्रजी व स्पॅनिश अशा तीन भाषांना अधिकृत स्थान देण्यात आलेले आहे. त्यांपैकी पिलिपिनो ही राष्ट्रभाषा आहे. फिलिपीन्समध्ये बोलल्या जाणाऱ्या आठ प्रमुख बोलभाषांपैकी तागालोग नावाच्या बोलभाषेवर पिलिपिनो ही भाषा आधारलेली असून ‘तागालोग’ असाही तिचा उल्लेख केला जातो. मलायो- पॉलिनीशियन भाषाकुटुंबातील ही एक भाषा. ती बोलणाऱ्यांचे प्रमाण ४४·४ टक्के (१९६०) इतके आहे[→ तागालोग (तागाल) भाषा]. 

प्रथम स्पेन आणि नंतर अमेरिका अशा दोन परकीय सत्तांच्या अंमलांखाली फिलिपीन्सला काही काळ रहावे लागल्यामुळे स्पॅनिश व इंग्रजी ह्या भाषांचा शिरकावही तेथे झाला. तथापि स्पॅनिश भाषिकांची संख्या अत्यल्पच-१३,३५,९४५ (१९७०) आहे. सु. ५० वर्षांच्या अमेरिकन सत्तेच्या अंमलानंतरही फिलिपीन्समधील इंग्रजी भाषिक १,६४,०९,१३३ (१९७०) एवढेच आहेत. 


फिलिपीन्समध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलभाषा सु. ७५ आहेत. स्पॅनिश सत्तेखाली येण्यापूर्वीचे फिलिपीन्सचे साहित्य तेथील विविध बोलभाषांत असून ते मौखिक परंपरेने जपण्यात आलेले आहे. ह्या लोकसाहित्यात १९ महाकाव्यांचा समावेश होतो. त्यांतील तीन महाकाव्ये लेखनिविष्ट झालेली असून त्यांचे इंग्रजीत अनुवाद झालेले आहेत. ईलोको, ईफूगाऊ आणि मानूव्हू ह्या बोलभाषांतील महाकाव्यांची नावे अनुक्रमे Lam-ang, Hudhud आणि Tuwaang अशी आहेत. ह्यांखेरीज कृषिगीते, नौकागीत आणि युद्धगीते ही फिलिपीन्सच्या लोकसाहित्यात आहे.

फ्रान्सीस्को बालाग्टास (१७८८-१८६२) हा पहिला श्रेष्ठ फिलिपीनो कवी. तागालोग भाषेत त्याने आपली काव्यरचना केली. फ्‍लोरांते ॲट लॉरा (१८३८) ह्या आपल्या दीर्घ कथात्मक काव्यरचनेत त्याने स्पॅनिश सत्तेचा निषेध केलेला आहे. स्पॅनिशमधील ‘कोर्रीदो’ नावाच्या बॅलड रचनाप्रकाराचा आदर्श, हे काव्य रचताना बालाग्टासच्या समोर होता असे दिसते.

होसे रिसाल (१८६१-९६) ह्या फिलिपीन्सच्या थोर देशभक्ताने Noli me tangere (१८८७, इं. शी. सोशल कॅन्सर) व El Filibusterismo (१८९१, इं. शी. द सब्‌व्हर्सिव्ह) अशा दोन उल्लेखनीय कादंबऱ्या लिहिल्या. जुलुमी स्पॅनिश सत्तेखाली भरडल्या जाणाऱ्या आपल्या देशबांधवांच्या दुःखाचे चित्रण त्याने ‘सोशल कॅन्सर’ मध्ये केले, तर ‘द सब्‌व्हर्सिव्ह’ मध्ये, ऱ्हासाला लागलेल्या सरंजामशाही समाजव्यवस्थेचे दर्शन घडवून शेतकऱ्यांच्या क्रांतीचे भाकित त्याने वर्तविले. त्याची काव्यरचनाही देशभक्तीच्या भावनेने भारलेली आहे. होसे पाल्मा ह्याचे Filipinas हे स्पॅनिश गीत आज फिलिपीन्सचे राष्ट्रगीत झालेले आहे. ‘लँड ऑफ द मॉर्निंग!’ (इं. भा.) अशा ओळीने ह्या गीताची सुरूवात होते. फेर्नांदो ग्वेर्रेरो (१८७३-१९२९), सेसीलीओ आपोस्तोल (१८७७-१९३८) हे उल्लेखनीय भावकवी. हेसूस बालमोरी (१८८६-१९४८) ह्याची कविता उपरोधप्रचुर आहे.

इंग्रजी साहित्यनिर्मिती फिलिपीन्समध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. होसे गार्सीआ व्हील्या हा विसाव्या शतकातील एक थोर फिलिपिनो कवी. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारी शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी त्याच्या कवितेत आढळते. देव आणि देश ह्यांच्यापासून दुरावल्याची उत्कट जाणीव हॅव कम , ॲम हीअर (१९४३) आणि व्हॉल्यूम टू (१९४९) ह्या दोन काव्यसंग्रहांतून प्रत्ययास येते. ‘कॉमा पोएम्स’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्हील्याच्या कविता व्हॉल्यूम टू ह्या काव्यसंग्रहात आढळतात. कवितेत स्वल्पविरामांची वैशिष्ट्यपूर्ण योजना करून तिच्यातील चिंतनगर्भ आशयाला एक वेगळे वजन व्हील्याने प्राप्त करून दिले आहे.

इंग्रजीतून लेखन करणाऱ्या अन्य उल्लेखनीय साहित्यिकांत एन्. व्ही. एम्. गॉनथालेथ, निक ह्‌वाकीन आणि ग्रेगोरिओ ब्रिलांतेस ह्यांचा समावेश होतो. द बांबू डान्सर्स (१९५९) ही गॉनथालेथ ह्याची कादंबरी, सेव्हन हिल्स अवे (१९४७), चिल्ड्रन ऑफ द ॲश-कव्हर्ड लोम (१९५४), आणि लुक स्ट्रेंजर, ऑन धिस आयलांड नाउ (१९६३) हे त्याचे कथासंग्रहही उल्लेखनीय आहेत. पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट ॲज फिलिपिनो ह्या निक ह्‌वाकीनच्या नाट्यकृतीवर स्पॅनिश संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. द वुमन हू हॅड टू नॅव्हल्स (१९६१) ही त्याची कादंबरी त्याच्या तीव्र कल्पनाशक्तीचा प्रत्यय देते. 

कुलकर्णी, अ. र.  

कला, क्रिडा :  फिलिपिनी कलाक्षेत्र मुख्यतः वास्तुकला, चित्रकला, नृत्यकला यांसारख्या दालनांत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसते. हे वैशिष्ट्य मुख्यतः स्थानिक कलापरंपरा स्पॅनिश आणि अमेरिकन प्रभावांखाली निर्माण झालेल्या आधुनिक कलांच्या प्रेरणा आणि समृद्ध असा लोककलांचा वारसा यांच्या संमिश्र संस्कारातून निर्माण झालेले आहे. 

स्पॅनिश लोकांनी सोळाव्या व सतराव्या शतकांत बरोक शैलीत बांधलेल्या चर्च-वास्तूंपैकी मानिला येथील सेंट ऑगस्टीनचे चर्च (१५९९-१६१४) हीच एक वास्तू दुसऱ्या महायुद्धाच्या तडाख्यातून वाचली. एकोणिसाव्या  शतकातील फिलिपिनी वास्तुकार फेलीपे रॉहास याने मानिला व सांतो दोमिंगो येथील अनेक चर्चवास्तू व घरे यांचे नव-गॉथिक (१८ व्या शतकातील पुनरूज्‍जीवित गॉथिक शैली) शैलीत पुनरूज्‍जीवन केले. एर्व्हास या स्पॅनिश वास्तुकाराने मानिलात बांधलेल्या अनेक सार्वजनिक व खाजगी वास्तूंवर बायझंटिन शैलीची छाप आढळते. मानिला येथील ‘माँटी  दी प्येदाद’ ही बँकेची वास्तू त्याची श्रेष्ठ निर्मिती समजली जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फिलिपीन्सवर अमेरिकेचा अंमल असताना सरकारतर्फे अनेक शाळा, सभागृहे, बाजारपेठा इ. सार्वजनिक वास्तू उभारण्यात आल्या. डॅन्येल बर्नम या अमेरिकन वास्तुकाराने मानिला येथील सरकारी कचेऱ्या बांधल्या. १९३० नंतर परंपरा व आधुनिकता यांचा मेळ घालून वास्तुरचनेत नवे प्रयोग करण्यात आले. पाब्‍लो आंतोन्योची मानिला येथील ‘कॅप्टन लुईस गॉन्झागा’ ही इमारत, देसार कॉन्सिओने बांधलेले फिलिपीन्स विद्यापीठातील प्रॉटेस्टंट चॅपेल इ. वास्तू त्याच्या निदर्शक होत.


दाम्यान दोमींगो या चित्रकाराच्या प्रयत्‍नांमुळे १८१५ ते २० च्या दरम्यान ललित कलांचे शिक्षण देणारी पहिली संस्था मानिलामध्ये स्थापन झाली. १९०६ मध्ये तिचे फिलिपीन्स विद्यापीठामध्ये विलीनीकरण करण्यात आले. या संस्थेने येथील चित्रकार घडविण्यास मोठाच हातभार लावला. आधुनिक फिलिपिनी चित्रकलेवर यूरोपीय कलासंप्रदायांचे प्रतिबिंब पडलेले आढळते. स्वच्छंदतावादी व दृक्‌प्रत्ययवादी या दोन्ही शैली हाताळणारे ह्‌वान लूना व फेलीक्स इदाल्गो हे स्पॅनिश राजवटीतील प्रसिद्ध चित्रकार होत. दृक्‌प्रत्ययवादी शैलीत चित्रे काढणारा फेर्नांदो आमोरोसोलो हा विसाव्या शतकातील प्रसिद्ध चित्रकार. १९३० मध्ये व्हीक्‍तॉर्यो एदादेस या चित्रकाराने अप्रतिरूप अभिव्यक्तीवादी शैली प्रथम हाताळली. गालो ओकाम्पो, कार्लोस फ्रांथेस्को हे अन्य आधुनिक चित्रकार उल्लेखनीय आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर नववास्तववादी प्रणालीच्या चित्रकारसंघाने चित्रकलेत नवीन प्रयोग करण्यास सुरूवात केली. अनिता माग्‌सायसाय-हो, एमील्यो लोपेथ, व्हिन्सेंट मानान्साला इ. फिलिपिनी चित्रकारांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. 

मानिलाच्या परिसरात आंद्रेस बोनिफाचो या लोकनेत्याचे स्मारकशिल्प उभारणारा गील्येर्मो टोलेंटीनो हा फिलिपिनी मूर्तीकलेचा जनक समजला जातो. नेपोलियन आब्यूव्हासारखे आधुनिक प्रयोगशील मूर्तीकार प्रसिद्ध आहेत. 

येथील लोकांना नृत्याचे उपजतच वेड आहे. लोकनृत्ये संथ लयीची व विशेष कौशल्यपूर्ण असतात. उदा., ‘फँडँगो सा इलॉ’ हे डोक्यावर व हातात तेलाचे दिवे घेऊन करावयाचे नृत्य. ‘टिन्‌क्लिंग’ (उड्या मारणारे पक्षी) हे लोकनृत्य अत्यंत लोकप्रिय आहे. देशात अनेक फिरत्या नृत्यसंस्था आहेत. त्या लोकनृत्यांवर आधारित आधुनिक नृत्ये सादर करतात. त्यांच्या नृत्यांतून नृत्यालेखनाचे विविध प्रकार व नर्तकांच्या सुंदर वेशभूषा ही वैशिष्ट्ये आढळतात. मानिलामधील महिला विद्यापीठाची ‘बायानिहान’ ही नृत्यसंस्था विशेष प्रसिद्ध आहे. नृत्यसंगीतासाठी वापरण्यात येणाऱ्या वाद्यांत एका तारेच्या ‘बँजो दी उनास ’ पासून चौदा तारांच्या ‘बँदूरीआ’ पर्यंत अनेक वाद्यांचा समावेश असतो. नृत्यसंगीत लोकगीतांवर आधारित असते. या प्रकारात होसे एस्टेला या नृत्यसंगीतकाराने जवळजवळ ३,००० रचना तयार केल्या आहेत.

बांबूचे ज्यूज हार्प, नाकाने वाजविण्याच्या बासऱ्या ही वाद्ये लोकप्रिय आहेत. गिटार, व्हायोलिन, बँजो, कोंबो ही आधुनिक यूरोपीय वाद्येही वापरण्यात येतात. अमेरिकन ‘पॉप ’ संगीत व चित्रपट येथे विशेष लोकप्रिय आहेत.

‘मोरो मोरो’ व ‘झॉरझ्वेल’ या प्रकारांतील लोकनाट्ये ग्रामीण भागात विशेष रूढ आहेत. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस आउरेल्यो टोलेंटीनोसारख्या नाटककारांनी झॉरझ्वेलसारख्या लोकनाट्यांचा उपयोग अमेरिकेच्या विरोधी प्रचारासाठी केला. ‘फिलिपीन एज्युकेशनल थिएटर असोसिएशन’ ही संस्था दूरचित्रवाणी, नभोवाणी व रंगमंच यांवरील नाट्यप्रयोग आयोजित करते.

कोंबड्याची झुंज हा रंजनप्रकार व बास्केटबॉल हा खेळ सर्वात लोकप्रिय आहेत. मोठ्या शहरांमध्ये गोल्फची मैदाने आढळतात. ‘फिलिपीन अमॅच्युअर ॲथ्‌लेटिक असोसिएशन’तर्फे अनेक फिलिपिनी खेळाडू आशियाई व ऑलिंपिक क्रीडासामन्यांत भाग घेत असतात.

जगताप, नंदा 

प्रेक्षणीय स्थळे : मानिला हे इतिहासप्रसिद्ध व देशाच्या राजधानीचे शहर, तसेच पहिल्या क्रमांकाचे बंदर आहे. लोकसंख्या १४,७९,११६ (१९७५). यास ‘पूर्वेकडील रत्‍न’ (पर्ल ऑफ द ओरिएंट) असे म्हणतात. येथील रिसाल उद्यान, राष्ट्रीय ग्रंथालय, पुरातत्वीय व मानवशास्त्रीय राष्ट्रीय संग्रहालय विख्यात आहे. केसॉन सिटी (९,५६,८६४) हे मानिलाचे उपनगर व देशाची जुनी राजधानी (१९४८-७२) होय. फिलिपीन्स विद्यापीठ येथेच आहे. सेबू (४,१३,०२५) हे फिलिपीन्समधील इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर. १५६५ मध्ये स्पॅनिशांनी पहिली वसाहत येथेच स्थापन केली. या शहरात उच्च शिक्षणसंस्था आहेत. डाव्हाऊ (४,८४,६७८) हे व्यापारदृष्ट्या महत्त्व असलेले बंदर व शहर. याच्या जवळच आपो हे देशातील सर्वोच्च शिखर (२,९५४ मी.) असल्याने अनेक पर्यटक येथे येतात. यांशिवाय सांबोआंगा, ईलोईलो, कालोओकान, बाकोलोद, पानाय ही देशातील अन्य काही प्रसिद्ध शहरे होत. आग्‍नेय आशियातील या देशाची वैशिष्ट्यपूर्ण कलापरंपरा हे पर्यटकांचे मोठेच आकर्षण आहे. १९७७ मध्ये ७,३०,००० पर्यटकांनी देशास भेट दिली.

फडके, वि. शं. भागवत, अ. वि. गाडे, ना. स. 

संदर्भ : 1. Burley, T. M. The Philippines : An Economic and Social Geography, London, 1973.

   2. Corpuz O. D. The Philippines, New York, 1965.

   3. Kuhn, Delia and Kuhn, Ferdinand, The Philippines : Yesterday and Today, New York, 1966.

   4. Taylor, George, The Philippines and The United States, New York, 1963.


फिलिपीन्स

फिलिपीन्स मधील पारंपरिक घरेडाव्हाऊ बंदराचे दृश्य, फिलीपीन्सटाआल ज्वालामुखी, फिलिपीन्सविधिमंडळाची इमारत, मानिला, फिलिपीन्सटिन् क्लिंग : प्रसिद्ध फिलिपीनी लोकनृत्य