मंगोलिया प्रजासत्ताक : मध्यपूर्व आशियातील एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश. हा औटर मंगोलिया अथवा मंगोलिया या जुन्या नावांनीही ओळखला जातो. क्षेत्रफळ १५,६५,००० चौ. किमी. लोकसंख्या १७,७३,००० (१९८३ अंदाज). हा देश ४१° ३२’ उ. अक्षांश ते ५२° १६’ उ. अक्षांश व ८७° ५०’ पू. रेखांश ते ११९° ५४’ पू. रेखांश यादरम्यान पसरलेला आहे. याच्या उत्तरेस सोव्हिएट रशिया तर पूर्व, दक्षिण व पश्चिम या तिन्ही दिशांना चीन आहे. देशाची पूर्व-पश्चिम कमाल लांबी २,४१४ किमी. व दक्षिणोत्तर रूंदी १,२५५ किमी. आहे. ऊलान बाटोर (लोकसंख्या ४,३५,४००-१९८०) ही देशाची राजधानी आहे.

 भूवर्णन : स्थूलमानाने मंगोलिया प्रजासत्ताकाचा भूप्रदेश म्हणजे एक पठार असून त्याची सस.पासून उंची सु. ९०० ते १,५२० मी. आहे. देशाच्या पूर्व, उत्तर व पश्चिम सरहद्दी पर्वतरांगांनी सीमित झालेल्या असून पूर्व सीमेलगत शिंगान (खिंगन) पर्वतरांग, तर उत्तर व पश्चिम सीमांवर अनुक्रमे सायान (सेयान्स) व अल्ताई पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. दक्षिण सीमेवर गोबी वाळवंट आहे.

देशाचे मध्य, उत्तर, पश्चिम व नैर्ऋत्य भाग टेकड्या व उंच पर्वरांगांनी व्यापलेले आहेत. अतिपश्चिमेकडील भाग मुख्यत्वेडोंगराळ व उंच पर्वतशिखरांचा असून दक्षिण व पूर्व भाग वाळवंटी व ओसाड आहेत. पर्वतरांगांदरम्यानच्या द्रोणीप्रदेशात अनेक सरोवरे आहेत. भूरचनेच्या दृष्टीने देशाचे उत्तरेकडील व पश्चिमकडील पर्वतप्रदेश, उत्तरेकडील पर्वतांदरम्यानचा द्रोणीप्रदेश आणि पठारी व वाळवंटी प्रदेश असे तीन विभाग पाडले जातात.

(१) उत्तरेकडील व पश्चिमेकडील पर्वतप्रदेश: देशातील या पर्वतरांगांची निर्मिती अल्पाइन काळात झाली असावी. देशात प्रमुख तीन पर्वतरांगा असून त्यांपैकी पश्चिम भागातील वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली, सु. १,६०० किमी. लांबीची अल्ताई पर्वतरांग प्रमुख आहे. मंगोलियन अल्ताई (मंगोल अल्तायन नूरू) व गोबी अल्ताई (गोव्ही अल्तायन नूरू) या तिच्या दोन प्रमुख शाखा होत. मंगोलियन अल्ताई या रांगेतील ताबन बोग्दो (उंची ४,६५३ मी.) हा रशिया, चीन व मंगोलिया यांच्या सरहद्दीवरील भाग देशातील सर्वोच्च भाग आहे. ही रांग आग्नेयीस सु. १,४५० किमी. पसरली असून तेथून पुढे तिच्या लहानलहान रांगा गोबी वाळवंटापर्यंत विस्तारल्या आहेत. या रांगेत मुंकू खैरखान (सु.४,२१० मी.) हे दुसरे उंच शिखर आहे.

गोबी अल्ताई ही दुसरी रांग देशाच्या दक्षिणमध्य भागात वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली असून तिच्या दक्षिणेस तिला समांतर अशा एड्रेंगियन व गुर्व्हान या छोट्या डोंगररांगा आहेत. इखे बोग्दो (३,९६२ मी.) हे या रांगांतील महत्त्वाचे शिखर आहे. गोबी अल्ताईच्या उत्तरेस तिला समांतर अशी खांगाई (हांग्यन नूरू) ही पर्वतरांग असून ऑत्खोनतेंग्री (४,०३१ मी.) हे तिच्यामधील उंच शिखर आहे. देशाच्या ईशान्य भागात ऊलान बाटोरच्या ईशान्येस हेंटियन नूरू (खेतेंन) ही १,९०० ते २,४५० मी. उंचीची रांग नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने, तर देशाच्या उत्तर सरहद्दीनजीक खब्सगल नूरू ही रांग पश्चिम-पूर्व दिशेने पसरली आहे.

(२) उत्तरेकडील पर्वतांदरम्यानचा द्रोणीप्रदेश : देशातील प्रमुख पर्वतरांगांदरम्यानचा हा अनेक सरोवरांचा प्रदेश आहे. याचा बराचसा भाग पर्वतउतारावरून वाहून आलेल्या गाळाचा बनलेला आहे. मंगोलियन अल्ताई, खांगाई व वायव्येस रशियाच्या सरहद्दीवरील डोंगररांगा यांदरम्यानचा द्रोणीप्रदेश ‘सरोवरांचा प्रदेश’ म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात सु. ३०० हून अधिक सरोवरे आहेत. याशिवाय खांगाई पर्वतरांगेचा पूर्व उतार व हेंटियन नूरूचा पश्चिमेकडील पायथ्यालगतचा द्रोणीप्रदेश तसेच खब्सगल नरूच्या उत्तरेकडील द्रोणीप्रदेश हे सरोवरांसाठी प्रसिद्ध आहेत. दक्षिण भागातील टूलागोल व ऑर्कॉनगोल हे द्रोणीप्रदेश सुपीक असून मंगोलियाच्या इतिहासात वसाहतींच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे ठरले. खांगाईचा उत्तरेकडील खोर्गो प्रदेश व इतर भाग हा निद्रिस्त ज्वालामुखींचा प्रदेश असून याच्या काही भागांत ज्वालामुखीजन्य सरोवरे आढळतात. तसेच या प्रदेशात काही उष्ण पाण्याचे झरेही आहेत. देशात भूकंपाचे प्रमाण अधिक आहे. 

(३) पठारी व वाळवंटी प्रदेश : देशाचा पूर्व भाग विस्तीर्ण ओसाड मैदानाचा, लहानलहान टेकड्यांचा व सस. पासून सु. ६०० ते ७०० मी. उंचीचा आहे. याही भागात अनेक निद्रिस्त ज्वालामुखी शंकू आहेत. देशाच्या पूर्व भागातील दरिगंगा प्रदेशात सु. २२० निद्रिस्त ज्वालामुखी शंकू आढळतात. हा प्रदेश गोबी वाळवंटांचा असून याचा बहुतेक भाग ग्रॅनाइटी व रूपांतरित खडकांचा आणि वाळूचा आहे. यात अधूनमधून रूंद उथळ द्रोणीप्रदेश आढळतात. याच प्रदेशात गुर्व्हान, एड्रेंगियन इ. छोट्या डोंगररांगा आहेत. याच्या काही भागात मात्र मरूद्याने, बेसाल्टी खडकांनी बनलेले कडे इ. नैसर्गिक भूविशेष पहावयास सापडतात. देशाच्या दक्षिण भागातील गोबी वाळवंटी प्रदेशात येलिन आम (व्हॅली ऑफ काँडर) हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. याच प्रदेशात अनेक निदऱ्या, कडे व त्यांमध्ये काँडर पक्ष्यांची घरटी पहावयास मिळतात.इतिहासकालीन समृद्ध संस्कृती याच भागात होती, असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते [ → गोबी-१].

देशाचा वायव्य व उत्तर भाग अनेक नद्या व सरोवरे यांनी व्यापलेला आहे. बहुतेक सर्व नद्या देशांतर्गत व देशाबाहेरील लहानमोठ्या सरोवरांना जाऊन मिळतात तर काही छोटे प्रवाह वाळवंटी प्रदेशातच लुप्त होतात. देशातील नदीप्रवाह डोंगराळ प्रदेशातून वाहत असल्याने अत्यंत वेगवान असून त्यांची पात्रे अरूंद आहेत. त्यामुळे अंतर्गत जलवाहतून अत्यंत मर्यादित आहे. बहुतेक नद्यांतील पाणी थंडीमध्ये गोठते, तर उन्हाळ्यात पात्रे कोरडी पडतात. उत्तरवाहिनी सेलेंगा ही देशातील प्रमुख नदी असून ती खांग ई पर्वतरांगेत उगम पावते. मूरेन व ईडेर हे तिचे प्रमुख शीर्षप्रवाह होत. १,४४४ किमी. लांबीची ही नदी प्रथम पूर्वेस वाहत जाते व रशियाच्या सरहद्दीजवळ उत्तरवाहिनी बनून पुढे रशियातील बैकल सरोवरास जाऊन मिळते. ऑर्कॉन ही तिची उजवीकडून मिळणारी प्रमुख उपनदी असून या दोन्ही नद्या खांगाई पर्वतरांगेच्या उत्तर उतारावरील वनप्रदेशातून वाहतात. सेलेंगा नदीला डावीकडून डेलगेर, एगीन इ., तर उजव्या बाजूने चानुजन, ऑर्कॉन या महत्त्वाच्या नद्या मिळतात. सेलेंगा नदी मे ते ऑक्टोबर या काळात सखे बाटोरच्या खालच्या भागात जलवाहतुकीस सोयीची ठरते. एगीन ही ४७२ किमी. लांबीची उपनदी देशांच्या उत्तर सरहद्दीजवळील खब्सगल सरोवरातून उगम पावून प्रथम दक्षिणेस व नंतर पूर्वेस वाहत जाऊन हुतागच्या पूर्वेस सेलेंगा नदीस मिळते. हिचे पाणी नोव्हेंबर ते एप्रिल या काळात गोठते. या प्रमुख नद्यांशिवाय देशाच्या पश्चिम भागात हॉव्हड, दझाबखान व पूर्व भागात टूला, ओनॉन, केरलेन इ. लहानमोठे नदीप्रवाह आहेत. केरलेन ही १,२५६ किमी. लांबीची नदी हेंटियन नूरू रांगेत उगम पावून प्रथम दक्षिणेस व नंतर ईशान्य दिशेने वाहत जाऊन चीनच्या इनर मंगोलिया प्रांतातील हूलुन सरोवरास जाऊन मिळते.


देशातील बहुतेक द्रोणीप्रदेश सरोवरांनी व्यापलेले दिसून येतात. देशात सु. ३,००० पेक्षा जास्त सरोवरे आहेत. त्यांपैकी बरीचशी सरोवरे ज्वालामुखीजन्य आहेत. देशाच्या उत्तर भागातील खब्सगल हे द्रोणीप्रदेशात असलेले मध्य आशियातील सर्वांत खोल (२३८ मी.) सरोवर समजले जाते. देशाच्या वायव्य कोपऱ्यातील उबसा हे देशातील मोठे (३,३७० चौ. किमी.) खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. देशातील तेऱ्हेमयन त्सागान या सु. ६२ चौ. किमी. क्षेत्राच्या सरोवरात एक बेट असून ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून, खांगाई पर्वताच्या पश्चिम उतारावरील इतिहासप्रसिद्ध बायान सरोवर हे सोनेरी वाळूच्या राशींसाठी प्रसिद्ध आहे. यांशिवाय देशात अनेक लहानमोठी सरोवरे व गोबी वाळवंटाच्या पश्चिम भागात काही औषधी पाण्याचे झरे आढळतात.

हवामान : देशाचे हवामान कोरडे खंडीय प्रकारचे असून कमी पावसाचे व तीव्र तापमानाचे आहे. येथील हिवाळे अत्यंत कडक थंडीचे व अतिशीत वाऱ्यांचे, तर उन्हाळे कडक उष्णतेचे असतात. देशात उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानांत मोठाच फरक जाणवतो. जानेवारीचे सरासरी तापमान -३४° से. (गोबी वाळवंटी प्रदेशात -१९° से.) असते, तर जुलैचे सरासरी तापमान १५° से. (२३° से.) असते. ऊलान बाटोर येथील जानेवारीतील किमान तापमान -२४° से., तर जुलैमधील सरासरी तापमान १८° से. पर्यंत असते. खब्सगल व हेंटियन नूरू प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान १.९° – ३.५° से. असते व पर्जन्याचे प्रमाण १६ ते २० इंच असते. गोबी वाळवंटी प्रदेशात मात्र पावसाची वार्षिक सरासरी४ ते ५ इंचांपेक्षा जास्त नसते. काही भागांत ते याहीपेक्षा कमी असते. देशात उन्हाळ्यात पाऊस पडतो. हिवाळ्यात सरोवरांतील पाणी गोठते व उन्हाळ्यात ते वितळल्याने नद्यांना पूर येतात. हिवाळ्यात पर्वतप्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फ पडते, तर ओसाड वाळवंटी प्रदेशात कडक थंडीच्या लाटा येतात. बर्फाच्या पातळ थरामुळे कुरणे फक्त शिल्लक राहतात. वर्षातील २२० ते २६० दिवस मात्र देशात स्वच्छ सूर्यप्रकाश असतो.

वनस्पती व प्राणी : भौगोलिक रचनेच्या विविधतेबरोबरच मंगोलियात वेगवेगळे नैसर्गिक विभाग दिसून येतात. प्रत्येक विभागातील वनस्पती व प्राणिजीवन वैशिष्ट्यपूर्ण असते. देशाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे मुख्यत्वे चार नैसर्गिक विभाग पाडले जातात: उत्तरेकडील स्टेप जंगलांचा डोंगराळ प्रदेश त्याच्या दक्षिणेस टेकड्यांच्या उतारावरील जंगलांचा प्रदेश, त्याच्या दक्षिणेस निमओसाड व नंतर संपूर्ण ओसाड वाळवंटी वनस्पतीचा प्रदेश. उत्तरेकडील जंगलांत लार्च आणि पाइन, सीडार, स्प्रूस, भूर्ज, ॲस्पेन, पॉप्लर इ. वनस्पती प्रामुख्याने आढळतात. याशिवाय द्रोणीप्रदेशांत व नद्यांच्या खोऱ्यांत तसेच पर्वतांच्या दक्षिण उतारांवर स्टेप प्रकारच्या वनस्पती आढळतात. टेकड्यांच्या उतारांवर व सपाट द्रोणीप्रदेशांत अनेक कुरणे आढळतात. यांमध्ये फेदर ग्रास, काउच ग्रास, किरमाणी  ओवा यांसारख्या इतर चाऱ्याच्या वनस्पती आढळतात. उन्हाळ्यात या प्रदेशात गडद जांभळ्या, निळ्या, तांबड्या व पिवळ्या रंगांची फुले असलेल्या वनस्पती बहरतात. निमओसाड व ओसाड प्रदेशांत (गोबी वाळवंट) तुरळक लहान झुडपे, गवत व अन्य  मरूवनस्पतींचे पट्टे आढळतात. सरोवरांच्या अथवा पाणथळ प्रदेशात काही फुलझाडे तसेच हिरवळ आढळते. ओसाड प्रदेशातील वनस्पतींवर उंट, मेंढ्या, गुरे यांचे पोषण होते.

उत्तरेकडील दाट जंगलात विडाल, तांबडे हरिण, एल्क, रो डिअर, कस्तुरी मृग, तपकिरी अस्वल, औंस, रानडुक्कर इ. प्राणिविशेष आढळतात. विरळ जंगलांत व द्रोणीप्रदेशांतील जंगलांत मार्मोट (याची फर असलेली कातडी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची), मंगोलियन कुरंग इ. प्राणी आढळतात. निमओसाड व वाळवंटी भागात आर्गली या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या रानमेंढ्या दिसून येतात. यांशिवाय गोबी अस्वल, रानटी घोडे, रानटी उंट इ. जंगली प्राणी आढळतात. देशातील मेंढ्या, उंट, गुरे, याक, मंगोलियन घोडे इ. पाळीव प्राणी होत. चंडोल, तितर, करकोचा, माळढोक इ. पक्षी स्टेप प्रदेशात तर बदके, गल (कुरव), पाणकोळी, पाणकावळा (करढोक) इ. पक्षी नद्या-सरोवरांचा प्रदेशांत आढळतात. सोनेरी गरूड, काँडर हे काही भागांत आढळतात. देशातील जलाशयांत एकूण ६० जातींचे मासे सापडतात. त्यांत सामन, ट्राऊट, पर्च इ, प्रमुख आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : मंगोलियातील मंगोल जमातीचा इतिहास फार प्राचीन आहे. तेराव्या शतकात ⇨चंगीझखानाने मंगोल साम्राज्याची स्थापना केली, परंतु त्याच्या मृत्यूनंतर (१२२७) काही वर्षांतच साम्राज्याचे अनेक तुकडे झाले. परिणामतः मंगोल लोक आपल्या मूळ प्रदेशातील (मंगोलिया) ओसाड भागात वस्तीस आले. त्यांच्यापैकी खाल्खा या प्रमुख मंगोल जमातीने गोबी वाळवंटाच्या उत्तरेकडील प्रदेशात वसाहती केल्या. १५८३ पर्यंत मंगोलियाचा प्रदेश तुमेट टोळ्यांकडे, तर त्यानंतर तो चाहार टोळीचा नेता लिगडनखानाकडे आला. १६३५ मध्ये लिगडनखानाचा पराभव करून मांचू लोकांनी येथे आपला अंमल बसविला. परंतु उत्तरेकडील व दक्षिणेकडील मंगोल लोकांत वारंवार तंटे निर्माण होऊ लागले. यांतूनच मंगोलियाचे दोन भाग होऊन उत्तरेकडील प्रदेश ‘औटर मंगोलिया’ आणि दक्षिणेकडील प्रदेश ‘इनर मंगोलिया’ या नावांनी ओळखले जाऊ लागले [⟶ मंगोलिया].  

इनर मंगोलियातील मांचू राजांनी आपला प्रदेश चीनमध्ये समाविष्ट केला. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात औटर मंगोलियाने पश्चिमेकडील मंगोलांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेकडील मांचू राजांची मदत मागितली. या संघर्षात पश्चिमेकडील मंगोलांचा पराभव झाला परंतु औटर मंगोलियाला मात्र स्वतःचे स्वातंत्र्य गमावून चीनचे स्वामित्व पतकरावे लागले. १६९१ ते १९११ या प्रदीर्घ काळात औटर मंगोलिया हा चीनचा एक प्रांत म्हणूनच होता. चीनमध्ये लोकशाही प्रजासत्ताकाच्या मागणीसाठी झालेल्या क्रांतीचा फायदा घेऊन मंगोलांनी १९११ साली स्वतंत्र प्रजासत्ताकाची मागणी केली. या मागणीला रशियाचा संपूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे औटर मंगोलिया अखेर स्वायत्त विभाग बनला. १९१७ मधील रशियन क्रांतीचा फायदा घेऊन चीनने औटर मंगोलियावर आक्रमण करून तो प्रदेश ताब्यात घेतला (१९१९). याविरूद्ध मंगोल नेत्यांनी १९२० मध्ये रशियाच्या नवीन सत्ताधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मार्च १९२१ मध्ये मंगोल कम्युनिस्ट पक्षाचे अनुयायी रशियात एकत्र आले व त्यांनी ’मगोलियन पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी’ ची स्थापना करून हंगामी लोकशासन स्थापन केले. रशियाच्या मदतीने मंगोल क्रांतिकारकांनी औटर मंगोलियावरील चीनची सत्ता झुगारून या प्रदेशाचे स्वातंत्र्य जाहीर केले व जुन्या मंगोल राजेशाहीचे तेथे पुनरूज्जीवन केले (जुलै १९२१). या स्वतंत्र सरकारला रशियाने नोव्हेंबर १९२१ मध्ये मान्यताही दिली. राजा बोग्दो याच्या मृत्यूनंतर राजेशाही संपुष्टात आली व २६ नोव्हेंबर १९२४ रोजी देशात लोकशाही प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले. देशाचे नाव मंगोलियन पीपल्य रिपब्लिक म्हणजे ’मंगोलिया प्रजासत्ताक’ असे ठेवण्यात आले. १९२५ मध्ये या प्रदेशातून रशियाने मदतीसाठी ठेवलेले आपले सैन्य काढून घेतले. नव्या मंगोल सरकारने देशातील उमरावशाही व बौद्ध भिक्षूंची धर्मसत्ता यांविरूद्ध मोहीम सुरू करून जहागीरदारांच्या व धार्मिक संस्थांच्या मालमत्ता जप्त केल्या व देशात आर्थिक समानता साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. १९३६ मध्ये रशिया व मंगोलिया प्रजासत्ताक यांच्यात परस्पर-सहकार्याचा तह होऊन या दोन राष्ट्रांतील संबंध दृढ करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी म्हणजे १९३९ मध्ये जपानचे मँचुरियातील आक्रमण रशियन व मंगोल सैन्यांनी परतवून लावले. २० ऑक्टोबर १९४५ रोजी देशात सार्वमत घेऊन मंगोलिया प्रजासत्ताक हे सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. ५ जानेवारी १९४६ रोजी त्यास चीननेही मान्यता दिली. १४ फेब्रवारी १९५० च्या रशिया-चीन करारानुसार त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देशाचा तत्कालीन पंतप्रधान व पक्षप्रमुख चॉइबल्सान (१९३८-५२) हा जानेवारी १९५२ मध्ये मरण पावला व त्यानंतर युमझागिन त्सेदेंबल हा पंतप्रधान झाला. याच्या कारकीर्दीत जुलै १९६० मध्ये देशाचे नवीन संविधान तयार करण्यात आले. मंगोलिया प्रजासत्ताकाला १९६१ मध्ये अमेरिकेने मान्यता दिली व तेव्हापासून त्यास संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्वही मिळाले. डिसेंबर १९६२ मध्ये चीन व मंगोलिया प्रजासत्ताक यांच्यातील सरहद्द कायम करण्यात आली. १९६६ पासून रशिया-चीन संबंध बिघडत गेले व परिणामतः रशियाधार्जिण्या मंगोलिया प्रजासत्ताकाचे चीनशी असलेले संबंधही बिघडू लागले. चीनमधील मंगोल लोकांना चीनकडून फार वाईट वागणूक दिली जाते, अशी तक्रार मंगोलिया प्रजासत्ताकाने केली. सरहद्दीबाबत चीनशी खटके उडू लागले. ११ जून १९७४ रोजी राष्ट्रप्रमुखाचे पद व मंगोलियन पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टीचे नेतेपदही त्सेदेंबलने आपल्याकडे घेतले. त्याने मंत्रिमंडळाच्या अध्यक्षपदी जम्ब्यन बटमोन्ह याची नेमणूक केली. डिसेंबर १९८२ अखेर हे दोघेही याच पदांवर होते.


देशाच्या १९६० साली झालेल्या संविधानदुरूस्तीनुसार सर्व सत्ता ‘पीपल्स ग्रेट हुराल’ म्हणजे संसदेच्या हाती असते. यात एकूण ३७ सदस्य (१९८२) असून ते ५ वर्षांसाठी सार्वत्रिक मतदानपद्धतीने निवडलेले असतात. संसदेच्या सभा वर्षातून दोन वेळा होतात. देशात अध्यक्षमंडळ (प्रिसिडियम) असून त्यात एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव व पाच इतर सभासद असतात. प्रिसिडियमचा अध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असतो. संसद सदस्यांतून मंत्रिमंडळाचे सदस्य निवडले जातात.

देशात कम्युनिस्ट मंगोलियन पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी (एम्-पीआर् पी) हा एकमेव अधिकृत राजकीय पक्ष आहे. पक्षकार्यावर देखरेख करण्यासाठी केंद्रीय समिती असते. स्थानिक प्रशासनासाठी देशाचे एकूण १८ विभाग पाडलेले असून देशात तीन नगरपालिका आहेत (१९८२). 

न्याय व संरक्षण : देशात एक सर्वोच्च न्यायालय असून ऊलान बाटोर येथे देशातील एकमेव नगर न्यायालय (सिटी कोर्ट) आहे. याशिवाय १८ प्रांतामध्ये १८ प्रांतिक न्यायालये व इतर स्थानिक न्यायालयेही आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्ष व इतर न्यायाधीश हे संसदेकडून पाच वर्षासाठी निवडले जातात. देशाच्या सर्वोच्च अधिवक्त्याची (प्रोक्युरेटर ऑफ द रिपब्लिक) नियुक्ती संसदेकडून ५ वर्षांसाठी केली जाते. न्यायालये अगर इतर शासकीय, प्रशासकीय कार्यालये नियमांनुसार आपले काम करतात किंवा नाही, हे पाहण्याचे विशेष काम त्याच्याकडे असते.

देशात सैनिकी शिक्षण व व्यवस्था रशियन धर्तीवर आहे. १९८२ साली देशात सु. ३१,५०० सैनिक होते. त्यांपैकी ३,१०० हवाई दलात होते. यात काही रशियन सल्लागार होते. संरक्षण दलात प्रत्येक नागरिकाला कमीतकमी ३ वर्षे नोकरी करण्याची सक्ती आहे. देशाला शस्त्रपुरवठा रशियाकडून केला जातो. देशात १९८२ मध्ये १०,००० लोकांची सैनिकीसम संघटना (पॅरामिलिटरी) होती. १९७० पासून देशात नागरी संरक्षक दल उभारण्यात आले आहे.

चौंडे. मा. ल.

आर्थिक स्थिती :  १९४८ पासून पंचवार्षिक योजनांचा अवलंब करीत गेल्यापासून मंगोलियाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत गेल्याचे दिसते. साम्यवादी देशाकडून, त्यांतही कोमेकॉन (कौन्सिल फॉर म्युच्युअल इकॉनॉमिक ॲसिस्टन्स) सदस्यदेशांकडून, मंगोलियाला मोठ्या प्रामाणावर आर्थिक साहाय्य मिळत गेले. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील मंगोलियन अर्थव्यवस्थेची दोन ठळक वैशिष्ट्ये म्हणजे समाजवादी पद्धतीच्या उत्पादनाचा अंगिकार व मंगोलियन प्रजासत्ताकाच्या पहिल्या तीस वर्षांपेक्षा अधिक वेगाने झालेला आर्थिक विकास, ही होत.

स्थापनेपासून देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य तो आकार देण्याच्या कामी विकासकार्यक्रमांनी जो काही हातभार लावला, तो लक्षात घेतल्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेचे सांप्रतचे चित्र नीट सुस्पष्ट होणार नाही कारण या कार्यक्रमांच्या योगेच मंगोलियन अर्थव्यवस्थेत व समाजामध्ये घडून आलेले दृश्य बदल अधिकच ठळक होतात. मंगोलियन दृष्टिकोनातून पाहता, देशाचा उदय झाला तेव्हा राज्यकर्त्यांपुढे ठळक नजरेत भरणारे अर्थव्यवस्थेचे मागासलेपण नाहीसे करणे (विशेषतः इतर राष्ट्रांना कच्चा माल व साधनसामग्री पुरविणारा देश, अशी मंगोलियाची त्यावेळी असलेली प्रसिद्धी), हे एक महत्त्वाचे कार्य होते. हे कार्य साध्य करण्यासाठी प्रथम कृषिकऔद्योगिक अर्थव्यवस्थेची उभारणी करणे व नंतर समाजवादाच्या तत्त्वांचा अवलंब करून (समाजवादाच्या चौकटीत) हीच अर्थव्यवस्था औद्योगिक-कृषिक अशा प्रकारची करणे, हे प्रमुख धोरण शासनाच्या दृष्टिपथात होते. अशा प्रकारचे धोरण अंगिकारणारे युरेशियामधील मंगोलियन प्रजासत्ताक हे पहिलेच राष्ट्र होय. राष्ट्र स्थापन झाले त्यावेळी राष्ट्रात एकही उद्योग अस्तित्वात नव्हता १९३० च्या पुढे औद्योगिकीकरणाचा पाया देशात दृढपणे रोवला गेला १९७० च्या पुढील काळात स्थूल औद्योगिक उत्पादनाचे प्रमाण वाढत गेल्याचे आढळते १९७१ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा २०%,स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा ३६%, तर एकूण निर्यातीतील हिस्सा १५% होता आणि वार्षिक औद्योगिक उत्पादनाचा वेग सु. १०% होता. अर्थातच मंगोलियाच्या औद्योगिकीकरणात सोव्हिएट रशिया व इतर समाजवादी राष्ट्रे (कोमेकॉन राष्ट्रे) यांच्याकडून मिळालेले तांत्रिक व आर्थिक साहाय्य यांचा सिंहाचा वाटा आहे यात शंका नाही. मंगोलियन अर्थव्यवस्थेचा शेती हा अद्यापिही प्रमुख आधार आहे, कारण ६४ टक्के लोकांचा पशुपालन व शेती हा जोडव्यवसाय आहे. १९५० च्या पुढे शेतीमध्ये सहकारी तत्त्वाचा अवलंब केल्यापासून अनेक तांत्रिक बदल व सुधारणा घडून आल्या.

शेती : मंगोलियन शेतीमध्ये १९२१ च्या पुढे अतिशय मूलगामी परिणाम घडून आले. १९३०-३५ पर्यंतच्या काळात, एकूण धोरण मोठाले जमीनदार व सरकारी अधिकारी यांच्याकडील जमिनी काढून घेण्याचेच होते काही सहकारी तत्त्वावर चालणारे व्यापारी स्वरूपाचे उपक्रम सुरू करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, देशातील तत्कालीन लहान व्यक्तिगत आराट (गुरे पाळणारे व शेतकरी) कुटुंबे ही अर्थव्यवस्थेमध्ये बसत नसल्याचे आढळून आले आणि त्यांऐवजी १९५० च्या पुढील काळात, लहान प्रमाणावरील शेतीचे स्वरूप बदलले जाऊन त्याची जागा मोठ्या प्रमाणावरील शेती उत्पादनाने घेतली याचाच अर्थ, सु. २ लक्ष आराट कुटुंबांची जागा २७० च्यावर सहकारी कृषिसंस्थांनी व ३० च्यावर शासकीय शेतांनी घेतली. सरासरीने, प्रत्येक सहकारी कृषिसंस्थेजवळ सु. ६०,००० गुरे, ४०० हे. प्रत्यक्ष लागवडीखाली आणलेली जमीन (पेरलेली जमीन), ७ ट्रॅक्टर व ७ मोटारवाहने असतात. प्रत्येक शासकीय शेताच्या अखत्यारीत सरासरीने २७,००० गुरे १३,००० हून जास्त हे. कृषियोग्य जमीन, ६० ट्रॅक्टर व सु. ३० मोटारवाहने असतात. दरडोई गुरांचे प्रमाण २० पेक्षा अधिक असून ते सबंध जगात सर्वाधिक आहे. आराट कुटुंबियांना सहकारी कृषिसंस्थांमधील उत्पादनाचा लाभ मिळतोच, त्याशिवाय त्यांना अधिक उत्पन्नाकरिता वैयक्तिक पशुपालनही करता येते. उत्तरेकडील भागात त्यांना कमाल ५० गुरे, तर दक्षिण भागात ७५ गुरे बाळगता येतात. याशिवाय अद्यापि लागवडीखाली न आणल्या गेलेल्या जमिनींची लागवडही करता येण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावरील कृषिव्यवसायाबरोबरच यांत्रिकीकरणाचाही अंगिकार करण्यात आल्यामुळे व विजेच्या वापराचाही प्रसार झाल्याने मेंढ्यांची लोकर काढणे तसेच दूधउत्पादन यांमध्येही यांत्रिकीकरण आले आहे. १९८० मधील देशातील तृणधान्ये, भाजीपाला व वैरण (चारा) यांखाली अनुक्रमे ५.५७५ लक्ष हे. ९.८ हजार हे. व १.३६७ लक्ष हे. अशी एकूण ७.०४ लक्ष हे. जमीन लागवडीखाली होती. १९८२ मध्ये ती ६.११ लक्ष हे. झाली. त्याच वर्षी प्रमुख पिकांचे पुढीलप्रमाणे उत्पादन झाले (आकडे हजार मे. टनांत): गहू, सातू, ओट आणि इतर तृणधान्ये ५५०.० बटाटे ७८ इतर पालेभाज्या ३६ वैरण ३०२ गवत ११७२.८. देशातील १९८० मधील पशुधनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्ष नगांत): मेंढ्या १४२.३०७ बकऱ्या ४५.६६७ घोडे १९.८५४ गुरे २३.९७१ उंट ५.९१५ कोंबड्या २.४९३ डुकरे ३३,९००. पशुजन्य पदार्थांचे उत्पादन असे होते (मे. टनांत) : गुरांचे मांस ६५,६०० मेंढ्यांचे मांस १,०५,४००बकऱ्यांचे मांस २४,५०० घोड्यांचे मांस १,०१,२०० दूध (लक्ष लिटर) ९२४. मेंढ्यांची लोकर, २०,००० टन गुरांची चामडी (नगांत) : ४.४२४ लक्ष मेंढ्यांची चामडी ३५.१० लक्ष बकऱ्यांची चमाडी ११.८६ लक्ष.


उद्योग : मंगोलियाच्या स्थापनेपासून शासकीय नियोजनाच्या सूत्रात, औद्योगिकीकरणास चालना व विकास, ही उद्दिष्टे स्पष्ट दिसून येतात. तथापि प्रारंभी अनेक अडचणी आल्या, विशेषतः तंत्रज्ञानाचा अभाव आणि प्रचंड प्रमाणावरील भांडवलओघाची गरज या गोष्टी सोव्हिएट रशियाच्या सहकार्यानेच दूर करणे मंगोलियन शासनाला शक्य झाले. १९२० व १९३० या दोन दशकांमध्ये लाकूड कापणे, बांधकाम सामग्री यांच्या निर्मितीचे कारखाने उभारण्यात आले खाणकाम व शक्तिनिर्मिती उद्योगही सुरू करण्यात आले. १९४८-५२ व १९५३-५७ या दोन पंचवार्षिक योजनामुळे व १९५८-६० या त्रैवार्षिक योजनेमुळे औद्योगिकीकरणाला अधिक वेग आला. वीजनिर्मिती, अन्नउद्योग व खाणउद्योग यांबरोबरच पीठगिरण्यांचा उद्योगही वेगाने चालू झाला. इंधन व शक्तिनिर्मिती उद्योगांचाही विस्तार करण्यात आला. १९६० च्या पुढे अवजड उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतविण्यात आले. १९७१ च्या सुमारास राष्ट्रीय उत्पन्नातील उद्योगांचा वाटा सु. २५ टक्के होता. उद्योगांचा विस्तार, तांत्रिक कार्यक्षमता व सर्वाधिक उत्पादकता यांवर अधिक भर देण्यात आला.

उद्योगांचा विकास सहकारी आणि सरकारी अशा दोन क्षेत्रांमधून करण्यात येत असतो मात्र सहकारी क्षेत्रामधून होणाऱ्या औद्योगिक उत्पादनाचे प्रमाण सरकारी क्षेत्राच्या तुलनेने बरेच कमी आहे. अंतर्गत सेवनाकरिता सहकारी क्षेत्रामधून अनेक वस्तूंचे उत्पादन करण्यात येत असते त्याचप्रमाणे दुरूस्तीकामही हे क्षेत्र पार पाडीत असते. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून, सरकारी क्षेत्रातील उद्योगांचा झपाट्याने विस्तार झाल्याचे व त्यांमध्ये विविधता आल्याचे आढळते. ऊलान बाटोर या शहरात ‘इंडस्ट्रियल कंबाइन’ हा प्रमुख उद्योग असून तो कपडे, पादत्राणे, शेतीची अवजारे, फर्निचर, चिनी मातीच्या वस्तू, साबण, आगकाड्या वगैरेंचे उत्पादन करतो. सबंध देशभर दुग्धशाळांचे जाळे पसरलेले असून अन्नप्रक्रिया उद्योगही झपाट्याने विकास पावत आहे. कोमेकॉन देशांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या (विशेषतः सोव्हिएट रशियाकडून) आर्थिक व तांत्रिक साहाय्यामुळेच मंगोलिया प्रजासत्ताकातील औद्योगिकीकरणाचा विकास होऊ शकला. १९८२ मध्ये प्रमुख वस्तूंचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते :  विटा ११२६.९ लक्ष नग चुना ९०,४०० मे. टन कापीव लाकूड ५,७८,९०० घ.मी. फेल्ट ६,१७,७०० मी. पादत्राणे १७,५०५ लक्ष जोड्या लोकरीचे कापड ९,६३५ लक्ष मी. पीठ १.२० लक्ष मे.टन मांस ६८,१०० मे. टन बीर ९,४०८ लक्ष लिटर.

देशात इंधनाकरिता अनेक पर्याय वापरले जातात. डार्खान येथे रशियाच्या सहकार्याने औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र बांधण्यात आले आहे. ऊलान बाटोर (६०,००० किवॉ.), डार्खान (१,००,००० किवॉ.) या शहरांत मोठी, तर सखे बाटोर (६,००० किवॉ.) आणि चॉइबल्सान (३,००० किवॉ.) या शहरांत लहान विद्युत् उत्पादन केंद्रे आहेत. १९८२ मध्ये देशात १५,७८,३०० मेवॉ. ता. एवढे वीजउत्पादन झाले. भूसर्वेक्षणांवरून देशात लोह, कथिल, यांच्या धातुकांचे कोळशाचे व तांबे, सोने, चांदी यांचे साठे असल्याचे आढळले आहे. कोळसा हे सर्वांत महत्त्वाचे खनिज होय. त्यानंतर फ्लुओरस्पार या खनिजाचा क्रम लागतो. टंगस्टन, युरेनियम, खनिज तेल इत्यादींचेही उत्पादन होत असते. मंगोलियन अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देणारी महत्त्वाची घटना म्हणजे रशिया व मंगोलिया प्रजासत्ताक यादोन्ही शासनांचा बूल्गान प्रांतातील एर्देनेत येथील तांबे व मॉलिब्डिनम यांच्या साठ्यांचे उत्पादन करण्यासाठी स्थापन झालेला संयुक्त प्रकल्प होय. १९८२ मध्ये कोळसा व लिग्नाइट यांचे अनुक्रमे ४९,२५,५०० मे. टन व फ्लुओरस्पारचे ६.६७ लक्ष मे. टन उत्पादन झाले.

देशातील सर्व प्रकारचे उद्योग तसेच व्यापार-वाणिज्य ही सरकारी अथवा सहकारी क्षेत्रात येत असल्यामुळे कामगार संघटना विविध प्रकारच्या नसून त्यांचा एक केंद्रीय महासंघच असतो (सेंट्रल कौन्सिल ऑफ मंगोलियन ट्रेड युनियन्स). या महासंघाच्या देशभर शाखा पसरलेल्या आहेत. १९८२ मध्ये महासंघाची सदस्यसंख्या ४.२५ लक्ष असून हा महासंघ ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ शी संबद्ध आहे. औद्योगिक सहकारी संस्था या आता शासनाच्या औद्योगिक संरचनेतच अंतर्भूत करण्यात आल्या असून विविध मंत्रालयांच्या अखत्यारीखाली औद्योगिक उत्पादन संघटना स्थापण्यात येत आहेत. औद्योगिक सहकारी संस्था यांऐवजी संबद्ध उद्योग समूह असे त्यांचे स्वरूप बनले आहे. १९८० मध्ये सरकारी क्षेत्रातील श्रमबलाचे विभाजन पुढीलप्रमाणे होते: उद्योग ६६,२०० बांधकाम २२,६६० सरकारी शेती ३७,५०० वाहतूक व संदेशवहन ३३,६०० आणि व्यापार, सेवा उद्योग, प्रापण ३४,१००.

अर्थकारण, व्यापार इ. : मंगोलियन स्टेट बँक (स्था.१९२४) ही देशातील प्रमुख बँक असून तिच्या ६५ शाखा आहेत. १९५४ पर्यंत ही बँक म्हणजे रशिया व मंगोलिया यांची संयुक्त वित्तसंस्था होती व ती ‘मगोल बँक’ या नावाने ओळखली जाई. मध्यवर्ती बँकेची सर्व कार्ये हीच बँक पार पाडते. कृषी, उद्योग व पशुपालन या उद्योगांकरिता अल्प व दीर्घ मुदतीची कर्जे हीच बँक पुरविते. स्टेट बँकेचा ३० परदेशी बँकांशी प्रत्यक्ष संबंध आहे. देशात खाजगी विमापद्धती अस्तित्वात नाही. वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीखालील शासकीय विमा संचालनालयाद्वारा विमाव्यवहार पाहिला जातो. देशात रोखे किंवा शेअरबाजारही नाही. ’टूग्रीक’ हे मंगोलियाचे अधिकृत चलन असून एका टूग्रीकचे १०० माँगोंमध्ये भाग केलेले असतात. १,२,५,१०,१५,२० आणि ५० माँगो व १ टूग्रीक यांची नाणी, तर १,३,५,१०,२५,५० व १०० टूग्रीकच्या नोटा प्रचारात आहेत. विनिमय दर १९८२ च्या अखेरीस १ स्टर्लिंग पौंड = ५.१३ टूग्रीक आणि १ अमेरिकन डॉलर = ३.१५ टूग्रीक किंवा १०० टूग्रीक = १९.४९ स्टर्लिंग पौंड = ३१.७५ अमेरिकन डॉलर असा होता. वार्षिक अर्थसंकल्प ‘ग्रेट पीपल्स हुरालला’ (संसदेला) सादर करण्यात येतो. सरकारी मालकीच्या व सहकारी उद्योगधंद्यांकडून (उपक्रमांकडून) पण्यावर्त (उलाढाल) करांच्या स्वरूपात व त्यांना झालेल्या नफ्यातून विशेष वजातींच्या स्वरूपात जवळजवळ ६०% महसूल जमा करण्यात येतो महसुलाच्या इतर बाबींमध्ये सामाजिक विमा, निधी, सहकारी शेती, जंगल व मृगया यांवरील करांचा अंतर्भाव होतो. खर्चाच्या बाबींमध्ये आर्थिक विकास (४९.८%), समाजिक व सांस्कृतिक गरजा –उदा., शिक्षण, समाजकल्याण इ. – (३८.२%), सार्वजनिक प्रशासन, संरक्षण इ. (१२%) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. १९८३ च्या अर्थ संकल्पामधील महसूल व खर्च यांचे आकडे सारखेच म्हणजे ५१४.५६ कोटी टूग्रीक होते. 

ऊलान बाटोर येथे उत्पादित केल्या जाणाऱ्या अथवा बाहेरून आयात केल्या जाणाऱ्या उपभोक्ता वस्तूंचे वितरण शासकीय विपणन संस्थामार्फत करण्यात येते. मंगोलियाच्या विदेश व्यापारात सोव्हिएट रशिया हा प्रमुख भागीदार देश असून सु. ७५% व्यापार एकट्या या देशाशी चालतो. १९८० साली निर्यात व्यापारात समाजवादी राष्ट्रांचा हिस्सा ९८.४% असून त्यांमध्ये कोमेकॉन गटातील राष्ट्रांचा९६.५%, इतर राष्ट्रांचा १.९% व भांडवलशाही राष्ट्रांचा १.६%, असे निर्यातप्रमाणे होते. त्याच वर्षाच्या आयात व्यापारापैकी ९८.५% आयात समाजवादी राष्ट्रांकडून झाली आणि त्यांमध्ये कोमेकॉन राष्ट्रांचा ९६.८%, इतर राष्ट्रांचा १.७% व भांडवलशाही राष्ट्रांचा १.५%, असा वाटा होता. मंगोलियाच्या निर्यात व्यापारातील ठळक वस्तू म्हणजे इंधने, खनिजे, धातू (२६.४%) गुरे, मांस, चरबी, धान्य (३२.४%) लोकर, चामडी व कातडी, फर (३०.९%) या असून आयात व्यापारातील प्रमुख बाबी यंत्रसामग्री व उपकरणे (३३.१%) इंधने, खनिजे, धातू (२४.१%) औद्योगिक उपभोग्य वस्तू (२०.९%) या होत.


मंगोलियाची नियोजनबद्ध अर्थव्यवस्था आहे. पहिली वार्षिक योजना १९४१ मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर पुढील सहा वार्षिक योजना पार पाडण्यात आल्या. मंगोलियाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत (१९४८-५३) २,०३७ लक्ष टूग्रीकांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९५३-५८) ती ६,००० लक्ष टूग्रीक, तर १९५८-६० या विशेष प्रकारच्या त्रैवार्षिक योंजनेमध्ये ही गुंतवणूक ९,६१० लक्ष टूग्रीक झाली. तृतीय पंचवार्षिक योजनेत (१९६१-६५) या गुंतवणुकीने ४४६ कोटी टूग्रीकांची पातळी गाठली. यांपैकी ७०% रक्कम औद्योगिक विकासार्थ राखून ठेवण्यात आली होती. हा औद्योगिक विकास शक्तिसाधने (३१%), खाद्यान्न उद्योग व इतर उपभोग्य वस्तु-उद्योग (३२%) आणि बांधकाम उद्योग (२९%) या तीन विभागांत प्रामुख्याने करावयाचा होता. चौथ्या पंचवार्षिक योजनेत (१९६६-७०) औद्योगिक उत्पादनात मागील योजनेपेक्षा ८०% अधिक वाढ करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. पाचव्या पंचवार्षिक योजनेत (१९७१-७५) बचती साधून अधिक उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. सहाव्या पंचवार्षिक राष्ट्रीय आर्थिक व सांस्कृतिक योजनेची (१९७६-८०) उद्दिष्टे कृषिउत्पादन वाढविणे, औद्यौगिक उत्पादनात गुणवत्ता वाढविणे व उत्पादकतेत लक्षणीय वाढ करणे, अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये तसेच सांस्कृतिक क्षेत्रात दर्जा व गुणवत्ता वाढविणे, ही होती. सातव्या पंचवार्षिक योजनेत (१९८१-८५) राष्ट्रीय उत्पन्न ३८-४१ टक्क्यांनी, स्थूल औद्योगिक उत्पादन ५२-५८ टक्क्यांनी, स्थूल कृषिउत्पादन २२-२३ टक्क्यांनी, तर विदेश व्यापार ५०-५५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

वाहतूक व संदेशवहन : मंगोलियन लोहमार्ग ऊलान ऊडे (रशिया) पासून ऊलान बाटोर (मंगोलिया प्रजासत्ताक) मार्गे पीकिंगपर्यंत (चीन) जातो. हा लोहमार्ग १९४९-५५ या काळात बांधण्यात आला असून त्याची लांबी १,४२५ किमी. आहे. मॉस्को-ऊलान बाटोरपीकिंग ही जलद आगगाडी आठवड्यातून दोन वेळा धावते. १९६४ मध्ये मंगोलियन लोहमार्गाचे दोन फाटे वा शाखा डार्खान येथील औद्योगिक प्रकल्पापर्यंत व तामसारव बूलाखपर्यंत नेण्यात आले. मंगोलियन रेल्वे ७५ टक्क्यांहून अधिक मालाची वाहतूक करते.

ऊलान बाटोरपासून चीनकडे व रशियाकडे जाणारे प्रमुख मार्ग दझामिन ऊडे, एर्लिएन व आल्तान बूलाख, क्याखटा या सरहद्दीवरील शहरांतून जातात. चितापासूनचा (रशिया) एक मार्ग मंगोलियाच्या पूर्वेकडील भागातून जातो व त्याचे दोन फाटे अनुक्रमे चॉइबल्सान व अंडर खान या शहरांना मिळतात. बीस्क व इर्कुत्स्क (रशिया) या दोन शहरांपासून अनुक्रमे पश्चिम व वायव्य मंगोलियामधील त्सागानूर, बायान-ऑल्गी आयमाग व खब्सगल सरोवरावरील हॅन्ह या शहरांकडे मार्ग जातात. वरील आणि इतर प्रमुख मार्गांची लांबी मिळून सु. ८,६०० किमी. आहे. साधारणतः शहरांमधील रस्तेच डांबरी     असून त्यांची लांबी सु. १,६०० किमी. आहे. ऊलान बाटोर व बायान खाँगोर या शहरांना जोडणारा पक्का रस्ता १९७५ मध्ये पूर्ण करण्यात आला. डार्खान व एर्देनेत ही शहरे जोडणारा रस्ताही पक्का करण्यात येत आहे. ऊलान बाटोर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये बस वाहतूक सेवा चालू असते.

उत्तर मंगोलियामधील खब्सगल सरोवर व सेलेंगा नदी (४७४ किमी. जलवहनसुलभ) यांमधून जलवाहतूक करण्यात येते. मंगोलियन नागरी हवाई वाहतूक कंपनी (मिआट किंवा ‘मंगोलएअर’ स्था. १९५६) ही अंतर्गत हवाई वाहतूक सेवा उपलब्ध करते. याशिवाय ती ऊलान बाटोर ते इर्कुत्स्क अशीही हवाई वाहतूक सेवा चालविते. रशियाची ‘एरोफ्लोट’ ही हवाई वाहतूक कंपनी मंगोलियास आपली हवाई वाहतूक सेवा उपलब्ध करते. मंगोलएअर आणि एरोफ्लोट संयुक्तपणे आठवड्यातून दोन वेळा ऊलान बाटोर-मॉस्को अशी हवाई वाहतूक करतात. विदेश व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारातील ‘जुल्चिन’ ही शासकीय संस्था (स्था. १९६०) विदेश पर्यटक सेवा कार्य करते. देशात १९७६ मध्ये ३८२ डाकघरे व २१८ दूरध्वनी कार्यालये होती. ऊलान बाटोर, गोबी अल्ताई व ऑल्गी या शहरांत बिनतारी संदेशवहन कार्यालये आहेत. १९८१ साली ४१,५०० दूरध्वनी १,७१,३०० रेडिओसंच व ५७,९०० दूरचित्रवाणीसंच होते. देशात १९६७ पासून दूरचित्रवाणी सेवा सुरू झाली. १९७० मध्ये मंगोलियन दूरचित्रवाणी केंद्र कार्य करू लागेल. ऊलान बाटोर रेडियो दिवसातून २१ तास मंगोलियन, रशियन, चिनी, इंग्रजी, फ्रेंच व कझाक भाषांमधून कार्यक्रम प्रसृत करतो.

समाजवादी अथव्यवस्थेचा अंगीकार केल्याने समाजवादी गटातील इतर देशांच्या तुलनेने मंगोलियातही आधुनिक स्वरूपाची औद्योगिककृषिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचे शासनाचे प्रधान धोरण आहे. गृहनिवसन तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना अधिक प्रमाणात प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. १९६१ व १९६२ पासून मंगोलिया प्रजासत्ताक हा अनुक्रमे संयुक्त राष्ट्रांचा व कोमेकॉन गटाशीच मंगोलियाचा व्यापार असला, तरी १९७० पासून भांडवलशाही राष्ट्रांशी मंगोलियाचा संपर्क वाढत असल्याचे दिसून येते.

गद्रे, वि. रा.

लोक व समाजजीवन : देशात १९८२-८३ मध्ये एकूण लोकसंख्येपैकी सु. ८७% लोक मंगोल वंशाचे (विशेषतः खाल्खा मंगोल) होते. याशिवाय देशात चाहार, बुर्यात व दरिगंगा मंगोल (५%), कझाक (५%), दर्खत, त्साटान इ. जमातींचे लोक राहतात. देशात रशियन आणि चिनी लोक अत्यल्प (२ टक्क्यांपेक्षा कमी) आहेत. देशाच्या ठराविक प्रदेशात या लोकांचे वास्तव्य जास्त असल्याचे दिसून येते. कझाक व दर्खत लोक अनुक्रमे पश्चिम, वायव्य भागांत व खब्सगल सरोवर प्रदेशात आढळतात तर बुर्यात, दरिगंगा मंगोल व चाहार लोक सेलेंगा नदीखोऱ्यात (रशियाच्या सरहद्दीजवळ) आणि देशाच्या आग्नेय भागात राहतात. पशुपालक (विशेषतः रेनडियर पाळणारे) त्साटान लोक कुरणांच्या प्रदेशात दिसून येतात. एकूण लोकसंख्येपैकी सु. १५% लोकच शहरांत दगड-विटांच्या इमारतींत राहतात. त्यामुळे त्यांचा अपवाद वगळता इतर-लोकांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. बहुतेक लोकांचे जीवन पशुपालन व्यवसायावर अवलंबून आहे. पशुपालक भटके लोक कुरणांच्या प्रदेशात ’यूर्ट’ (एक प्रकारचा तंबू) मध्ये राहतात. देशात लोकवस्ती अत्यंत विरळ असून १९८१ मध्ये लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला सु. १.०७ लोक इतकी होती. त्याचवर्षी देशात जननमान व मृत्युमान दर हजारी अनुक्रमे ३७.९ व १०.४ होते.


देशात बौद्ध धर्माचा प्रभाव दीर्घकाल टिकून होता. लामा धर्मगुरू लोकजीवनाचे शास्ते होते. १९३० च्या सुमारास देशात सु. १,००,००० लामा धर्मगुरू होते परंतु कम्युनिस्ट सत्तेच्या उदयानंतर या धर्माचा प्रभाव कमी होत गेला. धार्मिक संस्थांच्या जमिनी आणि इतर मालमत्ता जप्त केल्या गेल्या. १९७० च्या सुमारास देशात फक्त ८२ लामा धर्मगुरू होते. तथापि देशाच्या संविधानात धर्मस्वातंत्र्याचा हक्क अंतर्भूत आहे. देशाच्या काही भागांत तिबेटी बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.

समाजकल्याण व आरोग्य : १९६० पर्यंत मंगोलियाचा आरोग्य सुविधांच्या दृष्टीने पूर्वेकडील देशांत दुसरा क्रमांक होता. १९८० साली देशातील एकूण १०८ रूग्णालयांत ३,६८६ डॉक्टर व १८,१३३ खाटा होत्या. याशिवाय देशात बरेच दवाखाने व औषधोपचार केंद्रे आहेत.

शिक्षण : देशात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. १९७६ साली येथील बालोद्यानांत ३०,००० मुले होती. १९८०-८१ या वर्षात ५७१ शाळांतून (जनरल स्कूल) १३,८८३ शिक्षक व ३,९४,४०० विद्यार्थी ३७ तांत्रिक व्यवसाय शिक्षणसंस्थांत २२,१०० विद्यार्थी २५ विशेष माध्यमिक शिक्षणसंस्थांत १,१०० शिक्षक व १८,७०० विद्यार्थी, तर ७ उच्च माध्यामिक शिक्षणसंस्थांत १,१०० शिक्षक व २३,२०० विद्यार्थी शिकत होते. ऊलान बाटोर येथे एक विद्यापीठ (स्था. १९४२) व सहा उच्च शिक्षणसंस्था आहेत (१९८२). याच वर्षी विद्यापीठात ४० प्राध्यापक, २४० अधिव्याख्याते व १०,००० विद्यार्थी होते. इतर काही उच्च शिक्षणसंस्थांत शिक्षक प्रशिक्षण, वैद्यक, शेतकी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र इ. विषयांचे शिक्षण दिले जाते.

‘मंगोल’ ही देशाची अधिकृत भाषा आहे [⟶ मंगोल भाषा]. १९८२ साली देशात १३ प्रमुख वार्तापत्रे आणि ३२ नियतकालिके प्रसिद्ध होते होती. त्याच वर्षी देशात ४०० पुस्तके प्रसिद्ध झाली. सत्ताधारी पक्षाचे उनेन (ट्रुथ) हे दैनिक मुखपत्र प्रमुख असून १९८१ साली त्याचा खप १,४५,००० प्रती होता.

महत्त्वाची स्थळे : ऊलान बाटोर हे देशाच्या राजधानीचे ठिकाण असून मंगोलियाच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे. हे देशातील दळणवळणाचेही प्रमुख केंद्र व ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गाच्या पीकिंग शाखेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. शहरात एक विद्यापीठ आणि मंगोल, चिनी व तिबेटी भाषांतील प्राचीन हस्तलिखिते असलेले संग्रहालय आहे. डार्खान (लोकसंख्या ५६,४००-१९८०) हे शहर देशाच्या उत्तर भागात ऊलान बाटोर ते ऊलान ऊडे यांना जोडणारा लोहमार्ग व राजमार्ग यांवरील महत्त्वाचे ठिकाण आहे. एर्देनेत (३८,७००) हे ऊलान बाटोर ते पीकिंग या लोहमार्गावरील देशाच्या आग्नेय भागातील प्रमुख ठिकाण आहे. त्याच्याच जवळ वाळवंटी प्रदेशात असलेले साइन शांडा हे छोटे शहर विमानतळामुळे व तेल उत्पादनामुळे प्रगत होत आहे. देशाच्या पूर्व भागात चॉइबल्सान हे रेल्वेस्थानक असून कोळसा क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. उत्तरेस रशियाच्या सरहद्दीवरील सखे बाटोर हे सेलेंगा नदी काठावरील रेल्वेस्थानक असून रशियाशी होणाऱ्या व्यापारमार्गावरील प्रमुख ठिकाण आहे. उल्यासाताई व कॉब्डो ही पश्चिम भागातील डोंगरी वनप्रदेशातील स्थळे जंगलसंपत्तीची व्यापारकेंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. देशाच्या मध्यभागी असलेले त्सेत्सेर्लींख हे इतिहासप्रसिद्ध असून प्राचीन बौद्ध मठाचे केंद्र म्हणून उल्लेखनीय आहे. 

देशातील निसर्गसौंदर्य, वन्य प्राणिजीवन, अभयारण्ये व प्राचीन अवशेष ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. देशात १९६० साली विदेश पर्यटन सेवा कार्यालयाचीही स्थापना करण्यात आली आहे परंतु या व्यवसायाचा अद्याप तितकासा विकास झालेला नाही. १९८२ साली सु. ९,००० विदेशी पर्यटकांनी या देशास भेट दिली.

चौंडे. मा. ल.