मालदीव प्रजासत्ताक : हिंदी महासागरातील एक प्रवाळद्वीपीय प्रजासत्ताक देश. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ७° उ. ते ०° ४३ द. व ७२° ३१’ पू. ते ७३° ४३ पू. यांदरम्यान. दक्षिणोत्तर विस्तार ८२० किमी. व पूर्व-पश्चिम विस्तार १३० किमी. असून किनाऱ्याची लांबी २,३९३ किमी. व क्षेत्रफळ २९८ चौ. किमी. आहे. लोकसंख्या १,५८,५०० (१९८३ अंदाज). भारताच्या दक्षिणेस असलेले हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत लहान राष्ट्र आहे. देशामध्ये सु. २,००० वर बेटे असून त्यांपैकी केवळ २२० बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. देशातील सर्वांत उत्तरेकडील कंकणद्वीप भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारीपासून ४८० किमी. असून श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ६४० किमी. अंतरावर हा देश आहे. याच्या उत्तरेस ११० किमी. अंतरावर भारताचे मिनिकॉय हे कंकणद्वीप आहे. मालदीव व मिनिकॉय ही बेटे आठ अंश खाडीने एकमेकांपासून अलग झाली आहेत. माले हे राजधानीचे ठिकाण (लोकसंख्या ३०,०००–१९७८) याच नावाच्या कंकणद्वीपावर असून देशातील जास्तीतजास्त लोकसंख्या याच शहरी एकवटलेली  आहे. मालदीव हा ‘महालदीव’ (महाल = राजवाडा दीव = बेट) या शब्दाचा अपभ्रंश असावा.

भूवर्णन: मालदीव प्रजासत्ताकात इहवांडिफुलू, टिनाडुम्मटी, मिलडुम्मडुलू, उत्तर मलोस्‌मडुलू, दक्षिण मलोस्‌मडुलू, फडिफोलू, माले,आरी, फेलिडू, निलंडू, मुलकू, कोलुमडुलू, हड्‌डुम्‍मटी, सुव्हाडिव्ह, आडू इ. प्रमुख कंकणद्वीपसमूह आहेत. या द्वीपसमूहांतील बहुतेक बेटे सपाट व सस.पासून अगदी कमी उंचीची असून १·८ मी. पेक्षा अधिक उंचीची बेटे क्वचितच आढळतात. काही प्रवाळबेटांची निर्मितिप्रक्रिया अजून सुरू असून हळूहळू त्यांचा आकारही वाढत असलेला दिसतो, तर काही बेटांची उंची व आकार कमी होत आहे. काही बेटांवर गोड्या पाण्याची खाजणे आहेत. काही बेटे आकाराने खूपच लहान असून काहींच्याभोवती प्रवाळशैलभित्तींची निर्मिती झालेली आढळते. मध्य भागातील बेटांपेक्षा उत्तरेकडील व दक्षिणेकडील बेटे अधिक सुपीक असून त्यांतही पश्चिमेकडील बेटांपेक्षा पूर्वेकडील बेटे जास्त सुपीक आहेत.

हवामान :मालदीव बेटांचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचे उष्ण व आर्द्र आहे. वार्षिक सरासरी तापमान २७° से. असते. ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात (नोव्हेंबर–मार्च) हवामान सौम्य व उत्साहवर्धक, तर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात (जून–ऑगस्ट) हवामान वादळी स्वरूपाचे व जोरदार पावसाचे असते. दक्षिणेकडील बेटांपेक्षा उत्तरेकडील कंकणद्वीपांना जास्त जोरदार वाऱ्यांचा तडाखा बसतो. दक्षिण भागात वार्षिक सरासरी पर्जन्य ३८० सेंमी., तर उत्तर भागात २५० सेंमी. पडतो.

वनस्पती व प्राणी :बेटांवर खुरट्या व लहानलहान झुडुपांचे दाट आच्छादन आढळते. यांशिवाय नारळ, विलायती फणस, केळी, पपई, आंबा, वड इ. वृक्षप्रकार बरेच आहेत. फुलझाडेही आढळतात. वेगवेगळ्या प्रकारचे उंदीर, ससे, फळे खाणारी वटवाघळे इ. प्राणी येथे दिसून येतात. बदके, बिटर्न (बगळ्याचा एक प्रकार), कावळे, गुलिंदा, पाणलावा व अनेक प्रकारचे समुद्रपक्षी आढळतात. विंचू , भुंगेरे, जमिनीवरील खेकडे सर्वत्र दिसून येतात. खाजणांत, समुद्रकिनाऱ्यावर व भरसमुद्रात कासवे व इतर कवचधारी प्राणी, मुशा, तलवार मासा, घड्याळमासा इ. उष्ण कटिबंधीय जलचर मोठ्या प्रमाणात सापडतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : टॉलेमीच्या लेखनावरून पाश्चिमात्यांना इ. स. दुसऱ्या शतकात मालदीव बेटांविषयी प्रथम माहिती मिळाली. दक्षिण आशियाई लोकांनी येथे प्रथम वसाहती केल्या असाव्यात. प्राचीन काळी मालदीववर चीनचे आधिपत्य असल्याचे दिसून येते. त्यानंतर पश्चिम भारतातील माडलिक राजांकडे मालदीवकडून वार्षिक खंडणी पाठविली जाई. ११५३ मध्ये अरब व्यापाऱ्यांनी येथे इस्लाम धर्माचा प्रसार केला. तेव्हापासून १९५३ पर्यंतएकूण ९२ सुलतानांनी मालदीववर राज्य केले. १३४३ मध्ये प्रसिद्ध अरबी प्रवासी इब्न बतूता याने या बेटांना भेट देऊन काही काळ येथे वास्तव्यही केले. त्याची पत्नी मालदीवची होती. पोर्तुगीज प्रवासी दॉन लोरेन्को दे आल्मेईदा १५०७ मध्ये येथे आला, तेव्हा पोर्तुगीज फौजांनी मालदीव बेटे ताब्यात घेऊन त्यांना गोव्याकडे ठराविक खंडणी भरण्यास भाग पाडले. १५७३ मध्ये मुहम्मद ठाकुरूफानी अल् आझम याने येथील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणून तो स्वतः बेटांचा सुलतान बनला. त्यानेच येथे चलनपद्धती, नवीन लिपी व जुजबी फौज अस्तित्त्वात आणली. सतराव्या शतकात सीलोनवर (श्रीलंका) सत्ता असलेल्या डचांशी येथील सुलतानाचा करार होऊन डचांवर मालदीवच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी मालदीवचा सुलतान सीलोनकडे ठराविक खंडणी पाठवीत असे. १८८७ मध्ये बेटांचा ताबा ब्रिटिशांकडे गेला मात्र बेटांची अंतर्गत स्वायत्तता कायम राहिली. १९५६ मध्ये ब्रिटिशांनी गां बेटावर हवाई तळ आणि हिट्टाडू बेटावर ब्रिटिश रेडिओ केंद्र उभारले. २६ जुलै १९६५ रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळाले, परंतु चौदाव्या शतकापासून राज्य करणाऱ्या अद्-दिन (दिदी) राजघराण्याची कारकीर्द संपुष्टात आल्यावर ११ नोव्हेंबर १९६८ रोजी प्रजासत्ताक म्हणून मालदीवची घोषणा करण्यात आली. हा देश राष्ट्रकुलाचा व संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे. या देशात सतराव्या शतकात सु. ४० वर्षे राज्य करणारा सुलतान इस्कंदर व पहिला इब्राहिम, तसेच आधुनिक नेते अमीर इब्राहिम नासिर व मौमून अब्दुल गायूम इ. व्यक्ती थोर मानल्या जातात. २६ जुलै हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस मानला जातो. १९६८ मध्ये देशाचे नवीन संविधान तयार करण्यात आले. देशात एकसदनी राज्यपद्धती असून राष्ट्राध्यक्ष हा देशाचा आणि सरकारचा प्रमुख असतो त्याची निवड पाच वर्षांसाठी विधानमंडळाकडून (मजलिस) केली जाते. कार्यकारी मंडळाचा तो प्रमुख असून मंत्रिमंडळाची रचना तोच करतो. विधानमंडळाची सभासदसंख्या ४८ असून तीपैकी ४० सभासद सार्वत्रिक प्रौढ मतदानपद्धतीने निवडून आलेले व ८ राष्ट्राध्यक्षांनी नियुक्त केलेले असतात. ४० सभासदांपैकी २ सभासद राजधानी माले येथून, तर १९ बेटांमधून प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ३८ सभासद निवडून आलेले असतात. विधानमंडळाची मुदत पाच वर्षांची असते. येथे राजकीय पक्ष नाहीत. देशाचे २० प्रशासकीय जिल्हे आहेत. त्यांपैकी राजधानी केंद्रशासित असून १९ बेटांच्या कारभारासाठी राष्ट्राध्यक्षांकडून प्रत्येक बेटासाठी एका प्रमुखाची (वरिन) नियुक्ती केलेली असते. परंपरागत इस्लामी कायद्याच्या (शरीआह) चौकटीतूनच न्यायदान केले जाते. १९८० मध्ये मालदीव उच्च न्यायालयाची स्थापना झाली.


आर्थिक स्थिती : आर्थिक दृष्ट्या देश अत्यंत मागासलेला आहे. जगातील सर्वांत मागासलेल्या २५ देशांमध्ये मालदीवचा समावेश होतो. मासेमारी व्यवसायावरच देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या १९७४ च्या पाहणीनुसार एकूण क्षेत्रफळापैकी केवळ १०% क्षेत्रच शेतीयोग्य आहे. ज्वारी, भोपळा, रताळी, अननस, ऊस, बदाम तसेच उष्ण कटिबंधीय प्रदेशात येणाऱ्या भाजीपाल्याचे व फळांचे उत्पादन घेतले जाते. ही उत्पादने प्रामुख्याने घरांजवळील बागांमध्ये घेतली जातात. नारळाच्या झाडांपासून खोबरे व काथ्या तयार करणे, ही प्रमुख उत्पादने असून निर्यातीच्या दृष्टीने ती माशांखालोखाल महत्त्वाची आहेत. भात व मासे हे लोकांचे प्रमुख अन्न असले, तरी तांदळाची आयात करावीच लागते. अन्न व शेती संघटनेच्या अभ्यासमंडळाच्या मते देशातील कमी उंचीच्या व दलदलीच्या भागात योग्य रीतीने पीक व्यवस्थापन व पिकांची फेरपालट केल्यास भाताचे पीक उत्तम रीतीने घेता येऊन त्याबाबतीत देश स्वावलंबी बनेल. ठराविक वार्षिक आकार सरकारकडे भरणाऱ्यांना वस्ती नसलेल्या बेटांवर शेती करण्यास परवानगी दिली जाते. ९४% शेतकरी माले येथे राहून अशा प्रकारची शेती करीत होते. (१९७९). १९८१ मध्ये कृषिउत्पादन पुढीलप्रमाणे झाले (उत्पादन मे. टनांमध्ये) : नारळ ९,००० खोबरे २,०००  केळी २०९ मका ७·८५ टॅपिओका १९·५९ रताळी १०·८८ कांदे २·९६ मिरच्या ३४·२४ नाचणी ५५·०६ आफ्रिका नट ४·९९ राळा ३७·४५. गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा तुटवडा असल्याने पशुपालन व्यवसाय हा विशेष महत्त्वाचा नाही. शेळ्या व कुक्कुटपालन केले जाते. 

देशातील मासेमारी हाच सर्वांत मुख्य व्यवसाय असून स्किपजॅक ट्यूना व यलोफिन ट्यूना हे दोन प्रकारचे मासे अधिक पकडले जातात. एकूण पकडलेल्या माशांपैकी ९०% मासे सुकवून मुख्यत्वे श्रीलंकेला पाठविले जात. ‘मालदीव फिश’ म्हणून हे मासे प्रसिद्ध आहेत. १९७२ पासून मात्र श्रीलंकेने आयातीचे प्रमाण हळूहळू कमी करून १९७८ पासून आयात पूर्णपणे थांबविली. त्यामुळे मालदीवने सुक्या माशांपेक्षा ताज्या माशांच्या उत्पादनावर व निर्यातीवर भर देण्याचा प्रयत्न केला. १९७९ पासून पुन्हा श्रीलंकेने माशांची आयात सुरू केली, परंतु ते प्रमाण बरेच कमी आहे. १९७८ मध्ये ‘मालदीव निप्पॉन कॉर्पोरेशन’ ने जपानच्या भागीदारीने मालेजवळ मासे डबाबंदीकरण कारखाना सुरू केला. परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने १९८२ मध्ये ही भागीदारी संपुष्टात आली. माशांची निर्यात मात्र जपानला होत राहिली. देशाच्या एकूण परकीय चलनापैकी ४०% परकीय चलन केवळ माशांपासून मिळते (१९८०). मासेमारीसाठी यांत्रिक बोटींचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. १९८१ मध्ये एकूण ३४,९०० टन मासे पकडले गेले. त्यांपैकी १९,९०० टन माशांची निर्यात करण्यात आली. याशिवाय कासवांच्या टणक व नक्षीदार पाठींपासून वेगवेगळ्या वस्तू बनवितात. शंखशिंपले गोळा करणे हा व्यवसायही महत्त्वाचा बनला असून बहुतेक शिंपल्यांची दागिने तयार करण्यासाठी निर्यात केली जाते. काही दुर्मिळ प्रकारचे शिंपलेही येथे सापडतात.

देशात वनसंपत्तीचा अभावच आहे. नारळ हाच प्रमुख वृक्ष असून त्याचाच उपयोग इमारती व बोटी बांधणीसाठी केला जातो. खनिजसंपत्ती तर नाहीच. निर्मितिउद्योगांचाही अभाव असला, तरी त्यांत हळूहळू वाढ होत आहे. खोबरे, दोरखंड, शंखशिंपले, चटया, लेस तयार करणे, कवड्या व कासवाच्या पाठींच्या वस्तू बनविणे इ. येथील प्रमुख उद्योग आहेत. या उद्योगांपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा १९७६ मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनात ३% वाटा होता. हेच प्रमाण १९८१ मध्ये ४०% झाले. सतराव्या शतकात डचांनी सुरूवात केलेला हाताने लेस तयार करण्याचा उद्योग अजूनही प्रचलित असून महत्त्वाचा आहे. लाखकाम तसेच उत्तम प्रतीच्या व आकाराच्या चटयांचे विणकामही महत्त्वाचे आहे. मासेमारी व तत्संबंधित उद्योग, कापडनिर्मिती, खाद्यपदार्थ प्रक्रिया, पर्यटन, दळणवळण, आरोग्यसेवा, शिक्षणसेवा इत्यादींचा विकास व विस्तार योजना सरकारने हाती घेतल्या आहेत.

देशातील दरडोई उत्पन्न फारच कमी (सु. १६० डॉलर) होते (१९७६). एकूण काम करणाऱ्या लोकांपैकी ४४% मासेमारी व्यवसायात, २६% निर्मिती, बांधकाम इ. व्यवसायांत, १७% सेवा व्यवसायात, ११% शेतीमध्ये व २% इतर उद्योग-विभागांत गुंतलेले आहेत. एकूण ६०,२५९ कामगारांपैकी ३७,३९१ पुरुष व २२,८६८ स्त्री कामगार होते. (१९७७). माले येथे मोठा, तर हूलूलू बेटावर लहानसा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. माले येथील प्रकल्पापासून २२ लक्ष किवॉ. ता. वीज पुरविली जाते. यापैकी ६०% वीज घरगुती वापरासाठी व ३०% शासकीय इमारतींमध्ये पुरविली जाते (१९८१). पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी शासनातर्फे पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सुंदर पुळणी व खारकच्छ, जलक्रीडा व मासेमारीला सोयीचा समुद्रकिनारा, प्रवाळनिर्मित विविध आकृत्या इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. पर्यटन व्यवसायापासून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते. १९८१ मध्ये ६०,३५८ पर्यटकांनी देशाला भेट दिली आणि त्यांपासून देशाला ३,६६,२०,००० मालदीवी रुपयांइतके परकीय चलन मिळाले. सर्वच पर्यटकांना पारपत्र असणे गरजेचे असते. 

माले बेट हे प्रमुख व्यापारी केंद्र व खुले बंदर आहे. भाताची आयात व उदी अंबराची निर्यात यांमध्ये सरकारची मक्तेदारी आहे. तांदूळ, गव्हाचे पीठ, मीठ, खनिज तेल, साखर, कापड इ. मालाची आयात, तर मासे, नारळ, खोबरे, दोरखंड, कवड्या, शंख-शिंपले, कूर्मशुक्ती व हस्तकला वस्तूंची निर्यात केली जाते. जास्तीतजास्त व्यापार जपानशी (७३% –१९७९) असून त्याशिवाय श्रीलंका, सिंगापूर, ग्रेट ब्रिटन यांच्याशीही चालतो. १९८१ मध्ये ८६,४९,००० डॉलरची निर्यात व २,७८,५४,००० डॉलरची आयात झाली. येथील बरेचसे व्यापारी भारतीय असून त्यांचे सु. ३०० वर्षांपूर्वींपासून येथे वास्तव्य आहे.


रूफीया (मालदीवी रूपया) हे मालदीवचे चलन असून १०० ‘लारी’ चा एक रूफीया होतो. १, २, ५, १०, २०, ५० आणि १०० रूफीयांच्या नोटा प्रचारात आहेत. १ स्टर्लिंग पौंड = ८·१७ रूफीया व १ अमेरिकी डॉलर = ७,०५ रूफीया असा विनिमय दर किंवा १,००० रूफीया = १२२·३८ स्टर्लिंग पौंड = १४१·८४ अमेरिकी डॉलर असा होता (३१ डिसेंबर १९८४). १९८३ चे अंदाजपत्रक १,३७५ लक्ष रूफीया महसुलीचे व १,५४७ लक्ष रूफीया खर्चाचे होते. येथे उत्पन्न कर नाहीत. बोटी व मोटारी यांवर परवाना शुल्क लावले जाते. महसुलाची प्रमुख साधने म्हणजे जकात कर व पर्यटन व्यवसाय ही होत. माले येथे १९८१ मध्ये मध्यवर्ती बँकेची, तर १९८२ मध्ये बँक ऑफ मालदीवची स्थापना झाली. यांशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ सीलोन हबीब बँक लि., पाकिस्तान बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल लि. (लक्सेंबर्ग) यांच्याही येथे शाखा आहेत.

देशातील बेटाबेटांमधील वाहतूक लहानलहान बोटींद्वारे चालते. भारत, श्रीलंका, सिंगापूर यांच्याशी नियमितपणे जहाज वाहतूक चालते. माले येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ (१९८१) असून दुसरा विमानतळ हूलूलू बेटावर आहे. येथून कोलंबोशी (श्रीलंका) दररोज व त्रिवेंद्रमशी (भारत) आठवड्यातून तीनदा हवाई वाहतूक चालते.माले व देशातील गां बेट यांदरम्यान आठवड्यातून दोनदा हवाई वाहतूक चालते. कुवेत, अबू धाबी, सौदी अरेबिया व इतर खनिज तेल निर्यातक देशांची संघटना (ओपेक) यांच्या आर्थिक मदतीने हूलूलू बेटावरील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यात आला आहे. राजधानी माले येथे व इतर काही बेटांवर चांगले रस्ते आहेत. देशात पायी किंवा सायकलने प्रवास करणाऱ्यांचे  प्रमाण खूपच आहे. देशात नोंदणीकृत असे ४५ ट्रक १२५ मोटारी, ६,००० सायकली (१९८२), ३१२ मोटारसायकली (१९७८) ७,१४९ बोटी व ३७ सागरगामी जहाजे होती (१९८१). ११,९५६ रेडिओ संच व १,५१९  दूरचित्रवाणी संच (१९८२),१,५८२ दूरध्वनी संच व ९५ टेलेक्स यंत्रे (१९८१) होती. नभोवाणी कार्यक्रमांचे प्रसारण १९६२ पासून, तर दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रसारण १९७८ पासून सुरू करण्यात आले आहे. १९७९ मध्ये माले येथून दोन दैनिके, एक साप्ताहिक व एक मासिक प्रसिद्ध होत होते.

लोक व समाजजीवन: अत्यंत कमी भूप्रदेश व जास्त लोकसंख्या यांमुळे देशात लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला ५३८ (१९८२) आहे राजधानी माले येथे तर केवळ १·६ चौ. किमी. क्षेत्रात ३२,००० (सु. २०%) इतकी प्रचंड लोकसंख्या एकवटलेली आढळते. दर हजारी जननप्रमाण ४५·८ व मृत्यूप्रमाण १२·८ होते (१९८२). मालदीवमधील मूळ रहिवाशांविषयी खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. ते द्रविड वंशीय असावेत, असा अंदाज आहे. उत्तरेकडील बेटांवरील लोकांचा पश्चिम भारत, अरबस्तान व उत्तर आफ्रिकेतील लोकांशी बेटी व्यवहार झाल्याने तेथे संमिश्र लोकसंख्या आढळते, तर दक्षिणेकडील बेटांवरील लोकांचे श्रीलंकेमधील सिंहली लोकांशी शारिरीक साम्य आढळते. आफ्रिकेमधून आणलेल्या निग्रो गुलामांनी केलेल्या आंतरजातीय विवाहांमुळे त्यांचेही मिश्रण येथे आढळते. काही कॉकेशियन व मले लोकही आहेत. प्राचीन मालदीवी लोक बौद्ध धर्मीय होते. बाराव्या शतकात त्यांचे इस्लामीकरण करण्यात आले. आज इस्लाम हाच येथील प्रमुख धर्म आहे. काही अपवाद वगळता बरेचसे सुन्नी मुस्लिम असून या धर्मावर दृढ निष्ठा असणाऱ्या अनुयायांनाच देशाचे नागरिकत्व मिळते. माले येथे एक इस्लामधर्मीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. देशात कायद्यानुसार वधूचे विवाहसमयीचे किमान वय १५ वर्षे ठरविण्यात आले असून घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे. १९७७ च्या जनगणनेनुसार ३० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या एकूण स्त्रियांपैकी जवळजवळ निम्म्या स्त्रियांनी चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा विवाह केलेले आढळले तर ८०% स्त्रियांनी निदान दोनदा तरी विवाह केलेले आहेत. १९८१ मध्ये ५,४२८ विवाहांची, तर ४,०१० घटस्फोटांची नोंद झाली. देशात फक्त २% प्रौढ स्त्रिया गर्भधारणाप्रतिबंधक उपायांचा अवलंब करतात. माले येथे ८६ खाटांची सोय असलेले रुग्णालय असून देशाच्या उत्तर व दक्षिण भागांत प्रत्येकी एक रुग्णालय उभारण्यात येत आहे. देशात ९ डॉक्टर, २३ परिचारिका, १५९ प्रसाविका व २२२ इतर आरोग्य सेवक होते (१९८१). सरासरी आयुर्मान ४६·५ वर्षे (१९७७) असून बालमृत्यूप्रमाण दर हजारी १२१ आहे. माले येथील काही घरांचे कोलंबोतील घरांशी साम्य आढळते. बहुतेक घरांच्या बांधणीत नारळाच्या लाकडाचा उपयोग केलेला दिसून येतो. घराचे छप्पर कौलारू किंवा जस्तविलेपित लोखंडाच्या पत्र्यांचे आढळते.

दिवेही ही मालदीवी राष्ट्रभाषा असून तिचे श्रीलंकेतील जुन्या सिंहली (एलू) भाषेशी साम्य आढळते. अलीकडे अरबी व उर्दू भाषांचा प्रभाव अधिक दिसतो. सतराव्या शतकात थाना लिपीचा विकास झाला असून ह्या लिपीत उजवीकडून डावीकडे लिहिण्याचा प्रघात आहे. सुमारे ३% मालदीवी इंग्रजी भाषा बोलतात. 

देशात १९७७ मध्ये एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी ८२% लोक साक्षर होते. येथील शिक्षणपद्धतीचे तीन प्रकार आहेत : (१) परंपरागत धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा (मखताब), (२) दिवेही माध्यमाच्या प्राथमिक शाळा (मद्रसा) व (३) इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा. यांपैकी मखताबमध्ये प्रामुख्याने कुराण, प्रारंभिक अंकगणित आणि ‘दिवेही’चे लेखन-वाचन शिकविले जाते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे लागते. १९८१ मध्ये देशातील ३१० प्राथमिक शाळांत ३४,५६२ विद्यार्थी व १,००६ शिक्षक ४ माध्यमिक शाळांत ३,२१३ विद्यार्थी व १३७ शिक्षक आणि एका व्यावसायिक शाळेत ३२ विद्यार्थी व ८ शिक्षक होते. माले येथील मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयात १३,००० पेक्षा अधिक ग्रंथ होते (१९८१). येथेच एक वस्तुसंग्रहालयही आहे. त्यात मालदीवच्या ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे. 

राजधानी माले हेच देशातील एकमेव महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून ते देशाच्या साधारण मध्यभागी वसलेले आहे. शहरात खेळांचे अनेक क्लब, शासकीय कार्यालये, बँका, शाळा, नभोवाणी केंद्र, डाकगृह, पर्यटन निवास, हॉटेले इ. सोयी उपलब्ध आहेत. 

चौधरी, वसंत

मालदीव प्रजासत्ताक   माले बंदर : एक दृश्य

राजधानी माले येथील प्रशासकीय कार्यालय