लीआँ : फ्रांन्सच्या पूर्व भागातील ऱ्होन प्रांताची राजधानी व लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ४,१८,४७६ उपनगरांसह ११,७०,००० (१९८२). हे ऱ्होन व सोन नद्यांच्या संगमावर पॅरिसच्या आग्नेयीस ३८४ किमी. व ग्रनॉबलच्या ईशान्येस सु. ९२ किमी. वसलेले असून नद्यांमुळे शहराचे तीन भाग झाले आहेत. नद्यांच्या दुबेळक्यातील शहराच्या मध्यभागात बाजारपेठा व करमणुकीची केंद्रे असून सोन नदीच्या पश्चिरम किनाऱ्यावर जुने शहर व ऱ्होन नदीच्या पूर्व किनाऱ्यावर भव्य प्रासाद, विद्यापीठ व अनेक कारखान्यांचे नवे शहर विस्तारले आहे.

इ. स. पू. ४३ मध्ये ‘लगडूनम’ या नावाने येथे रोमन सैनिकी वसाहतीची प्रथम स्थापना झाली. त्यांनतर हे गॉल लोकांच्या राजधानीचे ठिकाण बनले. यांच्या काळातच इ.स. दुसऱ्या शतकात येथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला. इ. स. १९७ मध्ये सेप्टिमिअस सिव्हीरस या रोमन राजाने हे शहर उद्ध्वस्त केले. तेव्हापासून येथे अनेक सत्तांतरे झाली, तरी शहरावर चौदाव्या शतकापर्यंत आर्चबिशपांचेच वर्चस्व होते. १०३२ मध्ये या शहराचा पवित्र रोमन साम्राज्यात समावेश झाला. चौथ्या फिलिप्सच्या कारकीर्दीत १३१२ मध्ये हे शहर फ्रेंच साम्राज्यात समाविष्ट झाले. १३२० मध्ये शहराला नगरपालिकेची सनद प्राप्त झाली. पंधराव्या शतकात येथे भरणाऱ्या व्यापारजत्रांमुळे अनेक देशांतून व्यापारी येऊ लागले. इटालियन व्यापाऱ्यांनी शहरात रेशीम उद्योगाचा विकास केला. १४७३ मध्ये येथे छपाई उद्योगास सुरुवात झाली व सतराव्या शतकात या उद्योगाचे तसेच रेशीम उद्योगाचे युरोपातील एक प्रमुख केंद्र म्हणून हे शहर प्रसिद्धीस आले. धर्मयुद्धांच्या काळात येथील औद्योगिक प्रगतीवर विपरीत परिणाम झाला. एकोणिसाव्या शतकात हे सामाजिक पुनरुत्थान चळवळीचे केंद्र बनले होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याच्या प्रतिकाराचे हे मुख्य केंद्र असल्याने शहराचे अतोनात नुकसान झाले. याच वेळी काही काळ हे जर्मनीच्या ताब्यात गेले व ३ सप्टेंबर १९४४ रोजी ते फ्रेंच सैन्याने पुन्हा घेतले.

लोहमार्ग व ऱ्होन नदीतून जलमार्ग सुविधा, जवळचे सँतेत्येन कोळसाक्षेत्र, अल्पाइन जलविद्युत्निर्मिती केंद्र यांमुळे शहराच्या आर्थिक भरभराटीत भर पडली असून देशातील रोखे व्यवहारांचे हे दुसऱ्या  क्रमांकाचे शहर आहे. उच्च प्रतीचे रेशमी कापड, रेयॉन या प्रमुख निर्मिती उद्योगांबरोबरच रंग, रसायने, खते, औषधे, काच,प्लॅस्टिक व कातडी सामान, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, यंत्रे, मद्ये, चीज इत्यादींचे कारखाने शहरात आहेत. अकराव्या व पंधराव्या शतकांतील सँ मार्तँ दान्ये चर्च, बारा ते चौदाव्या शतकांतील सँ झां कॅथीड्रल, राजवाडा (सतरावे शतक) संग्रहालये, ग्रंथालये, विद्यापीठ (स्था.१८०८) ही शहरातील प्रमुख आकर्षणे आहेत. दरवर्षी जून महिन्यात येथे संगीत व नाट्यमहोत्सव भरतो. क्लॉडिअस व कॅराकॅला या रोमन सम्राटांचे व सेंट आंब्रोस यांचे हे जन्मग्राम होय.

चौंडे, मा. ल. सावंत, प्र. रा.