नेव्हाडा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी सिएरा नेव्हाडा पर्वतीय विभागातील एक राज्य. ‘नेव्हाडा म्हणजे हिमाच्छादित’. क्षेत्रफळ २,८६,२९९ चौ. किमी. पैकी पाण्याखाली १,९४८ चौ. किमी. १९७३ मध्ये ८६·५% जमीन केंद्रसरकारच्या मालकीची व १९७५ मध्ये सु. ४,३०१ चौ. किमी. इंडियन टोळ्यांना दिलेली होती. लोकसंख्या ५,९२,००० (१९७५). विस्तार ३५° उ. ते ४२° उ. अक्षांश व ११४° प. ते १२०° प. रेखांश यांदरम्यान. यांच्या नैर्ऋत्येस व पश्चिमेस कॅलिफोर्निया, उत्तरेस ऑरेगन व आयडाहो, पूर्वेस उटा व आग्नेयीस ॲरिझोना ही राज्ये असून, कार्सन सिटी ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : नेव्हाडाचा प्रदेश अमेरिकेच्या ‘ग्रेट बेसिन’ प्रदेशातील पर्वतश्रेणी व त्यांमधील द्रोणींनी बनलेला आहे. ४८ ते १६० किमी. लांबीच्या १६० पर्वतश्रेणींनी याचे कमीजास्त रुंदीचे ९० द्रोणी प्रदेश झाले आहेत. पर्वतांची सर्वसाधारण उंची २,४३८ ते ३,०४८ मी. असून त्यांत ३,४२८ मी. ते ४,००७ मी. पर्यंत उंचीची अनेक शिखरे आहेत. द्रोणी प्रदेश सपाट व वैराण असून ते नैर्ऋत्येकडे २१३ मी. पासून ईशान्येकडे १,८२९ मी. पर्यंत उंच होत गेले आहेत. सर्वांत जास्त म्हणजे ४६४ किमी. लांबीची हंबोल्ट नदी राज्याच्या उत्तर भागात, मुख्यतः पूर्व-पश्चिम व मग नैर्ऋत्येकडे वाहून हंबोल्ट सिंक या कुंडात विलीन होते. तिच्या उत्तरेकडील नद्या राज्याबाहेर स्नेक नदीला मिळतात. पश्चिम भागातील नद्या जवळच्या दऱ्याखोऱ्यांत पाटबंधाऱ्यांना पाणी पुरवून विराम पावतात. आग्नेय भागात व्हर्जिन व मडी या नद्या, हूव्हर धरणाने कोलोरॅडो नदी अडवून झालेल्या ‘मीड सरोवर’ या जगातील सर्वांत मोठ्या मानवनिर्मित जलाशयाला मिळतात. राज्यात नद्या थोड्या, समुद्रापर्यंत न पोहोचणाऱ्या व बऱ्याचशा वाळवंटात किंवा अंतर्देशीय जलकुंडांत लुप्त होणाऱ्या आहेत. सरोवरांपैकी ‘ताहो सरोवर’ या सुंदर सरोवराचा तिसरा हिस्सा राज्याच्या पश्चिम सीमेवर आहे. पिरॅमिड, विनिमका, वॉकर इ. तळी अतिप्राचीन हिमयुगोत्तर काळातील लहाँटन या २१,७५६ चौ. किमी. विस्ताराच्या सरोवराचे अवशेष आहेत. ही तळी गोड्या पाण्याची पण अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने मचूळ, तथापि मासे जिवंत ठेवणारी आहेत. नदीखोऱ्यांतून पाटबंधाऱ्यांवर होणाऱ्या किरकोळ शेतीखेरीज बहुतेक डोंगराळ भूप्रदेश गुरचराईस उपयोगी आहे. वनप्रदेश फक्त पश्चिमेच्या पर्वतभागांत व नद्यांकाठी असून राज्याचा बराच मोठा भाग मरुप्रदेशासारखा आहे.

खनिजे : ठिणगी गुडदीच्या उत्पादनात लागणाऱ्या डुमॉर्टीराइटचा देशातील सर्वांत मोठा साठा या राज्यात असून पारा, मॅंगॅनीज, टंगस्टन यांचे उत्पादन देशात वरच्या क्रमांकाचे आहे. तांब्याची उघड्या खड्‌ड्याची, जगातील सर्वांत मोठ्या खाणींपैकी एक खाण येथे असून मौल्यवान खडे, शिसे, चांदी, अँटिमनी, मॉलिब्डेनम, प्ल्युओरस्पार, पर्लाइट, पमीस, जस्त, चिकणमाती, मीठ, संगजिरे, सोने, लोह, चुना, लिथियम, जिप्सम, वाळू, मुरूम, दगड, बॅराइट व अलीकडे खनिज तेल व नैसर्गिक वायू इ. राज्यात उपलब्ध आहेत.

हवामान : येथे बव्हंशी उंचावरील मरुप्रदेशीय हवामान असून, उन्हाळा कडक व कोरडा, हिवाळाही दक्षिण भागाखेरीज अन्यत्र तीव्र असून सरासरी तपमान दक्षिणेत २१·१° से., तर उत्तरेकडे ७·२ से. पर्यंत व पर्जन्यमान पश्चिमेच्या पर्वतप्रदेशात ५० सेंमी. पासून पूर्वेकडे १२·५ सेंमी. पर्यंत कमी होत गेलेले असते.

वनस्पती : राज्याच्या पश्चिम भागात डोंगरउतार वनाच्छादित असून इतर भागांत मरुप्रदेशीय वनस्पती, काटेरी झुडुपे व निवडुंग आहेत. नद्यांकाठी तुरळक जूनिपर, पाइन, जॉशुआ, विलो, कॉटनवुड व उत्तरेकडे उंच डोंगरांवर ॲस्पेन पाईन, फर, स्प्रूस अशी झाडे आहेत. कित्येकदा सर्व प्रदेश रानफुलांनी बहरतो.

प्राणी : डोंगराळ भागात अस्वल, गिरिसिंह, हरिण पाण्याकाठी बीव्हर, स्कंक, मिंक, चिचुंद्री खोऱ्यांतून ससा, लांडगा, कॉयाट, कॅकोमिसल, सायाळ इ. आहेत. सेज ग्राऊज, महोका, तित्तिर, लावा, बदक, हंसक, प्लव्हर, लार्क, ब्लूबर्ड, किंगबर्ड इ. अनेक प्रकारच्या पक्ष्यांपैकी पांढरा पेलिकन (पाणकोळी) संरक्षित आहेत. स्थलांतरी पक्षीही विपुल आहेत. नद्या-तळ्यांतून बास, ट्राऊट, कॅटफिश इ. माशांची मुद्दाम पैदास चालू आहे.

इतिहास : राज्याच्या वेगवेगळ्या भागांत सापडलेले प्रागैतिहासिक अवशेष २३,८०० व ११,००० वर्षांपूर्वीच्या मानववस्तीची साक्ष देतात. ख्रि. पू. १२०० ते इ.स. ९०० दरम्यान आदिवासींची विस्तृत वसाहत असलेला प्रदेश उत्खननाने प्रकट झाला आहे. गोरे लोक येण्याआधी शोशोन, बॅनॅक, पैयूट व वाशी या रेड इंडियन आदिवासींची ही भूमी होती. हिच्या दक्षिण भागात स्पॅनिश लोक अठराव्या शतकात येऊन गेले पण प्रदेशात यूरोपियनांचा पुष्कळ संचार झाला तो एकोणिसाव्या शतकामध्ये. १८२५–२६ साली जेदिदाइया स्मिथ उत्तर भाग ओलांडून गेला, पीटर ऑग्डेन याने १८२८ ते १८३१ च्या दरम्यान हंबोल्ट नदीचा शोध लावला व १८३३ मध्ये वॉकर जोझेफ एका अस्तित्वातच नसलेल्या नदीच्या शोधात सारा मुलूख हिंडला. किट कार्सन या प्रसिद्ध वाटाड्याने प्रथम १८३३ आणि नंतर जॉन फ्रेमाँट या इकडची संपूर्ण माहिती लिहिणाऱ्या भूमिसंशोधकांबरोबर १८४३ नंतर कित्येक सफरी केल्या. १८४१ पासूनच पश्चिमेकडे जाणारे प्रवासी तांडे या भागातून जात होते. कॅलिफोर्नियात सोने सापडल्यावर त्यांचा मार्ग पश्चिमेचा हमरस्ताच बनला. त्यावरील मॉर्मन स्टेशन हे व्यापारी ठाणेच पुढे गोऱ्यांची नेव्हाडातील पहिली वसाहत म्हणून ‘जेनोआ’ या नावाने चालू राहिली. १८५८ मध्ये व्हर्जिनिया सिटीजवळ सोन्याचा शोध लागल्यावर आणि १८५९ मध्ये कॉमस्टॉक लोड ही चांदीची खाण अचानक सापडल्यावर नेव्हाडात वसाहतकऱ्यांचा पहिला लोंढा आला. कार्सन सिटी हे व्यापारी ठाणे झाले. १८६१ मध्ये आक्रमक इंडियनांच्या आणि वाटमाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी मिसिसिपीच्या पश्चिमेची सर्वांत मोठी लष्करी गढी- फोर्ट चर्चिल-बांधण्यात आली. त्याचवर्षी नेव्हाडा उटापासून वेगळा होऊन केंद्रशासित प्रदेश झाला आणि येथे सापडणाऱ्या चांदीला महत्त्व आल्यामुळे १८६४ मध्ये याला त्वरेने राज्याचा दर्जा देण्यात आला. यादवी युद्धाच्या शेवटच्या काळात उत्तरेकडील संघराज्य पक्षाला भक्कम आर्थिक आधार ‘कॉमस्टॉक लोड’ येथील चांदीचाच मिळाला. खाणी सापडल्यावर तेजी, त्यांतील सोने-चांदी संपल्यावर मंदी हा राज्याच्या उत्कर्षापकर्षाचा इतिहास यादवी युद्ध संपल्यापासून विसावे शतक उजाडेपर्यंत होता. १९०० साली टोनपा येथे चांदी सापडली, तेव्हा नवे वसाहतकरी आले. नंतर एल्को येथे तांबेही सापडले. पहिल्या महायुद्धात धातूंना मागणी आल्याने पूर्वीची ओसाड खाण, गावे पुन्हा गजबजली पण नंतर चांदीचा भाव उतरताच राज्याची आर्थिक स्थिती पुन्हा डळमळली. तथापि पशुपालन, पाटबंधाऱ्यांच्या पाण्यावर शेती हे धंदे वाढत होते. दुसऱ्या महायुद्धाने धातूंना पुन्हा तेजी आली आणि राज्याला आलेली सुस्थिती युद्धोत्तर काळातही चालू राहिली. केंद्रसरकारने अण्वस्त्रांच्या चाचणीसाठी राज्यातील मोठा वाळवंटी प्रदेश घेतला. सुट्टीत मौज करण्यासाठी, सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी, क्रीडेसाठी व विशेषतः राज्यात कायदेशीर असलेला जुगार खेळण्यासाठी व  सहजसुलभ घटस्फोट मिळविण्यासाठी हौशी प्रवाशांची राज्यात इतकी गर्दी लोटू लागली, की संबंध देशात नेव्हाडातील दरडोई उत्पन्न सर्वाधिक झाले.

राज्यव्यवस्था : साठांहून अधिक वेळा दुरुस्त झालेल्या १८६४च्या राज्यसंविधानानुसार कार्यकारी सत्ता, चार वर्षांसाठी २१ वर्षांवरील नागरिकांनी निवडलेले राज्यपाल व ६ खातेप्रमुख आणि १ नियुक्त खातेप्रमुख यांच्याकडे असते. चार वर्षांसाठी निवडलेले व निम्मे दोन वर्षांनी निवृत्त होणारे असे २० सेनेटर आणि दोन वर्षांसाठी निवडलेले ४० प्रतिनिधी यांचे द्विसदनी विधिमंडळ असते. अधिवेशने कार्सन सिटी येथे विषमांकी वर्षाच्या जानेवारीच्या तिसऱ्या सोमवारपासून ६० दिवस व खास अधिवेशने २० दिवस भरतात.

राज्यकारभारासाठी कार्सन सिटी या राजधानी विभागाशिवाय राज्याचे १६ परगणे केलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे पाच अपक्ष न्यायमूर्ती चार वर्षांसाठी निवडलेले असतात. जिल्हा न्यायालयांचे १५ न्यायाधीश दर चार वर्षांनी निवडले जातात. राष्ट्रसंसदेवर राज्यातर्फे २ सेनेटर व १ प्रतिनिधी निवडून जातात. १९५९ पर्यंत झालेल्या राज्यसंविधानाच्या दुरुस्त्यांपैकी सुलभ घटस्फोट व जुगाराला कायदेशीर मान्यता या दोन दुरुस्त्या राज्याला फार फायदेशीर ठरल्या आहेत. विषारी वायूने गुदमरवून प्राणदंडाची शिक्षा अंमलात आणणारे नेव्हाडा हे पहिले राज्य आहे.


आर्थिक स्थिती : कृषी आणि खाणकाम हे नेव्हाडाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत. शेतीपेक्षाही मुख्यतः मांसासाठी पोसलेल्या जनावरांचे, डोंगरचराईवर गुरे व मेंढ्या आणि नदीखोऱ्यांत घोड्यांची पैदास यांचे कृषिउत्पन्न जास्त मिळते. १९७५ च्या सुरुवातीस राज्यात २०,००० दुभत्या गाई ६,३७,००० मांसगुरे १,५१,००० मेंढ्या आणि १०,००० डुकरे होती. मांस, दुग्धपदार्थ, गुरे-वासरे, मेंढ्या-कोकरे, लोकर ही पैसा देणारी उत्पादने आहेत. हिवाळी चारा म्हणून अल्फाल्फा गवत करतात. शक्य तेथे पाटाच्या पाण्यावर घासचारा, बार्ली, गहू, ओट व कपाशीची लागवड होते. खनिजे शुद्ध करण्याचा उद्योग अधिक अर्थदायी असून पशुपालन, ओलिताची शेती, रासायनिक पदार्थांचे उत्पादन, लाकूडप्रक्रिया हे उद्योगही चालतात पण सर्वांत संपन्न धंदा प्रवाशांच्या सरबराईचा व जुगार-अड्‌ड्यांचा आहे. या व्यवसायांत २५% लोक गुंतलेले आहेत. १९३० च्या मंदीच्या लाटेमुळे कृषी आणि खाणकाम उद्योगांस झळ पोहोचली. १९३१ मध्ये जुगार कायदेशीर झाला व घटस्फोटासाठी राज्यात सहा आठवड्यांचे वास्तव्य पुरेसे ठरले, त्यामुळे जुगार व प्रवाशांची सरबराई यांनी राज्याची आर्थिक स्थिती चांगलीच सावरली. कोलोरॅडोवरील हूव्हर धरण व इतर धरणे यांमुळे आणि त्यांपासून मिळणाऱ्या विजेमुळे शेती व उद्योगधंदेही सावरले. राज्याबाहेरून आणलेल्या विजेने व नैसर्गिक वायूनेही हात दिला. १९५० ते ६० या दशकात केंद्रशासनाच्या अणुशक्ति-आयोगाने राज्यात अणुस्फोट चाचणीसाठी जागा निवडल्याने रोजगार व तांत्रिक उद्योग वाढले. ३३% लोक घाऊक व किरकोळ व्यापारांत आहेत. १९७० मध्ये ५०,००० हून अधिक कामगार संघटित होते. १९७५ मध्ये २,६५,९०० कामकऱ्यांपैकी ९·२% बेकार होते.

वाहतूक व संदेशवहन : राज्यात १९७३ मध्ये २,४८५ किमी. लोहमार्ग व ७९,४५४ किमी. सडकांपैकी २६,३४२ किमी. पक्क्या सडका होत्या. ११४ नागरी हवाईतळ व हेलिकॉप्टरतळ होते. १९७५ मध्ये मकारेन व रीनो आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ३६ लक्ष प्रवासी उतरले. १९७५ मध्ये ११ दूरध्वनी केंद्रे व ५,००,०४१ दूरध्वनियंत्रे होती. राज्यात ९ दूरचित्रवाणी केंद्रे व ३२ नभोवाणी केंद्रे आहेत. ३१ वृत्तपत्रांपैकी २३ साप्ताहिके आहेत.

लोक व समाजजीवन : राज्यातील सु. निम्मे लोक लास व्हेगास परिसरात व सु. चौथा हिस्सा रीनो परिसरात राहत असल्यामुळे हे राज्य देशातील एक अत्यंत विरळ (दर चौ. किमी.स फक्त १·७) लोकवस्तीचे समजले जाते. १९७० मध्ये नागरी लोकवस्ती ३,९५,३३६ (एकूण लोकसंख्येच्या ८०·९%) होती. तीपैकी ७३% लोक लास व्हेगास व रीनो या महानगरांत किंवा यांच्या आसपास नव्याने उपलब्ध झालेल्या भरभराटीच्या व्यवसायांत होते. ४,७०,५५९ लोक राज्यात जन्मलेले होते. सु. ९२% गोरे ५·६% निग्रो ३,८१३ इंडियन आणि बाकीचे आशियाई व इतर होते. ख्रिस्ती धर्माच्या मॉर्मन व रोमन कॅथलिक या प्रमुख पंथांचे प्रत्येकी, लोकसंख्येच्या २०% व बाकीचे प्रॉटेस्टंट व इतर पंथीय होते. थोडे यहुदी आणि इतर धर्मानुयायी होते. राज्यात जुन्या जमान्यातील खाणकरी, वसाहतकरी आणि गुराखी यांच्या परंपरागत वेषभूषेचे विशेष कौतुक असून राज्योत्सवांत जुन्या रूढींना उजाळा मिळतो.

शिक्षण : राज्याची भाषा इंग्रजी असून ७ ते १७ वर्षे वयापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. ऑक्टोबर १९७४ मध्ये १७० पूर्वप्राथमिक शाळांतून ६०,२२४ विद्यार्थी होते. ७८ माध्यमिक शाळा होत्या. २,६८५ प्राथमिक २,३८५ माध्यमिक व ४१५ अपंगांच्या शाळांतील शिक्षक होते. इतर शाळा ४१ होत्या. शिक्षकास दरमहा सु. १,००० डॉलर मिळतात. १९७५ मध्ये नेव्हाडा विद्यापीठात रीनो येथे ८,२५५ विद्यार्थी व ३६७ शिक्षक व लास व्हेगास येथे ७,९८५ विद्यार्थी व २८० शिक्षक होते. कार्सन सिटी, एल्को व लास व्हेगास येथे या विद्यापीठाच्या लोकमहाविद्यालयांतून २२३ शिक्षक व १५,४३० विद्यार्थी होते.

आरोग्य व लोककल्याण : ६५ वर्षांवरील गरजू वृद्धांस, अवलंबी मुलांच्या कुटुंबास व अंधांस शासकीय साहाय्य मिळते. १९७५ मध्ये राज्यात २३ रुग्णालये, ३,१५२ रुग्णशय्या व १९ कुशल परिचारिका केंद्रे व त्यांत १,१५८ खाटा होत्या. वंश, वर्ण, धर्म इत्यादींवरून कोणत्याही बाबतींत भेदभाव करण्यास १९७१च्या कायद्याप्रमाणे बंदी आहे. कार्सन सिटी येथे बालकल्याण गृहे आहेत.

कला, ग्रंथालये व वस्तुसंग्रह: कार्सन सिटी येथील ग्रंथालयाचा परिपूर्ण वैधानिक ग्रंथसंग्रह देशविख्यात आहे. रीनो येथे विद्यापीठ ग्रंथालयाखेरीज इतर ३ ग्रंथालये असून ४ शहरांत ऐतिहासिक वस्तुसंग्रह आहेत. व्हर्जिनिया सिटी येथे पुनरुज्जीवित आदिवासी कलांचे केंद्र आहे.

पर्यटन : जुगार आणि सुलभ घटस्फोट यांसाठी राज्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी वनोपवने, राष्ट्रीय स्मारके, ‘डेथ व्हॅली’ ची दृश्ये, ईली येथील लवणस्तंभयुक्त लेहमन गुहा, लिंकन परगण्यातील कॅथीड्रल, निदरी व तेथील रंगीबेरंगी खडक, हूव्हर व इतर धरणे, सरोवरे आणि त्यांच्या जलाशयांतील क्रीडा, गिर्यारोहण व बर्फावरील खेळ, आदिवासीजीवन इत्यादींसाठी पर्यटक मोठ्या संख्येने  येतात. १९७० मध्ये सु. २ कोटी पर्यटक आले होते. लास व्हेगास, रीनो, नॉर्थ लास व्हेगास, स्पार्क्स, हेंडरसन, कार्सन सिटी ही येथील प्रमुख शहरे होत.

ओक, शा. नि. कुमठेकर, ज. ब.