जैसलमीर :राजस्थान राज्याच्या जैसलमीर जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या १६,५७८ (१९७१). हे थरच्या वैराण वाळवंटी प्रदेशात, उत्तर रेल्वेच्या जोधपूर–जैसलमीर फाट्यावरील शेवटचे स्थानक असून जोधपूर, बारमेर, बिकानेर यांच्याशी सडकांनी जोडलेले आहे. ते जोधपूरच्या पश्चिमवायव्येस सु. २२५ किमी. आहे. रावळ जैसलने ११५६ मध्ये राजधानी म्हणून हे वसविले. नंतर जैसलमीर संस्थानची ती राजधानी  होती. हे काफिल्यांचे केंद्र असून येथे लोकर, कातडी, उंट, बकऱ्या, मीठ, मुलतानी माती यांचा व्यापार होतो. जवळच उपलब्ध होणाऱ्या पिवळट तपकिरी दगडांचे प्रेक्षणीय बांधकाम सर्वत्र दिसते. गावाभोवती चार दरवाजांचा दगडी कोट असून सु. ७५ मी. उंच टेकडीवर सुरेख किल्ला आहे. त्याला ९९ बुरुज आहेत. चौदाव्या-पंधराव्या शतकांतील जैन मंदिरे, राजवाडा, छत्री, इतर मंदिरे यांचे सुंदर नक्षीकाम, बगीचे, बादल विलास मीनार, घडसीसर आणि इतर तलाव प्रेक्षणीय आहेत. येथील ‘ज्ञानभांडार’ ग्रंथालयातील जुनी संस्कृत हस्तलिखिते तसेच ताडपत्रावरील जैन ग्रंथांचा भारतातील सर्वांत जुना संग्रह महत्त्वपूर्ण आहेत.

 ९९ बुरुजांचा किल्ला, जैसलमीर.

दातार, नीला