चंपा: (१) प्राचीन मालिनी, चंपा-मालिनी, चंपावती, कर्णपुरी वगैरे. आधुनिक चंपानगर किंवा चंपापूर. बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याच्या भागलपूर या मुख्य ठाण्यापासून पश्चिमेस सु. ७ किमी. व चंपा-गंगा संगमावर वसलेली एक प्राचीन नगरी. रामायण, महाभारत, बौद्ध साहित्य आणि यूआन च्वांगच्या प्रवासवर्णनात हिचा उल्लेख वारंवार आढळतो. रामायणकाळात ही लोमपाद राजाची, तर महाभारतकाळात कर्णाच्या अंग देशाची राजधानी होती. चंपा नावाच्या राजावरून अगर येथील चंपक वृक्षांच्या विपूलतेमुळे हिला चंपा नाव पडले असावे. येथे काही बौद्ध अवशेष सापडले आहेत, असे म्हणतात. तसेच प्राचीन काळी येथे जैन धर्माचे मोठे केंद्र असून त्यांचे बारावे तीर्थकार येथेच जन्मले व मृत्यू पावले, अशी आख्यायिका आहे. गौतम बुद्ध, महावीर व गोशाल यांनी या नगरीला अनेकदा भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. हे एक समृद्ध नगर आणि व्यापाराचे केंद्र असून येथील व्यापारी समुद्रमार्गाने व्यापार करण्याबाबत प्रसिद्ध होते.

(२) चंपापूर इ.स.पू. दुसरे शतक ते सु. पंधरावे शतक या कालावधीत अनाममध्ये (हल्लीच्या उत्तर व्हिएटनाममधील काही भाग व दक्षिण व्हिएटनाम) असलेले एक स्थळ व राज्य. या राज्याचा संस्थापक श्री-मार हा हिंदू असावा असे मानले जाते. यानंतरच्या भद्रवर्मन् राजाच्या कारकीर्दीत सर्वच दृष्टींनी या राज्याची भरभराट झाली. येथील तत्कालीन संस्कृतीवर भारतीय कलाविचारांचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो. धार्मिक विचारांतून अधिक प्रमाणात कलेचा विकास झालेला आढळतो. येथील मंदिरे आकाराने छोटी पण कलापूर्ण आहेत. येथील राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, सामाजिक व्यवस्था इ. भारतीय आदर्शांवरच आधारलेली होती.

उत्तरेकडून चंपावर सतत चीनचे हल्ले होत. बराच काळ चंपा चीनचे मांडलिकत्व पतकरून राहिले. परंतु उत्तरेकडील अनामी लोकांनी चीनच्या साहाय्याने १४७२ मध्ये चंपाचा पराभव केला.

कापडी, सुलभा