पालवाल : हरयाणा राज्याच्या गुरगाव जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३६,२०७ (१९७१). दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्ग व मध्य लोहमार्ग यांवरील हे स्थानक असून गुरगावच्या आग्नेयीस सु. ४५ किमी. व दिल्लीच्या दक्षिणेस सु. ५६ किमी.वर वसले आहे. पांडवांच्या राज्यात या ठिकाणाला महत्त्व होते. येथे स्तंभांवर उभारलेली एक मशीद व तांबड्या वालुकाश्मांची एक सुंदर घुमटाकार कबर आहे. ती सलीमगढ किल्ला बांधण्यासाठी आग्र्याहून दिल्लीला नेल्या जाणाऱ्या लाद्यांच्या प्रत्येक गाडीमागे एक लादी याप्रमाणे कर घेऊन, एका फकिराने बांधली असे म्हणतात. शहरात १८६७ पासून नगरपालिका असून शहराचा कारभार नगरपालिकीय समिती पाहते. कापूस, धान्य, साखर, तेलबिया यांच्या व्यापाराचे पालवाल हे केंद्र असून कापूस वटणी, हातमाग विणकाम हे उद्योगही येथे चालतात.

चौधरी, वसंत.