क्राइट्स चर्च, ड्रेझ्डेन.

ड्रेझ्डेन : पूर्व जर्मनीतील लोकसंख्येने तिसऱ्या क्रमांकाचे इतिहासप्रसिद्ध शहर व जिल्ह्याचे प्रमुख स्थान. लोकसंख्या ५,००,१०० (१९७१). ते एल्ब नदीवर चेकोस्लोव्हाकियाच्या हद्दीपासून सु. ३० किमी., बर्लिनच्या आग्नेयीस सु. १६० किमी. वर वसले आहे. शहराचे जुना व नवा असे दोन भाग असून नवीन शहर एल्बच्या उत्तरेस पसरले आहे. दुसऱ्या महायुद्धात त्याचे अपरिमित नुकसान झाले आणि बाँबच्या हल्ल्यामुळे जवळजवळ ६० टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या. पण गेल्या २०–२५ वर्षांत त्यांपैकी महत्त्वाच्या इमारतींचे जीर्णोद्धार झाले आहेत. पूर्व जर्मनीतील हे एक मोठे अंतर्गत बंदर असून प्रथमपासून सांस्कृतिक चळवळींचे केंद्र आहे. तेराव्या शतकापर्यंतचा त्याचा इतिहास फारसा स्पष्ट नाही. ते स्लाव्ह लोकांच्या ताब्यात होते. त्यानंतर जर्मनांनी त्याचे शहरात रूपांतर केले. १४८५ ते १८७१ पर्यंत सॅक्सनी राज्याची राजधानी येथे होती. पुढे बिस्मार्कने अखंड जर्मनी निर्माण केला. तत्पूर्वी ऑस्ट्रियन वारसा युद्ध (१७४०–४८) आणि सप्तवर्षीय युद्ध यांमध्ये प्रशियाने काही काळ यावर ताबा मिळविला होता. १८१३ मध्ये नेपोलियनने ते जिंकून आपला लष्करी तळ तेथे ठेवला आणि दोन महत्त्वाच्या लढांयाही जिंकल्या. सतराव्या व अठराव्या शतकांत ड्रेझ्डेन हे रोकोको आणि बरोक वास्तुशैलींसाठी व उपवने आणि कलाकेंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. त्याचे श्रेय अँथोनी या राजास मुख्यत्वे देण्यात येते. त्यात झ्विंगर राजवाडा, वस्तुसंग्रहालय, क्रोनेटॉर गेट, कॅथीड्रल (चर्च) इ. इमारती उल्लेखनीय आहेत. यातच २०० च्या वर फ्लेमिश, डच व इटालियन कलाकारांची रंगचित्रे होती. ती नामशेष झाली. उरलेल्या कालकृतींत रॅफेएलचे सिस्टाइन मॅडोना हे उत्कृष्ट असून काही चित्रे रशियात नेण्यात आली. कच्चा माल जवळपास म्हणावा तसा उपलब्ध नाही. त्यामुळे अवजड उद्योगधंदे येथे आढळत नाहीत मात्र क्ष किरण यंत्रे, कॅमेरा व छायाचित्रण यंत्रे, रोहित्र व इतर विद्युत् उपकरणे, प्रकाशकीय उपकरणे व ड्रेझ्डेन चायना या नावाने प्रसिद्ध असलेल्या लहान मूर्ती आणि मृत्पात्रे यांकरिता ते प्रसिद्ध असून यातील ड्रेझ्डेन चायना मूर्ती माइसन येथे होतात. पारदर्शक प्लॅस्टिकच्या शारीरीय प्रतिकृतींच्या उत्पादनाकरिता ते जगप्रसिद्ध आहे. येथे फुलांचाही मोठा उद्योग चालतो. लघुउद्योग आणि पूर्व जर्मनीत दिसणाऱ्या साचेबंद गाळ्यांचा अभाव हे ड्रेझ्डेनचे खास वैशिष्ट्य. सौंदर्य व कलासंग्रह यांमुळे हे शहर एल्बवरील फ्लॉरेन्स म्हणून पर्यटकांचे यात्रास्थान झाले आहे. ड्रेझ्डेन शैक्षणिक संस्थांसाठी तसेच संगीताकरिता प्रसिद्ध आहे. येथील संगीतिकागृह (१८७८) दुरुस्त करण्यात आले असून एक संगीत, वैद्यकीय महाविद्यालय, कलावीथी, कला अकादमी वगैरे संस्था आहेत. येथील तंत्रविज्ञान विद्यापीठ, अणुकेंद्रीय भौतिकी आणि आणवीय क्षेत्रासाठी संशोधन यांकरिता ख्यातनाम असून अणुकेंद्रीय संस्था व आरोग्यविज्ञान जर्मन संग्रहालय प्रसिद्ध आहेत. ड्रेझ्डेन लोहमार्गांनी बर्लिन व लाइपसिक या शहरांशी जोडले असून एल्बमुळे हँबर्ग व चेकोस्लोव्हाकियाशी त्याचा जलमार्गांनी संपर्क साधता येतो. येथील विमानतळ शहरास साजेसा असा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आहे.

शहाणे, मो. शा. देशपांडे, सु. र.