बॉर्दो : फ्रान्सच्या जिराँद प्रांताची राजधानी आणि देशातील महत्त्वाचे नदी बंदर. लोकसंख्या २,२६,२८१ (१९७५). हे गारॉन नदीतीरावर नदीमुखापासून ९६ किमी. आत, पॅरिसच्या नैर्ऋत्येस ५६० किमी. अंतरावर वसले आहे. लोहमार्ग, सडका, हवाई व जलवाहतूक यांचे हे केंद्र आहे. प. आफ्रिका, वेस्ट इंडीज, उत्तर व दक्षिण अमेरिका या सर्वांशी संपर्क साधता येण्यासारखे फ्रान्सचे हे प्रवेशद्वार मात्र इतर फ्रेंच बंदरांच्या तुलनेने विकसित होऊ शकले नाही, कारण मासीफ सेंट्रलचा अडसर होय.

प्राचीन काळी या शहराजवळच केल्टिक टोळ्यांची राजधानी होती. रोमन काळात ॲक्विटेक प्रांताची ही राजधानी ‘बर्डिगल’ नावाने ओळखली जाई. पाचव्या शतकात व्हिसीगॉथ आणि फ्रँक टोळ्यांच्या वर्चस्वाखाली याचे महत्त्व लयास गेले. मात्र पुन्हा अकराव्या शतकात ॲक्विटेनच्या ड्यूकने ही राजधानी केल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले. येथील इलिनॉर राजकन्येने फ्रान्सच्या सातव्या लुईशी घटस्फोट घेऊन इंग्लंडचा राजा दुसरा हेन्री याच्याशी विवाह केला तेव्हा बॉर्दो व ॲक्विटेन हे प्रांत त्याला आंदण म्हणून मिळाले. परिणामत: दोन्ही राष्ट्रांत दीर्घकाळ तंटा चालू राहिला व अखेरीस हे शहर इंग्रजी अंमलाखाली आले (११५४-१४५३). या काळात शहराचे व्यापारी महत्त्व वाढून सागरपार व्यापारात वाढ झाली. फ्रान्सने बॉर्दो ताब्यात घेतल्यावर (१४५३) ही ग्येनची राजधानी झाली. अकराव्या लुईने बॉर्दोची संसद स्थापन करुन पोप चौथा यूजीन याने स्थापन केलेल्या विद्यापीठाला (स्था. १४४१) विशेष हक्क प्रदान केले. १५४८, १६५३ आणि १६७५ मध्ये येथील लोकांनी राजघराण्याविरूद्ध बंडे केली होती. नंतर धर्मयुद्धाच्या नावाखाली कत्तली होऊन येथील व्यापार धोक्यात आला. यानंतर अठराव्या शतकात बॉर्दो पुन्हा भरभराटीच्या शिखरावर होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात जिराँदिस्तांचे हे प्रमुख केंद्र होते. तिसऱ्या प्रजासत्ताकाच्या ‘नॅशनल असेंब्ली’ची स्थापना याच शहरात १८७१ मध्ये करण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत फ्रेंच प्रजासत्ताकाची बॉर्दो ही हंगामी राजधानी होती, तर पहिल्या महायुद्धात अमेरिकन सैन्य उतरविण्याचे हे एक मोक्याचे ठिकाण होते. 

बॉर्दो : (१) बंदराचे दृश्य, (२) मद्याच्या कारखान्यातील एक विभाग.

शहराच्या आसमंतात धान्य, तंबाखू, भाजीपाला, फळे-विशेषतः द्राक्षे-यांची लागवड होते. द्राक्षापासून बनणाऱ्या उंची ‘बॉर्दो मद्यां’-साठी हे शहर फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. निर्यात मालात बॉर्दोमद्यांचा क्रमांक सर्वांत वरचा असून त्यांखालोखाल मध, राळ, रंगशलाका, लाकूड, व्हिनेगर, गालिचे, काचेच्या बाटल्या यांची निर्यात होते. आयात मालात प्रामुख्याने अशुद्ध खनिजे, तेलबिया, कडधान्ये, गोठविलेले मास, कोको, अशोधित फॉस्फेट, चामडी व कातडी यांचा समावेश होतो. शहरातील प्रमुख उद्योगधंद्यांत जहाजबांधणी, साखर शुद्धीकरण, विद्युत यंत्रसामग्री, रसायने, फळे व भाजीपाला डबाबंद करणे, रेल्वेचे डबे तयार करणे, पादत्राणे, अवजड यंत्रसामग्री, रासायनिक खते तसेच तसेच दारूच्या बाटल्या व दारूची पिंपे यांची निर्मिती वगैरेंचा समावेश होतो.

बॉर्दो शहराचा जुना भाग अरुंद, चिंचोळ्या रस्त्यांचा असून जुनी प्रवेशद्वारे अजूनही दृष्टीस पडतात. अठराव्या शतकात शहराची पुनर्रचना केल्यामुळे नवीन शहरात प्रशस्त रस्ते, विस्तीर्ण चौक आढळतात. शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू व स्मारके तसेच कलावस्तुसंग्रहालये, वाचनालये, वनस्पतीउद्यान, वेधशाळा, वायुसेना कार्यालय इ. आहेत. शहरातील प्रेक्षणीय स्थळांपैकी आठव्या शतकातील शहराचे प्रवेशद्वार, सँ आन्द्रे गॉथिक कॅथीड्रल (दहावे शतक), रोमनेस्क चर्च (अकरावे शतक), विद्यापीठ (१४४१). १७ कमानींचा दगडी पूल (१८२१) उल्लेखनीय आहेत. तसेच व्हिक्टर लुई आणि जॅक्विस गाब्रीएल यांनी अठराव्या शतकात बांधलेल्या काही शोभिवंत इमारतीही पाहावयास मिळतात. त्यांपैकी व्हिक्टर लुईने बांधलेल्या ग्रँड थिएटरची गणना यूरोपातील उत्कृष्ट रंगमंदिरांत केली जाते. राजकीय तत्त्वज्ञ माँतेस्क्यू व माँतेन यांचे बॉर्दो हे जन्मग्राम होय.

कापडी, सुलभा