स्लोव्हेनिया : ( रिपब्लिक ऑफ स्लोव्हेनिया ). मध्य यूरोपमधील एक प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ २०,२७३ चौ. किमी. लोकसंख्या २०,५०,१८९ (२०११). यूगोस्लाव्हियामधून बाहेर पडून १९९१ मध्ये स्वतंत्र झालेला हा देश असून याच्या उत्तरेस ऑस्ट्रिया, ईशान्येस हंगेरी, आग्नेयीस व दक्षिणेस क्रोएशिया, तर पश्चिमेस इटली हे देश व व्हेनिसचे आखात आहे. याला १,३३४ किमी. लांबीची भूप्रदेशीय सरहद्द असून ४७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ल्यूब्ल्याना ही देशाची राजधानी असून तिची लोकसंख्या २,७२,२२० (२०११) होती.

भूवर्णन : स्लोव्हेनियाचे भूक्षेत्र हे प्रामुख्याने पर्वतीय, जंगलमय व अनेक नद्यांच्या सुपीक खोर्‍यांनी व्यापलेले आहे. स्लोव्हेनियाचे प्राकृतिक दृष्ट्या चार विभाग केले जातात.

(१) अल्पाइन विभाग : याने देशाच्या भूक्षेत्राच्या ४०% भाग व्यापलेला आहे. स्लोव्हेनियाच्या उत्तर भागात इटली व ऑस्ट्रियाच्या सरहद्दीवर आल्प्स पर्वताच्या कामनिक, साव्हिन्या, कारावांकेन व ज्यूल्यन या पर्वतरांगा आहेत. ज्यूल्यन पर्वतरांगेत देशातील सर्वोच्च ट्रीग्लाव्ह (२,८६४ मी.) हे शिखर आहे.ट्रीग्लाव्ह शिखराजवळच्या दरीत बॉव्हिन्या व ब्लेड ही सरोवरे आहेत. उंच अल्पाइन पर्वतरांगांपेक्षा किंचित कमी उंचीचा भूप्रदेश सब अल्पाइन म्हणून ओळखला जातो. या भूप्रदेशातील द्रावा नदीच्या दक्षिणेकडील पॉहॉर्‍ये ही सब अल्पाइन पर्वतरांग आहे. मध्य अल्पाइन भूप्रदेशाला गॉर्नेस्का किंवा अप्पर कार्निओला या ऐतिहासिक नावाने संबोधण्यात येते. गॉर्नेस्काच्या दक्षिण भागात ल्यूब्ल्याना खोरे असून येथे क्रिन्य हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत शहर वसलेले आहे.

(२) कार्स्ट भूप्रदेश : देशातील हा दुसरा महत्त्वाचा भूप्रदेश देशाच्या नैर्ऋत्य भागात असून याने एकूण भूप्रदेशाचा २५% भाग व्यापलेला आहे. या भागात दिनारिक आल्प्स पर्वतरांग आहे. येथे चुनखडकांचे प्रमाण जास्त असून चुनखडकांतील गुहा व वैशिष्ट्यपूर्ण भूआकार तयार झालेले आहेत. कार्स्ट विभागावरून या भूआकारांना कार्स्ट भूमिस्वरूप हे नाव पडलेले आहे. या भागात सुपीक जमीन कमी प्रमाणात आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण खडकरचनेमुळे येथे अनेक गुहांची व भूमिगत नद्यांची निर्मिती झाली आहे. या प्रदेशातील पॉस्टोइना येथील गुहा जगप्रसिद्ध आहेत. हा भूप्रदेश डॉलेन्यास्क ( लोअर कार्निओला ) व नोट्रॅन्स्क ( इनर कार्निओला ) या ऐतिहासिक नावाने ओळखला जातो.

(३) पॅनोनियन मैदानी प्रदेश : हा मैदानी प्रदेश देशाच्या पूर्व व ईशान्य भागात असून याने २०% भूप्रदेश व्यापलेला आहे. हा बहुतेक सपाट मैदानी प्रदेश असून अधूनमधून कमी उंचीच्या टेकड्या आढळतात. या प्रदेशात साव्हा, द्रावा, मोराव्हा, साव्हिन्या या नद्यांची खोरी आहेत. येथे मारिबॉर, त्सेल्ये ही शहरे वसलेली आहेत.

(४) सब मेडिटेरेनियन स्लोव्हेनिया : हा भूप्रदेश समुद्रकिनारी असून याने देशाचा १६.७ % भाग व्यापलेला आहे. या प्रदेशात ४७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा दंतूर असल्याने येथे नैसर्गिक बंदरांची निर्मिती झालेली आहे. किनार्‍यावरील सुंदर पुळणी व विलोभनीय सृष्टीसौंदर्य यांमुळे यास स्लोव्हेनियाचा ‘ रिव्हिएअर ’ म्हणतात. कॉपेर हे देशातील प्रमुख बंदर येथे आहे.

साव्हा ही येथील मोठी नदी असून ती आल्प्सच्या ज्यूल्यन पर्वतरांगेत उगम पावून ल्यूब्ल्यानापासून क्रोएशियात वाहत जाऊन पुढे ती डॅन्यूब नदीस मिळते. हिची स्लोव्हेनियातील लांबी २२१ किमी. आहे. द्रावा व मूर या नद्या ऑस्ट्रियातून येऊन पुढे क्रोएशियात वाहत जातात. तेथे त्यांचा संगम होतो व तदनंतर द्रावा डॅन्यूबला मिळते. पश्चिमेस मौंट ट्रीग्लाव्ह येथे सोका नदी उगम पावते व पुढे इटलीतून वाहत जाऊन व्हेनिसच्या आखातास मिळते. स्लोव्हेनियाचा भूप्रदेश बहुतांशी पर्वतीय असल्याने व पर्वताचे उतार तीव्र असल्याने नद्यांच्या पाण्याची वाहण्याची गती जास्त असते. त्यामुळे जलविद्युत्निर्मितीस याचा फायदा होतो मात्र यामुळे जमिनीची धूप जास्त प्रमाणात होत आहे. येथे सु. ३०० लहानमोठे धबधबे असून सेडका हा येथील प्रसिद्ध धबधबा आहे. देशात सु. २०० सरोवरे आहेत. त्सेर्कनित्सा हे २६ किमी. क्षेत्राचे मोठे सरोवर येथे आहे.

देशात विविध प्रकारची मृदा दिसून येते. येथे चुनखडकापासून तयार झालेली हलकी मृदा आढळते. चुनखडीच्या प्रदेशात—विशेषतः कार्स्ट भूमिरूप प्रदेशात—चिकणमाती असून तिला टेरारोसा असे म्हणतात. पॅनोनियन मैदानी प्रदेश व नदीखोर्‍यांत गाळाची सुपीक मृदा आहे. तसेच काही ठिकाणी पॉडझॉल प्रकारची मृदा आढळते.

हवामान : स्लोव्हेनियातील वेगवेगळ्या भागातील हवामानात भिन्नता आढळते. पश्चिमेकडील किनारी भागात भूमध्य सागरी प्रकारचे, अंतर्गत भागात व उत्तर भागात खंडीय हवामान असून सौम्य ते उबदार उन्हाळे असतात आणि पूर्वेकडील पॅनोनियन मैदानी प्रदेशात, आल्प्स पर्वतीय प्रदेशात थंड उन्हाळे व कडक हिवाळे असणारे हवामान असते. पर्वतीय भागात सरासरी तापमान कमी असते. येथे हिवाळ्यातील ( जानेवारीत ) सरासरी तापमान ०° से.पेक्षा कमी असते. ते अंतर्गत भागात ०° ते २° से.पर्यंत तर किनारी भागात २° ते ४° से. असते मात्र किनारी भागातील तापमानावर उत्तरेकडून येणार्‍या थंड बोरा वार्‍यांचा परिणाम होत असतो. उन्हाळ्यातील जुलै महिन्यात तापमान अंतर्गत भागात २०°—२२° से.,पूर्व भागात २२°—२४° से. असते. किनारी प्रदेशात व अंतर्गत भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१ सेंमी. पेक्षा कमी, तर पर्वतीय भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३२० सेंमी. पेक्षा जास्त असते. पर्वतीय प्रदेशात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असते.


वनस्पती व प्राणी : स्लोव्हेनियाचा ५०% पेक्षा जास्त भूप्रदेश जंगलाने व्यापला आहे. येथे सूचिपर्णी प्रकारातील तीन हजारांवर वनस्पतिप्रकार आढळतात. आल्प्स पर्वतीय जास्त उंचीच्या भागात जूनिपर, पाइन वृक्ष कमी उंचीच्या भागात बीच, बर्च या वनस्पती, तर पर्वतीय प्रदेशात गवताची कुरणे आहेत. किनारी भागात खुरट्या वनस्पती, नेचे आढळतात. ट्रीग्लाव्ह राष्ट्रीय उद्यानात अनेक प्रकारची फुलझाडे आढळतात.

येथे हरिण, उदी रंगाचे यूरोपियन अस्वल, आयबेक्स, काळवीट, रानडुक्कर इ. प्राणी आढळतात. पक्ष्यांमध्ये गरुड, तितर इ. पक्षी आढळतात. सरोवरे, नद्या व समुद्रात विविध मासे असून कार्स्ट प्रदेशात अनेक विषारी साप दिसून येतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : रोमनपूर्वकाळात येथे केल्ट व इलिरियन लोक राहत होते. ते इ. स. पहिल्या शतकात रोमच्या अंमला-खाली आले. यावेळी स्लोव्हेनियाची राजधानी म्हणून ल्यूब्ल्याना शहराची ‘रोमन टाऊन ऑफ एमोना’ म्हणून स्थापना झाली. सहाव्या शतकाच्या अखेरीस स्लोव्हेनियनांनी (स्लाव्हांनी) सध्याच्या स्लोव्हेनिया भूप्रदेशात वसाहती करण्यास प्रारंभ केला. सातव्या शतकात पश्चिम स्लाव्हिक टोळ्यांनी कॅरिंथियाच्या डचीशी ऐक्य केले. ७४५ मध्ये कॅरिंथिया फ्रँक साम्राज्याचा भाग होऊन येथील स्लाव्ह ख्रिश्चन बनले व हळूहळू आपले स्वातंत्र्य गमावून बसले. बव्हेरियन ड्यूक व रिपब्लिक ऑक व्हेनिसच्या अंमलानंतर हे चौदाव्या शतकात हॅप्सबर्ग साम्राज्यात समाविष्ट झाले.

पहिल्या स्लोव्हेनियन पुस्तकाची १५५० मध्ये छपाई झाली व १५८४ मध्ये बायबलचे स्लोव्हाक भाषेत भाषांतर करून स्लोव्हेनियनांनी आपली राष्ट्रीय ओळख प्रस्थापित केली. नेपोलियनने १८०९ मध्ये स्लोव्हेनिया व क्रोएशियामधील भागांत इलिरियन प्रॉव्हिन्सची स्थापना केली व ल्यूब्ल्याना येथे याची राजधानी केली परंतु नेपोलियनच्या पराभवानंतर हे ऑस्ट्रियाच्या अखत्यारित आले. एकोणिसाव्या शतकात हॅप्सबर्ग साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी चळवळी वाढीस लागल्या. कॅरिंथिया प्रांतास प्रशासकीय स्वातंत्र्य मिळाले,तसेच इतर भागातील स्लोव्हेनियनांना सांस्कृतिक अधिकार मिळाले.हॅप्सबर्ग साम्राज्याच्या अस्तानंतर स्लोव्हेनिया ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्या आधिपत्याखाली आले. पहिल्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवानंतर स्लोव्हेनिया किंग्डम ऑफ दी सर्बज्, क्रोएटस् अँड स्लोव्हेनीजमध्ये समाविष्ट झाले. राजा पहिला अलेक्झांडर याच्या कारकीर्दीत या देशाचे नाव यूगोस्लाव्हिया असे झाले. त्याने सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालून सत्ता आपल्या हाती घेतली. यास राष्ट्रवादी लोकांचा तीव्र विरोध झाला. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने यूगोस्लाव्हिया ताब्यात घेतला व त्याची फाळणी केली. १९४५ मध्ये मार्शल टिटो यांच्या नेतृत्वाखाली यूगोस्लाव्हिया येथे फेडरल पीपल्स रिपब्लिक ऑफ यूगोस्लाव्हियाची स्थापना झाली आणि येथील राजसत्ता संपुष्टात आली.

 

१९४५ मध्ये जमिनीच्या हक्कांवर बंधने घालण्यास सरकारने सुरुवात केली. १९४६ मध्ये सरकारने उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करून त्याद्वारे सामुदायिकीकरणास प्रारंभ केला. युद्धोत्तरकाळातही यूगोस्लाव्हियात जातीय तणाव टिकून होते. १९६९ मध्ये कम्युनिस्ट लीगची स्थापना झाली. सरकारमधील मुक्तव्यापार धार्जिण्यांस वगळण्यात आले. प्रत्येक राज्यास अधिक अधिकार प्रदान करण्याच्या हेतूने १९७४ मध्ये संविधानाचा पुनर्विचार करण्यात आला तथापि १९८० मध्ये टिटोंच्या निधनानंतर यूगोस्लाव्हियात अंतर्गत कलह सुरू झाला. शीतयुद्ध समाप्तीनंतर अनेक समूहांनी स्वातंत्र्य मिळविले. ऑक्टोबर १९८९ मध्ये स्लोव्हेनियाच्या नॅशनल असेंब्लीने संविधानात दुरुस्ती केली. मे १९९० मध्ये स्लोव्हेनियात ५० वर्षांनंतर बहुपक्षीय निवडणुका झाल्या. २३ डिसेंबर १९९० मध्ये स्वातंत्र्यासाठी जनमत घेण्यात आले. त्यामध्ये ८८.५% लोकांनी यूगोस्ला-व्हियातून बाहेर पडून स्वतंत्र होण्याच्या बाजूने मतदान केले व २५ जून १९९१ ला स्लोव्हेनियाने यूगोस्लाव्हियातून बाहेर पडून स्वतंत्रतेची घोषणा केली. परिणामी स्लोव्हेनियास युद्धास सामोरे जावे लागले. युद्धानंतर स्लोव्हेनिया ८ ऑक्टोबर १९९१ मध्ये पुन्हा यूगोस्लाव्हियातून फुटून स्वतंत्र झाला, असे घोषित करण्यात आले आणि देशाने नवीन संविधानाचा स्वीकार केला.

यूरोपीय देशांनी १९९२ मध्ये स्लोव्हेनियास मान्यता दिली. याचवर्षी स्लोव्हेनिया युनोचा सदस्य झाला. स्लोव्हेनिया मार्च २००४ मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ( नाटो ) व १९९५ मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांचा सदस्य झाला. तसेच यूरोपियन समूहात मे २००४ मध्ये याचा समावेश झाला. १९९०—२००२ पर्यंत मीलॅन कुकॅन व २००२—०७ पर्यंत जॅनेझ ड्रॅनोव्हस्क आणि २००७—१२ पर्यंत डॅनिलो टुर्क हे राष्ट्राध्यक्ष होते. १९९०—९२ लोझे पेटर्ले, १९९२—२००० पर्यंत जॅनेझ ड्रॅनोव्हस्क, २००० मध्ये अँड्रेस बॅजूक यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. पुन्हा २०००—०२ पर्यंत जॅनेझ ड्रॅनोव्हस्क पंतप्रधान होते. नंतर अँटॉन रॉप हे २००२—०४ पर्यंत पंतप्रधान होते. २००४—०८ जॅनेझ जॅन्सा यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्यांनी खाजगीकरणास उत्तेजन दिले, तसेच याच काळात यूरो हे देशाचे चलन म्हणून स्वीकारण्यात आले. २००८—१२ पर्यंत बॅरूट पॅहोर हे पंतप्रधान होते.


४ डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत पॉझिटिव्ह स्लोव्हेनिया पक्षास २८, स्लोव्हेनिया डेमॉक्रॅटिक पक्षास २६, सोशल डेमॉक्रॅटिक पक्षास १०, ग्रेगर व्हिरँटस सिव्हिक लिस्ट पक्षास ८, डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ पेंशनर्स ऑफ स्लोव्हेनिया पक्षास ६, स्लोव्हेनियन पीपल्स पक्षास ६, न्यू स्लोव्हेनिया ख्रिश्चन पीपल्स पक्षास ४, इतर २ याप्रमाणे जनमत जागा मिळाल्या होत्या. यामध्ये संमिश्र सरकारचे पंतप्रधान म्हणून जानेवारी २०१२ मध्ये जॅनेझ जॅन्सा हे पुन्हा निवडले गेले. २ डिसेंबर २०१२ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बॅरूट पॅहोर हे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले होते.

स्लोव्हेनियात संसदीय लोकशाही प्रजासत्ताक प्रणाली आहे. २३ डिसेंबर १९९१ च्या संविधानाप्रमाणे येथील राज्यकारभार चालतो. राष्ट्राध्यक्ष हा देशाचा प्रमुख असून त्याची सार्वत्रिक निवडणुकीने पाच वर्षांसाठी निवड केली जाते, तसेच सलग दोन कार्यकालावधींसाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याची निवड करता येते. राष्ट्राध्यक्ष हा सैन्यदलाचा प्रमुख असतो. सरकारचा प्रमुख पंतप्रधान असून तो संसदेतील सदस्यांनी बहुमताने निवडलेला असतो. पंतप्रधान मंत्रीमंडळाच्या साहाय्याने कारभार पाहतो. मंत्र्यांची नेमणूक पंतप्रधान संसदेच्या मान्यतेने करतो.

देशाची संसद द्विसदनी आहे. यामध्ये नॅशनल असेंब्ली व स्टेट काउन्सिल ही दोन सभागृहे आहेत. नॅशनल असेंब्लीची सदस्यसंख्या ९० असते. यामध्ये ८८ सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्वाने निवडण्यात येतात व दोन सदस्य हंगेरियन आणि इटालियन या अल्पसंख्यांकांतून निवडण्यात येतात. नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांचा कालावधी चार वर्षांचा असतो. स्टेट काउन्सिलची सदस्यसंख्या ४० असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. त्यांची निवड हितसंबंधी समूह व विभागांमार्फत होते. अठरा वर्षांवरील व नोकरीत असलेल्या १६-१७ वर्षे वयाच्या सर्वांना मतदानाचा हक्क आहे. प्रशासकीय दृष्ट्या स्लोव्हेनिया १९९ नगरपालिका व ११ महा-नगरपालिकांत विभागला आहे.

संविधानाने न्यायव्यवस्थेची स्वायत्तता प्रस्थापित केली आहे. न्यायदान पद्धत ही दिवाणी कायद्यांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे. याशिवाय लोअर कोर्ट पद्धत ही स्थानिक व जिल्ह्यासाठी विभागली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड नॅशनल असेंब्लीमार्फत होते. तसेच कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट असून यामार्फत संविधानाशी निगडीत बाबींची कार्यवाही होते. याचे नऊ न्यायाधीश हे नॅशनल असेंब्लीमार्फत निवडण्यात येतात व नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करतात. या न्यायाधीशांचा कार्यकाळ नऊ वर्षांचा असतो.

आर्थिक स्थिती : यूरोपियन राष्ट्रसमूहात २००४ मध्ये समाविष्ट झालेल्या दहा देशांत स्लोव्हेनिया हा जास्त विकसित झालेला देश होता. या दहा देशांत यूरो चलन उपयोगात आणणारा हा पहिला देश आहे. सुशिक्षित समाज, कष्टकरी जनता, उत्कृष्ट साधनसामग्री, पश्चिम व पूर्व यूरोप यांमधील मोक्याचे स्थान याचा येथील अर्थव्यवस्थेस फायदा झालेला आहे.

सूक्ष्म आर्थिक धोरणामुळे ( मायक्रोइकॉनॉमिक पॉलिसी) अर्थ-व्यवस्थेस फायदा होऊन चलनवाढ व आर्थिक तूट कमी होण्यास मदत झाली आहे मात्र परकीय थेट गुंतवणुकीचे येथील प्रमाण कमी आहे. स्लोव्हेनिया हा सामाजिक कल्याण योजना अवलंबण्यात उदार आहे. परिणामी यूरोपियन कमिशनने स्लोव्हेनियास निवृत्तीवेतन खर्चाबद्दल समज दिली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक मंदीच्या अरिष्टामुळे स्वातंत्र्योत्तर-काळात देशास प्रथमतः २००९ मध्ये सौम्य आर्थिक मंदीस सामोरे जावे लागले त्यामुळे बेकारीचे प्रमाण ९% पर्यंत झाले होते. या मंदीतून सावरण्यासाठी देशाने अर्थसाहाय्यासारख्या विविध योजनांचा अवलंब केला होता. जागतिक बँक अहवालान्वये २०१० मध्ये स्लोव्हेनियाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ४९,२७६ द.ल. अमेरिकी डॉलर होते मात्र २००१—२०१० या कालावधीत दरडोई उत्पन्नवाढीचा सरासरी वार्षिक दर २.४ % होता.

शेती : २०११ मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा हिस्सा २.५% होता. कष्टकरी लोकांच्या ४.६% लोक कृषिव्यवसायात गुंतलेले आहेत. २००१—११ या दशकात शेतीपासूनच्या राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी सरासरी ०.९% घट झाली आहे. देशातील प्रमुख शेतमालाचे २०१० मधील उत्पन्न खालीलप्रमाणे आहे (  हजार मे. टन  ) : गहू १३५.५, बार्ली ८०.१, मका ३११.१, ओट ५.२, बटाटे १०१.२, टोमॅटो ३.२५, सफरचंदे ११७.६, द्राक्षे १०८.५. देशातील ६२% क्षेत्र जंगलाखाली होते (२०११). २००७ मध्ये २.८८ हजार घ. मी. लाकूड उत्पादन झाले.


२०१० मध्ये २,३३९ मे. टन मासे पकडण्यात आले होते. त्याच सालातील पशुधन संख्या खालीलप्रमाणे होती ( हजारात ) : गुरे ४७३, डुकरे ४१५, मेंढ्या १३८, शेळ्या ३०, घोडे २०, कोंबड्या २,९४५. या साली खालीलप्रमाणे मांस उत्पादन मिळाले ( हजार मे. टनात ) : बैलांचे मांस ३५.८, डुकराचे मांस ४४.१, मेंढ्याचे मांस १.६, कोंबड्यांचे मांस ५३.९ तसेच २०१० मध्ये ६२५.५ हजार मे. टन गाईचे दूध व २१.६ हजार मे. टन कोंबड्यांच्या अंड्यांचे उत्पादन मिळाले.

उद्योगधंदे : स्लोव्हेनियाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात २०११ मध्ये २९.७% हिस्सा उद्योगक्षेत्राचा होता. उद्योगक्षेत्रात कष्टकरी लोकांच्या ३२.७% लोक गुंतले होते. २००१—११ या दशकात उद्योगक्षेत्रातील उत्पादनात दरवर्षी सरासरी १.९% वाढ झाली आहे. परंपरागत उद्योगां-मध्ये प्रामुख्याने धातुउद्योग, फर्निचर, कापडउद्योग, कागदउद्योग, मद्यनिर्मिती इ. प्रमुख आहेत. सिमेंट, विद्युत्साहित्य, वाहतुकीची साधने हे उद्योग विकसित होत आहेत. २०१० मध्ये उत्पादन खालीलप्रमाणे होते (हजार मे. टन) : प्लायवुड १००, सिमेंट १,०००, लोहधातुक ६०६, शिसे १४. वस्तुनिर्मिती उद्योगाचा राष्ट्रीय उत्पादनात २०.८% हिस्सा होता, तर कष्टकरी जनतेच्या २२.६% लोक यात गुंतले होते (२०११). २००१—११ च्या दशकात वस्तुनिर्मिती उद्योगामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी सरासरी २.६% वाढ झाली होती. बांधकाम क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पादनात ५.२% हिस्सा होता, तर एकूण कष्टकरी जनतेच्या ७.६% लोक यामध्ये गुंतले होते (२०११). याचवर्षी सेवाक्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पादनात हिस्सा ६७.८% व यामध्ये एकूण कष्टकरी जनतेच्या ६२.७% लोक गुंतले होते. या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पादनात २००१—११ या दशकात दरवर्षी सरासरी ३.१% वाढ झालेली होती.

खाणकाम उद्योगाचा एकूण राष्ट्रीय उत्पादनात ०.४% हिस्सा होता, तर या क्षेत्रात कष्टकरी जनतेच्या ०.३% लोक गुंतले होते (२०११). तसेच २००१—११ च्या दशकात खाणकाम उद्योगांच्या उत्पादनात दरवर्षी सरासरी ३% वाढ झाली आहे. प्रमुख खाणउत्पादने २०१० मध्ये खालीलप्रमाणे होती : कोळसा ४,५७० ( हजार मे. टन  ), नैसर्गिक वायू ६,६७५ ( हजार घ. मी. ) व खनिज तेल ९९० बॅरल. टर्बॅाव्हल्ये, र्‍हॅस्तनिक व कॉचेव्हे येथे कोळसा खाणी आहेत. स्लोव्हेनियाची विद्युत्निर्मितीक्षमता ३ द. ल. किवॉ. होती (२००७). देशात एक अणुऊर्जानिर्मिती केंद्र आहे.

पर्यटन हाही येथील महसुलाचा प्रमुख भाग आहे. १९९१ नंतर येथील पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे. २०१० मध्ये १८,६९,१०० पर्यटकांनी देशाला भेट दिली होती व त्यापासून २,३११ द.  ल. अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले होते.

स्लोव्हेनिया यूरोपीय समूहात १ मे २००४ ला सामील झाला. स्लोव्हेनियाची २०१० मधील आयात २६,३६०.४ द.ल. अमेरिकी डॉलर व निर्यात २४,१८८ द. ल. अमेरिकी डॉलर होती. आयातीत प्रामुख्याने वाहने, विद्युत् यंत्रसामग्री, खनिज तेल व खनिज तेलजन्य पदार्थ, लोखंड आणि पोलाद यांचा समावेश असून आयात जर्मनी, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रिया, क्रोएशिया, हंगेरी इ. देशांतून होते. निर्यातीत विद्युत् यंत्रसामग्री, वाहने आणि त्याचे भाग, फर्निचर, कागद व त्यांची उत्पादने, व्यापार इत्यादींचा समावेश आहे. निर्यात प्रामुख्याने ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली, क्रोएशिया, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, रशिया यांच्याशी होते.

स्लोव्हेनियाच्या २०१० च्या अंदाजपत्रकात एकूण १,७३४.१ द. ल. यूरोची तूट होती. ही तूट एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या ५.८% होती. येथील चलनवाढीचा सरासरी वार्षिक दर २००१—१० मध्ये ३.७% होता. २०१० मध्ये उपभोक्ता दरात १.८% वाढ झाली होती. २०११ मध्ये बेकारीचे प्रमाण १२.१% होते.

 

१ जानेवारी २००७ पासून स्लोव्हेनियाने यूरो हे चलन स्वीकारलेले आहे. १०० सेंटचा १ यूरो होय. ३० डिसेंबर २०११ रोजी विनिमय दर १० यूरो = ८.३७ पौंड = १२.९४ अमेरिकी डॉलर याप्रमाणे होता. बँक ऑफ स्लोव्हेनिया ही देशाची प्रमुख बँक आहे. या बँकेमार्फत चलन वितरीत होते. नोव्हा ल्यूब्ल्याना बँक, नोव्हा क्रेडिटना बँक मारिबॉर व अबँका व्हिपा या अन्य प्रमुख बँका आहेत. ल्यूब्ल्याना येथे शेअरबाजार आहे.

वाहतूक व संदेशवहन : येथे रस्ते वाहतुकीस महत्त्व आहे. देशात ३८,८७२ किमी. लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये ७१२ किमी. मध्यम प्रकारचे रस्ते व ८५६ किमी. महामार्गांचा समावेश होतो (२००८). देशात २००९ मध्ये १,२२८ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. त्यांपैकी ५०३ किमी. लांबीच्या लोहमार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे. देशात १०,२०,१०० प्रवासी कार, २,३०० बस, ८१,५०० व्हॅन व ट्रक, ७१,५०० दुचाकी होत्या (२००७). स्लोव्हेनियात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. देशात तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते ल्यूब्ल्याना, मारिबॉर, पॉर्तोरॉझे येथे आहेत. येथे ॲड्रीआ एअरवेज ही प्रमुख हवाईवाहतूक कंपनी आहे. कॉपेर येथे आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आहे.


देशात २०१० मध्ये ९,१०,८०० दूरध्वनीधारक,१२,२०० भ्रमण दूरध्वनीधारक,०२,५०० इंटरनेटचा उपयोग करणारे लोक होते. २००८ मध्ये येथे आठ दैनिके प्रकाशित होत होती व त्यांचा एकूण खप ३,८०,००० होता. येथील स्लोव्हेन्स्के नॉव्हिस हे प्रसिद्ध दैनिक असून याचा प्रतिदिन खप ८८,००० होता (२००८). याशिवाय देशात डेलो, नेव्ह्निक ही दैनिके प्रसिद्ध होतात. तसेच देशात १,३४६ नियत-कालिके प्रसिद्ध होत होती (२००८). देशात ९९ नभोवाणी केंद्रे व तीन दूरचित्रवाणी केंद्रे होती (२००९).

लोक व समाजजीवन : स्लोव्हेनियातील २००१ — १० या दशकातील लोकसंख्यावाढीचा वार्षिक सरासरी दर अंदाजे ०.३% होता, तर लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.ला १०१.१ होती. देशात दर हजारी जननदर १०.९, मृत्युदर ९.१ व नोंदणीकृत विवाहदर ३.२ होता (२०१०). सर्वसाधारण आयुर्मान ७९ वर्षे असून ते पुरुषांत ७६ वर्षे व महिलांमध्ये ८२ वर्षे होते (२००९). जननक्षमता दर प्रति महिला १.४ होता (२००९). येथील लोकसंख्येपैकी ५०% लोक ग्रामीण भागात राहतात.

येथील लोकसंख्येत ८३.०६% लोक स्लोव्हेनियन होते (२००८). यामुळे बहुतांशी स्लोव्हेनियन एकजातीय आहेत. याशिवाय देशात सर्ब, क्रोएट, मुस्लिम, इटालियन, हंगेरियन इ. लोक आहेत.देशातील बहुसंख्य लोक ख्रिश्चन आहेत. यामध्ये बहुतांशी रोमन कॅथलिक चर्चचे अनुयायी असून प्रॉटेस्टंट ख्रिश्चनही आहेत. २००२ च्या जनगणनेप्रमाणे ५७.८% लोक रोमन कॅथलिक, २.४% मुस्लिम, २.३% परंपरावादी ख्रिश्चन, ०.८% प्रॉटेस्टंट व २२.८% इतर धर्मीय होते. फेब्रुवारी २०१२ मध्ये येथे एक कार्डिनल धर्मपीठ होते.

येथील लोकांचा पेहराव पाश्चात्त्य पद्धतीचा असतो. मुले-मुली १८ वर्षे वयोमानानंतर कायदेशीर रीत्या लग्न करू शकतात. १९०० नंतर दरवर्षी होणार्‍या विवाहात घट होत आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढते आहे. संविधानानुसार स्त्रियांना समान हक्क आहेत. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराचे   प्रमाण तुलनेने अत्यल्प आहे.

स्लोव्हेनियात आरोग्यसुविधा सर्वसाधारणतः चांगल्या आहेत. देशाच्या एकूण उत्पन्नातील ८.३% खर्च आरोग्यावर केलेला होता (२००८). देशात २९ रुग्णालयात ९,५८६ खाटांची सोय होती (२००८). येथे ४,९८१ डॉक्टर,२३९ दंतवैद्य १५,९८७ परिचरिका,५६४ औषधनिर्माते होते (२००७). येथे बालमृत्युमान कमी आहे. येथे सार्वजनिक व खाजगी आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.

स्लोव्हेनियात ९२% लोकांची भाषा स्लोव्हेन असून ही देशातील प्रमुख भाषा आहे. याशिवाय इंग्रजी, जर्मन, इटालियन या भाषा दुय्यम भाषा म्हणून उपयोगात आहेत. प्रिमोस ट्रूबर यास स्लोव्हेनियन साहित्याचा जनक म्हणतात. याने अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत. एकोणिसाव्या शतकातील फ्रॅन्से प्रेझेरेन हा येथील प्रसिद्ध लेखक व कवी होता. त्याने राष्ट्रीय भावगीते लिहीली. याशिवाय ईव्हॉन सान्कार, अँड्रेज हिएंग, ड्रॅगो जॅन्कार, सिरिल कॉस्मॅक, टॉमस सेलमन, रूडी सेलिगो हे येथील प्रसिद्ध लेखक आहेत.

शिक्षण : देशात सहा ते पंधरा वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. शाळेत मुख्य भाषा व अल्पसंख्यांकांची भाषा याप्रमाणे दोन भाषांतून शिक्षणाची सुविधा आहे. २००८ मध्ये शिक्षणावरील सर्व स्तरावरील खर्च एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.२% होता. विविध प्रकारचे माध्यमिक शिक्षण हे १५ वर्षे वयानंतर २ — ५ वर्षापर्यंत उपलब्ध आहे. २००८—०९ मध्ये मुलांचे शाळेत दाखल होण्याचे प्रमाण प्राथमिक शाळेत ९७ % व माध्यमिक शाळेत ९२% होते. येथे चार विद्यापीठे असून ती ल्यूब्ल्याना, मारिबॉर, कॉपेर, नॉव्हा गॉर्सीका येथे आहेत. २००९ मध्ये येथील प्रौढसाक्षरता प्रमाण अंदाजे ९९.७% होते. देशात ८९१ पूर्व प्राथमिक शाळांत ९,६४० शिक्षक व ७५,९७२ विद्यार्थी ४९३ प्राथमिक शाळांत १८,२०६ शिक्षक व १,६३,२२२ विद्यार्थी २४४ उच्च माध्यमिक शाळांत ११,२९७ शिक्षक व ९७,६१९ विद्यार्थी आणि ४९ उच्चशिक्षण संस्थात ५,६७३ शिक्षक व ९१,२२९ विद्यार्थी होते.

कला व क्रीडा : फुटबॉल हा येथील आवडता खेळ आहे. याशिवाय बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, गोल्फ, टेनिस, जलतरण हे खेळ येथे खेळले जातात. शिक्षण व क्रीडा मंत्रालयामार्फत खेळांचे प्रशासन चालते.


स्लोव्हेनियन लोकांच्या जीवनात सण व उत्सव यांना फार महत्त्व आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात उत्तर स्लोव्हेनियातील प्टूई शहरी ‘ कुरेंटी ’ उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. मारिबॉर शहरी ‘ लेंट ’ उत्सव जून अखेर ते जुलैच्या प्रारंभी सर्वत्र साजरा केला जातो. याचप्रमाणे उन्हाळी उत्सव ल्यूब्ल्याना व प्रीमॉर्स्का भागात जुलै, ऑगस्टमध्ये साजरा केला जातो. तसेच ल्यूब्ल्याना शहरी ‘ ड्रगा गॉड्बा ’ मे ते जूनमध्ये व नॉव्हॉ-मेस्तॉ शहरी ‘ रॉक ऑटोसेक ’ हा संगीत महोत्सव जुलैमध्ये होतो.

महत्त्वाची स्थळे : पर्यटकांना आकर्षित करणार्‍या विविध बाबी येथे आहेत. पश्चिमेकडे भूमध्यसागरी हॉटेले, ज्यूल्यन आल्प्समधील ब्लेड व बॉवि्र्हन्या ही सरोवरे दक्षिणेकडील कार्स्ट भूप्रदेश व तेथील ६,००० पेक्षा जास्त गुहा, प्रसिद्ध पॉस्टोइना येथील गुहा, ज्यूल्यन नॅशनल पार्क, ल्यूब्ल्याना प्राणिसंग्रहालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. पर्यटन-व्यवसायाकडे स्लोव्हेनियन टुरिस्ट बोर्ड विशेष लक्ष देत असते. ऑस्ट्रिया, फ्रान्स, क्रोएशिया, जर्मनी, इटली, नेदर्लंड्स, ग्रेट ब्रिटन इ. देशांतून पर्यटक येथे भेट देतात

गाडे, ना. स.

स्लोव्हेनिया
पॉस्टोइना गुहेतील अंतर्दृश्य ल्यूब्ल्याना विद्यापीठाची दर्शनी इमारत
स्लोव्हेनियन राष्ट्राध्यक्षांचा राजवाडा : ल्यूब्ल्याना. ब्लेड सरोवर : विहंगम एक दृश्य.