ॲक्रा : घाना देशाची राजधानी व अटलांटिक महासागरावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ६,६३,८८० (१९७०). ५°३१’ उ. व ०°१२’ प. गिनी आखातावरील पूर्वीच्या गोल्डकोस्ट भागातील हे ठिकाण. येथे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराकरिता किल्ला बांधला. सतराव्या शतकात डच, डेनश, फ्रेंच व इंग्‍लिश लोकांनी आपापले किल्ले बांधून व्यापारी ठाणी वसविली. किनाऱ्यालगतच्या भागात नायजेरिया प्रदेशातून आलेले ‘गा’ जमातीचे लोक राहत. गोल्डकोस्टमधील मूळचे रहिवासी अक्रान लोक ‘गा’ लोकांना ‘न्क्रान’ (म्हणजे काळ्या मुंग्या) असे म्हणत. त्यावरूनच यूरोपीयांनी या शहरास ‘ॲक्रा’ हे नाव दिले. १८७६ मध्ये ही ब्रिटिशांच्या गोल्डकोस्ट वसाहतीची राजधानी बनली आणि तीच स्वतंत्र घानाची राजधानी झाली.

समुद्रसपाटीपासून १९·५ मी. उंचीच्या सागरी कड्यांवर व भूशिरावर हे शहर वसले असून, त्याचे क्षेत्रफळ २२५·३ चौ.किमी. आहे. हे क्षेत्र भूकंपाच्या पट्ट्यात येत असून १९३९ साली झालेल्या भूकंपाने येथे खूप हानी झाली होती. स्वातंत्र्यानंतर शहराची झपाट्याने वाढ झाली. शहरात धातुकाम व मद्यनिर्मितीचे मोठे उद्योगधंदे असून बिस्किटे, रसायने, कीटकनाशके, डबाबंद फळे, आगकाड्या, मासळी खारवणे, कौले तयार करणे वगैरेचे लघु-उद्योग चालतात. ॲक्राच्या पार्श्वभूमीमध्ये सोन्याच्या व हिऱ्यांच्या खाणी असून कोकोचे प्रचंड उत्पादन होते. ॲक्रामधून प्रामुख्याने कोको, इमारती लाकूड, सोने, हिरे, मँगॅनीज व बॉक्साइट यांची निर्यात होते. रेल्वेने व उत्तम सडकांनी देशातील व शेजारच्या देशातील प्रमुख शहरांशी ॲक्रा जोडलेले आहे. येथे मोठा विमानतळ असून जगातील देशांशी येथून नियमित विमानवाहतूक चालते. ॲक्राच्या पूर्वेस सु. २५ किमी.वर टेमा हे ॲक्राचे उपनगर असून सध्या प्रामुख्याने तेथूनच जहाजवाहतूक चालते. ॲक्रामध्ये ५० च्या वर राजदूतांची निवासस्थाने आहेत. जुन्या किल्ल्यांपैकी एकात राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान व दुसऱ्यामध्ये तुरुंग आहे. येथील संसदभवन, राष्ट्रीय संग्रहालय, विद्यापीठ, रुग्णालय, चर्च, चित्रपटगृहे इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. येथे प्रवाशांकरिता अद्ययावत हॉटेल्स असून करमणुकींसाठी आकर्षण पुळणी आहेत. (चित्रपत्र)

लिमये. दि. ह.

(अ) ॲक्रा : घाना विद्यापीठाचे लेगॉन व अकुफाओ हॉल्स, (आ) ॲक्रा : घानाची राजधानी.