जर्सी सिटी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यू जर्सी राज्याच्या ईशान्य भागात हॅकिनसॅक व हडसन ह्या दोन नद्यांदरम्यान बसलेले शहर. लोकसंख्या २,६०,५४५ (१९७०). ते न्यूयॉर्कच्या पश्चिमेस हडसन नदीपलीकडे असून या दोन शहरांमध्ये नदीतून, तिच्याखालील बोगद्यातील लोहमार्गांने व खुष्कीचे दळणवळण चालू असते. जर्सी सिटी हे व्यापार, उद्योगधंदे व दळणवळणांचे मोठे केंद्र आहे. मांस डबाबंद करणे, रसायने, पत्र्यांचे डबे, यंत्रे व धातू शुद्ध करणे, रेल्वे एंजिने, खनिज तेलापासूनचे पदार्थ, लोखंड व पोलाद, साबण, पेन्सिली, सिगारेट, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने वगैरे हरतऱ्हेची उत्पादने येथे होतात. सेंट पीटर्स, जॉन मार्शल, राज्य शिक्षक व पदवीपूर्व इ. महाविद्यालये येथे आहेत. १९१६ साली पंचमस्तंभीयांच्या कारवायांमुळे ह्या शहरात स्फोट होऊन शस्त्रास्त्रांचा एक कारखाना भुईसपाट झाला. रेल्वे आणि जुना मॉरिस कालवा यांमुळे १८३० नंतर शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने झाला. न्यूयॉर्क बंदराचाच एक भाग असल्यामुळे येथपर्यंत सागरी बोटी येतात. भुयारी लोहमार्गाचेही हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथील लिंकनचा पुतळा व युद्धस्मारक प्रेक्षणीय आहे.

लिमये, दि. ह.