बॉस्पोरस सामुद्रधुनी : काळा समुद्र व मार्मारा समुद्र यांस जोडणारी व आशियाई तुर्कस्तानास यूरोपीय तुर्कस्तानापासून विभक्त करणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीची लांबी ३० किमी., कमाल व किमान रुंदी अनुक्रमे ३.७ किमी. व ०.७५ किमी., तर खोली ३६.६ मी. ते १२४.४ मी. आहे. काळ्या समुद्रातून मार्मारा समुद्राकडे या सामुद्रधुनीतून ताशी ८ किमी. वेगाने पाणी वाहते. मात्र मार्मारा समुद्रातून काळ्या समुद्राकडे पाण्याच्या पृष्ठभागाखालून वाहणाऱ्या पाण्याची गती फार कमी आहे. ग्रीक पुराणातील देवता ‘इओ’ने गाईच्या स्वरूपात ही सामुद्रधुनी पार केलेली होती, अशी समजूत आहे.

काळा समुद्र बॉस्पोरस सामुद्रधुनीमुळे व पुढे दार्दानेल्स सामुद्रधुनीद्वारे इजीअन समुद्रास (भूमध्य समुद्राचा फाटा) जोडला गेला आहे. या सामुद्रधुनीमुळे सोव्हिएट युनियनमधील मर्यादित बारमाही बंदरे जगाशी जोडली गेली आहेत. मोक्याच्या ठिकाणी असल्याने लष्करी दृष्ट्याही ही सामुद्रधुनी महत्त्वाची आहे. बायझंटिन सम्राटांनी, ऑटोमन सुलतानांनी व तुर्कस्तान सरकारने हिच्या किनारी भागात तटबंदी करून किल्ले बांधलेले आढळतात. ॲनासेलू हिसारी व रूमेल हिसारी हे ऑटोमन काळातील किल्ले अद्यापही पहावयास मिळतात.

ऑटोमन सत्तेच्या ऱ्हासानंतर यूरोपियनांनी या भागावर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे तुर्कस्तान व इतर यूरोपीय देश यांच्यात लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे असे करार वेळोवेळी करण्यात आले. १९३६ च्या करारान्वये या सामुद्रधुनीचे हक्क तुर्कस्तानाला मिळाले. या सामुद्रधुनीवर १९७३ साली झुलता पूल (लांबी १,०७४ मी.) बांधण्यात आला. जगातील हा एक मोठा पूल होय. मासेमारी व निसर्गसौंदर्य यांसाठी ही सामुद्रधुनी विशेष प्रसिद्ध आहे. इस्तंबूल (पूर्वीचे कॉन्स्टँटिनोपल), उस्कूदार ही या सामुद्रधुनीच्या काठावरील प्रमुख शहरे होत. सप्टेंबर १९६६ मध्ये बॉस्पोरस सामुद्रधुनी पोहून जाणारे मिहिर सेन हे पहिले भारतीय होत.

लिमये, दि. ह. गाडे, ना. स.