सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूतपूर्व संस्थानची राजधानी आणि कोकणातील एक लघुउद्योजक शहर. त्याची लोकसंख्या २२,८७१ (२००१) होती. सावंतवाडी तालुक्याचे मुख्यालय येथे असून ते मुंबई-पणजी (गोवा) या सतरा क्रमांकाच्या महामार्गावर वेंगुर्ल्याच्या पश्चिमेस ३१ किमी. वर व कोल्हापूरच्या नैर्ऋत्येस सु. ११० किमी. वर वसले आहे. त्याची सस.पासून उंची सु. ११८ मी. असून पश्चिमेकडील वाडी शिखराची उंची ३९६ मी. आहे. हे गाव फोंड सावंत यांनी १६७० मध्ये वसविले. सांप्रत मोती तलाव नावाच्या (बांधकाम १८७४) सु.१३ हे. क्षेत्राच्या निसर्गरम्य तलावाच्या सभोवती गावाची वस्ती विखुरलेली आहे. या तलावाची सरासरी खोली २ मी. असून त्याचा मुख्यत्वे उपयोग कृषिक्षेत्र भिजविण्यासाठी तसेच जनावरे

सावंतवाडीतील निसर्गरम्य मोती तलावपरिसर

व कपडे धुण्यासाठी केला जातो. तलावाच्या बाजूला बापूसाहेब महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा आहे. तलावाच्या पूर्वेस रस्त्याच्या पलीकडे जुना जीर्ण अवस्थेतील मातीचा किल्ला आहे. त्याच्या ईशान्य व दक्षिण बाजूस खंदक खोदलेला आहे. किल्ल्याला तीन प्रवेशद्वारे असून त्याचे क्षेत्रफळ ४५,०३६ चौ. मी. आहे परंतु डोंगरउताराच्या नैसर्गिक रचनेमुळे त्याचे बांधकाम वेडेवाकडे झाले आहे. उत्तरेकडील दरवाजाला लागून दोन बुरूज आहेत. किल्ल्याच्या आतील बाजूस भूतपूर्व संस्थानिकांचा राजवाडा असून तेथे काही जुनी शस्त्रास्त्रे (विशेषतः तोफा) आढळतात. पूर्वी किल्ल्याला तटबंदी होती, आता तिची पडझड झालेली आहे. किल्ल्यात राजवाड्याशिवाय अन्य काही इमारती आढळतात. संस्थानकाळात त्यांचा उपयोग प्रशासकीय कामांसाठी केला जात असे. शहराचे क्षेत्रफळ सु. ७ चौ. किमी. असून त्याचे विभाजन सात लहान लहान वाड्यांत (पेठांत) झाल्यामुळे अरुंद रस्ते व विखुरलेली घरे आढळतात.

सावंतवाडीत १९३१ मध्ये नगरपरिषदेची स्थापना झाली. तीद्वारे पाणीपुरवठा, शहराची स्वच्छता, रस्त्याची डागडुजी वगैरे कामे केली जातात. शहरात प्राथमिक विद्यालयांव्यतिरिक्त चार माध्यमिक विद्यालये असून एक पंचम खेमराज महाविद्यालय आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि काळूस्कर हायस्कूल ही जुनी विद्यालये असून इंग्रजी माध्यमाचे सेंट फिलोमेना इंग्लिश स्कूल आहे. शहरात रुग्णालये, पशु रुग्णालये, ग्रंथालय, बालोद्यान, चित्रपटगृहे, दूरध्वनी केंद्र, तसेच तालुक्याची सर्व शासकीय कार्यालये आहेत. दर मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. सावंतवाडीत शोभादायक नक्षीदार वस्तूंची निर्मिती होते. शहरात रंगीत माल बनविण्याचे लहान कारखाने आहेत. त्यांत गंजीफे, बुद्घिबळ, पाळणे वगैरे काष्टसाहित्य तयार होते. शिवाय या कारखान्यांतून गव्याच्या शिंगांच्या कलाकुसरयुक्त वस्तू बनविल्या जातात. लाख व लाकडाची खेळणी, गवताचे पंखे, चटया, टोपल्या, घोड्यांच्या अलंकृत रिकिबी वगैरेंची येथे निर्मिती होते. विशेषतः जंगली लाकूड व नारळाच्या झाडापासून अनुक्रमे खेळणी, केरसुण्या, काथ्या या वस्तू तयार करणारे कुटिरोद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहेत. शेवटचे संस्थानिक शिवरामराजे यांच्या पत्नी सत्त्वशीलादेवी या सावंतवाडीतील लाखकामाच्या पुनरुज्जीवनकर्त्या व स्थानिक हस्तकलांच्या पुरस्कर्त्या असून त्यांनी लाखकाम, हस्तकला, विणकाम, भरतकाम या कलांचे स्थानिक महिलांना प्रशिक्षण दिले आणि त्यासाठी सावंतवाडी महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली. शिवाय सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील गरीब व गरजू महिलांकरिता त्यांनी लघुउद्योगांची सुरुवात केली. त्यांना मोफत शिवणयंत्रे दिली. सत्त्वशीलादेवींना या कार्यासाठी राष्ट्रीय व राज्य पारितोषिके मिळाली होती. येथील लाकडी खेळणी प्रसिद्घ असून त्यांची निर्यात होते. विडी तयार करण्याचे उद्योगही शहरात चालतात. शहरातून दोन मराठी दैनिके व चार साप्ताहिके प्रसिद्घ होतात.

दैनंदिन कारभाराच्या सोयीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सावंतवाडी व कणकवली असे दोन प्रशासकीय उपविभाग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीनंतर (१९८१) करण्यात आले. त्यामुळे ही उपविभागीय कार्यालये येथे आहेत. शिवाय या तालुक्यात बागायतीखालील क्षेत्रात नारळ व सुपारी ही पिके मोठ्या प्रमाणावर होतात, त्यामुळे त्यांचाही व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. तालुक्यात आंबोली हे आरोग्यधाम असून येथे कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना झाली (२००१). पर्यटनस्थळ म्हणून ते विकसित झाले आहे. तालुक्यातील माजगांव येथील औद्योगिक वसाहत, तिलारी येथील जलसिंचन प्रकल्प आणि कोलगांव येथील एकात्मिक दुग्धविकास प्रकल्पांतर्गत बांधलेले पाच हजार लिटर क्षमतेचे शीतगृह यांमुळे सावंतवाडी तालुका एक प्रगतिशील तालुका म्हणून ख्यातनाम झाला आहे.

देशपांडे, सु. र.