पा र्मा : उत्तर इटलीच्या एमील्या-रॉमान्या विभागातील पार्मा प्रांताच्या राजधानीचे शहर. ते पो नदीच्या पार्मानामक उपनदींवर असून बोलोन्याच्या वायव्येस ८८ किमी. आहे. लोकसंख्या १,७७,८९४ (१९७६).

रोमनांनी ख्रिस्तपूर्व १८३ च्या सुमारास येथे वसाहत केली. रोमन सत्तेच्या अवनत काळात येथे बर्बर टोळ्यांचे वारंवार हल्ले होत. पोपसत्ता व पवित्र   साम्राज्य यांच्यातील संघर्षाचाही त्यावर अधिकच परिणाम झाला. चौदाव्या-पंधराव्या शतकांत त्यावर अनेक परकीय सत्तांचा, फेरारा, मिलान येथील सरदारांचा तसेच फ्रेंचांचाही ताबा होता. १५४५ मध्ये तिसऱ्या पोप पॉलने आपल्या प्येर लूईजी फार्नेसे या मुलासाठी पार्मा व पिआसेंझा यांचे एक ड्यूकराज्य बनविले. फार्नेसेच्या अंमलाखाली पार्माची प्रशासन, व्यापार, कलाकेंद्र इ. अनेक अंगांनी भरभराट झाली. १७३१ मध्ये ही ड्यूकसत्ता स्पॅनिश बूरवाँ कडे गेली. पार्मा फ्रेंचाच्या आधिपत्याखाली असताना (१८०२ – १४) व्हिएन्ना काँग्रेसच्या आदेशानुसार (१८१५) पार्मा, पिआसेंझा व ग्वास्टाल्ला ही मेरी लूईझ ह्या नेपोलियनच्या दुसऱ्या पत्नीस बहाल करण्यात आली. तिच्या मृत्यूनंतर (१८४७) पार्मा पुन्हा बूरबाँकडे गेले. १८६० मध्ये ते इटलीचा एक भाग बनले.

अनेक भव्य ऐतिहासिक स्मारके व वास्तू यांसाठी पार्मा प्रसिद्ध आहे. त्यांमध्ये बाराव्या शतकातील रोमनेस्क कॅथीड्रल, तेराव्या शतकातील अष्टकोनी रोमनेस्क-गॉथिक बाप्तिस्मागृह आणि सान जोव्हान्नी इव्हँजेलिस्टा चर्च (१५१०) यांचा समावेश होता. मॅडोना देला स्टेकाटा या चर्चमधील (सोळावे शतक) पार्मिजानीनोची अनेक उत्कृष्ट भित्तिलेपचित्रे उल्लेखनीय आहेत. कॅथीड्रल आणि सान जोव्हान्नीचे चर्च यांचे घुमट प्रख्यात चित्रकार कोररेद जो याच्या अनुक्रमे ‘ॲसम्प्श  ’ व ‘ॲसेन्शन’ ह्या कलाकृतींनी विभूषित आहेत. फार्नेसेच्या सरदारांनी बांधण्यास प्रारंभ केलेल्या ‘पिलोटा’ या अपूर्ण राजवाड्यातील राष्ट्रीय पुरावशेष संग्रहालय, पॅलटाइन ग्रंथालय आणि फार्नेसेचा शाही रंगमंच ह्या वास्तू प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या महायुद्धात त्यांचे अतोनात नुकसान झाले. १५०२ मध्ये स्थापन झालेले पार्मा विद्यापीठही पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे. त्यामध्ये विधी, वैद्यक व शल्यक्रिया, औषधनिर्मिती, विज्ञाने, पशुविकारविज्ञान इत्यादींच्या शाखा आहेत. एल्येन काँदीयाक (१७१५ – ८०) हा प्रबोधनकालीन तत्त्ववेत्ता आणि कर्लो इनोसेंझो फिनगोनी (१६९२ – १७६८) हा प्रसिद्ध इटालियन कवी या विद्यापीठाकडे आकृष्ट झाले होते. प्रसिद्ध वाद्यवृंद संचालक आर्तूरो तोस्कानीनी (१८६७ – १९५७), वास्तुशिल्पी व मूर्तिकार बेनेदेत्तो आंतेलामी (सु. ११५० – १२३०), कोररेद‌्जो (१४९४ – १५३४), पार्मिजानीनो (१५०३ – ४०) या सर्वांचे पार्मा हे स्थान जन्मभूमी व कर्मभूमीही होय. प्रसिद्ध मुद्रक जांबात्तीत्ता  बोदोनी (१७४० – १८१३) याचे कार्य व अखेर येथेच झाली.

पार्मा हे मिलान-बोलोन्या या प्रमुख लोहमार्ग व हमरस्ता ह्यांवरील महत्त्वाचे स्थानक आहे. पार्माची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिकच आहे. येथील चीज जगप्रसिद्ध असून शहरात यंत्रसामग्री, औषधे, खते, रसायने, पादत्राणे, अल्कोहॉल इत्यादींचे कारखाने आहेत.

गद्रे, वि.रा.