सिक्कीमची राजधानी, गंगटोक.

गंगटोक :सिक्कीमची राजधानी व महत्त्वाचे व्यापारी शहर.लोकसंख्या १५,००० (१९७१). हे दार्जिलिंगच्या ईशान्येस ४५ किमी., समुद्रसपाटीपासून १,८७१ मी. उंचीवर वसले आहे. शहराच्या आसपास सिक्कीमच्या लोकवस्तीपैकी सु. एकतृतीयांश लोकराहतात. पूर्वी गंगटोक लहानलहान लाकडी घरांचे लहानसे गाव होते. गेल्या १०–१५ वर्षांत त्याला आधुनिक शहराचे स्वरूप आले आहे. लाल बाजार, आधुनिक राजवाडा, मंत्र्यांची निवासस्थाने, सचिवालय, विद्यालये, औषधालये इत्यादींमुळे गंगटोकच्या वैभवात भरपडली आहे.येथे दालचिनी, समशीतोष्ण कटिबंधीय फळे इत्यादींबाबतची खास केंदे, कुटिरोद्योग संस्था, तिबेट-विद्याभ्यास मंडळ असून सिक्कीमच्या सांस्कृतिक जीवनाचे हे केंद्र आहे. १९६१ मध्ये पूर्ण  झालेल्या रांगणी जलविद्युत् प्रकल्पामुळे गंगटोकच्या वीज पुरवठ्यात भर पडून उद्योगधंद्यांच्या विकासास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. कापड व कपडे, रग, धातुकाम, लाकूडकाम, सतरंज्या, कागद इत्यादींचेउद्योग येथे आहेत. नथुला-गंगटोक सडकेमुळे बागडोग्रा (सिलिगुडी) ह्याभारतीय हवाई स्थानकाशी गंगटोक जोडले गेले असून, भारत रस्ताविकास मंडळानेबांधलेल्या २४१·५ किमी. उत्तर सिक्कीम राजमार्गाने गंगटोकचा सिक्कीम सीमेपर्यंतच्या शहराशी व्यापार सुलभ झाला आहे. मका, डाळी, बटाटे, तांदूळ, फळफळावळ, जनावरे, कातडी वस्तू इत्यादींची मोठी बाजारपेठ गंगटोकला आहे. येथील रूमटेकचा बौद्धमठही प्रसिद्ध आहे.

ओक, द. ह.