हार्बिन : चीनमधील मँचुरिया प्रदेशातील हेलुंग जिआंग प्रांताच्या राजधानीचे ठिकाण, प्रमुख औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक व राजकीय केंद्र. ते अमूर नदीची उपनदी सुंगारी या नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. लोकसंख्या १६,३५,९७१ (२०१०). मध्ययुगीन काळात मासेमारी करणारे छोटे खेडे म्हणून याची ओळख होती. १८९८ मध्ये रशियन सरकारच्या मदतीने ट्रान्स-सायबीरियन रेल्वेमार्गाचे काम सुरू झाल्यानंतरहे बांधकामाचे प्रमुख केंद्र बनले व शहराचा नियोजनपूर्वक विकास सुरू झाला. १९०४-०५ मधील रशिया-जपान युद्धात लष्करी तळ म्हणून हार्बिनचा उपयोग केला गेला. त्यामुळे लष्करासाठी आवश्यक साधनांच्या निर्मितीची येथे सुरुवात झाली व सुंगारी नदीवरील आंतरराष्ट्रीय व्यव-सायाच्या दर्जाचे बंदर म्हणून हार्बिनचा विकास झाला आणि हार्बिन आधुनिक शहर बनले. ऑक्टोबर १९१८ मधील साम्यवादी चळवळीनंतर १ लाख रशियन सैनिकी अधिकारी व सरदारांनी हार्बिन येथे आश्रयघेतला व हे लष्करी केंद्र बनले. १९३१ मध्ये जपानने मँचुरियावर हल्ला करून हा प्रांत काबीज केला. १९३२–४५ या कालावधीत हार्बिन पिंक्यांग (बिन्ज्यांग) नावाने ओळखले जात होते. दुसऱ्या महायुद्धात (१९४५) रशियाने जपानकडून हा प्रदेश परत मिळविला.

 

हार्बिन हे १९४९ नंतर देशातील प्रमुख औद्योगिक ठिकाण म्हणून विकसित झाले आहे. आजमितीस सोयाबीन, साखर, अन्न पदार्थ,तंबाखू , चामड्याच्या वस्तू , साबण, खाणकाम आणि धातुशोधक उप-करणे, कृषी अवजारे, प्लॅस्टिक आणि विद्युत्निर्मिती उपकरणे इ. निर्मिति-उद्योग येथे चालतात. हार्बिन हे चीनमधील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे वाहतूक केंद्र असून येथे ५ रेल्वेमार्ग तसेच ९ राष्ट्रीय व राज्यमार्ग एकत्र येतात.

 

येथे दीर्घकालीन हिवाळे व अल्पकालीन उन्हाळे असतात. हिवाळ्यातील नोव्हेंबर ते मार्च महिन्यांतील तापमान गोठणबिंदूच्या खाली (जानेवारीतील किमान तापमान -२४° सें.पर्यंत) असते. येथे गहू, मका, सोयाबीन, साखर-बीट, अळशी, चिनी ऊस इ. अन्नधान्य पिके घेतली जातात. शहरात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अनेक संस्था असून त्यांत हार्बिन तंत्रज्ञान संस्था प्रसिद्ध आहे.

 

येथे जगातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय हिम शिल्पकला महोत्सव दरवर्षी भरतो. त्यातील बर्फाच्या कलाकृती पर्यटकांना आकर्षित करतात. येथील संस्कृतीवर रशियन, यूरोपियन, हान, मँचुरियन इ. संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो. येथील इमारतींचे बांधकाम, चर्च, कलाकृती इ. यूरोपीय पद्धतीप्रमाणे असल्यामुळे या शहराला चीनचे पॅरिस असेही म्हणतात.

 

म्हस्के, पांडुरंग