कार्त्ये, झाक : (? १४९१—१ सप्टेंबर १५५७). उत्तर अमेरिकेतील सेंट लॉरेन्स नदीचा शोध लावणारा फ्रेंच समन्वेषक. ब्रिटनीमधील सॅंट मालो येथे जन्म. यूरोपच्या वायव्येकडून अतिपूर्वेला जाणारा मार्ग शोधण्यासाठी फ्रेंच राजाने १५३४ मध्ये याची नेमणूक केली. दोन जहाजे व एकसष्ठ माणसे घेऊन हा निघाला. न्यू फाउंडलंडच्या उत्तरेकडील बेल सामुद्रधुनीतून आत शिरून न्यू फाउंडलंडच्या पश्चिम किनाऱ्याने जात असता, वादळामुळे याच्या बोटी कॅनडाच्या न्यू ब्रन्सविक किनाऱ्याला लागल्या. तेथे काही दिवस राहून याने तेथील इंडियनांशी मैत्री केली. दोन इंडियन बरोबर घेऊन हा परतला. दुसऱ्या वर्षी तो अँटीकोस्टी बेटाजवळून सेंट लॉरेन्सच्या मुखात शिरला त्यानेच सेंट लॉरेन्स हे नाव दिले. ‘धनाढ्य देश आहे’ या इंडियनांच्या सांगण्यावर विश्वासून तो तराफ्यातून सध्याच्या माँट्रिऑलपर्यंत गेला, परंतु द्रुतवाहांमुळे त्याला परतावे लागले. १५४१ च्या सफरीत त्याने आणलेले किंमती दगड मूल्यहीन असल्याचे आढळल्याने फ्रेंचांचे बरीच वर्षे कॅनडाकडे दुर्लक्ष झाले.

शाह, र.रू.