लाओस : लाओ पीपल्स डेमॉक्रॅटिक रिपब्लिक. आग्नेय आशियातील इंडोचायना द्वीपकल्पावरील एक खंडांतर्गत देश. क्षेत्रफळ २,३६,८०० चौ. किमी. लोकसंख्या ३५,८४,८०३ (१९८५). आग्नेय-वायव्य लांबी १,१६२ किमी. व ईशान्य-नैर्ऋत्य कमाल रूंदी ४७८ किमी. अक्षवृत्तीय विस्तार १३° ४०’ ते २२° ४०’ उ. व रेखावृत्तीय विस्तार १००° ते १०७° पू. यांदरम्यान. लाओसच्या उत्तरेस चीन व व्हिएटनाम, पूर्वेस व्हिएटनाम, दक्षिणेस कांपुचिया आणि पश्चिमेस थायलंड व ब्रह्मदेश असून सरहद्दीची एकूण लांबी ४,५१३ किमी. आहे. व्ह्यँत्यान (लोकसंख्या ३,७७,४०९-१९८५) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : मेकाँग नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या देशाचा, विशेषतः उत्तरेकडील व पूर्वेकडील. भूप्रदेश ओबडधोबड, पठारी व पर्वतीय आहे. या पठारी व पर्वतीय प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांनी खोल व अरुंद दऱ्या निर्माण केल्यामुळे काही ठिकाणी हे प्रदेश खंडित झाले आहेत. देशाच्या पूर्वेकडील व्हिएटनाम सरहद्दीवर सु. २,७०० मी. उंचीची ॲनामितिक पर्वश्रेणी आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेले मौंट बिआ हे देशातील सर्वोच्च शिखर (२,८२० मी.) आहे. ॲनामितिक पर्वतात फक्त तीन खिंडी असून त्यांमधूनच लाओस-व्हिएटनाम एकमेकांना जोडले गेले आहेत. मध्य भागातील यार्स मैदान म्हणजे झिआंग खोआंग पठाराचाच एक भाग आहे. इतिहासपूर्वकाळातील जार खडक येथे आढळल्याने त्याला यार्स असे नाव पडले आहे. लष्करी व राजकीय दृष्ट्या हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. देशाच्या ईशान्य भागात ट्रान्निंग पठार असून त्याची उंची १,०२० ते १,३७० मीटरच्या दरम्यान आहे. दक्षिण व पश्चिम भागांतील मेकाँग व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात गाळाचा विस्तृत मैदानी प्रदेश आहे. त्यामध्ये व्ह्यँत्यान मैदान सर्वांत मोठे आहे. दक्षिण भागातील बलोयेन पठार हा १.०७० मी. उंचीचा दुसरा सुपीक जमिनीचा प्रदेश आहे.

पूर्वेकडील पर्वतश्रेणीत उगम पावणाऱ्या नद्यांपैकी काही नद्या पूर्व उतारावरून पूर्वेस व्हिएटनाममधून वाहत जाऊन दक्षिण चिनी समुद्राला मिळतात तर पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्या मेकाँग नदीला येऊन मिळतात. मेकाँग व तिच्या उपनद्यांनीच लाओसचे जलवाहन केलेले आहे. एका रुंद दरीतून वाहणारी मेकाँग नदी प्रथम ब्रह्मदेशाच्या सरहद्दीवरून, नंतर लाओस देशातून, पुढे थायलंड सरहद्दीवरून व शेवटी दक्षिण लाओसमधून वाहत जाऊन कांपुचियामध्ये जाते. नदीचे पात्र रुंद असले, तरी केवळ व्ह्यँत्यान व सावान्नाकेत यांदरम्यानच नदीचा जलवाहतुकीस उपयोग होतो. बाकीच्या पात्रात बऱ्याच ठिकाणी द्रुतवाह आढळतात. सावान्नाकेतच्या खाली तर मोठ मोठे द्रुतवाह व जलप्रपात आढळतात. पावसाळ्यात नेहमीच मेकाँग व तिच्या उपनद्यांना पूर येतात. तसेच त्यांच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी पूरमैदानांची निर्मिती झालेली आढळते.

हवामान : लाओसमध्ये उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे हवामान आढळते. मे ते ऑक्टोबर पावसाळा असून या काळात मासिक सरासरी पर्जन्यमान २८ ते ३० सेंमी. असते. यावेळी वारे नैऋत्येकडून वाहत येतात. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यानच्या कोरड्या ऋतूतील सरासरी पर्जन्यमान १.३ सेंमी. असते. यावेळी वारे ईशान्येकडून वाहतात.वर्षभर आर्द्रतेचे प्रमाण खूप असते. अवर्षणकाळातही हवेत आर्द्रता अधिक असते. बलोयेन पठारावर वार्षिक सरासरी ४१० सेंमी. पर्यत वृष्टी होते. मार्च ते सप्टेंबर सरासरी तपमान २८° से., तर नोव्हेंबर ते मार्चमध्ये २१° सें. असते. मार्च-एप्रिलमध्ये ते ३२° सें. पेक्षाही अधिक वाढते. जानेवारीमध्ये सर्वांत कमी तापमान असते.

वनस्पती व प्राणी : लाओसची सु. ६०% भूमी अरण्यांखाली आहे. देशाच्या उत्तर भागात उष्णकटिबंधीय, रुंदपर्णी, सदाहरित वर्षारण्ये आढळतात. दक्षिण लाओसमधील मोसमी अरण्यांत सदाहरित व पानझडी वृक्षांचे मिश्रण आढळते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांचे वृक्ष एकमेकांजवळ वाढल्याचे दिसते. मोसमी अरण्यांत उंच जाड्याभरड्या गवताचे आच्छादनही आढळते. बांबू, वेत, पाम व लीआन ह्या वनस्पती सामान्यपणे देशभर आढळतात.

लाओसमधील जंगलांत बिबळ्या, वाघ, हत्ती, रानडुक्कर, चित्ता, हरिण, अस्वल हे प्राणी आढळतात. त्यांशिवाय अनेक प्रकारचे साप, पक्षी, मासे, कीटक व सरपटणारे प्राणी आढळतात. १९७५ पर्यत देशाच्या राष्ट्रध्वजावर हत्तीचे चित्र असे. लाओ राजवंशातील हे परंपरागत चिन्ह असून ओझ्याचे जनावर म्हणून इतिहासकाळातही याचा वापर केलेला आढळतो.

इतिहास व राज्यव्यवस्था : पुरातत्त्वीय पुराव्यांवरून असे दिसते की, मेकाँग नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वीपासून शेती, धातुशास्त्र व मातीची भांडी तयार करण्याची कला अवगत असावी. या प्रदेशाविषयीचा प्राचीन इतिहास विशेष ज्ञात नाही. तेराव्या शतकात चीनमधील लाओ लोकांनी इंडोचायना द्वीपकल्पात स्थलांतर केले. लाओ लोकांचा हा प्रदेश म्हणजेच लाओस असावा. हे थाई जमीतीचे वंशज असावेत. तेराव्या शतकाच्या मध्यास फांगूम याने स्थापन केलेले लान्‍झांग नावाचे एक शक्तिशाली व एकसंघ राज्य येथे होते. फांगूम यानेच लाओसमध्ये बौध्दधर्माच्या हीनयान पंथाचा प्रसार केला. लांन्‍झांगला अधूनमधून ख्मेर, ब्रह्मी, व्हिएटनामी व थाईंबरोबर युद्धे करावी लागली. त्यांतूनच या राज्याने प्रभावी प्रशासकीय पद्धती व लष्करी संघटनेचा विकास करून शेजारील देशांबरोबर चांगले व्यापारी संबंध प्रस्थापित केले. परंतु अंतर्गत कलहांमुळे १७०७ मध्ये लांन्‍झांग राज्याचे उत्तरेकडील ल्वांगप्राबांग (सांप्रतचे अपर लाओस) व दक्षिणेकडील व्ह्यँत्यान (लोअर लाओस) या दोन राज्यांमध्ये विभाजन झाले. या विभाजनाचाच शेजारी राष्ट्रांनी फायदा घेऊन स्वाऱ्या करण्यास सुरुवात  केली. सयामने (थायलंड) व्ह्यँत्यान पादाक्रांत करून ते आपल्या राज्याला जोडले (१९२८), तर ल्वांगप्राबांग हे चीन व व्हिएटनाम या दोहोंचे मांडलिक राज्य बनले. दरम्यान फ्रान्सने मध्य व उत्तर व्हिएटनाममध्ये आपले पाय रोवले होते. १८९३ मध्ये फ्रान्सने व्ह्यँत्यान व ल्वांगप्राबांगवर आपल्या सत्तेचा विस्तार केला. फ्रेंच इंडोचायनाचा एक भाग म्हणूनच लाओसच्या ल्वांगप्राबांग, व्ह्यँत्यान व चंपासाक या मांडलिक राज्यांचा फ्रान्स कारभार पहात होता. १९४६ मध्ये या तिन्ही राज्यांचे सामीलीकरण झाले.

दुसऱ्या महायुद्धकाळात लाओस जपानने काबीज केल्यानंतर १० मार्च १९४५ रोजी इंडोचायनाचा वसाहतीचा दर्जा समाप्त झाल्याचे जपानने घोषित केले व ल्वांगप्राबांगच्या राजाला स्वातंत्र्याची घोषणा करण्यास भाग पडले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी लाओ मुक्ती चळवळीने त्वांगप्राबांगच्या राजाला पदभ्रष्ट केले. परंतु लगेचच फ्रेंच लष्कराने पुन्हा लाओस काबीज केले व २७ ऑगस्ट १९४६ रोजी झालेल्या एका करारानुसार १९०४ पासून ल्वांगप्राबांगच्या गादीवर असलेल्या सिसाव्हाँग व्हाँग राजाला लाओसच्या गादीवर बसविले. अशा रीतीने फ्रेंचांनी परत लाओसवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मे १९४७ मध्ये राजाने नवीन लोकशाही संविधान स्वीकारले परंतु १९५७ पर्यंत फक्त पुरुषांनाच मतदानाचा अधिकार होता. १९ जुलै १९४९ रोजी लाओसला फ्रेंच संघांतर्गत नाममात्र स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर लाओसला संपूर्ण सार्वभौमत्व देणारे आणखी दोन करार अनुक्रमे ६ फेब्रुवारी १९५० व २२ ऑक्टोबर १९५३ रोजी झाले. प्रिन्स सूव्हाना फूमा राजवंशातील प्रमुख मुत्सद्दी असून ते १९५१-५४, १९५६-५८, १९६०, १९६२-७५ या काळात लाओसच्या पंतप्रधानपदावर होते. २९ डिसेंबर १९५४ रोजी झालेल्या पॅरिस करारानुसार फ्रान्स व इंडोचायनातील इतर राज्यांबरोबर असलेली सर्व विशेष आर्थिक बंधने काढून टाकण्यात आली. दरम्यानच्या काळात १९५३ मध्ये व्हिएटनामी साम्यवादी (व्हिएटमिन्ह) फौजांनी लाओसवर हल्ले चढविले. १३ ऑगस्ट १९५० रोजी पॅथेट लाओ या लाओशियन साम्यवादी चळवळीची स्थापना झाली. तिचे नेतृत्व प्रिन्स सूफानूव्होंग याच्याकडे होते. पॅथेट लाओ म्हणजे पूर्वीची राजेशाही आणि फ्रेंचविरोधी असलेली लाओ राष्ट्रवादी आघाडी होय. व्हिएटमिन्हच्या लाओसवरील हल्याच्या वेळी पॅथेट लाओने व्हिएटमिन्हशी सहयोग केला. २१ जुलै १९५४ रोजी झालेल्या जिनीव्हा युद्धविराम करारानुसार सर्व व्हिएटमिन्ह व बहुतांश फ्रेंच फौजा लाओसमधून काढून घेण्यात आल्या व पॅथेट लाओ फौजांना उत्तरेकडील दोन प्रांतांत बोलविण्यात आले. पॅथेट लाओने व्हिएटमिन्ह या व्हिएटनामी साम्यवादी चळवळीच्या मदतीने लाओसच्या उत्तर भागातील आपले स्थान भक्कम केले. सूफानूव्होंगचा सावत्र भाऊ सूव्हाना फूमा याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरकारशी पुन्हा एकीकरणाविषयीच्या अनिर्णित बाबींवर बोलणी सुरू केली. २ नोव्हेंबर १९५७ रोजी वाटाघाटी पूर्ण झाल्या व पॅथेट लाओने स्वतःच आपल्या पक्षाचे ‘नीओ लाओ हक साट’ या वैध राजकीय पक्षात रूपांतर केले. तथापि उजव्या विचारसरणीच्या घटकांनी सूव्हाना फूमा यांना पंतप्रधानपदावरून खाली खेचले. तसेच पॅथेट लाओच्या सैन्याने रॉयल लाओ आर्मीमध्ये सामील होण्यास नकार दिला. त्यामुळे मे १९५९ मध्ये युद्धाला पुन्हा सुरुवात  झाली. जानेवारी १९६० मधील उजव्या विचारसरणीच्या लोकांचा रक्तहीन उठाव व ऑगस्टमधील कॅप्टन काँग ली यांच्या नेतृत्वाखालील छत्रीधारी सैनिकांच्या मदतीने केलेल्या उठावामुळे उडालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत सूव्हाना फूमा पुन्हा अधिकारावर आले. जनरल फूर्मा नोसाव्हान व प्रिन्स बून ऊम यांच्या नेतृत्वाखाली उजव्या विचाराच्या गटामधील लष्कराने ११ डिसेंबरला राजधानी व्ह्यँत्यान ताब्यात घेतली. अवघ्या तीन दिवसांच्या युद्धांतच व्ह्यँत्यानची बरीच नासधूस झाली. प्रिन्स बून ऊम यांच्या नेतृत्वाखाली उजव्या पक्षाचे नवीन सरकार अधिकारावर आले. परंतु आणखी लष्करी विरोध, संयुक्त संस्थानांकडून आलेली मोठी मदत व सल्ला यांमुळे मे १९६१ मध्ये शासनाला युद्धविराम करावा लागला. युद्धविरामाच्या संदर्भात जिनीव्हा येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. पंतप्रधान म्हणून सूव्हाना फूमा यांना मान्यता देण्याच्या प्रश्नावर लाओसमधील तिन्ही राजकीय गटांमध्ये एकमत झाले (११ जून १९६२). लाओसच्या स्वातंत्र्य व तटस्थेविषयी जिनीव्हा येथे झालेल्या करारानुसार २३ जुलै रोजी शासनाकडे सर्व सत्ता देण्यात आली व ७ ऑक्टोबरपर्यंत सर्व परकीय फौजा लाओसमधून काढून घेण्याचे ठरले. आंतरराष्ट्रीय नियंत्रण आयोगाच्या देखरेखीखाली लाओसला पूर्णाधिकार देण्याची संयुक्त संस्थानांनी घोषणा केली. साम्यवादी फौजा मात्र लाओसमधून काढून घेतल्या गेल्या नाहीत. १९६३ मधील वसंत ऋतूमध्ये युद्धास पुन्हा सुरुवात  झाली. तेव्हा व्हिएटनाम युद्धाचे लाओस हे मुख्य युद्धक्षेत्र बनले. त्यावेळी संयुक्त संस्थानांनी व्ह्यँत्यान शासनाला मोठी लष्करी आर्थिक मदत दिली तर पॅथेट लाओला उत्तर व्हिएटनामने पाठिंबा देऊन १९७४ मध्ये २०,००० सैन्य लाओसमध्ये दाखल केले. संयुक्त संस्थानांच्या पाठिंब्याने लाओसमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत तडजोड करण्याचे प्रयत्न १९७१ मध्ये सुरू झाले. परंतु फेब्रुवारी १९७३ पर्यंत कसलीही बोलणी झाली नव्हती ५ एप्रिल १९७४ रोजी पँथेट लाओ व बिगर-साम्यवादी गटांचे सारखेच प्रतिनिधित्व असलेल्या नवीन संयुक्त सरकारची स्थापना होऊन सूव्हाना फूमा पंतप्रधानपदावर आले, तर प्रिन्स सूफानूव्होंग हे नव्याने निर्माण झालेल्या संयुक्त राष्ट्रीय राजकीय परिषदेचे अध्यक्ष बनले. यावेळी देशाच्या तीनचतुर्थांश क्षेत्रावर आपले प्रभुत्व असल्याचा दावा पॅथेट लाओने केला. एप्रिल १९७५ मध्ये अमेरिकेच्या पाठिंब्याने व्हिएटनाम व कांपुचियातील शासन अधिकारावरून गेले. तेव्हा लाओशियन साम्यवाद्यांनी लाओसवर संपूर्ण लष्करी व राजकीय वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. २३ ऑगस्टला पॅथेट लाओने व्ह्यँत्यानच्या मुक्ततेची घोषण केली. तेव्हापासूनच पॅथेट लाओचा लाओसवरील प्रभाव अधिक मजबूत बनला. 


लाओ पीपल्स डेमॉक्रॅटिक रिपब्लिकची घोषणा २ डिसेंबर १९७५ रोजी करण्यात आली. प्रिन्स सूफानूव्होंग यांची राष्ट्रध्यक्ष म्हणून, तर कायसोने फौमपिट्टन यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. किंग सव्हांग वथ्यना यांच्या राज्यत्यागामुळे ६२२ वर्षे अस्तित्वात असलेली लाओसमधील राजेशाही संपुष्टात आली. १९७९ मध्ये लाओ पॅट्रिॲटिक फ्रंटचे लाओ फ्रंट फॉर नॅशनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये रूपांतर करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक गटांचा समावेश असून त्यातील एल्‌पीआर्‌पी गट सर्वांत महत्त्वाचा आहे. 

नव्या राष्ट्रीय संसदेची निवडणूक एप्रिल १९७६ मध्ये घेण्याची घोषणा करण्यात आली. तथापि अंतर्गत अस्थिर परिस्थितीमुळे मतदान अनिश्चित काळपर्यंत पुढे ढकलण्यात आले. १९७१ ते १९८० या दशकाच्या उत्तरार्धात साम्यवाद्यांनी आपली सत्ता अधिक दृढ करण्यावर व अर्थव्यवस्था समाजाभिमुख करण्यावर अधिक भर दिला. खाजगी व्यापारावर बंदी घातली, कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण व शेतीचे सामूहिकीकरण करण्यात आले. जुलै १९७७ मध्ये व्हिएटनामशी पंचवीस वर्षांचा मैत्रीकरार करण्यात आला. तसेच रशियाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात आले. त्याबरोबर चिनी तंत्रज्ञ व सल्लागारांना लाओसमधून घालवून देण्यात आले. परिणामतः सरकारविरोधी लहानलहान गनिमी गटांना चीनने पाठिंबा व प्रशिक्षण देण्यास सुरुवात  केली. त्यातच १९७८ मध्ये तीव्र पूरस्थिती निर्माण झाली.त्यामुळे १९७९ मध्ये लाओसची अर्थव्यवस्था ढासूळ लागली. तेव्हा लाओशियन शासनाने सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेचा वेग थोडा कमी केला व खाजगी व्यापारास पुनर्मान्यता आणि बिगर-साम्यवादी राष्ट्रांकडून मदत स्वीकारण्याची घोषणा केली. ऑक्टोबर १९८६ मध्ये आजारी सूफानूव्होंग यांनी आपल्या राष्ट्राध्यपदाचा व सर्वोच्च तज्ञ समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा फौमी व्ह्यँगव्हिचीट यांची हंगामी राष्ट्रध्यक्ष म्हणून, तर सिसाँफॉन लोव्हांसे यांची सर्वोच्च तज्ञ समितीचे (सुप्रीम पीपल्स असेंब्ली) हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

देशाच्या १९४७ च्या संविधानानुसार लाओस हे संसदीय लोकशाही राष्ट्र होते. राजा हा देशाचा नामधारी मुख्य कार्यकारी अधिकारी होता. पंतप्रधान (मंत्रिपरिषदेचा अध्यक्ष) हाच खरा कार्यकारी व वैधानिक प्रमुख असून तो राजाला सहाय्यक म्हणून काम पहात होता. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राष्ट्रीय संसदेला जबाबदार होते. संसदेचे ५९ सभासद असून ते दर पाच वर्षांनी सार्वत्रिक प्रौढ मतदानपद्धतीने निवडले जात. डिसेंबर १९७५ मध्ये लाओ पीपल्स डेमॉक्रॅटिक रिपब्लिकची स्थापना होऊन शासकीय प्राधिकार संसदेकडे हस्तांरित करण्यात आले. संसदेचे २६४ सभासद असून ते नव्याने नियुक्त केलेल्या स्थानिक प्राधिकरणांकडून निवडले जातात. संसदेने ४५ सभासदांच्या सर्वोच्च तज्ञ समितीकडे नवीन संविधान तयार करण्याचे काम सोपविले असून १९८६ मध्ये नव्या संविधानाचा तयार केलेला मसुदा चर्चेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पॅथेट लाओचा नेता केसोने फौमविहान यांच्या हातात अधिक काळपर्यंत सत्ता टिकून राहिली. केसोने हे लाओ पीपल्स रेव्होल्यूशनरी (कम्युनिस्ट) पक्षाचे महासचिव असून नोव्हेंबर १९८६ मध्ये ते त्याच पदावर पुन्हा निवडून आले. 

देशात एकूण १३ प्रांत असून त्यांची विभागणी जिल्हा नगरक्षेत्र व खेड्यांमध्ये केलेली आहे. १९७५ पासून स्थानिक प्रशासनव्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली असून निर्वाचित लोकांच्या समितीकडून खेड्यांचा कारभार पाहिला जातो. व्ह्यँत्यान येथे सर्वोच्च न्यायालय आहे. 

लाओसमधील सशस्त्र बलाची संख्या ५५,५०० आहे. त्यापैकी ५२,५०० लाओ पीपल्स आर्मी १,००० नौसेना व २,००० वायुदलात असून त्याशिवाय सु. ५०,००० व्हिएटनामी सेना लाओसमध्ये आहे (१९७८). किमान अठरा महिन्यांची लष्करी सेवा सक्तीची आहे.

आर्थिक स्थिती : जगातील सर्वांत गरीब व अविकसित देशांपैकी हा एक आहे. लोकांच्या जीवनावश्यक गरजाही नीटशा भागत नाहीत, लाकूड, खनिजे आणि जलविद्युत्शसक्ती ही देशातील महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. तथापि वाहतूकसोयींचा अभाव, यादवी युद्ध इत्यादींमुळे ही साधनसंपत्ती विशेष उपयोगात आणली गेली नाही. तसेच इतर वसाहतींच्या तुलनेत फ्रेंचांनी लाओसमध्ये फारच थोडी भांडवल गुंतवणूक केली. शिवाय बरेचसे उद्योजक १९७५ नंतर देश सोडून गेले. कम्युनिस्ट राजवटीने मात्र तुलनेने काहीशी आर्थिक स्थिरता आणली. मात्र त्यांच्याकडेही आर्थिक नियोजन करू शकणाऱ्या व राबवू शकणाऱ्या तज्ञांची टंचाई होती. मर्यादित औद्योगिक विकासामुळे बहुतेक सर्व आवश्यक निर्मिती उत्पादनांची लाओसला आयात करावी लागते. हा एक कृषिप्रधान देश असून ८० ते ९० टक्के लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४% पेक्षा म्हणजे सु. ८,८०,००० हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे (१९८०). त्यांपैकी १,१५,००० हेक्टर क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. तांदूळ हे मुख्य पीक असून त्याशिवाय चहा, कॉफी, मका, कापूस, तंबाखू, भुईमूग, वेलची, ताग, कसावा, बटाटे, रताळी, भाजीपाला, फळे, अननस, साखर, केळी, रॅमी ही उत्पादने घेतली जातात. बहुतांश लाओ ओली भातशेती करतात. उत्तर लाओसमध्ये काही शेतकरी जंगले साफ करून तेथे किंवा डोंगराळ प्रदेशात कोरडी भातशेती करतात. तांदळाखालील एकूण क्षेत्र सु. ७,३९,००० हेक्टर (१९८१) असून १९८५ मध्ये तांदळाचे उत्पादन १४,७१,००० टन झाले. अलीकडे जलसिंचन व खतांचा वापर करून उत्पादन वाढविले आहे. तरीही गरजेपेक्षा उत्पादन कमी असल्याने कमी पडलेला तांदूळ, विशेषतः थायलंडकडून, आयात केला जातो. यादवी युद्धाच्या काळात शेतीचे खूप नुकसान झाले. १९७५ पासून शेतीचे सामूहिकीकरण सुरू झाले. शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध झाला. पुढे या शेतीचे सहकारी शेतीमध्ये रूपांतर करण्यात आले. १९८६ पर्यंत अशा ४,००० कृषी सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. कृषी उत्पादन मुख्यतः हवामानावर अवलंबून असते. कधी पुरामुळे तर, कधी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते. शेती विकासासाठी शासनाकडून यांत्रिक कृषी अवजारे व जलसिंचनाच्या सोयी पुरविल्या जातात. तसेच दुबार पीक पद्धतीचा अवलंब, खतांचा वापर, दर हेक्टरी उत्पादवाढीस उत्तेजन देऊन भटक्या शेती प्रकाराला आळा घातला जातो. देशातील महत्त्वाच्या पिकांचे १९८६ मधील उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (हजार मेट्रिक टनांत) : तांदूळ-१,४९०, मका-३७, बटाटे-५२, रताळी-११५, कसावा-८४, कडधान्ये-२६, सोयाबीन-६, भुईंमूग शेंग-१०, सरकी-१२, रूईचा कापूस-६, भाजीपाला व खरबूज-२३४, फळे-१४६, ऊस-१०२, कॉफी-६, तंबाखू पाने-३.

दक्षिणेकडील मैदानी प्रदेश आणि नॉय, बांगहिआंग व डॉन नद्यांच्या खोऱ्यात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. १९७५ मधील युद्धाच्या अंतिम काळात मोठ्या प्रमाणावर पशुधनाची हत्या झाली. देशातील १९८६ मधील पशुधन पुढीलप्रमाणे होते (संख्या हजारांमध्ये) : म्हशी-१,०१७ गुरे-५९३ डुकरे-१,५१६ शेळ्या-७१ घोडे-४२ कोंबड्या-८,०००. याच वर्षातील पशुधन उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार मे. टनांत) : डुकरांचे मांस ५५, म्हशीचे मांस-२९, बीफ व व्हील १०, कोंबड्यांचे मांस २०, कोबंड्याची अंडी २८.१, गाईचे दूध ८, गुरे व म्हशीची कातडी ४.५, मेकाँग व तिच्या उपनद्यांमधून दरवर्षी सु. २०,००० मे. टन मासे पकडले जातात.

इमारती लाकूड हे देशातील महत्त्वाचे उत्पादन असून त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणावर केली जाते. १९८५ पासून पुनर्वनसंवर्धन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १९८६ पासून रोजवुड आणि सागवानासह १५ प्रकारांच्या वृक्षतोडीस कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. चंपासक, सावान्नाकेत, टाकेक व व्ह्यँत्यान यांच्या आसमंतातील प्रदेश इमारती लाकूड उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. पश्चिम लाओसमधील पाक्ले जिल्हा साग उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. मेकाँग नदीच्या वाहतूक सुविधेमुळे तिच्या खोऱ्यातील लाकूडतोड अधिक सोयीची ठरते. लाकूडतोड व्यवसायात हत्ती व बैलांचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. इमारती लाकडाशिवाय जळाऊ लाकूड, लाकडी कोळसा, देवधूप, देवधूप साल, बांबू, खोबरे, कापोक, ताडतेल, वेत, वेगवेगळ्या प्रकाराची रेझिने व झाडांचा चीक ही अरण्यांमधून मिळणारी प्रमुख उत्पादने आहेत. सर्व प्रकारच्या लाकडांचे एकूण उत्पादन ४०,५१,००० घनमीटर (१९८५) असून ९०% पेक्षा अधिक लाकूड इंधनासाठी वापरले जाते. १९८५ मध्ये ८६ लक्ष अमेरिकी डॉलर किंमतीचे इमारती लाकूड आणि अरण्योत्पादनांची निर्यात करण्यात आली. 


लाओसमध्ये कथिल, जिप्सम, सैंधव, खनिज तेल, तांबे, सोने, जस्त, शिसे, पोटॅश, मँगॅनीज, पायराइट, गंधक व मौल्यवान खडक इ. खनिजपदार्थांचे साठे आहेत. कथिल आणि जिप्समचे उत्पादन महत्त्वाचे आहे. कथिलाचे साठे सु. ७,००,००० टन आहेत. देशात कथिल उत्पादन ५२० मे. टन (१९८५) आणि जिप्सम उत्पादन १,००,००० मे. टन (१९८६) झाले. ‘ सिआंगखोआंग ’ जवळील यार्स मैदानात सु. ११ महापद्म टनांचे लोहखनिजाचे साठे, सारावान येथे कमी प्रतीच्या अँथ्रासाइट कोळशाचे साठे व व्ह्यँत्यान मैदानात पोटॅशयुक्त सिल्व्हाइटचे साठे सापडले आहेत. व्ह्यँत्यान दा नांग (व्हिएटनाम) यांदरम्यान ३९५ किमी. लांबीच्या नळमार्गामुळे लाओसला दरवर्षी ३,००,००० मे. टन खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होईल. त्यामुळे लाओसचे थायलंडवरील अवलंबन कमी होईल. १९८५ मध्ये देशात एकूण ९१८ द. ल. किवॉ. तास वीज निर्मिती झाली. यामध्ये ९६% जलविद्युत्शक्ती व ४% औष्णिक विद्युत्शवक्ती होती. नाम एन्‌गुम धरण मेकाँगवरील बहुउद्देशीय प्रकल्प आहे. १९६९ मध्ये या धरणाच्या बांधणीस सुरुवात  होऊन १९७१ मध्ये पहिल्या व १९७८ मध्ये दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. येथून वार्षिक वीजनिर्मिती सु. १ महापद्म किवॉ. तास होत असून त्यापैकी ९०% पेक्षा अधिक वीज थायलंडला निर्यात केली जाते. इमारती लाकडाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची निर्यात विजेची आहे (१९७९). १९८६ मध्ये वीजनिर्यातीपासून लाओसला थायलंडकडून ३२ द. ल. अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले. एकूण निर्यात उत्पन्नाच्या ६५% पेक्षा अधिक हे उत्पन्न आहे. लाकूड व कोळसा ही स्थानिक उपयोगाची प्रमुख ऊर्जासाधने आहेत. व्ह्यँत्यानजवळ खनिज तेलाचे साठे मिळाले आहेत.

औद्योगिक दृष्ट्या लाओस अविकसित आहे. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी ६% उत्पादन निर्मितिउद्योगांमधून मिळत असून एकूण कामगारसंख्येपैकी १% पेक्षाही कमी कामगार यामध्ये गुंतले आहेत. उद्योगधंदे मुख्यतः अरण्ये व शेती उत्पादनांवरील प्रक्रिया, हस्तव्यवसाय व मूलभूत उपभोग्य वस्तुनिर्मिती प्रकारचे आहेत. खाणकाम, लाकडी कोळसा निर्मिती, सिमेंट, विटा तयार करणे, सुतारकाम, तंबाखू प्रक्रिया, भात सडणे, लाकडी सामान निर्मिती, लाकूड कापणे, सूत निर्मिती, दारू गाळणे, चहा आणि कॉफी प्रक्रिया, प्लायवुड निर्मिती हे उद्योगधंदे लहानमोठ्या प्रमाणावर चालतात. बहुतांश उद्योगधंदे व्ह्यँत्यान प्रदेशात चालतात. हस्तव्यवसाय हे अनेक लाओशियन लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. रेशमी कापड, टोपल्या, लाखकाम, सोन्या-चांदीचे दागिने, मातीच्या विटा व भांडी, मद्यनिर्मिती, लोखंड उत्पादने इ. व्यवसायांबाबत काही गावांचे व प्रदेशांचे विशेषीकरण आढळते. देशात १९८३ मध्ये काही प्रमुख औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली : बीर १३, ००० हेक्टोलिटर, सौम्य पेये १२,३७० हेक्टोलिटर, कापड १,४५१.४ हजार मीटर, कपडे ४७४ .९ हजार नग, मोटारीचे रबरी टायर व ट्यूब १ द. ल. नग, प्लास्टिक उत्पादने १८५.१ मे. टन, धुलाई पावडर ९७० मे. टन, पशुवखाद्य ३,००० मे. टन, विटा १०.९ द. ल. इतर विकसनशील देशांप्रमाणेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत लाओसला परदेशी तज्ञांवर अवलंबून रहावे लागते. १९७० मध्ये देशात फक्त ३६४ प्रशिक्षित शास्त्रज्ञ व अभियंते होते. १९८२ मध्ये सु. १०,००० लाओशियन परदेशात प्रशिक्षण घेत होते. त्यांपैकी ३,५०० रशियात शिक्षण घेत होते. कुशल मजूर, औद्योगिक उपकरणे व सुटे भाग यांच्या तुटवट्याचाही परिणाम औद्योगिक विकासावर झालेला आढळतो. उद्योगधंद्यांवरील शासनाचे नियंत्रण कमी करून गुंतवणूक व उत्पादन यांबाबत उद्योगाच्या व्यवस्थापकाला स्वायत्तता देण्याचा निर्णय १९८५ मध्ये घेण्यात आला. जुलै १९८७ पर्यंत व्ह्यँत्यानमधील ८० पैकी १६ उद्योजकांना अशी स्वायत्तता देण्यात आली. लाओसमध्ये एकूण २९५ कारखाने आणि त्यांत १८,००० कामगार होते (१९८७).

पॅथेट लाओ सत्तेवर येण्यापूर्वी लाओसमध्ये भांडवली व उपभोग्य वस्तूंची बाजारपेठ वाढत होती. त्यावेळी व्ह्यँत्यान हे ठोक व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. १९७५ मध्ये खाजगी व्यापारावर बंदी घातल्यामुळे मोठ्या प्रमाणावर छोटे व्यापारी व व्यावसायिक-विशेषतः चिनी, जपानी, पाकिस्तानी, थाई व व्हिएटनामी-आपापल्या देशांत निघून गेले. तांदुळ, साखर यांसारख्या आवश्यक मालाच्या विक्री आणि वितरणामध्ये पॅथेट लाओने प्रत्यक्ष सहभाग घेऊन वस्तूंच्या किंमती आटोक्यात आणल्या. १९७९ मध्ये खाजगी व्यापारावरील बंदी उठविली, त्यामुळे बाजारातून ज्या काही उपभोग्य वस्तूंची टंचाई भासत होती, त्या पुन्हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या. ग्रामीण भागात अजूनही वस्तुविनिमय पद्धती प्रचलित आहे. वर्षातून एक-दोन वेळा मैदानी प्रदेशातील शेतकरी पर्वतीय प्रदेशातील लोकांना कापड व हस्तकलावस्तू देऊन त्यांच्याकडून त्याच्या मोबदल्यात तृणधान्य, हरिण व गेंडा यांची शिंगे, हस्तिदंत या वस्तू घेतात. चहा, अफू, तंबाखू, मीठ, चांदी व सोने यांचा विनिमयाचे माध्यम म्हणून उपयोग केला जातो. १९७५ मधील राजकीय पुनर्रचनेनंतर लाओसच्या विदेश व्यापारविषयक धोरणात बदल झाला. कथिल, जलविद्युत्‌शक्ती, लाकूड, कॉफी, तंबाखू, अफू यांची निर्यात तसेच यंत्रे, तांदूळ व इतर अन्नसामग्री, खनिज तेल उत्पादने, वाहतुकीची व औद्योगिक साधनसामग्री यांची आयात केली जाते. लाओसचा व्यापार मुख्यतः रशिया, थायलंड, जपान, फ्रान्स, चीन, व्हिएटनाम या देशांशी चालतो. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत लाओसचा विदेशव्यापार प्रतिकूल संतुलनाचा राहिला आहे. जुलै १९८७ मध्ये शासनाने काही कंपन्यांना आयात-निर्यातीसंबंधी बरीच स्वायत्तता दिली.

किप हे अधिकृत चलन म्हणून डिसेंबर १९७९ पासून नव्याने स्वीकारण्यात आले आहे. १ नवीन किप = १०० ऑट होतात. १, २ व ५ ऑटची नाणी आणि १, ५, १०, २०, ५०, १०० व ५०० किपच्या नोटा आहेत. १ अमेरिकी डॉलर = ७१५ किप आणि १ पौंड = १,१७३ किप असा विनिमय दर होता (मार्च १९९०). देशात मेट्रिक मापनपद्धतीचा अवलंब केला जातो. नॅशनल बँक ऑफ लाओस या मध्यवर्ती बँकेची स्थापना १९५५ मध्ये व्ह्यँत्यान येथे झाली. बँक ऑफ इंडोचायना (स्थापना १९५३) ही सर्वांत मोठी व्यापारी बँक आहे. व्यापाराचे प्रमाण कमी असून पैशातील व्यवहारांपासून बहुसंख्य लोक अलिप्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कराला लाओसमध्ये विशेष महत्त्व नाही. १९७७ मध्ये शासनाने कृषी उत्पादनांवर उद्गामी कर लादलेला आहे. करांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग अरण्योद्योग व खाणकाम विकासासाठी केला जातो. परंतु कर आकारणीमुळे काही बडे शेतकरी कृषी उत्पादनाबाबत नाउमेद झाले. त्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा वेग कमी झाला आहे. चैनीच्या वस्तूंवरील शुल्क ३० ते ६० टक्क्यांदरम्यान असून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तूंवरील करभार कमी केलेला आहे. स्थानिक उत्पादित वस्तूंना स्पर्धक ठरणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर पूरक शुल्क आकारले जाते. रेडिओ, मद्य, तंबाखू व साखर यांच्यावर विशेष उत्पादनशुल्क आकारण्यात येते. १९८४ च्या अर्थसंकल्पात एकूण महसूल ४,५५० द. ल. किपचा व एकूण खर्च ८,०३५ द. ल. किप इतका होता.

राष्ट्रीय योजना व विदेशी सहाय्य परिषदेने (स्थापना १९५६) देशाच्या विकासाचा सर्वसाधारण आराखडा व पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केला आहे. देशातील मर्यादित भांडवली साधनसंपत्तीमुळे विदेशी खाजगी गुंतवणूकदार मिळविण्याचा शासन प्रयत्न करते. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडूनही मदत मिळविली जाते. लाओशियन शासनाने आर्थिक योजनेचा एक आराखडा तयार केला होता (१९६२), परंतु अंतर्गत अस्थिरतेमुळे ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकली नाही. १९६९ मध्ये आर्थिक व सामाजिक विकासासाठी एक दीर्घ मुदतीची (१९६९-७४) व ११० द. ल. डॉलर खर्चाची योजना तयार करण्यात आली. या योजनेचा अधिक भर नाम एन्गुम धरण पूर्ण करण्यावर होता. १९७५ मध्ये पॅथेट लाओच्या हाती सत्ता आल्यानंतर लाओसच्या अर्थव्यवस्थेत समाजवादी धर्तीवर पुनर्रचना घडवून आणण्याचे प्रयत्न केले. देशाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनाकाळात (१९८१-८५) स्थूल सामाजिक उत्पादनात ६५ ते ६८%, कृषी उत्पादनात २३ ते २४ व औद्योगिक उत्पादनात १०० ते १२० टक्के वाढ झाली. तसेच या काळात प्रमुख महामार्गांची व जलमार्गांची दुरूस्तीही करण्यात आली.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडून लाओसला १९५५ पासून आर्थिक मदत सुरू झाली, ती १९७५ पर्यंत चालू राहिली. या काळात लाओसची अर्थव्यवस्था पूर्णपणे संयुक्त संस्थानांच्या आर्थिक मदतीवरच अवलंबून होती. संयुक्त संस्थानांनी या काळात लाओसला ९०० द. ल. डॉलर असैनिकी कर्ज, अनुदान आणि १.६ महापद्म डॉलर सैनिकी सहाय्य दिले. पॅथेट लाओने सत्ता हाती घेतल्यानंतर १९७५ ते १९७९ या काळात बहुतांश आवश्यक साहाय्य चीनने दिले. १९७९ पासून लाओसने मुख्यतः रशिया, व्हिएटनाम व त्यांच्याशी संलग्न  राष्ट्रांकडून प्रत्यक्ष मदत घेतली. असाम्यवादी राष्ट्रांपैकी जपान, स्वीडन व नेदर्लंड्‌स या राष्ट्रांनीही मदत दिली. १९८७ मध्ये एकूण १०० द. ल. अमेरिकी डॉलरची विदेशी देशांनी आर्थिक मदत दिली असून त्यांपैकी ४० द. ल. डॉलरची मदत बिगर-कम्युनिस्ट राष्ट्रांकडून मिळाली. १९८४ अखेरपर्यत लाओसवरील एकूण विदेशी कर्जाचा बोजा ४०० द. ल. डॉलर होता. लाओसमध्ये सहकारी चळवळीचा प्रसार बराच झालेला दिसतो.

वाहतूक व संदेशवहन : पुरेशा वाहतूक सुविधांचा अभाव हा लाओसच्या आर्थिक विकासातील प्रमुख अडथळा ठरला आहे. खंडांतर्गत स्थानामुळे रस्त्यांनाच विशेष महत्त्व आहे. तथापि पर्वतीय भूमीमुळे रस्तेही मर्यादित आहेत. तसेच मुसळधार पर्जन्यवृष्टी व पुरांमुळे रस्त्यांची नेहमीच नासधूस होते. देशात १२,९८३ किमी. लांबीचे रस्ते आहेत (१९८५). त्यांपैकी ४,०६२ किमी. लांबीचे रस्ते बारमाही वापरता येणारे आहेत. इतर रस्त्यांनी पावसाळ्यात वाहतूक करता येत नाही. देशातील ९०% मालवाहतूक व ८५% प्रवासी वाहतूक रस्त्यांनी केली जाते. व्हिएटनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेने केलेल्या बाँबहल्यात बऱ्याच रस्त्यांची नासधूस झाली. त्यांपैकी व्हिएटनामशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची दुरूस्ती व्हिएटनामच्या मदतीने करण्यात आलेली आहे. देशात लोहमार्ग नाहीत. मात्र महामार्ग क्र. ९ ला समांतर असा लोहमार्ग बांधणीचा संकल्प आहे. रशियाच्या मदतीने १९७६ मध्ये ‘ लाओ एव्हिएशन ’ ची स्थापना करण्यात आली. व्ह्यँत्यान येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून १,२२० मीटरपेक्षा अधिक लांबीच्या १४ धावपट्ट्या व कमी लांबीच्या ५२ धावपट्ट्या आहेत. देशातील महत्त्वाची शहरे हवाई वाहतुकीने एकमेकांशी जोडली आहेत. खंडांतर्गत स्थानामुळे कांपुचिया आणि व्हिएटनाममधून वाहत जाऊन दक्षिण चिनी समुद्राला मिळणाऱ्या मेकाँग नदीतून लहान जहाजांद्वारे वाहतूक करावी लागते. थायलंडवरील अवलंबन कमी करण्यासाठी लाओसने १९७७ मध्ये व्हिएटनामशी एक करार केला आहे. त्यानुसार लाओसचे प्रमुख बंदर म्हणून बॅंकॉकची जागा दा नांग घेईल. देशात ४,६०० किमी. लांबीचे अंतर्गत जलमार्ग उपलब्ध आहेत. व्ह्यँत्यान-दा नांग यांदरम्यान तेल वाहतुकीसाठी जलमार्ग टाकण्याचे काम १९८१ पासून सुरू झाले आहे.


लोक व समाजजीवन : लाओसच्या ३५, ८४,८०३ या एकूण लोकसंख्येपैकी १७,५७,११५ पुरुष व १८,२७,६८८ स्रिया होत्या (१९८५). बहुसंख्य लोक बौध्द धर्मीय (हीनयान पंथीय) आहेत.त्यामुळे प्रत्येक खेड्यात, नगरात व शहरात बौध्द मंदिरे आढळतात. व्ह्यँत्यान व ल्वांगप्राबांग शहरांना तर ‘ सिटीज ऑफ थाउजंड्स्‌ ऑफ टेंपल्स ’ असे संबोधले जाते. सतराव्या शतकातील सु. ७० पॅगोडे एकट्या व्ह्यँत्यान शहरात आढळतात. त्यांपैकी वाट-फ्रा केओ व दॅट लुआंग हे विशेष प्रसिद्ध आहेत. लाओ हा देशातील प्रमुख वांशिक गट असून ५०% पेक्षा अधिक लोकसंख्या या गटातील आहे. भाषा, संस्कृती व स्थानानुसार देशातील लाओ लोकांचे अधिकृतरीत्या पुढील चार गट पाडले जातात. लाओ-लूम किंवा सखल भूमिवासी लाओ, लाओ-ताई (आदिवासी ताई), लाओ-थेऊंग (पर्वत उतारावरील लाओ) आणि लाओ-सोऊंग किंवा मेओ व मॅन (पर्वत माथ्यावरील लाओ). इतर अल्पसंख्याक लोकांमध्ये व्हिएटनामी, चिनी, यूरोपीय, भारतीय व पाकिस्तानी यांचा समावेश होतो. लाओ-लूम व लाओ-ताई हे थाई लोकांपैकी लाओ गटातील असून तेराव्या शतकात दक्षिण चीनमधून त्यांनी आग्नेय आशियात स्थलांतर केलेले आहे. लाओ-लूम मुख्यतः मेकाँग व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात व शहरांत आढळतात. लाओ-ताई देशभर आढळत असले, तरी ते मुख्यतः उच्चभूमी प्रदेशात राहतात. लाओ-थेऊंग हे भिन्नभिन्न उपजमातींचे असले, तरी मॉन-ख्मेर ही त्यांतील प्रमुख जमात आहे. यांनाच ‘ खा ’ (गुलाम) म्हणून संबोधले जाते. मेओ व मॅन लोक उत्तर लाओसमध्ये राहतात. यांची मोठी संख्या उत्तर व्हिएटनाम व चीनमध्ये असून गेल्या शतकात त्यांनी येथे स्थलांतर केलेले आहे. त्यांच्यात कन्फ्यूशस पंथीय व जडप्राणवादी वैशिष्ट्ये आढळतात. मात्र त्यांतील काही लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत. लाओ-सोऊंग लोकांमध्येही वेगवेगळ्या उपजमाती आहेत. लाओ किंवा लाओशियन ही अधिकृत भाषा असून देशातील सु. दोनतृतीयांश लोक हीच भाषा बोलतात. फ्रेंच भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जात असून वेगवेगळ्या जमातींच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आढळतात. अलीकडच्या काळात लाओसमधील लोकांचे फारच कमी स्थलांतर झालेले दिसते. १९६५ ते १९७५ या काळात युद्धजन्य परिस्थितीमुळे ब्लॅक थाई जमातीच्या लोकांनी मेकाँग खोऱ्यात स्थलांतर केले. मे १९७५ पासून ते पॅथेट लाओच्या अंतिम विजयापर्यंत हजारो लाओशियन निर्वासित थायलंडमध्ये गेले. १९७५ ते १९८२ या काळात सु. १,६७,००० लाओशियन थायलंड किंवा इतरत्र पळून गेल्याचे म्हटले जाते. यांत १,०८,००० ह्माँग, याओ व इतर पर्वतीय जमातींतील लोक होते.

देशातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स १५.२ आहे. मेकाँग नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक घनता असून उत्तरेकडील आणि पूर्वेकडील प्रदेशांत ती विरळ व विखुरलेल्या स्वरूपात आढळते. ८७% लोकसंख्या ग्रामीण असून ती सु. ९,००० खेड्यांत राहते. वार्षिक सरासरी दर हजारी जन्मप्रमाण ४६ मृत्यूप्रमाण २३ आहे. देशाची लोकसंख्या बरीच कमी असल्याचे १९८० मध्ये शासनाने सूचित केले. तेव्हा कुटुंबनियोजनाविषयीचे पूर्वीचे निर्बंध उठविण्यात आले. तसेच गर्भधारणा प्रतिबंधक साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. जीवनमान इतक्या कनिष्ठ दर्जाचे आहे, की मोटारगाडी सहसा कोणाकडे आढळत नाही. सायकल व रेडिओ या येथील लोकांच्या चैनीच्या वस्तू आहेत. सामान्यपणे सखल प्रदेशातील लोकांचे जीवनमान उच्च दर्जाचे व उच्चभूमीच्या प्रदेशातील लोकांचे जीवनमान कनिष्ठ दर्जाचे आहे. आधुनिक औषधांच्या वापरामुळे मलेरिया व देवी रोगांचे प्रमाण  कमी झाले आहे व लोकांचे आरोग्य काहीसे सुधारले आहे. तथापि बालमृत्यूप्रमाण अजून अधिक (दर हजारी १२९-१९७५) आढळते. व्ह्यँत्यानसह सर्व शहरांत शुद्ध पाण्याचा तुटवडा असून इतरही आरोग्यविषयक समस्या तशाच आहेत. काही प्रदेशांत अजूनही मलेरियाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्याशिवाय फुप्फुसदाह, फ्ल्यू, अतिसार, आमांश, पॅरसाइट्स (parasite’s)यॉज (Yaws), कातडीचे रोग, बाल्यावस्थेतील रोग, यकृतशोथ (hepatitis), गुप्तरोग, क्षयरोग या विकारांच्या समस्याही देशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. १९७५-८० मधील सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ४२.१ वर्षे व स्रियांच्या बाबतीत ४५ वर्षे असून आशियात हे आयुर्मान सर्वांत कमी आहे. लाओसमध्ये १,१२३ रुग्णालये व ९,८१५ खाटा, १ चिकित्सालय, ५५८ डॉक्टर, २,२४६ वैद्यकीय कामगार, ६,६०० प्रथमोपचार कामगार होते. (१९८५). 

लाओसमध्ये  सामान्यपणे लाकडी व बांबूची घरे बांधतात. त्यांचे छप्पर गवताचे असते. ही घरे जमिनीपासून १ ते २ मी. उंच लाकडी डांबांवर उभारलेली असतात. लाओ खेडी लहान असून त्यांमध्ये सामान्यपणे ३०० ते ५०० रहिवासी असतात. जुलै-ऑगस्टमध्ये जेव्हा मॉन्सूनचा पर्जन्य शिगेला पोहोचलेला असतो, तेव्हा वस्त्या अगदी एकाकी पडलेल्या दिसतात. या काळात बैलगाडी हेच ग्रामीण भागातील एकमेव वाहतुकीचे साधन उपलब्ध असते.

देशातील १९७५ मधील साक्षरतेचे प्रमाण ४०% असून १९८५ मध्ये ते ९०% पर्यंत वाढले. लाओसमध्ये खाजगी शाळा नाहीत. पाच वर्षांचे प्राथमिक आणि ६ वर्षांचे माध्यमिक शिक्षण आहे. १९८२-८३ या शैक्षणिक वर्षात ६,५२५ प्राथमिक शाळांत ४,८०,८७१ विद्यार्थी व १६,४५४ शिक्षक ४१९ माध्यमिक शाळांत ६४,५०० विद्यार्थी व ३,७०९ शिक्षक ६० उच्च माध्यमिक शाळांत १७,४९२ विद्यार्थी व १,०७० शिक्षक ७८ शिक्षक प्रशिक्षण संस्थांत १२,००० विद्यार्थी (१९८६) आणि ५५ व्यवसायशिक्षण शाळांत १३,१३२ विद्यार्थी व १,३४३ शिक्षक होते. त्यांशिवाय चार औषधवैद्यकशास्त्र विद्यालये, एक वैद्यक विद्यापीठ (१९८५), एक कृषी महाविद्यालय, एक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व एक पाली उच्च अभ्यास विद्यालय (१९८२-८३) आहे. व्ह्यँत्यान येथे सिसाव्हाँग व्हाँग विद्यापीठ (स्थापना १९५८) असून त्यात १,६०० विद्यार्थी आहेत (१९८४). ल्वांगप्राबांग, सावान्नाकेत व चंपासाक येथे प्रादेशिक तंत्रशिक्षण महाविद्यालये आहेत. लाओ हे शिक्षणाचे माध्यम आहे. व्ह्यँत्यान येथील राष्ट्रीय ग्रंथालयात ५०,००० ग्रंथ असून ते देशातील सर्वांत मोठे ग्रंथालय आहे. अनेक बौद्ध संस्थांमध्ये अभिजात वाङ्मय आढळते. व्ह्यँत्यान व ल्वांगप्राबांग येथे कला व वास्तुशिल्पाचे अतिशय सुंदर व परंपरागत नमुने पहावयास मिळतात.

रेडिओसह सर्व प्रकारची संदेशवहन सेवा  व वृत्तपत्रे ही शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. १९६७ पासून बँकॉकशी थेट दूरध्वनिसेवा सुरू झाली असून इतरही काही राजधानीची ठिकाणे दूरध्वनीने जोडली आहेत. देशात एकूण ५,५०६ दूरध्वनिसंच आहेत (१९७४). व्ह्यँत्यान येथून रेडिओ ध्वनिक्षेपणास १९६८ पासून सुरुवात  झाली. सध्या ‘ लाओ नॅशनल रेडिओ ’द्वारा हे प्रसारण केले जाते. बहुतांश प्रसारण लाओ भाषेतून असते. सरकारी बातम्या इंग्रजी, फ्रेंच व इतर भाषांमधूनही प्रसारित केल्या जातात. रशियन दूरचित्रवाणी कार्यक्रम उपग्रहाद्वारे येथे उपलब्ध होतात. रशियाच्या मदतीने व्ह्यँत्यानजवळ एक भूकेंद्र उभारले असून त्याद्वारे रशियन दूरचित्रवाणी कार्यक्रम पहावयास मिळतात. १९८३ पासून स्थानिक दूरचित्रवाणी सेवा सुरू झाली आहे. देशात २,३२,००० रेडिओ संच व ३१,००० दूरचित्रवाणी संच आहेत. (१९८६). सेंइंग पॅक्सॅक्सॉन, व्हेत्यां मेखाओ सॅन पॅथेट लाओ ही व्ह्यँत्यानमधील प्रमुख वृत्तपत्रे आहेत. केवळ रशिया व व्हिएटनाम यांचेच विदेशी वृत्तविभाग लाओसमध्ये आहेत.

महत्त्वाची स्थळे : आशियातील इतर देशांच्या तुलनेत लाओसमध्ये फारच कमी शहरे आहेत. व्ह्यँत्यान हे देशातील सर्वांत मोठे शहर व देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. सावान्नाकेत (लोकसंख्या ५०,६९०-१९७३), पाक्से (४४,८६०), ल्वांगप्राबांग (४४,२४४), सायाबुरी (१३,७७५), टाकेक (१२,६७६) ही लाओसमधील इतर महत्त्वाची नगरे आहेत. पूर्वीच्या शासनाने लाओसमधील निसर्गसौंदर्य व कलात्मकदृष्ट्या आकर्षक बाबींविषयी लोकांमध्ये प्रसिद्धी करून पर्यटन विकासाचा प्रयत्न केला. परंतु देशातील कलहाच्या परिस्थितीमुळे लाओसमध्ये येणारे पर्यटक परावृत्त होऊ लागले. पॅथेट शासनाने मात्र पर्यटनाबाबत विशेष रस घेतला नाही. त्यामुळे व्हिएटनाम वगळता इतर विदेशी पर्यटकांना व विदेशी शासकीय अधिकाऱ्यांना लाओसमध्ये जाण्यास क्वचितच परवानगी दिली जाते. विदेशातून लाओसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पारपत्राची व प्रवेशपत्राची आवश्यकता असते.

चौधरी, वसंत.


राजधानी व्ह्यँत्वान येथील खुली मंडई पारंपरिक पोशाखातील मेओ युवती

जलमार्ग देशातील एक दळणवळण माध्यम