श्रवणबेळगोळ : भारताच्या कर्नाटक राज्यातील जैन धर्मीयांचे एक पवित्र महाक्षेत्र व पर्यटन स्थळ. हसन जिल्ह्यातील हे ठिकाण अर्सिकेरे-म्हैसूर लोहमार्गावर हसनच्या पूर्वेला ५० किमी. व म्हैसूरच्या उत्तरेला ८९ किमी. विंध्यगिरीवर चेन्नरायपटण तालुक्यात वसले आहे. दोडाबेट्टा (विंध्यगिरी) आणि चिक्कबेट्टा (चंद्रगिरी ) या जुळ्या पर्वतश्रेणींच्या दुबेळक्यातील या गावाची लोकसंख्या ५,२०३ होती (२००१). प्राचीन कोरीव लेखांत त्याचा बेळगोळ, बेळगुळ, बेळुगुळ, गोमटपुर, दक्षिण काशी अशा भिन्न नावांनी उल्लेख आढळतो. श्रवण म्हणजे श्रमण, बेळ म्हणजे शुभ्र आणि गोळ म्हणजे तळे या कन्नड शब्दांवरून ‘श्रवणबेळगोळ ’ हा शब्द बनला आहे. त्याचा वाच्यार्थ श्रमणांचे ( जैन साधूंचे ) धवल सरोवर असा आहे.

या तीर्थक्षेत्राचा इतिहास असंबद्ध आहे पण तो इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंत मागे नेतात. भद्रबाहू नावाचा जैन साधू उत्तर प्रदेशात दुष्काळ पडल्यानंतर आपल्या शिष्यांसह दक्षिण भारतात आला. त्याच्या सोबत वृद्ध आणि संन्यस्त राजा चंद्रगुप्त मौर्य होता. चंद्रगुप्त मौर्याने त्याचे अखेरचे आयुष्य श्रवणबेळगोळ येथे घालविले, असे जैन परंपरा सांगते आणि चिक्कबेट्टावरील इ. स. सहाव्या शतकातील एका कोरीव लेखात तसा उल्लेख आढळतो. मौर्यांच्या अस्तानंतर कर्नाटकच्या प्रदेशावर सातवाहन, कदंब ( इ. स. ३००-५००) आणि गंग (३५०९-९९) या राजांची सत्ता होती. गंग वंशीय राछ ( ज ) मल्ल किंवा राजमल्ल सत्यवाक्य राजाच्या वेळी ( कार. ९७४-९८४) त्याच्या पत्नीच्या आग्रहास्तव चामुंडराय या मंत्र्याने येथील गोमटेश्वराची एकसंध पाषाणातील भव्य शिल्पाकृती ९८३ मध्ये करविली. गोमटेश्वर ( गोम्मटेश्वर ) हा जैनांचा पहिला तीर्थंकर ‘ ऋषभनाथ ’ याचा पुत्र समजला जातो. त्यास बाहुबली किंवा भुजबळी म्हणजे मदन याचा अवतार मानतात. पोदनपूर येथील कुक्कुटेश्वराच्या पुतळ्यावरून चामुंडरायास हा पुतळा करण्याची स्फूर्ती मिळाली, अशी कथा थोड्याफार फरकाने भुजबलिचरित्र किंवा राजवळीकथा या गंथांतून आढळते. गोमटेश्वरास कुक्कुटेश्वर असेही म्हणतात. हा पुतळा अरिट्टी नेमी या शिल्पकाराकडून घडवून घेतला असावा, असा बी. एल्. राईस या भारतविदया वेत्त्याचा तर्क आहे. या पुतळ्यामुळे या स्थळाचे धार्मिक महत्त्व वाढले आणि अनेक जैन मुनींनी ही आपली तपोभूमी केली. जैन तत्त्वज्ञानाचे काही गंथही येथे लिहिले गेले.

ग्रॅनाइट पाषाणातील १७.३८ मी. उंचीचा गोम्मटेश्वर, खड्‌ग आसनात, समभंग अवस्थेत उत्फुल्ल कमळपीठावर उत्तराभिमुख, मंदस्मित करीत उभा असून, या प्रचंड शिल्पाचे प्रमाण या कमळावर रेषांकित करून ठेवले आहे. गोम्मटेश्वर दिगंबर असून त्याचा प्रत्येक अवयव घाटदार व प्रमाणबद्ध आहे. त्याच्या पायथ्याशी वारूळ, फणीधारी सर्प, वेली यांचे शिल्पांकन आहे. या पुतळ्याच्या डाव्या पायामधील कोनाड्यासारख्या जागेतील शिलालेख तमिळ, कन्नड व मराठी अशा तीन भाषांत आणि द्राविडी व नागरी लिप्यांत कोरला आहे. मराठी लेख देवनागरीत पुढीलप्रमाणे आहे  ‘ श्री चावुण्डराये करवियले गंग राजे सुत्ताले करवियले ’. हा मराठीतील आद्य शिलालेखांपैकी एक असून तो इ. स. ९८३ मध्ये कोरविला असावा, असे बहुतेक तज्ज्ञ मानतात.

या गावाच्या परिसरात इ. स. दहा-बाराव्या शतकांत अनेक मंदिरे बांधली गेली. त्यांपैकी कलात्मक व वैशिष्टय्पूर्ण मंदिरे चिक्कबेट्टा टेकडीवर आहेत. तेथेच भद्रबाहूची गुंफा असून तिच्यात त्याची चरणचिन्हे आहेत. माथ्यावर तटबंदी असून कू गे बह्मस्तंभ, मानस्तंभ, कत्तले बस्ती, चंद्रगुप्त बस्ती, शासन बस्ती, शांतिनाथ बस्ती इ. मंदिरे आहेत. शांतिनाथ बस्ती मंदिरातील शिल्पकाम लक्षणीय असून शांतिनाथाची काळ्या पाषाणातील मूर्ती १.३ मी. उंच आहे. पार्श्वनाथ, चामुंडराय, त्याची पत्नी अजितादेवी व मोनालिसा सदृश युवती यांची सुरेख उत्थित शिल्पे चामुंडराय बस्तीत आहेत. प्रत्यक्ष गावात भंडारी बस्ती, अक्कन बस्ती, कलामंदिर, दानशाले बस्ती, मंगाई बस्ती, जैन मठ, नगर जिनालय वगैरे मंदिरे आहेत. त्यांपैकी भंडारी बस्ती हे सर्वांत मोठे मंदिर आहे. तीत काळ्या पाषाणात चोवीस तीर्थंकारांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे त्यास चतुर्विंशतितीर्थंकर बस्ती म्हणतात. या ठिकाणी अनेक शिलालेखही उपलब्ध झाले असून एपिग्राफिया कर्नाटिका च्या दुसऱ्या भागात ते सर्व प्रसिद्ध झाले आहेत.

पार्श्वनाथ बस्तीसमोरील मानस्तंभ हा सु. २० मी. उंचीचा असून सतराव्या शतकात कुणी पुत्तयाह नामक गृहस्थाने तो बांधला आहे तर गंग राजा मारसिंह याच्या स्मरणार्थ कू गे बह्मस्तंभ उभारला आहे. त्यावर त्याच्या प्रशस्तिदर्शक ११३ ओळींचा मजकूर आहे. या सर्व बस्ती-मंदिरांतून गंग, राष्ट्नकूट, कल्याणी-चालुक्य आणि होयसळ काळांतील वास्तुशिल्पशैलींचे, विशेषत: नागर-वेसर, दर्शन घडते.

श्रवणबेळगोळ येथे नित्यनैमित्तिक पूजाअर्चा चालते. दर बारा वर्षांनी विशेष सोहळा संपन्न होतो. १९८३ मध्ये गोमटेश्वराच्या मूर्तीला एक हजार वर्षे पूर्ण झाली म्हणून मोठा समारंभ झाला. यावेळी महाभिषेक आणि मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून सुवर्णफुले उधळण्यात आली. त्यानंतर ८ ते १९ फेबुवारी २००६ दरम्यान या सहस्त्रकातील महामस्तक अभिषेक सोहळा मोठया धुमधडाक्याने साजरा झाला. यावेळी लाखो जैन धर्मीय व थोर व्यक्ती जगभरातून या ठिकाणी जमल्या होत्या.

पहा : गोमटेश्वर.

संदर्भ : 1. Dandavathi, Padmaraja, Gommata : Mahamastakabhisheka-2006, Banglore, 2005.

2. Tagore, K. V. R. Ed. March of Karnataka, January 2006, Banglore, 2006.

३. तुळपुळे, शं. गो. प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे, १९६३.

४. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.

देशपांडे, सु. र.