वर्धा जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील एक जिल्हा. २० १८’ उ. ते २१ २१’ उ. अक्षांश व ७८ ३०’ पू. ते  ७९ १५’ पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६,३१० चौ. किमी. म्हणजे राज्याच्या २% असून जिल्ह्याची लोकसंख्या १०,६५,५८९ (१९९१) होती. आकाराने सामान्यपणे त्रिकोणी असलेला हा जिल्हा दक्षिणेस व नैर्ऋत्येस यवतमाळ, पश्चिमेस अमरावती, उत्तरेस व ईशान्येस नागपूर आणि पूर्वेस व आग्‍नेयीस चंद्रपूर या जिल्ह्यांनी वेढलेला आहे. राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्या व क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यांत याचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. ऐतिहासिक घटनांविषयी जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, वर्धा, समुद्रपूर, सेलू व हिंगणघाट या आठ तालुक्यांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली असून वर्धा शहर (लोक. ८८,४९५ – १९८१) हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे आहे.

भूवर्णन : वर्धा जिल्ह्याचा बहुतांश भूप्रदेश म्हणजे नागपूर पठाराचा पश्चिम भाग आहे. जिल्ह्याची उत्तर, पश्चिम व नैर्ऋत्य सरहद्द वर्धा नदीने बनलेली असून वर्धा व वेणा (वुन्ना) या प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांनी जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग व्यापला आहे. हा भाग वगळता इतर बराचसा प्रदेश डोंगराळ व टेकड्यांचा आहे. त्यामुळे भूरचनेच्या दृष्टीने जिल्ह्याचे (१) डोंगराळ व टेकड्यांचा उंच प्रदेश व (२) नदीखोऱ्यांचा कमी उंचीचा मैदानी प्रदेश, असे भाग केले जातात. पहिला भौगोलिक विभाग सातपुडा पर्वरांगेच्या दक्षिणेकडील सोंडेने बनलेला असून त्यात उत्तर भागातील डोंगराळ प्रदेशाचा समावेश होतो. त्याने आष्टी, कारंजा व आर्वी तालुक्यांचा बराचसा भाग व्यापला आहे. जिल्ह्याच्या उत्तर व ईशान्य सरहद्दींवर रावणदेव-गरमसूर या टेकड्या पसरलेल्या असून त्यांच्या दक्षिणेकडील उतारावर मालेगाव, नांदगाव व ब्राह्मणगाव (ब्राह्मणवाडा) टेकड्या आहेत. सर्वसामान्यपणे बहुतेक टेकड्या मैदानी भागापेक्षा १२२ मी.हून जास्त उंचीच्या नाहीत. गरमसूर हे जिल्ह्यातील सर्वांत उंच (सस. पासून ६०२ मी.) शिखर असून त्याखालोखाल नांदगाव (५३६ मी.), मालेगाव (४९२ मी.) ही अन्य महत्त्वाची शिखरे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर भागातील या टेकड्यांशिवाय मैदानी भागात मध्यभागी तीगाव, हनुमान, तर पश्चिमेकडे बहिरम व आग्‍नेयीकडे हरणखुरी आणि गिरड या इतर कमी उंचीच्या टेकड्या आहेत. दुसऱ्या भौगोलिक विभागात ⇨वर्धा व  वेणा या नद्यांच्या खोऱ्यांचा समावेश होतो. याने वर्धा तालुक्याचा दक्षिण भाग तसेच सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी या तालुक्यांचा प्रदेश व्यापला आहे. हा प्रदेश सामान्यपणे सस.पासून २०० ते ३९० मी. उंचीचा असून तुटक-तुटक पठारांनी व मैदानांनी तसेच लहान नदीखोऱ्यांनी बनलेला आहे. कारंजा व आष्टी तालुक्यांचा दक्षिण भाग तळेगाव-कारंजा-कोंढाळी पठार या स्थानिक नावांनी ओळखला जातो. जिल्ह्याच्या मध्यभागातील टेकड्यांच्या दोन्ही बाजूंचा (पश्चिमेस वर्धा नदीपर्यंत व पूर्वेस डोंगररांगांपर्यंत) कमी उंचीचा सपाट प्रदेश ‘आर्वी मैदान’ म्हणून ओळखतात.

संपूर्ण वर्धा जिल्हा दक्षिण ट्रॅप क्षेत्रात विस्तारलेला असून या भागात लाव्हा वाहांची जाडी सु. ४०० मी. आहे. या वाहांमध्ये आढळणारे गाळाचे थर आणि लाल प्रस्तंभ यांमुळे प्रत्येक वाह एक दुसऱ्यापासून अलग ओळखता येतो. अलीकडील अवसाद हे मुख्यत्वे वर्धा, वेणा, यशोदा, धाम व पोथरा या नद्यांच्या काठांवर अरुंद पट्ट्यांत आढळतात. यांमध्ये मुख्यतः चाळ, वाळू, माती व रेव यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील मृदा मुख्यतः काळी कपाशीची आहे. मृदेचे काळी-१, काळी-२, मुरमाळ आणि खारडी व बरडी असे येथे प्रमुख स्थानिक प्रकार मानले जात असून उथळ, मध्यम व खोल असे त्यांचे उपप्रकार आहेत. समुद्रपूर तालुक्याचा पूर्वभाग, सेलू तालुक्याचा उत्तर किनारा आणि कारंजा व आष्टी तालुक्यांत उथळ प्रकारची, तर हिंगणघाट व आर्वी तालुक्यांच्या पश्चिमेकडील काही भागात मध्यम प्रकारची जमीन आढळते. वर्धा व वेणा नद्यांच्या काठांवर सर्वत्र गाळ व काळ्या जमिनीचे थर आढळून येतात.

जमिनीच्या उतारानुसार येथील नद्या सामान्यपणे दक्षिणवाहिनी असून लांबीने कमी आहेत. त्यामुळे दक्षिणेकडील सपाट प्रदेशात प्रवाहांचे जाळे पसरलेले आहे. वर्धा ही जिल्ह्यातील एकमेव मोठी व प्रमुख नदी असून ती या जिल्ह्याच्या उत्तर, पश्चिम व दक्षिण सीमांवरून वाहते. यशोदा, वेणा, बांकळी (वाकळी) या तिच्या मुख्य उपनद्या आहेत [ ⟶ वर्धा नदी ]. वेणा नदी जिल्ह्याच्या पूर्व भागातून उत्तर-दक्षिण दिशेने वाहते. हिचा उगम नागपूर जिल्ह्यात महादागड टेकड्यांत असून सिंदी रेल्वे स्थानकाच्या आग्‍नेयीस सु. ३ किमी.वर ती वर्धा जिल्ह्यात प्रवेश करते. खालच्या टप्प्यात ती चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाते. पोथरा ही वेणा नदीची डावीकडून मिळणारी सर्वांत मोठी उपनदी असून ती गिरड टेकड्यांत उगम पावते. या नदीने हिंगणघाट तालुक्याच्या पूर्व भागाचे जलवाहन केलेले आहे. तिच्यामुळे जिल्ह्याची आग्‍नेय सरहद्द बनली असून हिंगणघाट तालुक्यातील सेकापूर गावाच्या ईशान्येस ४ किमी.वर ती वेणा नदीस मिळते. या नदीवर समुद्रपूर तालुक्यातील झुनका गावाजवळ १९८२ मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले आहे. बोर ही वेणा नदीची उजवीकडून मिळणारी उपनदी नागपूर जिल्ह्यात उगम पावून समुद्रपूर तालुक्यातील मांडगावजवळ वेणा नदीस मिळते. वर्धा तालुक्यातील बोर गावाजवळ या नदीवर १९६९ मध्ये मातीचे धरण बांधण्यात आलेले आहे. धाम ही तिची मुख्य उपनदी आहे. धाम नदीवर आर्वी तालुक्यातील महाकाली गावाजवळ धाम प्रकल्पाचे काम चालू आहे. पंचधारा ही धाम नदीची उपनदी आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या नद्यांपैकी यशोदा व वाकळी या प्रमुख असून त्या वर्धेच्या उपनद्या आहेत. यशोदा ही हिंगणघाट तालुक्यातील निमसडा गावाजवळ, तर वाकळी ही आर्वी तालुक्यातील पारगोठाण रेल्वेस्थानकाजवळ वर्धा नदीस मिळते. तीगाव टेकड्यांत उगम पावणारी भदाडी ही यशोदा नदीची उपनदी आहे. जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून आग्‍नेय-वायव्य दिशेने वाहणारी कार ही वर्धेची उपनदी असून ती कोंढाळी पठारावर उगम पावते. ही नदी वर्धा व नागपूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील अरुंद व खडकाळ दरीतून वाहत जाऊन वर्धा नदी येथे जिल्ह्यात प्रवेश करते तेथे तिला मिळते. या नद्यांशिवाय जिल्ह्यात बोर धरण, केळझर तलाव, नाचणगावचा देव तलाव, आर्वीचा सांगपूर तलाव, पोथरा जलाशय, आष्टीचा कपिलेश्वर तलाव इ. एकूण १०४ तलाव आहेत.


हवामान : मोसमी वाऱ्यांचा काळ वगळता (पावसाळा) जिल्ह्याचे बव्हंशी कोरडे (शुष्क) व उन्हाळ्यात अती उष्ण असते. हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. एकाच दिवशी तापमानात बराच चढ-उतार होण्याचे प्रसंग वर्षभरात अनेक वेळा घडतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील तफावत जास्त असते. या काळात दिवस अती उष्ण, तर त्यामानाने रात्री जलद थंड होतात. ऐन उन्हाच्या वेळी येणाऱ्या सौम्य झुळुकांमुळे अथवा मेघगर्जनेसह क्वचित पडणाऱ्या पर्जन्यामुळे उन्हाळा थोडा सुसह्य होतो. मे हा अती उष्णतेचा, तर जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. मे महिन्यातील दैनिक कमाल तापमान ४३ से., तर किमान २७ से. असते. कधीकधी दिवसाचे तापमान ४७ से.पर्यंतही जाते तर हिवाळ्यात (डिसेंबर) दैनंदिन सरासरी तापमान स्थलपरत्वे १३ ते २९ से.पर्यंत असते. काही वेळा ते रात्रीचे ५ से.पर्यंत खाली येते. जिल्ह्यात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी. असून उंचीनुसार पावसाच्या प्रमाणात ९० ते १४० सेंमी.पर्यंत फरक दिसून येतो.

वनस्पती व प्राणी: वर्धा जिल्ह्यात फार मोठी जंगले अथवा वनस्पतींचे वैविध्य नाही. गोंडवन वनस्पती प्रणालीतील काही विशिष्ट वनस्पतींच्या जाती येथे आढळतात. जिल्ह्यात एकूण वनक्षेत्र सु. ८७५ चौ. किमी. असून जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते सु. १४% आहे. मुख्यत्वे आर्वी, कारंजा, आष्टी, समुद्रपूर व सेलू या तालुक्यांत वनांचा विस्तार दिसून येतो. हिंगणघाट तालुक्यात तुरळक वनक्षेत्र आहे. जिल्ह्यातील एकूण वनव्याप्त प्रदेशापैकी ६०% राखीव, ३७% असंरक्षित व ३% अवर्गीकृत वनक्षेत्र आहे. आर्वी व हिंगणी परिसरात उत्तम दर्जाच्या सागवानाची वने आढळतात. येथील जंगलात धावडा, सालई, तेंदू, मोवई या वनस्पतींचे प्रमाण जास्त असून त्यांशिवाय ऐन, वेल, कळंब, पळस, मोह, बेहडा इ. वनस्पतींबरोबरच कुरूड, घोनळ, मुशाम, मारवेल, शेळा (शेंडा) इ. प्रकारचे गवतही आढळते. येथील वनोत्पादनांमध्ये मुख्यत्वे साग, इमारती व जळाऊ लाकूड, बांबू, गवत, बिडी पत्ता, डिंक इत्यादींचा समावेश असतो. वनांच्या वाढीसाठी जिल्ह्यात अनेक वनविकास योजना राबविल्या जात आहेत.

आकाराने लहान, विरळ व विखुरलेल्या वनक्षेत्रांमुळे येथे पशु पक्ष्यांचे वैविध्य नाही. नीलगाय, काळवीट, चौशिंगा, सांबर, चितळ, बिबळ्या, वाघ, अस्वल इ. मोठ्या प्राण्यांशिवाय ससा, तरस, लांडगा, रानडुक्कर, चिंकारा, भेकर इ. प्राणी आढळतात. बदके, इग्रेट, बक हे पाणपक्षी तसेच रानकोंबडे, तितर, कबुतरे, होले इ. पक्षी तुरळक दिसून येतात.

चौंडे, मा. ल.

इतिहास : या प्रदेशातील इ. स. पू. १००० पूर्वीच्या वसतीविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. वर्धा शहराच्या ईशान्येस आठ किमी. वर पवनार येथे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्‍त्‍वीय विभागाने १९६७ मध्ये उत्खनन केले. त्यात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे काही अवशेष मिळाले. त्यांवरून येथील लोक दगडाच्या हत्यारांबरोबरच काही प्रमाणात तांब्याची हत्यारे वापरीत असावेत आणि त्यांची वस्ती प्रामुख्याने नदीकाठी लहान खेड्यांतून होती. ते पशुपालन, शिकार व कृषीच्या प्राथमिक अवस्थेत असावेत. हे लोक उत्तरेकडून आलेल्या आर्य टोळ्यांपैकी असावेत, असा काही विद्वानांचा कयास आहे.

सम्राट अशोक याच्या प्रस्तर लेखावरून हा प्रदेश मौर्य साम्राज्यात होता (कार. इ. स. पू. २७३-२३२). त्यानंतर शुंग काळात (इ. स. पू. १८७ – ७२) पुष्यमित्र शुंगाचा मुलगा अग्‍निमित्र याने वरदा (वर्धा) नदीच्या दोन्ही बाजू स्वतंत्र करून विदर्भाचे विभाजन केले आणि हा प्रदेश पूर्व विदर्भात अंतर्भूत करण्यात आला. शुंगांनंतर सातवाहनांची सत्ता होती. त्यावेळी शक-क्षत्रपांनी त्यावर स्वारी करून काही प्रदेश मिळविला. पवनी (पवनार) येथे अलीकडे सापडलेल्या स्तंभलेखनावरून सर्व विदर्भ रूपिअम्मा (भंडारा जिल्हा) या क्षत्रपाच्या आधिपत्याखाली आला. त्यावेळी गौतमीपुत्र सातकर्णी (कार. इ. स. ६२-६८) याने क्षत्रपांचा पराभव करून पुन्हा विदर्भावर सत्ता मिळविली. इ. स. २५० च्या सुमारास वाकाटकांनी सातवाहनांकडून सत्ता घेतली. वाकाटक घराण्याच्या (इ. स. २७०-५२५) अंमलाखाली हा भूप्रदेश सु. २५५ वर्षे होता. पहिला प्रवरसेन (कार. २७०- ३३०) याच्या मृत्यूनंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे विभाजन होऊन चार शाखा झाल्या. त्यांपैकी ज्येष्ठ शाखेची राजधानी नागपूरजवळील नंदिवर्धन येथून वर्धा जिल्ह्यातील प्रवरपूर (पवनार) येथे हलविण्यात आली. प्रभावती-गुप्ताचे दोन ताम्रपट उपलब्ध असून त्यांपैकी एक वर्धा जिल्ह्यातील आहे. त्यात विद्यमान हिंगणघाट तालुक्यातील डंगुण खेड्यातील एका ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख आहे. यात चतुःसीमांचा उल्लेख असून वर्धा जिल्ह्यातील आसपासच्या अनेक विद्यमान गावांचे संदर्भ मिळतात.

दुसऱ्या प्रवरसेनानेच प्रवरपूरची (पवनारची) स्थापना केली आणि तेथे प्रभावती-गुप्तासाठी रामचंद्राचे भव्य मंदिर बांधले. या मंदिराच्या सुशोभनासाठी खोदलेल्या शिल्पांचे काही नमुने धाम नदीकाठी केलेल्या संशोधन-उत्खननांत सापडले आहेत. प्रवरसेनानंतर त्याचा मुलगा नरेंद्रसेन प्रवरपूरच्या गादीवर आला. त्याच्या वेळी भवदत्तवर्मन या नल वंशातील राजाने विदर्भ पादाक्रांत केला तथापि नल राजांना या प्रदेशात फारसे स्थैर्य लाभले नाही. यानंतर या प्रदेशावर बादामीचे चालुक्य, त्यांचे मांडलिक राष्ट्रकूट आणि यादव यांचे आधिपत्य होते. यादवांनी विदर्भात अनेक मंदिरे बांधली आणि विद्वानांना आश्रय दिला. त्यांच्या कोरीव लेखांतून यासंबंधी माहिती मिळते. बोपदेव हा या काळातील प्रसिद्ध संस्कृत पंडित. तो वर्धा नदीच्या काठी असलेल्या सार्थ किंवा वेदपद या गावचा मूळ रहिवासी असावा. [⟶ यादव घराणे].

यादव काळाच्या अखेरीस महाराष्ट्रावर उत्तरेकडून मुसलमानांची आक्रमणे झाली. कुत्बुद्दीन मुबारक शाह याने हरपालदेवला ठार मारून यादव साम्राज्य नष्ट केले (१३१८). तत्पूर्वीच या जिल्ह्यात वर्ध्याच्या पश्चिमेस शिरपूर या ठिकाणी गोंड राज्य स्थापन झाले होते (१२५०). हे चंद्रपूरचे गोंड राज्य सर्वांत भरभराटीस आले. गोंडसत्तेच्या अंमलाखाली हा प्रदेश असताना काही काळ मोगलांनी पवनार हे स्थान आपल्या विदर्भातील हालचालींचे लष्करी ठाणे केले होते. नागपूरकर भोसल्यांच्या वेळी या घराण्यातील रूपाजी व त्याचा पुतण्या परसोजी यांनी प्रारंभी छत्रपती राजाराम (कार. १६८९-१७००) यास हरप्रकारे मदत करून गोंडवन व वऱ्हाड प्रांतात अंमल बसविला. मोगलांच्या ऱ्हासानंतर वर्धा जिल्ह्याचा बराच भाग पुन्हा गोंड राजाकडे आला आणि आष्टी व आसपासचा प्रदेश निजामाच्या अखत्यारीत गेला. पहिला रघूजी भोसले (कार. १७३१-५५) याने गोंडवन राज्य खालसा करून गाविलगढ, नरनाळा व माणिकदुर्ग हे महत्‍त्वाचे किल्ले काबीज केले. पुढे पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) नागपूर संस्थानात ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट राहू लागला आणि त्यानंतर संस्थानात गादीसाठी अंतर्गत कलह झाला आणि इंग्रजांनी १८५४ मध्ये दत्तक वारसा नामंजूर करून नागपूर संस्थान खालसा केले. नागपूर राज्य इंग्रजांनी घेतल्यावर नागपूर जिल्ह्यातील हिंगणघाट, वर्धा व आर्वी हे तालुके बाजूला काढून १८६२ साली वर्धा या स्वतंत्र जिल्ह्याची स्थापना केली. सुरुवातीस पुलगाव येथे जिल्हा मुख्यालय होते पुढे ते पालकवाडी (वर्धा शहर) येथे हलविण्यात आले (१८६६) आणि वर्धा नदीवरून त्यास वर्धा जिल्हा हे नाव प्राप्त झाले. स्वातंत्र्यापर्यंत (१९४७) वर्धा जिल्हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता. १९५६ च्या राज्यपुनर्रचनेनंतर हा जिल्हा मध्य प्रदेश राज्यातून मुंबई राज्यात व पुढे १ मे १९६० रोजी नवनिर्मित महाराष्ट्र राज्यात अंतर्भूत झाला. [⟶ विदर्भ].

देशपांडे, सु. र.


आर्थिक स्थिती : जिल्ह्यातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील एकूण ६,२९,००० हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी लागवडीलायक क्षेत्र ७४%, कायम गावरान व इतर चराऊ जमीन यांखालील क्षेत्र ७%, शेतीला उपलब्ध नसलेले क्षेत्र ७% व जंगलाखालील क्षेत्र १२% होते (१९८८-८९). बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेण्यात येतात. कापूस, ज्वारी, मूग, तूर, जवस, तीळ, भुईमूग, ऊस, हळद, गहू, हरभरा, वाटाणा, मिरची ही पिके होतात. १९९०-९१ मध्ये तृणधान्याचे एकूण उत्पादन १.०२ लाख मे. टन, भुईमूग शेंग उत्पादन १८,१०० मे. टन, एकूण कडधान्ये उत्पादन ४६,२०० मे. टन आणि कापसाचे उत्पादन (सरकीविरहित गाठी) १,८१,३०० मे. टन झाले. मुख्य पीक ज्वारीचे असते. संकरित व जादा उत्पादन देणाऱ्या पिकांमध्ये प्रामुख्याने ज्वारी, तूर, गहू, कापूस, भुईमूग या पिकांचा समावेश होतो. संत्र्याचे पीक मुख्यतः कारंजा व आर्वी तालुक्यांत, तर केळीचे उत्पादन सेलू तालुक्यात घेतले जाते.

जिल्ह्यात ओलिताखालील निव्वळ क्षेत्र २३,३१५ हे. असून त्यापैकी विहिरींद्वारे ७९% व कालव्यांद्वारे आणि इतर साधनांद्वारे २१% सिंचन करण्यात येत होते (१९८८-८९). कृषिविकास साधण्यासाठी सिंचनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात विहिरी, लहान पाटबंधारे, मध्यम प्रकल्प, उपसा सिंचन योजना आणि नदीनाल्यांवर पंप बसवून सिंचन व्यवस्था विकसित केली जात आहे. त्या दृष्टीने काही प्रकल्पांची कामे चालू आहेत. लोअर वेणा प्रकल्पाद्वारे सु. १४,००० हे., अपर वर्धा प्रकल्पाद्वारे सु. १६,५०० हेक्टर व लोअर वर्धा प्रकल्पाद्वारे ४४,००० हे. असे एकूण ७४,५०० हे. क्षेत्र सिंचनाखाली येईल. जिल्ह्यातील बोर, धाम, डोंगरगाव, पंचधारा हे मध्यम प्रकल्प पूर्ण झाले असून पोथरा प्रकल्प प्रगतावस्थेत आहे. मदना प्रकल्पाचे काम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. नागपूर सरहद्दीजवळील कार व सिरसी  आणि चंद्रपूरकडील लाल नाला या मध्यम प्रकल्पांमुळेही जिल्ह्याचा काही भाग सिंचनाखाली येईल. सुकळी आणि यशोदा या मध्यम प्रकल्पांच्या उभारणीची योजना आहे. जिल्ह्यात राज्यस्तरावरील १८ लघुप्रकल्प पूर्ण झाले आहेत व तीन प्रकल्पांची कामे चालू आहेत स्थानिक स्तरावरील ३७ प्रकल्प पूर्ण झाले असून ५० प्रकल्पांचे काम चालू आहे. त्याशिवाय काही लहान उपसासिंचन प्रकल्पही पूर्ण झाले आहेत. हे सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील एकूण सु. दीड लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

कोरडवाहू शेती विकासाच्या दृष्टीने शासनाने जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांतील प्रत्येकी एक गाव आदर्श करण्यासाठी ‘कृषी पंढरी’ ही योजना सुरू केली आहे. एकात्मिक ग्रामीण विकास योजनांतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरी बांधण्यासाठी, जुन्या विहिरींची दुरुस्ती, विहिरींवरील पंप खरेदी, सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, बैलजोडी, बैलगाडी विकत घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. यांशिवाय फलोत्पादन, कडधान्ये, तेलबिया उत्पादन विकास इ. कार्यक्रम राबविले जातात. आधुनिक शेतीचे तंत्र अवगत व्हावे, म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे खत मिळावे व इंधनाची समस्या सुटावी म्हणून गोबर वायू संयंत्र विकास योजना राबविली जाते.

जिल्ह्यातील पशुधनाची एकूण संख्या ६,६६,२८६ आहे. त्यापैकी ६३% गाई-बैल, ७% म्हशी-रेडे, २८% शेळ्या – मेंढ्या, २% इतर पशुधन होते (१९८७). वर्धा जिल्हा हा ‘गौळाऊ’  गुरांचे माहेरघर आहे. प्रामुख्याने आर्वी, कारंजा व आष्टी तालुक्यांत गोपालन केले जाते. बहुसंख्य म्हशी या स्थानिक जातीच्या असून त्या ‘नागपुरी’  किंवा  ‘एलिचपुरी’ म्हणून ओळखल्या जातात. ‘मुरा’ व सुरती जातीच्या म्हशीसुद्धा काही प्रमाणात ह्या जिल्ह्यात आढळतात. वर्धा जिल्ह्यात एक पशुवैद्यकीय चिकित्सालय, २० पशुवैद्यकीय दवाखाने, ३३ प्रथमोपचार केंद्रे, ७६ कृत्रिम रेतन केंद्रे आणि विस्तारकार्य तसेच प्रात्यक्षिकांकरिता एक फिरते पशुरोग नियंत्रक पथक आहे. पशुधन विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्यात राबविले जातात.

वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण ३,३४४ हेक्टर क्षेत्र मत्स्योत्पादनासाठी अनुकूल आहे. १९९०-९१ मध्ये १,००० मे. टन मस्त्योत्पादन झाले. केळझर येथे मत्स्यबीज उत्पादनकेंद्र स्थापन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अवर्गीकृत वनक्षेत्र महसूल विभागाच्या देखरेखीखाली, तर राखीव आणि सुरक्षित वनक्षेत्र वनविभागाच्या देखरेखीखाली येते. १९९०-९१ मध्ये ०.४७४ हजार घनमीटर इमारती लाकडाचे व १.३०५ हजार घनमीटर जळाऊ लाकडाचे उत्पादन झाले. याच वर्षी वनोत्पादनांपासून ३६३.५२ लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यापैकी इमारती लाकडांपासून २२.७५ लाख रुपयांचे, जळाऊ लाकडांपासून १.४६ लाख रुपयांचे व बांबू, गवत, बिडीपत्ता, डिंक वगैरे गौण उत्पादनांपासून ३३९.३१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

जिल्ह्यात मुख्य खनिजे आढळून येत नाहीत. माती, मुरूम इत्यादींपासून अल्पशा प्रमाणात महसूल प्राप्त होतो. १९९० मध्ये नोंदणीकृत कारखान्यांची संख्या १३९ होती. पैकी १३० कारखाने चालू स्थितीमध्ये असून त्यांत ९,२८८ कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे वर्ध्यापासून ६ किमी. अंतरावर ३१२.१९ हे. जमिनीवर एक औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आलेली आहे. ३१ मार्च १९९१ पर्यंत तीमध्ये एकूण ७० कारखाने कार्यरत होते.

वर्धा जिल्ह्यात खालीलप्रमाणे मोठे व मध्यम स्वरूपाचे उद्योग स्थापण्यात आले आहेत. आर्. बी. बी. ए. स्पिनिंग व वीव्हिंग मिल्स, हिंगणघाट आर्. एस्. रेखचंद मेहता स्पिनिंग व वीव्हिंग मिल्स, हिंगणघाट पुलगाव कॉटन मिल्स, पुलगाव महाराष्ट्र एक्स्प्लोझिव्ह्‌ज, केळझर (ता. सेलू) नोबल एक्स्प्लोकेम प्रा. लि. हिंगणी (ता. सेलू) वर्धा जिल्हा शेतकरी सहकारी सूत गिरणी, वर्धा हे मोठे व मध्यम स्वरूपाचे उद्योग वर्धा जिल्ह्यात स्थापण्यात आले आहेत. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट व गंधकाम्‍ल निर्मितीचा विदर्भ विकास महामंडळ मर्या., महात्मा सहकारी साखर कारखाना मर्या., जामणी रेल्वे एक्स्प्लोझिव्ह्‌जचा डिन इंडिया लिमिटेड, सिंदी या उद्योगांना केंद्र सरकारकडून परवाना देण्यात आलेला आहे.

गांधीजींच्या तत्त्वप्रणालीवर आधारित वर्धा जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने कोणेतेही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली राहू नये, यासाठी पंचवार्षिक योजना आखण्यात आली आहे. या योजनेखाली रिक्षाचालकांना आर्थिक साहाय्य, छोट्या धंद्यांकरिता दुकानांचे गाळे, झाडू बनविणे व रस्त्यावरील चर्मकारांसाठी छोटे गाळे आदी योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणून कमी भांडवलावर घरच्या घरी करता येण्यासारखा उद्योग म्हणजे रेशीम उद्योग होय. या उद्योगाचा विकास व्हावा, म्हणून खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्‍न करीत आहे. वर्धा व त्याच्या परिसरातील खेड्यांत ह्या उद्योगाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने तसेच हा उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाची शास्त्रीय माहिती, प्रशिक्षण व रेशीम उद्योगासंबंधी येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता जमनालाल बजाज प्रतिष्ठान व शिधा मंडळ, वर्धा यांनी संयुक्तपणे पिंपरीच्या कृषी विज्ञान शाखेमार्फत, रेशीम कोष पैदास प्रकल्प सुरू केला आहे.

जिल्ह्यामध्ये मार्च १९९१ अखेर निरनिराळ्या उद्योगांमधील एकूण कामगार संख्या ४०,१२२ असून त्यात १२,३२५ खाजगी १६,७५३ निमशासकीय आणि ११,०४४ शासकीय आहेत. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये ६९% व खाजगी क्षेत्रामध्ये ३१% कामगार होते.

वर्धा जिल्ह्यात एकूण सहकारी संस्थांची संख्या जून १९९१ अखेर १,२९० एवढी होती. त्यांपैकी सहकारी पतसंस्था ४०४, बिगर शेतीसंस्था ११० व गृहनिर्माण संस्था १८० व दुग्ध व्यवसाय संस्था २८३ होत्या. सर्व संस्थांच्या सभासदांमध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या सभासदांची संख्या सर्वांत जास्त म्हणजे १,२४,१०३ एवढी आहे. प्राथमिक कृषी सहकारी  संस्थांमार्फत १९९०-९१ मध्ये शेतकरी सभासदांना ६४६ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. विविध बँकांमार्फतही कर्जवाटप केले जाते. जिल्ह्यामध्ये वर्गीकृत बँक कार्यालयांची संख्या ७२ व सहकारी बँकांची संख्या ६३ आहे. त्यांपैकी ४९ टक्के नागरी भागात व ५१ टक्के शाखा ग्रामीण भागात आहेत.


वाहतूक व संदेशवहन : वर्धा जिल्ह्यात मार्च १९९१ अखेर एकेरी लांबीचे रुंद लोहमार्ग ६५ किमी., दुहेरी लांबीचे २२५ किमी., तिहेरी व अधिक लांबीचे ७० किमी. आणि अरुंद मापी ३७ किमी. असे एकूण ३९७ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. वर्धा शहर हे दिल्ली – मद्रास व हावडा – मुंबई लोहमार्गावरील महत्‍त्वाचे प्रस्थानक आहे.

मार्च १९९१ अखेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २,६०३ किमी. लांबीच्या रस्त्यांचे काम व नगर परिषद हद्दीतील भागात २६८ किमी. रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले. त्यापैकी ग्रामीण भागात ५७ किमी. व नागरी भागात ७४ किमी. लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. निरनिराळ्या प्रकारच्या नोंदणी मोटार वाहनांची संख्या २०,९५१ एवढी आहे. त्यांत ८३% मोटार-सायकली व स्कूटर, ७% मोटारी व जीप, ४% मालमोटारी व ६% इतर वाहने आहेत.

जिल्ह्यात मार्च १९९१ अखेर १८२ टपाल कार्यालये व ७१ तारघरे होती. जिल्ह्यातील १७२ गावांना डाकघरांची सोय असून ३,७९० दूरध्वनींची सोयही आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर १९८९ पासून दूरदर्शन सेवा सुरू झाली. एकूण सार्वजनिक दूरचित्रवाणींची संख्या १५२ होती.

वर्धा जिल्ह्यात एकूण १,३७१ गावे व ६ शहरे आहेत (१९८१). पैकी ३१ मार्च १९९१ पर्यंत १,२३९ गावांचे व शहरांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. म्हणजे जिल्ह्यात ९०% विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. मार्च १९९० पर्यंत ३३,९५३ शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यात आला.

चौधरी, वसंत

लोक व समाजजीवन : महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, जमनालाल बजाज यांच्या शिकवणीचा ठसा येथील लोकजीवनावर आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सत्यशोधक चळवळ, बहुजन समाज आंदोलन, सत्यशोधक जलसे व मेळावे यांचा येथील सामाजिक जीवनावर बराच प्रभाव होता आणि त्यांचा जनजागृतीस मोठा हातभार लागला. त्यांच्या प्रेरणेने झालेला ग्रामोद्योगांचा विकास हे या जिल्ह्यातील ठळक वैशिष्ट्य मानता येईल. ग्रामोद्योग व शेती हीच येथील जनतेची प्रमुख जीवनसाधने आहेत. जिल्ह्यात फार मोठे कारखाने नसल्यामुळे येथील मोठ्या शहरांतही इतर जिल्ह्यांतील औद्योगिक शहरांच्या तुलनेत शांतता आढळते. नोकरी व व्यवसायांनिमित्त उत्तरेकडील तालुक्यांतील लोक नागपूर, अमरावती अथवा मुंबईकडे स्थलांतरित होत असल्याने या जिल्ह्यातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण राज्यातील लोकसंख्या-वाढीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. १९८१ च्या जनगणनेप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ९,२६,६१८ लोकसंख्येपैकी ४,७५,६९६ पुरुष व ४,५०,९२२ स्त्रिया होत्या. तसेच ६,९५,१०८ लोक ग्रामीण भागांत, तर २,३१,५१० लोक नागरी भागांत रहात होते. याच वर्षी जिल्ह्यात ३६,४१२ लोक अनुसूचित जातींचे, तर १,४२,२४४ लोक अनुसूचित जमातींचे होते. जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १४७ असून एकूण कामकऱ्यांपैकी ७३% लोक शेती व तिच्याशी निगडित उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत. धार्मिक दृष्ट्या १९८१ साली जिल्ह्यात ७,५२,३९३ हिंदू १,२९,०२१ बौद्ध ३७,३६८ मुसलमान ५,४८२ जैन १,३६८ ख्रिस्ती ५६३ शीख ३३१ इतर धर्मीय व ९३ लोक धर्म न सांगितलेले होते. जिल्ह्यात ब्राह्मण, मराठा, तेली वगैरेंशिवाय कुणबी, कोष्टी, गोवारी, धनगर, गवळी, कोलाम, गोंड, परधान, पारधी, भोई, सिंधी इ. जाति जमातींचे तसेच इतर धर्मपंथीय लोक राहतात.

जिल्ह्यातील बहुतेक गावे नद्या अथवा नाले यांच्या काठांवर वसलेली असून विदर्भातील अन्य जिल्ह्यांतील घरांप्रमाणेच येथील घरांची बांधणी आहे. खेड्यांतील शेतकऱ्यांची घरे मातीची किंवा कच्च्या विटांची, कौलारू अथवा धाब्याची असतात. काही गावांत जुने वाडे, विशेषतः आर्वीमध्ये, अद्याप दिसून येतात. उष्णतेपासून संरक्षणाच्या दृष्टीने घरांना पत्र्याऐवजी कौले व ओसरी असते. शहरांतील श्रीमंतांची घरे मात्र आधुनिक सुखसोयींनी युक्त आहेत. येथील लोकांच्या पोशाखात व बोलण्यात खास वऱ्हाडी छटा जाणवते. जुन्या वळणाचे लोक डोक्याला पगडी (आता फारशी दिसत नाही), फेटा अथवा दुपट्टा वापरतात. बंडी वापरण्याची पद्धतही जुनीच आहे. घराबाहेर जाताना बोडके जाणे पूर्वी अशुभ मानीत परंतु उष्णता व थंडीपासून रक्षण व्हावे हा त्यामागील हेतू असावा. जेवताना मात्र शिरस्त्राण हमखास काढून ठेवणे शिष्टाचाराचे मानतात. अलीकडील पोशाखात मात्र बरेच परिवर्तन झालेले दिसते. शेतकरी सर्वसाधारणपणे धोतर, सदरा व खांद्यावर उपरण्यासारखे वस्त्र आणि डोक्याला टोपी वापरतात. जुन्या वळणाच्या स्त्रिया नऊवारी लुगडे व चोळी वापरतात, तर शहरी भागांत मात्र वेगवेगळी फॅशन दिसून येते.

जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या सर्वांत जास्त असून (८६.६४%) त्याखालोखाल हिंदी भाषिक आहेत (६.५५%). वर्ध्याची बोली भाषा वऱ्हाडी व नागपुरी यांच्या मिश्रणाने बनलेली आहे. यांशिवाय उर्दू, गुजराती, तेलुगू, पंजाबी, सिंधी, इंग्‍लिश या भाषा थोड्याफार प्रमाणात प्रचलित आहेत. बंजारी, भिली किंवा भिलोडी, गोंडी, गोरखली किंवा नेपाली, हलबी, खानदेशी, कोलामी, कोकणी, कोरकू, कोया इ. स्थानिक भाषा अल्प प्रमाणात बोलल्या जातात.

येथील बहुसंख्य हिंदू वारकरी संप्रदायाचे असून पंढरपूरचा विठ्ठल हे त्यांचे आराध्यदैवत आहे. त्याखालोखाल महानुभाव पंथीयांची संख्या जास्त असून इतर पंथीय अल्प आहेत. वर्धा जिल्ह्याची संतपरंपराही मोठी आहे. हिंदू व मुसलमान या दोहोंना पूज्य असणारे आर्वीतील आद्य संत तेलंगराय, संत मायबाई, आडकुजी महाराज, योगी अवघडनाथ, झामसिंग महाराज, पारडीचे नगाजी महाराज, अनंतदास महाराज इ. थोर व्यक्तींचे या जिल्ह्यातील कार्य उल्लेखनीय आहे. साहित्य व वैचारिक क्षेत्रांतही या जिल्ह्याने महत्त्वाचे कार्य केले आहे. सामाजिक व वैचारिक लेखनांत म. गांधी, आचार्य विनोबा भावे, आचार्य काका कालेलकर, बाळकोबा भावे इ. लेखकांचे येथील कार्य खूप मोलाचे आहे. विनोबाजींची गीताई येथेच तयार झाली. पवनार आश्रमाच्या विद्यमाने ‘परमधाम प्रकाशना’तर्फे या लेखकांचे विविध वैचारिक साहित्य प्रकाशित झाले. विदर्भ साहित्य संघाचे सत्ताविसावे (२५ व २६ नोव्हेंबर, १९६७) व अठ्ठाविसावे (१४ व १५ फेब्रुवारी १९७०) साहित्य संमेलन अनुक्रमे वर्धा व आर्वी येथे भरविण्यात आले होते. मराठी साहित्य महामंडळाच्या विद्यमाने भरणारे अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन वर्ध्याला ११ ते १३ मे १९६८ या काळात संपन्न झाले. सर्व प्रकारच्या साहित्याबरोबरच संगीत, शिल्पकला व चित्रकला या क्षेत्रांतही वर्धा जिल्ह्याने मोठ्या कलाकारांना घडविले आहे.


जिल्ह्यातील आरोग्यसुविधा खाजगी दवाखान्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, नगर परिषद व धर्मादायसंस्था यांमार्फत पुरविल्या जातात. १९९० मध्ये जिल्ह्यात शासनामार्फत चालविली जाणारी एकूण १६ रुग्णालये, ४५ दवाखाने, २२ प्रसूतिगृहे व २७ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या वर्षीचे जिल्ह्यातील जन्म-मृत्यू प्रमाण दर हजारी अनुक्रमे २७.७ व ८.९५ होते. जिल्ह्यात गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशन (सेवाग्राम), महारोगी सेवा समिती (दत्तपूर), महिला समाज (वर्धा), राष्ट्रभाषा प्रचार समिती (वर्धा), जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था (वर्धा), कस्तुरबा हेल्थ सोसायटी (सेवाग्राम), मारवाडी शिक्षा मंडळ (वर्धा), महिलाश्रम (वर्धा), अखिल भारतीय चरखा संघ (सेवाग्राम) इ. स्वयंसेवी संस्थांद्वारा समाजकल्याणाचे कार्य केले जाते.

इतिहासकाळापासून या जिल्ह्याला आदर्श शैक्षणिक परंपरा आहे. वाकाटककाळी प्रवरपूर (पवनार) हे विद्वान ब्राह्मणांचे गाव म्हणून विख्यात होते, तर विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून हा जिल्हा राष्ट्रीय शिक्षणामुळे प्रसिद्ध झाला. १९२० नंतर वर्ध्यात राष्ट्रीय जागृतीची प्रेरणा वेगाने पसरू लागली. सत्याग्रहाश्रम व गांधी सेवा संघ यांच्या पाठोपाठ १९२४ मध्ये महिलाश्रमाची स्थापना झाली. या संस्थेने महिला शिक्षणाचा शास्त्रशुद्ध पाया घातला. काँग्रेसच्या १९३७ च्या जाहीरनाम्यानुसार येथील ग्रामीण भागांतील शिक्षणाच्या प्रसारावर भर देण्यात आला. १९३८ च्या ‘नई तालीम’ शिक्षण पद्धतीच्या प्रसारासाठी सेवाग्रामला हिंदुस्थान तालीम संघ स्थापन करण्यात आला. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा म्हणून म. गांधीनी १९३७ मध्ये राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्ध्याला स्थापन केली. १९४० मध्ये जिल्ह्यात पहिले वाणिज्य महाविद्यालय स्थापन झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणक्षेत्रात खूपच प्रगती झाली. १९८१ च्या जनगणनेप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ४,७३,०७० साक्षरांपैकी २,९०,२९५ पुरुष व १,८२,७७५ स्त्रिया साक्षर होत्या. जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ५१.०२ आहे. जिल्ह्यात १९८८-८९ मध्ये ८ पूर्व-प्राथमिक, ९८९ प्राथमिक, १३१ माध्यमिक, ४८ उच्च माध्यमिक व १३ सामान्य शिक्षण महाविद्यालये होती. येथे औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असून याच वर्षी येथे एक वैद्यकीय महाविद्यालय (सेवाग्राम) आणि ४ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये होती. आर्वी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यांत प्रौढ शिक्षण केंद्रे आहेत.

महत्त्वाची स्थळे : वर्धा जिल्ह्यात पारंपरिक अर्थाने प्रेक्षणीय स्थळे कमी आहेत. परंतु वर्धा, सेवाग्राम, पवनार, आर्वी यांसारख्या पुरातत्‍त्‍वीय अथवा प्रेरणास्थळांना भेट देण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. ⇨ वर्धा शहर या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाला म. गांधी, जमनालाल बजाज यांच्यामुळे राजकीय व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. शहरातील आणि जवळपासच्या गांधीवादी संस्था, मगन संग्रहालय, लक्ष्मीनारायण व गीताई मंदिर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. वर्धा रेल्वेस्थानकाजवळच राष्ट्रभाषा प्रचार समितीचे कार्यालय आहे. हिंगणघाट (लोक. ५९,०७५-१९८१) हे वर्धा शहराच्या दक्षिणेस ३३.५ किमी.वर असून पूर्वीपासून कापूस उत्पादक प्रदेशातील शहर म्हणून त्याला महत्त्व आहे. येथील बनी जातीचा कापूस लँकाशरला पाठविला जात असे. सुंदर शिल्पकाम केलेले मल्हारी-मार्तंडाचे जुने मंदिर (१७९२-१८०५), विदर्भातील जैन मंदिरांपैकी महत्‍त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले येथील जैन मंदिर, सुंदर बागा आणि काचकामा यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. संत गाडगे महाराजांच्या स्मरणार्थ मार्गशीर्षमध्ये येथे मोठी यात्रा भरते. शहरात दोन दर्गे व तीन मशिदी असून येथे मोठा उरूसही भरतो. आर्वी (३१,११९) हे ‘संतांची आर्वी’ म्हणून प्रसिद्ध असलेले शहर वर्ध्याच्या वायव्येस ५४.७५ किमी.वर असून कापसाची बाजारपेठ म्हणून विख्यात आहे. राष्ट्रीय चळवळीत या शहराचा मोठा वाटा होता. शहरात राम, कृष्ण, लक्ष्मीनारायण यांची सुंदर मंदिरे असून संत मायबाईचा मठ आहे. आष्टी (८,०५०) हे वर्ध्याच्या उत्तरेला ७८.८६ किमी.वर असून पीर वजित या मुसलमान अवलियाची येथील कबर प्रसिद्ध आहे. दरवर्षी तेथे मोठा उरूस भरतो. हिंदूही याचे भक्त आहेत. ‘छोडो भारतआंदोलना’त या गावात मोठी रणधुमाळी झाली होती. पवनार (७,०८७) हे पुरातन गाव वर्ध्याच्या ईशान्येस ९ किमी.वर धाम नदीकाठी वसलेले असून वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याची प्रवरपूर राजधानी हीच असावी, असे तज्ञांचे एक मत आहे. रोमन साम्राज्याशी पवनारचे (प्रवरपूरचे) व्यापारी संबंध असावेत, असे म्हटले जाते. तेथे अनेक पुरातत्‍त्‍वीय उत्खनने झाली आहेत. १९३७ पासून मात्र हे प्रेरणास्थान म्हणून प्रसिद्ध झाले. आचार्य विनोबाजींनी स्थापन केलेला ‘परमधाम आश्रम’ (पूर्वीचा जमनालाल बजाज यांचा लाल बंगला), म. गांधीस्तंभ व छत्री ही येथील महत्‍त्वाची स्थाने आहेत. ⇨ सेवाग्राम (३,५६४) म्हणजेच पूर्वीचे सेगाव. वर्ध्यापासून ५ किमी. वर असलेले हे गाव म. गांधींच्या वास्तव्याने पुण्यस्थळ बनले. येथील आदिनिवास, बापू व बा कुटी, आखरी निवास, महादेव कुटी ही पर्यटकांची प्रमुख श्रद्धास्थळे व आकर्षणे आहेत. या शहरांशिवाय अलिपूरचे संत वली यांची कबर, आंजीचा किल्ला, देवळी येथील मंदिरे व डिसेंबर महिन्यातील यात्रा, जंगलव्याप्त प्रदेशातील निसर्गसुंदर ढगा हे गाव व तेथील स्वयंभू महादेवमंदिर, हिंदु-मुस्लिमांना पवित्र असलेली गिरडमधील ख्वाजा फरिद बाबांची समाधी, पारडीचे मुरलीधर मंदिर, गारपीट हे रम्य वनग्राम व तेथील वन्य पशु-पक्ष्यांचे अभयारण्य, बोरीचे धरण व अभयारण्य ही जिल्ह्यातील प्रमुख आकर्षणे आहेत. 

चौडे, मा. ल.


वर्धा जिल्हा

लक्ष्मीनारायण मंदिर, वर्धा.मल्हारी-मार्तंड मंदिर (१७९२-१८०५), हिंगणघाट.सेवाग्राम येथील बापू कुटी.


जिल्ह्यातील हातमाग उद्योग, एक दृश्य.मल्हारी-मार्तंड मंदिरातील शिल्पपट्टिका, हिंगणघाट.लक्ष्मीनारायण मंदिर, कापशी, (१८९०).प्रसिद्धा मगन संग्रहालय, वर्धा.म. गांधी स्मारक छत्री, पवनार.