व्हेनेझुएला :  (रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला). दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत उत्तरेकडील कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावरील देश. क्षेत्रफळ ९,१६,४९० चौ. किमी. (कॅरिबियनमधील ७२ बेटांसह). ०० ३५’ ते  १२० ११’ उ. व ६०० १०’ ते ७३० २५’ प. यांदरम्यान पसरलेल्या या देशाचा दक्षिणोत्तर कमाल विस्तार १,०५० किमी. तर पूर्व – पश्चिम विस्तार १,२८५ किमी. आहे. सागरी किनारा एकूण २,८१३ किमी. लोकसंख्या २,१८,००,००० (१९९७ अंदाज). काराकास [लोकसंख्या महानगरीय ३१,२७,००० (१९९९ अंदाज)] ही देशाची राजधानी आहे. व्हेनेझुएलाच्या पूर्वेस गुयाना, दक्षिणेस ब्राझील, पश्चिमेस कोलंबिया, उत्तरेस कॅरिबियन समुद्र व ईशान्येस अटलांटिक महासागर आहे.

भूवर्णन : व्हेनेझुएलाचे चार प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात : (१) माराकायव्हो खोरे (२) अँडियन पर्वतीय उच्चभूमी (३) लानोज (४) गियाना उच्चभूमी.

(१) माराकायव्हो खोरे : देशाच्या वायव्य भागात हा विभाग असून त्यात माराकायव्हो सरोवर, व्हेनेझुएलाचे आखात व परिसरातील सखल व दलदलयुक्त भाग आणि पॅराग्वाना द्वीपकल्प यांचा समावेश होतो. क्षेत्रफळ सु. ६५,००० चौ. किमी. आग्नेयीकडील कॉर्डिलेरा दे मेरिदा पर्वतामुळे व ईशान्येकडील सिगोव्हीआ उच्च भूमीमुळे हा विभाग देशाच्या इतर भागापासून अलग झालेला आहे. माराकायव्हो हे द. अमेरिका खंडातील सर्वांत मोठे सरोवर आहे. ते एका उपखंडाचा भाग असून उथळ व गोड्या-मचूळ पाण्याचे बनलेले आहे. खंडातील सर्वाधिक ज्ञात खनिज तेलसाठे याच खोऱ्यात आहेत.

(२) अँडियन पर्वतीय उच्चभूमी : प्रामुख्याने उत्तर व्हेनेझुएलात हा विभाग मोडतो. कॅरिबियन किनाऱ्यावर असलेली बेटे म्हणजे अँडियन पर्वतश्रेण्यांचे शिरोभागच आहेत. देशातील सर्वाधिक लोक याच विभागात राहतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे त्याचे तीन विभाग पडतात : (अ) कॉर्डिलेरा दे मेरिदा (सिएरा नेव्हाडा) रांग-अँडियन पर्वताची देशातील ही सर्वांत उंच व मोठी पर्वतश्रेणी आहे. ईशान्य दिशेत ४८० किमी.पर्यंत तिचा विस्तार आहे. या रांगेची रुंदी १३ ते ६४ किमी. आहे. वनाच्छादित खोरी, गवताळ पठारे आणि देशातील एकमेव हिमाच्छादित पर्वतीय प्रदेश यातच आहे. ४,७०० मी.पेक्षा अधिक उंचीची अनेक शिखरे यात आहेत. पीको बोलीव्हार या सर्वोच्च शिखराची उंची ५,००७ मी. असून पीको हंबोल्टची उंची ४,९६१ मी. आहे. देशाच्या वायव्य भागात कोलंबिया-व्हेनेझुएला सरहद्दीवर अँडियन पर्वतातील स्येरा दे पेरीहा हा उंच कटक आहे. त्यातील शिखरांची उंची ३,४०० मी.पेक्षा अधिक असून कटकाची सरासरी उंची २,४०० मी. आहे. (ब) मध्यवर्ती उच्चभूती – तीमध्ये कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यालगत एकमेकींस समांतर दिशेत पसरलेल्या दोन पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. या दोन श्रेण्यांदरम्यान जे सुपीक खोरे आहे, त्यात लोकवस्तीची घनता अधिक आहे. हा भाग शेती व उद्योगधंद्यांच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचा आहे. (क) ईशान्येकडील उच्चभूमी – तीमध्ये कमी उंचीचे पर्वतीय भाग व टेकड्यांचा समावेश होतो. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे कारीपे नगराजवळील ग्वाचारो गुहेत ग्वाचारो नावाचे हजारो पक्षी राहतात.

(३) लानोज : मध्य व्हेनेझुएलातील सखल मैदानी व गवताळ प्रदेश लानोज किंवा ओरिनोको सखल भूमी म्हणून ओळखला जातो. अँडियन उच्चभूमी व गियाना उच्चभूमी यांच्या दरम्यान हा प्रदेश येतो. तसेच पश्चिमेस कोलंबिया सरहद्दीपासून पूर्वेस अटलांटिक महासागर किनाऱ्यावरील ओरिनोको नदीच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत याचा विस्तार झालेला आहे. या प्रदेशाचा मंद उतार ओरिनोको त्रिभुज प्रदेशाकडे आहे. उंची २·१५ मीटरपेक्षा क्वचितच अधिक आहे. देशाचे एक तृतीयांश क्षेत्र या विभागाने व्यापले आहे. गियाना उच्चभूमी प्रदेशातून वाहत येणारी ओरिनोको नदी लानोज प्रदेशाच्या दक्षिण सरहद्दीवरून पश्चिमेकडून पूर्वेस वाहते. ओरिनोको व तिच्या उपनद्यांनी देशाच्या फार मोठ्या प्रदेशाचे जलवाहन केलेले आहे. ओरिनोको ही देशातील सर्वांत लांब नदी (२,०६६किमी.) आहे. लानोजचा बहुतांश भाग विस्तृत चराऊ कुरणांखाली आहे. येथील गुराख्यांना ‘लानेरो’ असे संबोधले जाते. लानोजमध्ये कृषिक्षेत्रही आहे. दीर्घ काळ कोरडा ऋतू असल्यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासते. तांदूळ व तीळ ही उत्पादने या विभागात घेतली जातात. महत्त्वाची खनिज तेल-क्षेत्रे लानोजच्या पूर्व भागात आहेत.

(४) गियाना उच्चभूमी : हा विभाग आग्नेय भागात असून त्याने देशाचे जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. ओरिनोको नदीपासून दक्षिणेस हा प्रदेश उंचावला गेला आहे. भूशास्त्रीयदृष्ट्या हा देशातील सर्वांत जुना भूप्रदेश असून ओबडधोबड व ग्रॅनाइटी गिरिपिंडयुक्त आहे. जे विस्तृत पठारी प्रदेश आहेत, त्यांचे काठ उंच कड्यांप्रमाणे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी त्या कड्यांची उंची ७६२ मी.पर्यंत आढळते. येथे महाकाय व सपाट माथ्याचे जे पर्वतीय भाग आहेत, त्यांना ‘टेपुई’ म्हणतात. पायथ्याकडून ते अगदी काटकोनात कड्याप्रमाणे उंचावत गेलेले असून ती उंची २,१८० मी.पर्यंत वाढत गेलेली आढळते. अतिशय वेगाने वाहणाऱ्या नद्यांमुळे या विभागातील उंच पठारांचे खोलपर्यंत खनन झालेले आहे. या विभागातच जगातील सर्वांत उंच (९७९ मी.) एंजेल धबधबा आहे. उष्णकटिबंधीय अरण्यांनी या प्रदेशाचा बराचसा दक्षिण भाग व्यापला आहे. गियाना उच्च भूमीत इंडियन जमाती विखुरलेल्या आहेत. येथील वस्ती विरळ असून काही भाग निर्जन आहेत. या प्रदेशात बॉक्साइट, लोहखनिज, मँगॅनीज, सोने अशी किमती खनिजे आढळतात. स्यूदाद गुयानाजवळ काही नद्यांवर वीजनिर्मितीसाठी धरणे बांधली आहेत.

व्हेनेझुएलात सानारे हा एक जागृत ज्वालामुखी असून त्याचा सर्वांत अलीकडील उद्रेक १९२७ मध्ये झाला होता.

मृदा व खनिजे : देशात नापीक व तांबड्या रंगाची उष्णकटिबंधीय जांभी मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते. लागवडीखालील क्षेत्र प्रामुख्याने किनारी प्रदेशात, माराकायव्हो सखल प्रदेशात आणि पर्वतश्रेण्यांदरम्यानच्या खोऱ्यांमध्ये आढळते.

जगाच्या सु. सात टक्के खनिज तेलसाठे आणि सु. तीन टक्के नैसर्गिक वायूचे साठे देशात आहेत. खनिज तेलाप्रमाणेच लोहखनिज, बॉक्साइट या उत्पादनांमुळे देशाला उत्पन्न मिळते. याशिवाय सोने, हिरे, कोळसा व मीठ यांचे साठेही देशात आहेत.

नद्या व सरोवरे : ओरिनोको ही देशातील सर्वांत मोठी व महत्त्वाची नदी (लांबी २,७३५ किमी.) आहे. आपल्या ४३६ उपनद्यांसह ही नदी अँडियन पर्वतश्रेणीच्या दक्षिण उताराचे तसेच लानोज व गियाना उच्चभूमी या विभागांच्या बहुतांश भागाचे जलवाहन करते. ब्राझीलच्या सरहद्दीजवळ गियाना उच्चभूमीमध्ये तिचा उगम होतो. कमाल पर्जन्यवृष्टीच्या काळात तिच्या पाण्याची पातळी १२ मी. ने वाढते. अटलांटिक महासागरातील भरतीच्या लाटांचा शिरकाव मुखापासून आत ४१८ किमी. वरील स्यूदाद बोलीव्हारपर्यंत होतो. ओरिनोकोचे पात्र काही ठिकाणी ८ किमी.पर्यंत रुंद झालेले आढळते. सु. ५० मुखांनी ती अटलांटिक महासागराला मिळते. तिचे मुख्य पात्र खोल असून स्यूदाद बोलीव्हारपर्यंत सागरी जहाजे जाऊ शकतात. कोलंबिया सरहद्दीवरील प्वेर्तो आयरकूचोपर्यंत पडावाद्वारे वाहतूक करता येते. देशांतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने ही नदी विशेष उपयुक्त आहे.

गियाना उच्चभूमीवरून वाहणाऱ्या ओरिनोकोच्या उपनद्या तेथील ‘टेपुई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सपाट माथ्याच्या पर्वतीय प्रदेशावरून अतिशय वेगाने वाहतात. अशाच एका ‘टेपुई’वरून एंजेल हा जगातील सर्वांत उंच धबधबा दरीत कोसळतो. ओरिनोको प्रणालीची जलविद्युत्‌-निर्मितिक्षमता फार मोठी आहे. कोरोनी ही ओरिनोकोची आग्नेय भागातील शीघ्रवाही उपनदी. या उपनदीवरील गुरी हे धरण जगातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. कारोनी नदीखोऱ्यात समृद्ध खनिज साठे आहेत.

आपूरे ही ओरिनोकोची सर्वांत मोठी उपनदी अँडीज पर्वतात उगम पावते. पश्चिम लानोजमध्ये ती जलवाहतुकीस उपयुक्त ठरते. माराकायव्हो हे द. अमेरिका खंडातील सर्वांत मोठे सरोवर (२१० x १२० किमी. क्षेत्रफळ १३,५१२ चौ. किमी.) असून त्यास व्हेनेझुएला आखाताकडे ८ ते १४·५ किमी. रुंदीचे प्रवेशद्वार (चॅनेल) आहे. त्यातील गाळ काढून हा मार्ग जलवाहतुकीस खुला ठेवण्यात येतो. त्याची खोली ११ मी. असून या मार्गाने तेलाचे मोठे टँकर व २८,००० टन वजनापर्यंतची इतर जहाजे माराकयव्हो बंदरात येऊ शकतात. लहान सागरी जहाजे सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत जाऊ शकतात. उथळ किनारी भागात सरोवराची सरासरी खोली ९ मी. आहे. माराकायव्होचे पाणी मचूळ असून ते पिण्यासाठी किंवा जलसिंचनासाठी उपयुक्त ठरत नाही. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाच्या मध्यवर्ती खोऱ्यात गोड्या पाण्याचे व्हॅलेंशिया सरोवर आहे (२९ X १६ किमी.).

हवामान : व्हेनेझुएला पूर्णपणे उष्ण कटिबंधात मोडतो. देशाचे अगदी दक्षिणेकडील टोक विषुववृत्तापासून ८० किमी.पेक्षा कमी अंतरावर असले, तरी प्रदेशाची उंची व प्रचलित वारे यांमुळे तापमान व आर्द्रता यांत विविधता आढळते. आर्द्र विषुववृत्तीय किंवा डोलड्रम पट्ट्याचा उन्हाळ्यात होणारा परिणाम व कोरड्या व्यापारी वाऱ्यांचा हिवाळ्यात पडणारा प्रभाव या चक्रनेमिक्रमाने येथील ऋतू ओळखले जातात. तापमानापेक्षा पर्जन्यमानातील फरकानुसार येथील ऋतू स्पष्ट होतात. तापमान वर्षभर सामान्यपणे सारखेच असते. उंचीनुसार मात्र त्यात फरक पडत जातो. तीनुसार तापमानाचे तीन विभाग आढळतात. ८०० मी.पेक्षा कमी उंचीचे प्रदेश उष्ण असून तेथील दैनिक सरासरी तापमान २४० से.पेक्षा अधिक असते. ८०० ते २,००० मी. उंचीचे प्रदेश समशीतोष्ण असून तेथील दैनिक सरासरी तापमान १०० ते २७० सें. यांदरम्यान असते तर २,००० मी.पेक्षा अधिक उंचीचे प्रदेश शीत असून तेथील दैनिक सरासरी तापमान १८० से.पेक्षा कमी असते. केवळ शीत प्रदेशात रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते. अशी परिस्थिती कॉर्डिलेरा दे मेरिदा प्रदेशातील अधिक उंचीच्या भागात आढळते. केवळ तेथेच काही भागात कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेश व हिमनद्या आढळतात.

पर्जन्यमानातही प्रादेशिक भिन्नता आढळते. व्हेनेझुएला जरी हरिकेन पट्ट्याच्या दक्षिणेस येत असला, तरी ऋतुनुसार उत्तर अटलांटिक उच्चदाब प्रदेशामुळे निर्माण होणाऱ्या व्यापारी वऱ्यांचा प्रभाव येथे आढळतो. या वाऱ्यांमुळे महासागरी भागात पाऊस पडतो मात्र मार्गारीटा बेटापासून पॅराग्वाना द्वीपकल्पापर्यंतचा पर्वतीय किनारी भाग शुष्क राहतो. तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०·८ सें.मी.पेक्षा कमी आहे. माराकायव्हो सरोवराच्या पश्चिमेस असलेल्या पेरीहा-पर्वतात, तसेच गियाना उच्च भूमीच्या दक्षिण भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०५ सेंमी. आढळते. पूर्व लानोजमध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०० सेंमी. आहे. मे-ऑक्टोबर या पावसाळी मोसमात लानोज प्रदेशात नेहमीच मोठी पूरपरिस्थिती निर्माण होते. माराकायव्होच्या दक्षिणेकडील सखल भागात व ओरिनोकोच्या त्रिभुज प्रदेशात पावसाचे प्रमाण बरेच अधिक आहे (वार्षिक सरासरी २०३ सेंमी.). गियाना उच्च भूमीचे उंच पठारी भाग व उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील मध्यवर्ती खोऱ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो.

वनस्पती व प्राणी : दक्षिण अमेरिकेतील वनस्पतींची विविधता इतर देशांप्रमाणेच व्हेनेझुएलातही आढळते. देशातील सु. दोन पंचमांश क्षेत्र अरण्यांखाली असून निम्मे क्षेत्र गवताळ प्रदेशांखाली आहे. प्रामुख्याने लानोज, गियाना उच्चभूमीतील उंच पठारी प्रदेश व अँडीजमधील उंच अल्पाईन प्रदेशात गवताळ कुरणे आढळतात. वनस्पतिविशेषांनुसार देशाचे वेगवेगळे विभाग पडतात. त्यांपैकी उत्तरेकडील कॅरिबियन किनाऱ्यावर काटेरी वनस्पती आढळतात. व्हेनेझुएलातील अँडीज पर्वतउतारावर दाट अरण्ये आहेत. ओरिनोको खोऱ्यातील वनस्पतिजीवनात बरीच विविधता आढळते. दक्षिण भागात वर्षारण्ये आढळतात.

देशाच्या बहुतांश दक्षिण भागाचे ॲमेझॉन खोऱ्यातील वनस्पतिजीवनाशी साम्य आहे. त्यात रबरासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पती आढळतात. ओरिनोको खोऱ्याचा उत्तरेकडील गवताळ लानोज प्रदेश उष्णकटिबंधीय  पानझडी किंवा सदाहरित वर्षारण्यांखाली आहे. दक्षिणेकडे व पूर्वेकडे ब्राझील आणि गुयाना सरहद्दीजवळ पानझडी वनांची जागा वैशिष्ट्यपूर्ण ॲमेझॉनी वर्षारण्यांनी घेतलेली असून त्यात अधूनमधून सॅव्हाना प्रकारच्या वनस्पतींचे मिश्रण आढळते.

व्हेनेझुएलात सामान्यपणे जग्वार, प्यूमा, ऑसेलॉट, रानटी कुत्रे, मार्टेन, ऊद मांजर, माकड, कॅव्ही, न्यूट्रिआ, साळिंदर, टॅपिर, पेकारी, हरीण, ऑपॉस्सम इ. प्राणी आढळतात. तसेच जलाशयांच्या भागात सर्वत्र कासवे, मगरी, सुसरी इ. आढळतात.

इतिहास व राजकीय स्थिती : युरोपीय वसाहतपूर्व काळात व्हेनेझुएलात कॅरिब इंडियन लोक पूर्व भागात, तर आरावाक इंडियन लोक पश्चिम भागात वस्तीला होते. या जमाती शेती, शिकार, मासेमारी व वनोत्पादने गोळा करीत. युरोपीय येथे आल्यानंतर त्यांच्याबरोबर आलेल्या रोगांमुळे अनेक इंडियन मरण पावले. इतर अनेक जण उपासमारीमुळे मृत्युमुखी पडले, तर काही जण युद्धात मारले गेले. या इंडियन जामतींनी युरोपीय अतिक्रमणाला प्रारंभी तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न केला. क्रिस्तोफर कोलंबसाने इ. स. १४९८ मधील आपल्या तिसऱ्या अमेरिकन सफरीत व्हेनेझुएलाच्या ईशान्य किनाऱ्यावर म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या मूख्य भूमीवर पहिले पाऊल ठेवले. इ. स. १४९८ व १४९९मध्ये स्पॅनिशांनी दक्षिण अमेरिकेच्या कॅरिबियन किनाऱ्याचे बरेच समन्वेषण केले. त्यापाठोपाठ स्पॅनिश वसाहतकार या प्रदेशात दाखल झाले. आमेरिगो व्हेसपूचीसह आलेला आलाँसो दे ऑकेथा हा स्पॅनिश समन्वेषक १४९९ मध्ये माराकायव्हो सरोवरमार्गे व्हेनेझुएलाच्या भूमीवर आला व त्याने या प्रदेशास  व्हेनेझुएला (लिटल व्हेनिस) असे नाव दिले. पंधराव्या शतकाच्या प्रारंभकाळात मार्गारीटा व कूबाग्वा बेटांच्या सभोवतालच्या सागरी भागातील शिंपल्यांतून मोती मिळविण्यासाठी स्पॅनिश वसाहतकार येथे मोठ्या संख्येने आले. अराया द्वीपकल्पापासून केप कॉडेरापर्यंतच्या किनाऱ्याला त्याने पर्ल कोस्ट (मोत्यांचा किनारा) असे नाव दिले. अराया द्वीपकल्पभागात गेल्या काही शतकांपासून मिठाचे उत्पादन घेतले जात आहे. इ. स. पू. २००० पासून येथील विस्तृत किनारी प्रदेशात, तसेच लानोज प्रदेशात वेगवेगळ्या जमातींची मोठी वस्ती होती. कूमाना ही व्हेनेझुएलातील पहिली युरोपीय (स्पॅनिश) वसाहत इ. स. १५२३ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून तीन शतके व्हेनेझुएला ही स्पॅनिश वसाहत राहिली. तिच्यावर स्पेनमधील पाद्री व नोकरशाहीचे वर्चस्व होते. सतराव्या शतकात स्पॅनिशांची दक्षिण अमेरिकेतील ही सर्वांत गरीब वसाहत होती. वसाहत काळात शेती हा येथील प्रमुख व्यवसाय होता. कोको व तंबाखू ही प्रमुख पिके घेतली जात व काही प्रमाणात पशुपालन-व्यवसाय केला जाई. पुढे कातडी, तंबाखू व कोको यांचा किफायतशीर, पण बेकायदेशीर व्यापार वाढला. त्याबरोबरच व्हेनेझुएला हे चाचेगिरीचे व चोरट्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. त्यामध्ये इंग्रज व डच लोकांचा सहभाग अधिक होता. क्रीओल लोकांनी येथील गोऱ्यांच्या वसाहतीतील संपत्तीचा, विशेषतः जमिनींचा ताबा घेऊन स्थानिक जमातींना गुलामगिरीत ठेवले.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीला स्पॅनिश वसाहतींनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. इ. स. १८१०पासून फ्रांथीस्को दे मीरांदा व सीमॉन बोलीव्हार यांच्या नेतृत्वाखाली क्रीओल लोकांनी स्पेनपासून स्वतंत्र होण्यासाठी चळवळ सुरू केली. व्हेनेझुएलन वसाहतीने ५ जुलै १८११ रोजी आपल्या स्वातंत्र्याची एकतर्फी घोषणा केली. १८२१मध्ये व्हॅलेंशियाजवळील कारोबोबो येथे बोलीव्हारने स्पॅनिशांविरुद्ध मोठा विजय मिळविला व व्हेनेझुएलातील स्पॅनिश सत्ता संपुष्टात आली. दरम्यानच्या काळात १८१९ मध्ये बोलीव्हार हा ‘ग्रान (ग्रेटर) कोलंबिया’चा राष्ट्राध्यक्ष बनला होता. ग्रान कोलंबिया म्हणजे सांप्रतचे व्हेनेझुएला, कोलंबिया, एक्वादोर व पनामा या देशांचे संयुक्त प्रजासत्ताक. १८२९ मध्ये व्हेनेझुएलाने ग्रान कोलंबियातून बाहेर पडून आपले स्वतंत्र संविधान तयार केले (१८३०). १८३० ते १९५८ या काळात व्हेनेझुएलावर सामान्यपणे एकामागून एक आलेल्या लष्करी हुकूमशहांचीच सत्ता होती. जनरल आंतोन्यो गुझमान ब्लांग्को (कार. १८७०–८८), जनरल सीप्रीआनो कास्त्रो (१८९९ – १९०८) व क्वान बीसेंते गोमेस (१९०९-३५) हे त्यांपैकी प्रमुख लष्करी सत्ताधीश होत. व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्य चळवळीचा नेता होसे आंतोन्यो पाएझ हा १८३१ मध्ये नव्या व्हेनेझुएला प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला. पुढे ब्लांग्कोने आपल्या कारकिर्दीत (१८७० – ८८) शिक्षण, दळणवळण व आर्थिक सुधारणा केल्या परंतु चर्चची सत्ता झुगारली व खूप संपत्ती गोळा केली. त्यामुळे त्यास सत्तेवरून खाली खोचण्यात आले. पुढील चार वर्षे क्वाकीन क्रेस्पो याची हुकूमशाही राहिली. त्याच्या कारकिर्दीतच व्हेनेझुएलाचा ब्रिटिश गियानाबरोरील सीमासंघर्ष सुरू झाला. नंतरच्या सीप्रीआनो कास्त्रोच्या कारकिर्दीत आर्थिक भ्रष्टाचार वाढून प्रशासन कमजोर झाले. कास्त्रो युरोपच्या दौऱ्यावर असताना गोमेसने सत्ता हस्तगत केली. त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश, डच व अमेरिकन खनिज तेलकंपन्या व्हेनेझुएलात आल्या आणि देशातील खनिज तेलउद्योगाचा विकास घडून आला. परिणामतः १९३० च्या सुमारास व्हेनेझुएला जगातील एक अग्रेसर तेल उत्पादक देश बनला परंतु गोमेस हा एक जुलमी हुकूमशहा होता. आपल्या अनेक विरोधकांना तसेच उदारमतवादी व्यक्तींना त्याने जुलमाने तुरुंगात डांबले किंवा विश्वासघाताने ठार मारले. राष्ट्राची तिजोरी त्याची खाजगी मालमत्ता बनली होती. त्याने शिक्षण, आरोग्य, शेतीसुधारणा, गृहनिर्माण यांसारख्या देशातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. १९३५ मध्ये जेव्हा तो मरण पावला, तेव्हा लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. १९३५ नंतर मात्र हुकूमशाही राज्यकर्त्यांना जनतेचा विरोध वाढू लागला. डेमॉक्रॉटिक ॲक्शन पार्टी (इं. भा.) या पक्षाला लष्कराचाही पाठिंबा मिळू लागला. गोमेसच्या नंतर त्याच्या मंत्रिमंडळातील युद्धमंत्री जनरल एलेआसार लोपेस काँट्रीरास सत्तेवर आला. त्याने काही सार्वजनिक हिताच्या गोष्टी केल्या. त्यानंतर जनरल ईसाईआस मेदीना आंगारीटा सत्तेवर आला. त्याने जमीनसुधारणा तसेच देशाच्या दृष्टीने अधिक अनुकूल ठरणारे करार विदेशी कंपन्यांशी करण्याचा प्रयत्न केला. व्हेनेझुएला व गुयाना (पूर्वीचा ब्रिटिश गियाना) यांदरम्यानच्या सरहद्दीबाबतचा प्रश्न दीर्घ काळापर्यंत अनिर्णित राहिला.

व्हेनेझुएलात १८ ऑक्टोबर १९४५ रोजी क्रांतीचा भडका उडाला. काराकासमध्ये तर जोरदार चकमकी झाल्या. डेमॉक्रॅटि ॲक्शन पार्टीचा (एडी) तरुण नेता रोम्यूलो बेटांकूर्ट हा राष्ट्राध्यक्ष बनला. त्याने विदेशी तेलकंपन्यांचे हितसंबंध जपले. त्याच्या मंत्रिमंडळातील अकरा सदस्यांपैकी सात तरुण सदस्यांचे शिक्षण संयुक्त संस्थानांत झाले होते. त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका कृषितज्ञाकडे कृषिखाते आले. १९४६-४७ मध्ये संविधान समिती सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत ‘एडी’ पक्षाला निर्णायक बहुमत मिळाले, परंतु नंतरच्या सरकारांमध्ये बरीच उलथापालथ झाली. त्यामुळे पुढील काही सरकारे अस्थिर राहिली. एडी पक्षाचा नेता रोम्यूलो गाल्‌यागो याची १९४७ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, परंतु १९४८ मध्ये लष्कराने गाल्‌यागोची सत्ता झुगारून दिली. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत तीन लष्करी अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे व्हेनेझुएलावर राज्य केले. १९५० मध्ये मार्कोस पेरेझ हीमेनेद हा सत्ताधीश बनला. १९५८ मध्ये झालेल्या बंडात त्याला पदच्युत करून हद्दापार करण्यात आले. त्याच वर्षी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या रोम्यूलो बेटांकूर्ट या ‘एडी’ पक्षनेत्याचे शासन अधिकारावर आले. लोकनिर्वाचित आणि पूर्ण नियतकाल (१९५९ – ६४) सत्तेवर राहणारे रोम्यूलो बेटांकूर्ट हे व्हेनेझुएलाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. १९६१ मध्ये नवीन संविधान स्वीकारण्यात आले. मार्च १९६४ मध्ये ‘एडी’ पक्षाचे उमेदवार डॉ. राऊल लेओनी हे राष्ट्राध्यक्ष झाले. लेओनी शासनानेही कृषिउत्पादकता वाढविण्याकडे व औद्योगिक विकासावर भर दिला. लेओनीनंतर राफाएल कॅल्डेरा हे १९६९ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. १९७४ मध्ये कार्लोस आंद्रेस पेरेझ राष्ट्राध्यक्ष झाले व त्यांनी लोहखनिज खाणकाम व तेलउत्पादन कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. १९७८ मध्ये सोशल ख्रिश्चन पार्टीचे उमेदवार लुईस हेरेरा कँपीन्स हे अल्प मताधिक्याने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीत व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था कमकुवत बनली. विदेशी कर्ज तिप्पट झाले. राहणीखर्च दुप्पट वाढला. त्यामुळे १९८३ च्या निवडणुकीत ‘एडी’ पक्षाचे उमेदवार जेमी लुसिंची मोठ्या मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. १९८८ च्या निवडणुकीत कार्लोस आंद्रेस मोठ्या मताधिक्याने पुन्हा सत्तेवर आले.

व्हेनेझुएला हे एक प्रजासत्ताक संघराज्य आहे. व्हेनेझुएलाच्या इतिहासातील देशाचे तेविसावे संविधान १९६१ मध्ये अमलात आले. त्यानुसार राष्ट्राध्यक्षांची निवड पाच वर्षांसाठी प्रत्यक्ष सार्वत्रिक मतदान पद्धतीने होते. तसेच केंद्रीय व राज्य विधिमंडळांच्या लोकप्रतिनिधींची निवडही करण्यात येते. राष्ट्राध्यक्ष व त्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य हे जन्माने व्हेनेझुएलन असावेत, तसेच त्यांचे किमान वय ३० वर्षे असावे असे बंधन आहे. राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्यांदा १० वर्षे निवडणूक लढविता येत नाही.

डेमॉक्रॅटिक ॲक्शन पार्टी (एडी) हा व्हेनेझुएलातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. सोशालिस्ट इंटरनॅशनल हा सभासद पक्ष आहे. १९४७, १९५८, १९६३, १९७३, १९८३ व १९८८च्या निवडणुकांत या पक्षाने विजय मिळविला होता. सोशल ख्रिश्चन पार्टी (सीओपीईआय्) हा दुसरा महत्त्वाचा पक्ष असून त्याने १९६८ व १९७८मधील निवडणुका जिंकल्या होत्या. मूव्हमेंट टोवर्ड सोशॅलिझम (एम्ए्एस्) हा देशातील डाव्या विचारसरणीचा प्रमुख पक्ष आहे.

आर्थिक स्थिती : व्हेनेझुएला हा खनिज तेलउत्पादन व निऱ्यात या बाबतींत जगातील एक अग्रेसर देश आहे. १९२०च्या दशकात खनिज-तेलउत्पादन उद्योगाच्या भरभराटीस सुरुवात झाली. येथील परंपरागत अर्थव्यवस्था कॉफी, कोको, तंबाखू व साखर यांसारख्या कृषि-उत्पादनांवर आधारित होती. या उत्पादनांची निर्यातही करण्यात येई.

व्हेनेझुएलाच्या एकूण भूक्षेत्रफळापैकी केवळ ४% क्षेत्र कृषियोग्य असून त्यातील जवळजवळ एक तृतीयांश पडीक जमीन आहे. देशातील १५% श्रमबल शेतीमध्ये गुंतले असून वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची सतत आयात करावी लागते. सुमारे ५०% शेतकरी उदरनिर्वाह-स्वरूपाची शेती करतात. निम्म्यापेक्षा अधिक शेतांचा आकार २० हेक्टरांपेक्षा कमी आहे. राष्ट्रीय उत्पन्नापैकी ९ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न या व्यवसायातून प्राप्त होते. देशातील कृषि-उत्पादनांत केळी, मका, गहू, तांदूळ, ज्वारी, द्विदल धान्ये या पिकांचा व कापूस, ऊस, कॉफी व कोको या नगदी पिकांचा समावेश होतो. शासनामार्फत शेतकऱ्यांना भांडवल, तांत्रिक व यंत्रसामग्रीविषयक मदत देण्यात येते. १९९५ मधील कृषि-उत्पादने पुढीलप्रमाणे : (उत्पादन हजार टनांमध्ये). तांदूळ ६४३ कसाव्हा २८५ ऊस ६,९०० केळी १,२१५ संत्री ४४० बटाटे २१५ टोमॅटो २४४.  लानोज प्रदेशात पशुपालन-व्यवसायाचा बराच विकास करण्यात आला आहे. तरीही मांस आयात करावे लागते.

देशातील दक्षिणेकडील जवळजवळ निम्मा प्रदेश अरण्यांनी व्यापला आहे. मॅहॉगनीसारखे कठिण लाकडाचे उपयुक्त वृक्ष असूनही वनोद्योगाचा विशेष विकास झालेला नाही. देशातील लाकूडउत्पादन २२,५४,००० घ.मी. होते (१९९४). विस्तृत समुद्रकिनारा लाभूनही मासेमारी व्यवसायाचा विशेष विकास झालेला नाही. अँकोव्ही जातीचे मासे येथे अधिक पकडले जातात. माराकायव्हो प्रदेशातून कोळंबीची निऱ्यात केली जाते. १९९४ मधील मत्स्योत्पादन ४,२४,००० टन होते.

देशातील प्रमुख तेलक्षेत्र माराकायव्हो खोरे व पूर्व लानोजमध्ये असून सु. ७५% खनिज तेल-उत्पादन माराकायव्हो सरोवराच्या परिसरातून होते. खनिज तेलाखालोखाल नैसर्गिक वायू-उत्पादनाचा क्रम लागतो. खनिज तेलसाठ्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या उत्पादन-कपातीच्या धोरणामुळे १९९० पासून खनिज तेलउत्पादनात घट झाली आहे. निऱ्यातीपासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ९४% उत्पन्न खनिज तेलापासून मिळते. देशाचे सु. २७% राष्ट्रीय उत्पन्न या व्यवसायातून मिळते.

व्हेनेझुएलातील खनिज तेलउत्पादनात १९७६ पूर्वी प्रामुख्याने ब्रिटिश व अमेरिकन कंपन्यांचे वर्चस्व होते. १९७६ मध्ये येथील खनिज तेलउद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. पुढे १९९२ पासून पुन्हा खाजगी व विदेशी गुंतवणूकदारांना परवाने देण्यात आले. १९९५ मधील देशातील अशुद्ध तेलाचा प्रतिदिनी उत्पादनाचा अंदाज सु. २६,५७,००० पिंपे असा आहे. येथील तेलाची सर्वाधिक निऱ्यात संयुक्त संस्थानांना होते. १९९४ मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन २·८३ अब्ज घ.मी. इतके झाले. याशिवाय लोहखनिज, बॉक्साइट, कोळसा, हिरे, सोने, जिप्सम, फॉस्फेट ही खनिजउत्पादनेही महत्त्वाची आहेत. देशात १९९५ मध्ये पुढीलप्रमाणे प्रमुख खनिजउत्पादने झाली (उत्पादन हजार टनांत) : लोहखनिज २३,४२४ कोळसा ४,६४६ व सोने ३,२८७ किग्रॅ.

निर्मिति-उद्योगांत १९७० पासून वेगाने वाढ होत गेली. देशातील १५% कामगार कारखानदारीतील असून २३% राष्ट्रीय उत्पन्न या व्यवसायातून मिळते. निर्मिति-उद्योगाचा विस्तार काराकास, उत्तरेकडील किनारी प्रदेशातील माराकायव्हो व मोरोन, ओरिनोकोच्या पूर्वेकडील खोऱ्यात स्यूदाद गुयाना इ. भागांत झालेला आढळतो. यांपैकी माराकायव्हो येथे प्रामुख्याने खनिज तेल-शुद्धीकरण, खाद्यपदार्थ व अवजड यंत्रसामग्री यांची निर्मिती होते. मोरोन येथे खनिज तेल-रसायन उद्योगांचे, तर स्यूदाद गुयाना येथे पोलाद व ॲल्युमिनियम उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. लोहखनिज व बॉक्साइटचे विपुल साठे, पुरेसा विद्युत्‌पुरवठा व समुद्रसान्निध्य या घटकांच्या उपलब्धतेमुळे लोहपोलाद व ॲल्युमिनियम उद्योगांचा वेगाने विकास झाला. खनिज तेल – रसायन उद्योगाचीही शासकीय प्रोत्साहनामुळे मोठी वाढ झाली आहे. याशिवाय सिमेंट, रबरी उत्पादने, सिगारेटी, खाद्यपदार्थ – प्रक्रिया, वस्त्रोद्योग, जहाजबांधणी, खते, बीर, साबण, औषधे, काचेच्या वस्तू इत्यादींची  निर्मिती हे उद्योग देशात आहेत. देशातील पोलादउत्पादन ३१·४ लक्ष टन, ॲल्युमिनियम ६,१७,००० टन आणि सिमेंट उत्पादन ४५·६ लक्ष टन इतके होते (१९९४). १९९६ मध्ये ५,९६,६७६ पर्यटकांनी व्हेनेझुएलाला भेट दिली.

या देशाचा संयुक्त संस्थानांशी ४२% आयात व्यापार व ४९% निऱ्यात व्यापार चालतो.  याशिवाय जर्मनी, जपान यांच्याशीही व्यापारी संबंध आहेत. कोलंबिया व मेक्सिको या शेजारील देशांबरोबर व्हेनेझुएलाचा खुला व्यापारकरार १ जानेवारी १९९५ पासून अमलात आला आहे. प्रामुख्याने खनिज तेल, खनिज तेल-उत्पादने व ॲल्युमिनियम यांची निर्यात, तर रसायने, औद्योगिक यंत्रसामग्री, आधारभूत औद्योगिक उत्पादने, वाहतुकीची साधने, खाद्यपदार्थ, चैनीच्या उपभोग्य वस्तू यांची आयात केली जाते. १९९७ मधील एकूण आयातमूल्य १२·७ महापद्म अमेरिकी डॉलर व निर्यातमूल्य २१·४ महापद्म अमेरिकी डॉलर होते. खनिज तेलाचे निर्यातमूल्य १२·६ महापद्म अमेरिकी डॉलर एवढे होते (१९९१).

बोलीव्हार हे व्हेनेझुएलाचे चलन असून १०० सेंटिमो बरोबर एक बोलीव्हार होतो. ५, १०, २०, ५०, १००, ५००, १,००० व ५,०० बोलीव्हारच्या नोटा आणि ५, २५ व ५० सेंटिमोची, तसेच १, २ आणि ५ बोलीव्हारची नाणी चलनात आहेत.

देशात ६२,००० किमी. लांबीचे बारमाही खुले रस्ते असून त्यांपैकी २४,००० किमी. लांबीचे रस्ते फरसबंदी आहेत. लोहमार्ग विकास बेताचाच झालेला आहे. काही लोहमार्ग औद्योगिक क्षेत्रापुरते मऱ्यादित आहेत. काराकास येथे भुयारी रेल्वेमार्ग आहे. ला ग्वायरा हे काराकासचे तसेच देशातील प्रमुख बंदर आहे. त्याशिवाय मारकायव्हो, प्वेर्तो काबेलो, प्वेर्तो ऑर्डाझ व ग्वांता ही इतर सागरी बंदरे आहेत. ओरिनोको आणि तिच्या आपूरे व आराउका ह्या उपनद्या जलवाहतुकीच्या दृष्टीने विशेष उपयुक्त आहेत. काराकासजवळील सीमॉन बोलीव्हार एअरपोर्ट हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. देशात दोन शासकीय व चार सांस्कृतिक आणि बाकीची व्यापारी रेडिओ केंद्रे आहेत. चार शासकीय, तीन व्यापारी व तीन इतर दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. देशात १०७·५ लक्ष रेडिओ संच व ४१ लक्ष दूरचित्रवाणी संच होते (१९९७). प्रमुख दैनिक वृत्तपत्रे ८६ असून त्यांचा खप ४६ लाखांपेक्षा अधिक होता (१९९६).

सार्वजनिक प्रशासन, संरक्षण, व्यापार व निर्मितिउद्योग यांमध्ये राष्ट्रीय श्रमबल विभागले आहे. सेवाव्यवसायांत ६०% कर्मचारी आहेत. १९७० ते १९८५ या काळात या देशातील आर्थिक भरभराटीमुळे लगतच्या देशांतून, विशेषतः कोलंबियातून मोठ्या प्रमाणावर कामगार आले. येथील कामगार चळवळ नेहमीच कार्यक्षम राहिली आहे. १९९५ मध्ये कामगारांची संख्या ८५,४४,००० होती. पैकी १० लक्ष कामगार कृषिव्यवसायात गुंतले होते. बेरोजगारीचे प्रमाण १०·५% होते (१९९७).

लोक व समाजजीवन : अनेक इंडियन जमाती या येथील मूळ रहिवासी होत. पुढे स्पॅनिश वसाहतकारांनी आफ्रिकेतून बऱ्याच गुलामांची आयात केली. इंडियन, स्पॅनिश व आफ्रिकन मिळून बनलेल्या मिश्रवंशीय लोकांचा आधुनिक व्हेनेझुएलन समाज आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५% हा समाज आहे. या लोकांना ‘मेस्टिझो’ असे म्हटले जाते. उर्वरित २०% गोरे व ८% कृष्णवर्णीय आफ्रिकन वंशाचे आहेत. येथील मिश्र इंडियन-आफ्रिकन मिश्रवंशीयांना झांब्योस, तर मिश्र गोरे-आफ्रिकन मिश्रवंशीयांना मुलेट्टो म्हणतात. मेस्टिझो लोक देशभर विखुरलेले असून गोरे लोक प्रामुख्याने शहरांत केंद्रित झाले आहेत. काळे लोक मुख्यतः उत्तरेकडील किनारी भागात आढळतात. एक लाखापेक्षा अधिक इंडियन लोक अंतर्गत भागातील घनदाट अरण्यात राहतात. दूरच्या एकाकी प्रदेशात, दक्षिण भागात व कोलंबिया सरहद्दीजवळच्या प्रदेशात इंडियन आदिवासी लोक आढळतात.

काळ्या लोकांच्या आप्रवासनावर १९२९ मध्ये निर्बंध लादण्यात आले, तर १९३६ मध्ये गोऱ्या लोकांच्या आप्रवासनास उत्तेजन देण्यात आले. १९४५ नंतर रोजगाराच्या निमित्ताने विशेषतः स्पेन, इटली व पोर्तुगाल या देशांतून अनेक युरोपीय तसेच कोलंबियन लोक देशात आले. १९८० च्या सुमारास १० लाखांहून अधिक कोलंबियन बेकायदेशीररीत्या व्हेनेझुएलात राहत होते.

देशातील ९५% लोक रोमन कॅथलिक व २% प्रॉटेस्टंट पंथाचे आहेत. काही ज्यू व मुस्लिम मोठ्या शहरांमध्ये आढळतात. १९६१च्या राज्यघटनेनुसार रोमन कॅथलिक हा अधिकृत धर्म असला, तरी देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे.

व्हेनेझुएलातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.ला २३·९ होती (१९९७). ओरिनोको व व्हेनेझुएलाचा दक्षिणेकडील अर्धा भाग विरळ लोकवस्तीचा आहे. दर हजारी जन्मप्रमाण २९ व मृत्युप्रमाण ९ होते (१९८५ अंदाज). लोकसंख्यावाढीचे प्रमाण प्रति वर्षी २·४% आहे.

स्पॅनिश ही देशातील अधिकृत भाषा असून दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचाही वापर केला जातो. माध्यमिक शाळेत इंग्रजीला द्वितीय भाषेचे स्थान आहे. एकाकी प्रदेशातील इंडियन लोक वेगवेगळ्या स्थानिक बोली भाषा बोलतात.

व्हेनेझुएलातील सामाजिक वातावरण बरेच मोकळेपणाचे आहे. वांशिक किंवा वर्णभेदाच्या बाबतीत ताठर भूमिका आढळत नाही. १९४० नंतर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर बरेच वाढले. प्रति माणशी राष्ट्रीय उत्पन्न २,७०० डॉलर असून (१९८६) लॅटिन अमेरिकेतील हे सर्वाधिक उत्पन्न आहे. परंतु अति श्रीमंत व अती गरीब यांमधील दरी खूप मोठी आढळते. स्पॅनिश पद्धतीची एकमजली घरे सर्वत्र आहेत. ग्रामीण भागातून आलेले अकुशल कामगार लोक ‘रँच’मध्ये (लहानसे घर) राहतात. शहरांच्या आतबाहेर रँचची गर्दी झालेली आढळते. लोकांची शहरांकडील धाव रोखण्यासाठी शासनाने ग्रामीण प्रदेशांत पक्के रस्ते, विद्युत्‌-पुरवठा, शिक्षण, आरोग्य इ. सुविधा पुरविल्या आहेत. सामाजिक सुरक्षितता योजना १९४४ पासून कार्यान्वित आहे.

शिक्षण : वसाहतकाळात देशातील शिक्षणव्यवस्था चर्चच्या अखत्यारित होती. एकोणिसाव्या शतकात अँड्रीस बेलो व सेसील्यो आकोस्ता हे दोन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले. १९६० पासून शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या. साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्क्यांपर्यंत आहे. १९७४पासून मोठ्या प्रमाणावर शासकीय शिष्यवृत्त्या ठेवण्यात आल्या. ७ ते १४ वयोगटातील सर्व मुलांसाठी सक्तीचे शिक्षण आहे. देशातील १६,००० प्राथमिक शाळांत १,८६,००० शिक्षक व ४२,००,००० विद्यार्थी १,५०० माध्यमिक विद्यालयांत ३४,००० शिक्षक व ११,००,००० विद्यार्थी होते (१९९४). तसेच सार्वजनिक क्षेत्रातील १६ विद्यापीठे, १ तंत्रनिकेतन विद्यापीठ, १ मुक्त विद्यापीठ आणि खाजगी क्षेत्रातील १२ विद्यापीठे, २ रोमन कॅथलिक विद्यापीठे व १ तंत्रविद्याविषयक विद्यापीठ होते (१९९५-९६). काराकास येथील ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ व्हेनेझुएला’ विद्यापीठ सर्वांत जुने आहे (स्था. १७२५).

देशातील आरोग्यविषयक दर्जा चांगला आहे. पुरुषांचे सरासरी आयुर्मान ६८ वर्षे व स्त्रियांचे ७३ वर्षे आहे. देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत व दवाखान्यांत एकूण ४२,७२५ डॉक्टर व ५२,२९४ खाटा होत्या (१९९६).

सीमॉना रोद्रीगेस, अँड्रीस बेलो व सीमॉन बोलीव्हार यांच्यापासून स्पॅनिश भाषेतील व्हेनेझुएलन साहित्याला गती मिळाली. एकोणिसाव्या शतकात व्हेनेझुएलातील काही लेखक व कलाकारांनी जागतिक कीर्ती मिळविली.  त्यांपैकी आंतोन्यो पेरेझ बोनाल्दे (१८४६ – ९२), कादंबरीकार तेरेसा दे ला पॅरा (१८९१ – १९३६) व रुफीनो ब्लांको फाँबाना (१८७४ – १९४४) हे प्रसिद्ध लेखक होऊन गेले. अँड्रीस इलॉय ब्लांको हे कवी म्हणून प्रसिद्ध होते. रोम्यूलो गाल्यागो व आर्तूरो उस्लर पीत्रक्ष हे विसाव्या शतकातील प्रसिद्ध कादंबरीकार असून त्यांपैकी रोम्यूलो गाल्यागो (१८८४ – १९६९) हे १९४८ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांच्या दोना बार्बारा (१९२९), कॅनायमा (१९३५) व पोब्रे नेग्रो (१९३७) या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. लेखक म्हणून मॅरिआनो पिकॉन-सालस (१९०१ – ६५), मीगेल ऑटेरो सिल्व्हा (१९०८), आर्तूरो उस्लर पीत्री (१९०६) हे उल्लेखनीय आहेत. मार्टिन वाय टॉव्हर (१८२८ – १९०२), आर्तूरो मायचेलीना (१८७३ – ९३), ॲलीजांद्रो ओटेरो व जेजस सोटो हे प्रमुख चित्रकारही एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. टिटो सालस (१८८९ – १९७४) हे विसाव्या शतकातील कलाकार व चित्रकार आहेत. व्हेनेझुएलाने काही वैशिष्ट्यपूर्ण असे आधुनिक वास्तुशिल्पही विकसित केले. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ व्हेनेझुएलाच्या आवारात हे वास्तुशिल्प आढळते. आलेकांद्रो कॉलिना व फ्रान्सिस्को नाबाएद हे वास्तुशिल्पकार व ओस्वाल्दो व्हीगास हे चित्रकार प्रसिद्ध आहेत.

बेसबॉल व फुटबॉल हे देशातील विशेष लोकप्रिय खेळ आहेत. काही शहरांत बैलांच्या झुंजी आयोजित केल्या जातात. घोड्यांच्या शर्यती, टेनिस, कोंबड्यांच्या झुंजी, शिकार, मासेमारी हे येथील लोकांचे इतर आवडीचे खेळ व छंद आहेत. जोरोपो हे राष्ट्रगीत व नृत्य आहे. युवा वर्गाला रॉक डान्सचे विशेष आवडतो. व्हेनेझुएलातील लोकसाहित्य, वसाहतकालीन कला, ललित कला व सीमॉन बोलीव्हार यांचे जीवन या संदर्भातील वस्तुसंग्रहालये काराकासमध्ये आहेत.

महत्त्वाची स्थळे : काराकास हे देशाच्या राजधानीचे तसेच देशातील सर्वांत मोठे शहर आहे. माराकायव्हो (लोकसंख्या सु. १६,००,००० – १९९५ अंदाज) हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. काराकासच्या नैर्ऋत्येकडील व्हॅलेंशिया हे एक औद्योगिक तसेच पशुपालन व दुग्धशाळा केंद्र आहे. याशिवाय बार्किसिमेटो, स्यूदाद गुयाना, मारकाई, पेटरी, बार्सेलोना ही चार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे आहेत.

चौधरी, वसंत