आंबेजोगाई : मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. लोकसंख्या २७,७७२ (१९७१) . निजामी अमलातील नाव ‘मोमिनाबाद’. अंबाजोगाई अथवा योगेश्वरी हे प्राचीन व इतिहासप्रसिद्ध स्थान बालाघाट डोंगराच्या दक्षिणेस, घोडदरीत जयंती नदीवर वसले आहे. येथील हवा कोरडी व समशीतोष्ण आहे. येथील सर्वांत जुना उपलब्ध शिलालेख १२४० मधील सिंघण यादवाच्या कारकीर्दीतला आहे. यादववंशीय जैत्रपाळ राजाची गढी (सध्याचा शहाबुर्झ) सु. ७०० वर्षोपूर्वीची आहे. यादवकालात या नगरीची विशेष भरभराट झाली. चक्रधाराच्या तिर्थयात्रेत ज्या‘खोलानायकाचे आंबिया’ चा उल्लेख आहे, त्या सिंघण यादवाच्या सेनापती खोलेश्वराचा शिलालेख येथील चोभाऱ्याच्या गणेश मंदिरात आहे. ज्ञानेश्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचे नमूद आहे. सोळाव्या शतकात दासोपंतांनी व सतराव्या शतकात कृष्णदयार्णवांनी येथे ग्रंथनिर्मिती केली. समर्थ रामदासांनी या तीर्थाची यात्रा केली होती. यादवांनंतर वेगवेगळ्या इस्लामी अमलाखाली असलेल्या याच ठिकाणी विसाव्या शतकात स्वामी रामानंद तीर्थांनी निजामशाहीविरूध्द स्वातंत्र्यसंग्रामाची मुहूर्तमेढ प्रथम रोवली. आजचे आंबेजोगाई शहर नदीच्या पूर्व-पश्चिम तीरांवर वसले असून त्यात शासकीय कार्यालये व शिक्षणसंस्था यांखेरीज योगेश्वरीचे मंदिर, दासोपंतांचे देवघर, खोलेश्वर, अमलेश्वर, चोभारा गणेश इ. देवळे व गावाबाहेरची लेणी ही प्रक्षणीय आहेत. राज्यपरिवहन महामंडळाच्या बसमार्गांनी चारी दिशांकडून आंबेजोगाईस जाता येते. येथे १९७५ साली निघणारे वैद्यकीय महाविद्यालय व परिसरातील साखर कारखाना यांमुळे शहराचे महत्त्व वाढत आहे.

ओक, शा. नि.