गवताळ प्रदेश : पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत कोरड्या हवेचे ओसाड, वाळवंटी प्रदेश आणि आर्द्र हवेचे अरण्यप्रदेश यांच्या दरम्यान, खंडांच्या अंतर्भागात मुख्यत: गवताने निसर्गतःच आच्छादलेले विस्तृत, सपाट मैदानी किंवा पठारी प्रदेश आढळतात. त्यांना उष्ण कटिबंधात सॅव्हाना व समशीतोष्ण कटिबंधात स्टेप व प्रेअरी म्हणतात. दक्षिण आफ्रिकेत त्यांना व्हेल्ड, दक्षिण अमेरिकेत लानोज, कँपोज, पँपास, आणि ऑस्ट्रेलियात डाउन्स अशीही नावे आहेत. अंटार्क्टिकाशिवाय प्रत्येक खंडात असे विस्तीर्ण तृणप्रदेश आहेत.

ब्रिटिश बेटे, पश्चिम यूरोप, न्यूझीलंड इ. थंड प्रदेशांत मनुष्याने अरण्ये तोडली, तेथे लुसलुशीत हिरव्यागार गवताची कुरणे तयार झाली आहेत. वाळवंटी प्रदेशातही काही भाग तृणाच्छादित असतो. टंड्रा प्रदेश, बहुतेक पठारी प्रदेश आणि काही पर्वतांचे उतार येथेही प्राणी चरू शकतील असे गवत आढळते. तथापी मुख्यतः  सॅव्हाना, स्टेप व प्रेअरी हेच विस्तीर्ण प्रदेश, गवताळ प्रदेश असे विशेषत्वाने मानले जाते.

पृथ्वीवरील जमिनीचा सु. २४% भाग गवताळ प्रदेश आहे. त्यापैकी  ३१% प्रदेश विशेष उंच सॅव्हाना गवताचा, २२% उंच सॅव्हाना गवताचा, १८% ओसाड प्रदेशातील सॅव्हानाचा, १३% उंच प्रेअरी गवताचा, १०% बुटक्या स्टेप गवताचा व ६% पर्वतीय तृणप्रदेशाचा आहे.

तृणप्रदेशात झाडांपेक्षा गवतच वाढावे अशी नैसर्गिक परिस्थीती असते. पाऊस इतक्या बेताचा पडतो, की  त्याची ओल जमिनीच्या खालच्या थरांपर्यंत पोहोचत नाही, ती वरच्या थरातच राहते. ही गोष्ट झाडांपेक्षा गवताच्या वाढीला अधिक पोषक असते. प्रेअरीचा तृणप्रदेश जवळजवळ वृक्षहीनच आढळतो. परंतु येथील हवामान पाहता तेथे अरण्येही वाढू शकली असती. अर्जेंटिना, यूरग्वाय, पॅराग्वाय येथेही अरण्ये वाढण्याजोगी हवामानाची परिस्थिती आहे. आफ्रिकेतील विस्तीर्ण सॅव्हाना तृणभूमीत जसे हवामान आहे तसे भारत, आग्नेय आशिया, मध्य अमेरिका येथेही आहे. परंतु या प्रदेशात त्या हवामानात अरण्ये वाढलेली आहेत. आफ्रिकेच्या आणि स्टेप प्रदेशाच्या गवताळ प्रदेशांत मात्र मधूनमधून काही थोडी झाडे दिसतात तेवढीच. याचे कारण मानवाची वस्ती आणि त्याने वापरलेला किंवा आपोआप उत्पन्न झालेला अग्नी. 

इ.स.पू. १०००० वर्षांपूर्वींच मनुष्य काही प्राण्यांना माणसाळवून त्यांचे कळप बाळगू लागला होता. माणसाने बाळगलेले प्राणी मर्यादित प्रदेशात चरतात आणि तेथील गवत पार नाहीसे करतात. आफ्रिकेच्या वायव्येकडील पर्वतीय प्रदेशात माणसाने शेळ्या, मेंढ्या आणि उंट चारले नसते, तर तेथे अरण्य तयार झाले असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या नैऋत्य भागात प्राणी चारल्यामुळे त्या भागाचे मरुभूमीत रूपांतर झाले आहे. भारतातही राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाच्या सीमेवर शेळ्या-मेंढ्या चारल्यामुळे वाळवंटी प्रदेश विस्तार पावत आहे आणि मरुभूमीचे हे आक्रमण थांबविण्यास तेथे मुद्याम गवताची लागवड करून प्राणी चारण्यास बंदी करण्यात येत आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हरणे, गवे, हत्ती, घोडे वगैरे विविध प्राणी भरपूर होते, ते सापक्षतः अलीकडच्याच काळात माणसाने नष्ट केले. त्यामुळे तेथील गवत अधिक उंच वाढले. वणवा लागून ते गवत जळले तेव्हा लहान गवत जळल्यामुळे जांच्यावर विशेष परिणाम होत नव्हता, ती झाडेही नष्ट झाली आणि तृणभूमी वाढली. 


शेळ्या वगैरे ज्यांचा पाला खाऊन टाकीत असत, ती झुडपे अधिक दाट वाढली. त्यांनां जमिनीपासून अधिक जवळ जास्त फांद्या आल्या आणि त्यामुळे गवत कमी झाले. १९६० साली इंग्‍लंडमध्ये रोगामुळे सशांची संख्या फार कमी झाली. पाच वर्षांत तेथील तृणभूमीचे रूपांतर जंगलात झाले. वन्य पशू बाळगलेल्या प्राण्यांपेक्षा विस्तृत प्रदेशात चरतात. गवत पार नाहिसे होण्यापूर्वीच ते दुसऱ्या प्रदेशात दूर चरत जातात, त्यामुळे तृणभूमीचे रक्षण होते. आफ्रिकेतील अतिविस्तीर्ण तृणभूमी व तेथील विविध प्रकारचे लहान मोठे तृणभक्षक प्राणी यांचा परस्परसंबंध असावा. मानवी जीवनाचाही पृथ्वीवरील वनप्रदेशांवर परिणाम होतो. मनुष्य अरण्ये तोडून शेती करतो आणि धान्ये पिकवितो, मूळचे वन्य प्राणी नाहीसे करून बाळगलेले प्राणी चारतो इंडोनेशियामध्ये प्राचीन काळी पशुपालक टोळ्यांनी आगी लावून, दाट उष्णकटिबंधीय अरण्ये नाहीशी केली. तेथे उष्णकटिबंधीय तृणभूमी तयार झाली. भारतातही पशुपालक व कृषीवल लोकांनी अरण्ये तोडून तृणभूमी व तृणभूमीचे ठिकाणी शेतीप्रदेश तयार केले. उत्तर अमेरिकेतील वन्य पशूंची शिकार करून जगणारे रेड इंडियन वगैरे मूळचे लोक भरपूर व सुलभ शिकार मिळावी म्हणून तृणप्रदेशांस आग लावून देत, यामुळे झाडे नष्ट झाली आणि वृक्षहीन विस्तीर्ण तृणप्रदेश तयार झाला. मानवी जीवन आणि अग्नी, आपोआप उत्पन्न झालेला वणवा किंवा मनुष्याने मुद्याम लावून दिलेला वणवा यांचा वनस्पतिजीवनावर झालेल्या परिणामांची अशी अनेक उदाहरणे सापडण्याजोगी आहेत.

सॅव्हाना : उष्णकटिबंधातील या तृणप्रदेशात विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सु. ५° ते २०° अक्षांशांपर्यंतचा प्रदेश येतो. त्याच्या विषुववृत्ताकडील व ध्रुवाकडील काही भागांवर वायुभाराच्या पट्‌ट्यांच्या स्थलांतरामुळे वर्षातील काही काळ अनुक्रमे विषुववृत्तीय व वाळवंटी प्रदेशांच्या हवामानाचा अनुभव येतो. आफ्रिकेत विषुववृत्ताच्या उत्तरेकडे अटलांटिकपासून इथिओपियाच्या डोंगराळ भागापर्यंत म्हणजेच सूदान व त्याच्या पश्चिमेस चॅड, नायजेरिया, अपर व्होल्टा, टोगो, घाना, आयव्हरी कोस्ट, माली, गिनी सेनेगल, गँबिया, मॉरिटेनिया इ. देशांचा व दक्षिणेकडे अंगोला, काँगो, झँबिया, मालावी, ऱ्होडेशिया, मोझँबीक, मॅलॅगॅसीचा (मादागास्करचा) पश्चिम किनारा इ. देशांचा भाग यात समाविष्ट होतो. त्यांतील काही भागास व्हेल्ड असे नाव आहे. तसेच टांझानिया, केन्या, युगांडा, रूआंडा, बुरूंडी इ. देशांचा पठारी भागही यात येतो. हे पठारी भाग विषुववृत्त प्रदेशाच्या अक्षांशात असले, तरी उंचीमुळे त्यांचे स्वरूप तृणप्रदेशाचेच आहे. आफ्रिकेतील विषुववृत्तीय प्रदेशाभोवती या तृणप्रदेशाचे जणू काही नालाकृती कडेच पडले आहे. आफ्रिकेत हा तृणप्रदेश जसा एका सलग पट्‌ट्यात येतो, तसा इतर खंडांत येत नाही. पर्वत, नद्यांची खोरी यांमुळे तो खंडित होतो. दक्षिण अमेरिकेत विषुववृत्ताच्या उत्तरेस व्हेनेझुएलामधील ओरिनोकोचे खोरे (लानोज), गियाना व ब्राझील यांचे पठारी भाग, कोलंबियाचा उत्तरेकडील प्रदेश आणि दक्षिणेस आग्नेय ब्राझीलचा पठारी प्रदेश (कँपोज) व बोलिव्हिया, पॅराग्वाय व अर्जेंटिना यांचा ग्रानचाको नावाचा प्रदेश हे भाग येतात. मध्य अमेरिकेतील देश व मेक्सिको यांचा पश्चिम किनाऱ्याचा प्रदेशही या प्रकारचाच आहे. त्यांचा पूर्व किनाऱ्याचा भाग व क्यूबा वगैरे वेस्ट इंडीज बेटांपैकी विशेषतः पश्चिमेकडील बेटांचा समावेश काही भूगोलज्ञ याच प्रकारच्या प्रदेशात करतात, तर काही त्याला मान्सून प्रदेशात किंवा त्यासारख्या कॅरिबियन प्रदेशात घालतात. ऑस्ट्रेलियातील उत्तरेकडील व ईशान्येकडील किनाऱ्यांच्या आतील बाजूला असलेला डाउन्स नावाचा प्रदेश याच प्रकारचा आहे. काही भूगोलज्ञ मात्र त्याचा समावेश मान्सून प्रदेशात करतात.

सॅव्हानामधील तपमान सु. २१° ते २३° से. च्या दरम्यान असते. हिवाळ्यात थंडी अशी नसली, तरी तपमान कमी झाल्याचे जाणवते. वार्षिक सरासरी तपमानकक्षा ५° ते १५° से. पर्यंत असते. मध्यान्हीचा सूर्य वर्षातून दोन वेळा, एकदा उत्तरायणात आणि एकदा दक्षिणायनात, थेट माथ्यावर येतो. याला अनुलक्षूनच ‘सूर्यामागोमाग पाऊस जातो’ हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. क्वचित डोंगराळ भागात प्रतिरोध पर्जन्यही येतो. पावसाचे प्रमाण विषुववृत्ताच्या बाजूस सु. १५० सेंमी. पर्यंत असते. ते मरूप्रदेशाच्या बाजूस २५ सेंमी. पर्यंत कमीकमी होत जाते, दोन्ही  बाजूंचे हे रूपांतर प्रदेश सोडले, तर त्यांच्या दरम्यानचा प्रदेश हा खरोखर तृणप्रदेश होय. येथे जोरदार व्यापारी वारे वाहतात. सूदानमध्ये साहारकडून येणारे तप्त हरमॅटन वारे वाहतात. त्यांनी सारा प्रदेश जणू काही भाजून निघतो. रुक्ष, तप्त, कोरड्या हवेचे दिवस आणि आर्द्र, सौम्य, सुसह्य हवेचे दिवस असे वर्षाचे स्पष्ट भाग दिसून येतात.

येथील वनस्पती पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतात. विषुववृत्तीय प्रदेशातील जास्त पावसाच्या भागात जास्त झाडेच पुष्कळदा आढळतात. गवत असे थोडेच असते. पावसाचे प्रमाण मरु प्रदेशांकडे कमीकमी होत जाते, तसतसे वनस्पतींचे स्वरूपही बदलत जाते. अरण्ये विरळ होत जातात. गवताचे प्रमाण वाढत जाते मरु प्रदेशाजवळच्या भागात गवतही लहान, निःसत्त्व, खुरटे होत जाते झुडपे व काटेरी वनस्पती अधिक होतात व शेवटी मरु प्रदेशातील विशिष्ट वनस्पती दिसून येऊ लागतात. विषुववृत्ताच्या बाजूस गवत चांगलेच दाट उगवते. ते कित्येकदा तीनचार मी. पर्यंतही उंच वाढते. पुढेपुढे गवताची उंची व दाटपणा कमीकमी होत जातो. मधूनमधून बाभूळ, बेल, चिंच, गोरखचिंच, ताड अशा प्रकारची झाडे वाढतात. सामन्यतः सॅव्हानामध्ये गवत व झाडे यांचे मिश्रण झालेले आढळून येते, बऱ्याच झाडांना छत्रीसारखा आकार आलेला असतो. त्यामुळे त्यांचे जोरदार वाऱ्यांपासून संरक्षण होते. सॅव्हाना गवत हे जाड देठाचे व राठ असते. पावसाच्या सुरुवातीस उगवलेले नवे गवत मऊ व चवदार असते. पुढे ते उंच आणि दडस होते. पावसानंतर लवकरच उष्णतेमुळे ते वाळून जाते व त्याचा रंग पिवळा, तपकिरी असा होतो आणि नंतर ते मरून जाते. त्यापूर्वी त्याचे बी जमिनीवर पडलेले असते. त्यापासून पुढील पावसाच्या वेळी नवे गवत उगवते काही गवते वर्षायू तर काही दीर्घायू असतात. झाडांची रचनाही कडक उन्हास तोंड देईल अशी असते. बाभूळ, चिंच वगैरेची पाने लहान असतात, ताडाचे खोड कठीण आणि खवल्याखवल्यांचे असते. गोरखचिंचेचे खोड खूप जाड असून त्यात साठवलेल्या पाण्यावर उष्ण काळातही झाड जगते. काही भागात गवत इतके दाट असते, की वन्य पशू, गुरे व माणसे यांनी पाडलेल्या वाटांशिवाय इतर कोठूनही त्यात प्रवेश करणे कठीण जाते.

या गवताळ प्रदेशात तृणभक्षक व त्यांवर जगणारे मांसभक्षक असे दोन्ही प्रकारचे प्राणी राहतात. अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील प्राण्यांपेक्षा आफ्रिकेतील प्राण्यांमध्ये विविधता फार आढळते. मोठे पशू आफ्रिकेतच विशेषेकरून आहेत. अनेक प्रकारचे हरिण व मृग, रानबैल, रानरेडे, झेब्रा, जिराफ, गेंडा, हत्ती, पाणथळ भागात हिप्पोपोटॅमस व सुसरी, झाडांच्या आश्रयाने माकडे, बॅबून इ. आणि सिंह, चित्ता, तरस, कोल्हा, खोकड हेही आहेत. अनेक प्रकारच्या मुंग्यांची मोठमोठी वारुळे आहेत. त्यांच्या सावलीत कित्येकदा लहान प्राणी विसावतात. गवतावर गवती किडे, टोळ व इतर अनेक कीटक असतात व त्यांवर आणि मेलेल्या किंवा मारून टाकलेल्या प्राण्यांच्या मांसावर जगणारे अनेक प्रकारचे पक्षी संचार करीत असतात. व्हेल्ड व कारू भागांत शहामृग हा सर्वांत मोठा पक्षी आणि ऑस्ट्रेलियात कांगारू हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आढळतो. प्राण्यांचे रंग व त्यांच्या अंगावरील पट्टे किंवा ठिपके यांमुळे ते गवतात चटकन दिसून येत नाहीत. या रंगसादृश्याचा फायदा संरक्षण व आक्रमण दोन्हींसाठी होतो. तृणभक्षकांना बळकट पायांमुळे वेगाने पळून जाऊन, शत्रूंपासून बचाव करता येतो.रानरेडे व रानबैल हे शिंगांनी प्रतिकारही चांगला करतात. भराभर मिळेल ते गवत किंवा झाडपाला खुडून घेणे व मग निवांतपणे त्यांचे रवंथ करीत बसणे ही आत्मसंरक्षणाचीच नैसर्गिक योजना आहे. इतकेच काय झाडांच्या सावलीत विश्रांती घेत बसलेले कित्येक प्राणी उठवताना प्रथम मागचे पाय उभे करून जमीन व झाडाच्या फांद्या यांमधील जागेतून संभाव्य शत्रूंची टेहेळणी करून मगच पूर्ण उभे राहतात बसतानाही ते प्रथम पुढचे पाय दुमडतात व मग पूर्णपणे बसतात. गाईम्हशींच्या व शेळ्यामेंढ्यांच्या या सवयी सहज पाहता येतात. कोरड्या ऋतूत सर्व प्राणी लहानमोठ्या पाणवठ्यांच्या आसपास राहतात. पाऊस पडला की वनस्पतिसृष्टीप्रमाणेच प्राणीसृष्टीही गजबजून उठते.


या प्रदेशात लोकवस्ती फारच विरळ आहे. दर चौ. किमी. ला सु. ५ इतकीच. काही विशिष्ट भागात माणसाने फायदेशीर व्यवसाय सुरू केल्याने ती वाढलेली आहे. प्राणी पुष्कळ असले, तरी केवळ शिकार करून राहणारे लोक थोडेच. ते धनुष्यबाण, भाले वगैरे शस्त्रे वापरतात. जनावरांच्या वाटेवर खड्डे करून ते गवताने किंवा पानांनी झाकून त्यांत फसलेल्या प्राण्यांची शिकार करतात. तथापि प्राण्यांचे कळप बाळगणे व प्राथमिक स्वरूपाची शेती करणे हे व्यवसाय प्रमुख आहेत. कित्येक जमातींत प्राणी हीच संपती मानली जाते हे लोक मांसासाठी प्राणी न बाळगता त्यांच्या दुधासाठी, लोकर, केस, कातडी वगैरेंसाठी बाळगतात. शेतीला योग्य अशी जमीन काही ठिकाणी आढळते. पावसाच्या मुरणाऱ्या पाण्याबरोबर जमिनीतील काही पोषक द्रव्ये खालच्या थरात जातात व कोरड्या ऋतूत ती पुन्हा वर येतात. त्यांचा योग्य समतोल साधला, तर उत्तम सुपीक जमीन तयार होते. गवताळ प्रदेशात काही ठिकाणी अशी जमीन आढळते. तेथे शेती चांगली होते. क्षार जमिनीवर साचले म्हणजे काही वेळा त्यांचा थर कडक बनतो. लोखंडाचा अंश असेल, तर अशी जमीन शेतीला त्रासदायक ठरते. कडक थर फोडून मशागत करणे साध्या अवजारांनी जमत नाही. अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया यांपेक्षा आफ्रिकेत फार पूर्वीपासून पशुपालन आणि शेती हे व्यवसाय चालू आहेत. जोंधळा, बाजरी, मका,गहू, वाटाणे, घेवडे, भूईमूग, कापूस, तंबाखू, कॉफी इ. पिके येऊ शकतात. काही गावांतील तरुण लोक पावसाच्या सुरुवातीस पेरण्या करून गुरांचे कळप घेऊन ते चारावयास दूर जातात. उरलेले लोक पिकांकडे लक्ष देतात. पावसानंतर पिके तयार झाली, म्हणजे कापणीच्या वेळी तरुण मंडळी परत येतात. कोरड्या ऋतूसाठी तरतूद करून ठेवणे अवश्य असते. आफ्रिकेतील बहुतेक देशांत ही पिके काढतात. पावसाच्या आधी वाळलेले गवत पेटवून देण्याची पद्धत पुष्कळ ठिकाणी आढळते. त्यामुळे नवीन गवत जोमाने उगवते आणि गुरांना भरपूर चारा मिळतो. लोकांची घरे मातीच्या भिंतींची व गवताच्या छपराची असतात. शेते, गुरे वगैरेंची मालकी वैयक्तिकपेक्षा सामुदायिक अधिक असते. लोकांचे कपडे थोडे व सुती असतात. मसाई, बांटू हौसा इ. जमाती आफ्रिकेत दीर्घकालापर्यंत आहेत. काही जलप्रवाह व काही कायम स्वरूपाचे पाणवठे यांशिवाय या विस्तीर्ण प्रदेशात पाणी मिळविणे ही एक मोठीच समस्या असते. तसेच आफ्रिकेच्या पुष्कळ भागात त्से त्से माशी हे एक मोठे संकट आहे. ही माशी चावल्याने गुरे मरतात, माणसेही क्वचितच मरतात किंवा त्यांना निद्रानाशाचा विकार जडतो. श्वापदांपासून पाळलेल्या प्राण्यांचे रक्षण करणे हाही एक प्रश्न असतो.

यूरोपीय गोऱ्या लोकांच्या संपर्कामुळे सॅव्हानामधील जीवन बदलेले आहे. अरण्ये, तृणप्रदेश, खनिजे यांचा व्यापारी उपयोग करण्यासाठी गोरा मनुष्य येथे आला. तो मुखतः व्यवस्थापक व तंत्रज्ञ या भूमिकेतून आला व तद्देशीय लोकांपासून अलग राहिला. दक्षिण अमेरिकेत व वेस्ट इंडीजमध्ये स्पॅनिश व पोर्तुगीज लोक गेले व ते तेथील लोकांत मिसळून मिश्रवर्णीय लोकसंख्याच वाढली आहे. आफ्रिकेत गोऱ्यांच्या प्रयत्नाने धरणे वगैरे झाली व व्यापारी शेतीची वाढ झाली. मांसासाठी पशुपालन मात्र येथे यशस्वी होणे कठीण जाते कारण कोरड्या ऋतूत जनावरे पुष्ट होऊ शकत नाहीत. समशीतोष्ण कटिबंधातील गुरांच्या जाती येथे टिकाव धरू शकत नाहीत. अमेरिकेत व ऑस्ट्रेलिया मात्र मूळच्या लोकांचा सहज पाडाव करून पठारी प्रदेशात व इतरत्रही पाश्चात्त्य पद्धतीचे पशुपालन आफ्रिकेपेक्षा अधिक चांगले होते. तेथे हिंस्त्र पशूंचे भयही कमी.तथापी गुरांचे रोग, वाहतुकीच्या सोयींचा अभाव या अडचणी आहेतच.

व्हेनेझुएला, कोलंबिया, मेक्सिको येथील खनिज तेल,गियानामधील लोखंड, नायजेरियामधील कथील व कोळसा, झाईरेच्या कटांगामधीलव त्याच्या जवळच्या भागातील तांबे, युरेनियम, कोबाल्ट इ. खनिजांचा आणि वेस्ट इंडीज, ब्राझील, व्हेनेझुएला, सूदान वगैरे प्रदेशांतील कापूस, तंबाखू वगैरे पिके यांचा व्यापारी दृष्टीने फायदा यूरोपीयांनी मिळविला. दक्षिण अमेरिकेत ग्रानचाकोमधील क्केब्राचो या झाडापासून मिळणाऱ्या टॅनिनचा कातडी कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. उसापासून साखर, त्याच्या जोडीला रम, अल्कोहॉल वगैरे पेये, चिपाडांपासून कागद इ. व्यवसाय वेस्ट इंडीज व दक्षिण अमेरिकेतील देशांत फार फायदेशीर ठरले आहेत. हाव्हॅना चिरूट जगप्रसिद्ध आहेत.

समुद्रकाठच्या सुंदर पुळणी, वनश्री, मासेमारी, शिकार आणि अलीकडे वन्य पशुंचे त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत निरीक्षण यांमुळे या प्रदेशातील काही भाग हौशी प्रवाशांचे आकर्षण बनले आहेत.

स्टेप : समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात रुक्ष, वाळवंटी प्रदेशाला जवळ असलेल्या कमी पावसाचा तृणप्रदेश तो स्टेप व अरण्यांच्या बाजूचा, अधिक पावसाचा तृणप्रदेश तो प्रेअरी असे सामान्यतः  मानतात. कित्येकदा अमेरिकेतील तृणप्रदेश ते प्रेअरी आणि यूरेशियातील तृणप्रदेश ते स्टेप असेही म्हटलेले आढळते व कधीकधी दोनही संज्ञा एकाच अर्थाने वापरलेल्याही दिसतात. तथापि आधी सांगितलेल्या वर्गीकरणाप्रमाणे यूरेशियात काळ्या समूद्राच्या पश्चिमेकडील डॅन्यूबच्या खोऱ्यात खालच्या प्रदेशापासून पूर्वेकडे यूरोपीय सोव्हिएट रशियाच्या दक्षिणेकडील रुंद पट्टा नैऋत्य सायबीरिया बालकाश सरोवरापर्यंतचा आणि त्यापलीकडे अगदी पूर्वेस मँचुरिया व ऑर्‌डॉस वाळवंटापर्यंतचा प्रदेश उत्तर आफ्रिकेत वाळवंट व पर्वत यांमधील आणि वाळवंट व भूमध्यसागरी प्रदेश यांमधील अरुंद पट्टा उत्तर अमेरिकेत वाळवंटी प्रदेशांच्या उत्तरेस आणि पूर्वेस टेक्ससपासून दक्षिण कॅनडापर्यत पसरलेला ग्रेट प्लेन्स हा प्रदेश वॉशिंग्टन आणि ऑरेगन संस्थानांतील काही भाग दक्षिण अमेरिकेत पॅटागोनियातील अँडीजच्या पायथ्यापासून दक्षिणेस मॅगेलनच्या सामुद्रधुनीकडे रुंद होत गेलेला पट्टा, ऑस्ट्रेलियात वाळवंटी प्रदेशाच्या पूर्वेस मरी व डार्लिंग नद्यांच्या खोऱ्यातील लहानसा प्रदेश यांचा समावेश स्टेप प्रदेशात होतो. दक्षिण अमेरिकेत, अर्जटिनामध्ये व आफ्रिकेच्या दक्षिण भागात वाळवंटांना लागून स्टेप प्रदेश नाही.

स्टेपचे हवामान विषम आहे. उन्हाळ्यातील सरासरी तपमान २३° से., तर हिवाळ्यातील शून्याखाली तीनचार अंश जाते. पावसाचे प्रमाण ५०–५५ सेंमी. पेक्षा अधिक नसते. युरेशियात पश्चिमेकडून येणारी चक्री वादळे काही पाऊस देतात. पाऊस उन्हाळ्यात पडतो. हिवाळ्यातील कोरड्या थंडीत झाडे टिकाव धरू शकत नाही. उन्हाळी पावसावर गवत वाढते. अगदी कोरड्या प्रदेशात ते पुंजक्या पुंजक्यांनी वाढते.तथापी सामान्यतः स्टेप प्रदेशात सर्व भूमी गवताने आच्छादलेली असते. मात्र हे गवत उंच वाढत नाही. पूर्ण वाढ झालेले गवतही २०–२५ सेंमी. पेक्षा अधिक उंच वाढत नाही. त्याचे दृश्य क्षितिजापर्यंत एकसारखे दिसते. कमीजास्त पावसामुळे कमीजास्त उंचीचे गवत दिसते एवढाच काय तो फरक. दीर्घकाल पाण्याशिवाय जगता येईल, अशी त्याची रचना असते. ते दीर्घायू असते व पावसाबरोबर त्याची झटपट वाढ होते. जीवनचक्र लवकर पुरे होते व मग ते वाळून पिवळे पडते. पावसाचे पाणी जमिनीत खोल जात नाही. पावसानंतर पृष्ठभागाजवळच्या थरात बुटक्या गवताच्या उथळ मुळांना थोडी आर्द्रता मिळते. घोडा, गाढव, उंट शेळ्या, मेंढ्या हे प्राणी मुखतः आढळतात. तसेच अनेक प्रकारचे हरिण, कॉयोट, जॅकरॅबिट, बॅजर वगैरे रानटी प्राणी आहेत. लांडग्यासारख्या काही प्राण्यांशिवाय मोठे हिंस्र पशू नाहीत. स्टेप प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे घोडे, शेळ्या, मेंढ्या इ. प्राण्यांचे कळप बाळगणे व त्यांना चारण्यासाठी गवत व पाणी मिळेल त्या त्या प्रदेशात भटकत राहणे. या प्राण्यांचे दूध, मांस, रक्त, कातडी इत्यादींचा जीवनात उपयोग होई. घर असे एका जागी नसल्यामुळे चटकन उभारता व मोडता येईल, अशा तंबूतून ते राहत. त्यासाठीही कातड्यांचा उपयोग करीत. प्राण्यांपासून मिळणार्‍या वस्तूंच्या मोबदल्यात ते जवळपासच्या शेतीप्रधान प्रदेशातून धान्य, खजूर, चहा वगैरे पदार्थ मिळवतात. युर्टमध्ये राहणाऱ्या किरगिझ लोकांचे जीवन हे प्रातिनिधिक मानता येईल. पाणी ही महत्त्वाची समस्या असल्यामुळे ते मिळेल तेथे शेती होऊ शकते. प्राचीन ग्रीकांनी काळ्या समुद्राच्या उत्तरेस वसाहती करून शेती सुरू केली. त्यांच्या संपर्कामुळे सिथियन भटके लोकही शेती करू लागले. गहू, जव वगैरे पिके अशा प्रदेशात होतात. सोव्हिएट रशियाने कालव्यांच्या साहाय्याने पाण्याची सोय करून, बहुतेक भटक्या जमातींना आता स्थिर जीवन प्राप्त करून दिले आहे. दीर्घकालीन अवर्षणाला तोंड देण्याची पाळी आली म्हणजे भटक्या जमातीचे लोक शेजारच्या कृषिप्रधान प्रदेशांवर स्वार्‍या करीत. यूरोपपासून चीनपर्यंतच्या प्रदेशाच्या इतिहासात याची साक्ष आढळते. या झगड्यात जलद संचार करणार्‍या युद्धप्रवीण भटक्या जमातींचा बहुधा जय होई. मात्र भूमिप्रेमी कृषिवल जमाती या जेत्यांनाच कालांतराने पचवून टाकीत.

प्रेअरी : उत्तर अमेरिकेच्या मध्यभागी असलेला सखल मैदानी प्रदेश हाच मुख्यतः प्रेअरी प्रदेश म्हणून ओळखला जातो. स्टेपच्या वर्णनात सांगितल्याप्रमाणे ग्रेट प्लेन्स या प्रदेशाच्या पूर्वेस मिशिगन सरोवरांच्या रेखांशापर्यंत हा प्रदेश आहे. त्यात कॅनडाच्या ॲल्बर्टा, सस्कॅचेवन व मॅनिटोबा यांचे दक्षिण भाग आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या टेक्सस व लुइझिॲना यांच्या किनारी प्रदेशापासून पश्चिम  ओहायओ, इंडियाना, मिसुरी, आयोवा, इलिनॉय, विस्कॉन्सिन, मिनेसोटा इ. संस्थानांचा सखल प्रदेश येतो. इलिनॉयला तर प्रेअरी स्टेट असे म्हणतात. दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिनामधील अँडीजच्या पायथ्यापासून अटलांटिक किनाऱ्यापर्यंतचा उत्तरेकडील रीओ सालादो आणि दक्षिणेकडील रीओ नेग्रो या नद्यांच्या दरम्यानचा पँपास नावाचा प्रदेश प्रेअरी प्रकारचा आहे. त्याचा पश्चिमेकडील कमी पावसाचा भाग काहीसा स्टेपसारखा आहे. पँपासमध्येच यूरग्वाय व त्याला लागून असलेला ब्राझीलचा अगदी दक्षिणेकडील भाग येतो. दक्षिण आफ्रिकेत कालाहारी वाळवंट व ड्रेकन्सबर्ग पर्वत यांच्या दरम्यानचा बोट्‍स्वाना, ऱ्होडेशिया व दक्षिण आफ्रिकेचे ट्रान्सव्हाल, ऑरेंज फ्री स्टेट व केप ऑफ गुड होप प्रांत यांच्या सरहद्दीवरील हायव्हेल्ड नावाचा प्रदेश, मॅलॅगॅसीचा (मादागास्कर) काही डोंगराळ भाग, ऑस्ट्रेलियामधील आग्नेयाकडील मरी आणि डार्लिंग यांच्या खोऱ्यांचा न्यू साउथ वेल्समधील प्रदेश, न्यूझीलंडच्या दोन्ही बेटांचा पूर्व किनाऱ्यावरील काही भाग आणि युरेशियामध्ये स्टेप व सूचिपर्णी अरण्ये यांच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे पूर्व यूरोपचे सधन प्रदेश हंगेरी, रूमानियाचे मैदानी प्रदेश, काळ्या समुद्राच्या उत्तरेस सोव्हिएट युनियनचे विस्तीर्ण प्रदेश आणि मध्य आशियाचे ओसाड प्रदेश व उत्तरेकडील अरण्ये यांमधील प्रदेश हे इतर प्रेअरी प्रदेश होत. युरोशियातील स्टेप व प्रेअरी वेगळे न मानता बुटक्या गवताचे व उंच गवताचे स्टेप प्रदेशच पुष्कळदा मानलेले आढळतात.

प्रेअरीचेही हवामान विषम असते. उन्हाळ्यातील सरासरी तपमान १६° ते २२° से. पर्यंत आणि हिवाळ्यातील ४° ते -१९° से. पर्यंत असते. पाऊस मुख्यतः उन्हाळ्यात येतो व त्याचे प्रमाण ३० सेंमी. ते ७५ सेंमी. पर्यंत असते. काही भागात ४० ते १०० सेंमी. पर्यंतही पाऊस पडतो. तथापि पावसाची अनिश्चितता, उन्हाळ्यातील उच्च तपमान व हिवाळ्यातील पाणी गोठण्याच्यापेक्षाही कमी तपमान, जोरदार वारे, उन्हाळ्याच्या उत्तरार्धांत तीव्र पाणीटंचाई ही प्रेअरी प्रदेशाच्या हवामानाची वैशिष्ट्ये होत.

प्रेअरीतील गवत उंच वाढणारे व खोल मुळांचे असते. पूर्ण वाढ झालेले गवत एक ते तीन मी. उंचीपर्यंत वाढलेले दिसते. अर्जेंटिनातील नैसर्गिक गवत घोडेस्वाराच्या उंचीपेक्षाही अधिक वाढलेले होते. अमेरिकेत वसाहतीसाठी आलेले यूरोपीय लोक क्षितिजापर्यंत पसरलेल्या सपाट आणि काहिशा ऊर्मिल वृक्षहीन प्रदेशावरील उंचच उंच वाढलेले व वाऱ्याबरोबर लहरणारे दाट गवत पाहून स्तिमित झाले असल्यास नवल नाही. जलप्रवाहांच्या काठाकाठानेच काय ती झाडे वाढलेली दिसत. इतिहासपूर्व काळात मानवाने शिकारीस साहाय्यकारक व्हावे किंवा जनावरांस चाऱ्याचा अधिक प्रदेश मिळावा, म्हणून मुद्दाम लावलेल्या व मग आटोक्याबाहेर गेलेल्या वणव्यांचा परिणाम म्हणजे ही वृक्षहीनता आहे. त्यातल्या त्यात येथील आर्द्र हवेत वृक्षांची वाढ होणे सहजशक्य आहे. आजच तेथे शेती करणाऱ्या लोकांनी आपापल्या वस्तीशेजारी झाडे लावली आहेत ती चांगली वाढली आहेत. सॅव्हानामधील गवताची रोपे स्वतंत्र एकएकटी वाढलेली असतात तसे येथे नाही. येथे जमिनीखाली अनेक रोपांची मुळे एकमेकांत गुंतून जाळे बनलेले असते व गवत उपटू गेल्यास काही रोपे व त्यांच्या मुळांबरोबर मातीचा मोठा ढेपसा वर येतो.

माती साठसत्तर सेंमी. खोलीपर्यंत ओलाव्याची असते. तिच्यात बुटक्या गवतास न जुमानता उंच गवत मूळ धरते. गवताच्या पुष्कळ वर्षायू व दीर्घायू जाती असतात. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात गवत वाळून जाते आणि हिवाळ्यात पुष्कळदा हिमाच्छादित होते.

प्रेअरीतील जमिनीचे प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दीर्घकाळपर्यंत मनुष्याचा संपर्क नसल्यामुळे गवत व त्यांची मुळे मातीत मिसळून जमिनीच्या वरच्या थरात, सेंद्रिय द्रव्यांचा भरपूर पुरवठा झालेला असतो. प्रेअरीच्या कमी पावसाच्या भागात पावसाचे पाणी जमिनीत फार खोलपर्यंत झिरपत जात नाही. त्यामुळे जमिनीच्या वरच्या थरांतील जी खनीज द्रव्ये पावसाच्या पाण्यात विरघळतात ती फारतर ३० ते ५० सेंमी. खोलीपर्यंत जातात. जास्त पावसाच्या भागात सेंद्रिय द्रव्ये ३० सेंमी. खोलीपर्यंत गेलेली आढळतात. त्यामुळे ‘ब्‍लॅक प्रेअरी’ मृदा म्हणून ओळखली जाणारी सुपीक जमीन तयार होते. तिच्यातील खनिज द्रव्ये मात्र अधिक खोलपर्यंत जातात. वरच्या थरातील खनिज द्रव्ये, सेंद्रिय द्रव्ये पावसाच्या पाण्याबरोबर खालच्या थरात जाणे, याला परिच्यवन म्हणतात. प्रेअरीच्या कमी पावसाच्या भागात परिच्यवन कमी होऊन ३० ते ५० सेंमी. खोलीपर्यंत खनिजे, विशेषतः चुना साठून जी जमीन तयार झालेली असते, तिला ‘चर्नोझम’ असे नाव आहे. ही जमीन फारच सुपीक असून ती ‘ब्‍लॅक प्रेअरी’ मृदेपेक्षाही अधिक गडद रंगाची असते. तिच्यात सेंद्रिय द्रव्येही अधिक खोलीपर्यंत गेलेली असतात. बुटक्या गवताच्या प्रदेशात सेंद्रिय द्रव्ये कमी प्रमाणात मिळतात आणि चुन्याची खनिजेही चर्नोझमपेक्षा अधिक वरच्या थरात एकसारथी पसरलेली आढळतात. या जमिनीचा रंग तपकिरी असतो तिला ‘चेस्टनट ब्राऊन’ मृदा म्हणतात.

या सुपीक प्रदेशात निसर्गतः गवत चांगले वाढते. गवतावर जगणारे हरिण, काळवीट, गवा, घोडा वगैरे प्राणी भरपूर असतात आणि त्यांच्यावर जगणारे कॉयोट, लांडगे वगैरे मांसभक्षक प्राणीही असतात. स्टेपप्रमाणे येथेही मोठाले हिंस्र पशू आढळत नाहीत. स्टेप व प्रेअरीमधील घोडा हा प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या एकसारख्या सपाट प्रदेशात तो वेगाने पळू शकतो. तो विश्रांतीसाठी खाली बसला, तर प्रथम मागचे पाय दुमडतो आणि गवतावरून आजूबाजूला पाहून धोका नाही अशी खात्री झाली, म्हणजे पुढचे पाय दुमडून पूर्ण बसतो किंवा आडवा होतो. उठतानाही तो प्रथम पाय उभे करतो व आजूबाजूला पाहून मग पूर्ण उभा राहतो.

प्रेअरीमधील माणसाचे व्यवसाय सॅव्हाना व स्टेपप्रमाणेच शिकार, पशुपालन व शेती या क्रमाने विकसित झाले आहेत. सुपीक जमीन आणि बेताचा पाऊस व योग्य तपमान यांमुळे प्रेअरी प्रदेश गव्हाच्या शेतीला विशेष अनुकूल आहेत. मकाही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आता या प्रदेशात या मूळ व्यवसायांवर आधारलेली कारखानदारी व व्यापार ही वाढली आहेत.

पूर्व यूरोपीय देशांत रशियाच्या काळ्या मातीच्या पट्‌ट्यात व पश्चिम सायबीरियात पुष्कळ पूर्वीपासून लोक वस्ती करून राहिले आहेत. यांनी तेथे शेतीही केलेली आहे. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापूर्वी यूरोपीय अमेरिकन वसाहतवाल्यांना गवताळ प्रदेशांचे आकर्षण नव्हते. १८५०–६० च्या सुमारास हे लोक अमेरिकन प्रेअरी प्रदेशात गेले व तेथे गुरे पाळू लागले. तेथील मूळच्या रेड इडियन लोकांना घोड्याचा उपयोग स्वारीसाठी करावयाचे माहित नव्हते, ते त्याची शिकार करीत. पाश्चात्त्यांच्या संपर्काने घोड्याच्या स्वारीसाठी उपयोग केल्यामुळे, त्यांचे शिकारीचे क्षेत्र व सुकरता वाढली. गुरांची खिल्लारे बाळगणाऱ्या पाश्चात्य वसाहतवाल्यांनी त्या भागातल्या मूळ प्राण्यांचा फार मोठा संहार केला. गव्यांचे मोठमोठे कळप हाकारून त्यांना कड्यांवरून किंवा घळ्यांत उड्या टाकणे किंवा शिकाऱ्यांच्या टप्पातल्या मोक्याच्या जागेकडे जाणे भाग पाडीत. केवळ हौस किंवा खेळ म्हणून शेकडो प्राणी मारले जात. हे प्राणी, त्यांचे शत्रू व त्यांचे पुनरुत्पादन यांचा नैसर्गिक समतोल यांमुळे बिघडला. तसेच गवतावरील अनेक प्रकारचेकीटक व त्यांवर जगणारे पक्षी यांच्याही संख्येवर परिणाम झाला. पशुपालकांच्या पाठोपाठ शेतकरी आले आणि पूर्वेकडील अधिक आर्द्र प्रदेशात त्यांनी मका व गहू यांची शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे गुरे पाळणारे लोक अधिकाधिक पश्चिमेकडे गेले. शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे भरमसाट पिके येऊ लागली. लोखंडी नांगर, विहिरी खणण्याची यंत्रे आणि कुंपणाची काटेरी तार यांमुळे वसाहतवाल्यांचे व्यवसाय विस्तार पावले. पश्चिमेकडील भागात घोड्यावरून गुरांची राखण करणाऱ्या धाडसी गुराख्यांचा (काउबॉइजचा) एक आगळाच जीवनक्रम झाला व त्यावर गोष्टी, काव्ये, चित्रे तयार होऊन त्यांचे रोमहर्षक आकर्षण बनले. अलीकडील काळातही चित्रपट व दूरदर्शन यांना या जीवनक्रमाचे भरपूर खाद्य मिळालेले आहे. रेल्वेमुळे अमेरिकेत व रशियातही तृणभूमीचा उपयोग वसाहतींसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि आधुनिक शास्त्रीय शोधांमुळे व शेतीयंत्रांमुळे उत्पान्नाचे प्रमाण वाढून निर्यातही वाढली. तथापी पश्चिमेकडील कमी पावसाच्या बुटक्या गवताच्या भागात लागोपाठ अवर्षणे झाली म्हणजे गुरांचे कळप दुसरीकडे न्यावे लागतात आणि शेती प्रदेशात गवताचे संरक्षण नसल्यामुळे जमिनीचा वरचा थर वाऱ्याने उडून जातो आणि धुळीच्या वादळामुळे नुकसान होते. आज कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे देश मका व गहू यांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत आणि रशियाचे गव्हाचे उत्पादन जगात पहिल्या क्रमांकाचे आहे. अमेरिकन प्रेअरीमधील रेड इंडियन लोक पाश्चात्त्यांच्या आधुनिक शस्त्रांपुढे लवकरच निष्प्रभ आले आणि आज ते अगदीच अल्पसंख्य झाले असून, त्यांना ठरवून दिलेल्या प्रदेशातच राहावे लागते. कॅनडामधील तृणप्रदेशांचा चांगला उपयोग या शतकाच्या सुरुवातीस होऊ लागला.


अर्जेंटिनाच्या पँपासमध्ये १८०० ते १९१० या काळात पाश्चात्त्यांच्या वसाहती वाढल्या. उत्तर अमेरिकेतील ‘काउबॉय’ प्रमाणेच अर्जेंटिना व यूरग्वाय येथील ‘गाउचो’ हे घोडोस्वार गुराखी, त्यांच्या अस्थिर परंतु रोमहर्षक जीवनाने, दोराच्या फासाने गुरे पकडण्याच्या कौशल्यामुळे आणि धाडस व कौर्य यांमुळे काव्यपोवाड्यांचे विषय बनले. तेथील मूळच्या इंडियन लोकांचा सहज पाडाव झाला. १८७७ मध्ये अर्जेंटिनामध्ये पहिले शीतकोठीचे जहाज आले व विषुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशांत मांसाची निर्यात करणे शक्य झाले. आज मांस निर्यातीत अर्जेंटिनाचा जगात पहिला क्रमांक आहे. गहू, जवस, बार्ली इ. अनेकविध शेती उत्पादनही मोठे आहे.

ऑस्ट्रेलियातही मूळच्या लोकांचा वसाहतवाल्यांना विरोध होऊ शकला नाही. ते उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळ लोकांपेक्षाही मागासलेले होते. गेल्या शतकाच्या अत्तरार्धात ऑस्ट्रेलियातही गुरे पाळणे कमी होऊन, शेती व्यवसाय वाढू लागला. तथापी ग्रेट डिव्हायडिंग रेजच्या पश्चिमेकडील कमी पावसाच्या भागात मेंढ्या पाळणे एवढाच व्यवसाय शक्य होता. तेथील मूळचे प्राणी फार भिन्न असल्यामुळे यूरोपातून जातिवंत मरिनो जातीच्या मेंढ्या आणून तेथे मेंढपाळीचा व्यवसाय वाढविण्यात आला आणि आज ऑस्ट्रेलियाचा लोकरीच्या निर्यातीत प्रथम क्रमांक आहे. काही लोकांनी हौसेने यूरोपातून आणलेल्या सशांची संख्या इतकी वाढली, की ते मेंढ्यांचे गवत फस्त करू लागले. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यावर हजारो पौडांचा खर्च दरसाल होऊ लागला. येथेही अवर्षणाचा परिणाम मेंढपाळीच्या धंद्यावर होऊ लागला व पाण्याच्या अभावी हजारो मेंढ्या मृत्युमुखी पडू लागल्या परंतु सुदैवाने कांरजी विहिरींचे मोठे क्षेत्र उपलब्ध झाल्यामुळे तो धंदा सावरला. उत्तर किनाऱ्यावरील मोसमी पावसाच्या प्रदेशाला लागून असलेल्या गवताळ प्रदेशात गुरे पाळण्याचा धंदा चालतो आणि आग्नेय व नैऋत्य भागांत गहू होतो, न्यूझीलंडमध्येही गुरे, मेंढ्या पाळणे व गव्हाची शेती होऊ लागली आणि आगबोटीवर व विमानांत बर्फगार कोठ्यांची सोय झाल्यामुळे, इतर जगापासून अलग पडलेल्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांतूनही यूरोपकडे धान्य, मांस, अंडी, दुभत्याचे पदार्थ, लोकर इ. पदार्थ निर्यात होऊ लागले.

दक्षिण गोलार्धातील दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या कमी लोकवस्तीच्या देशांत यूरोपीय वसाहतवाल्यांनी आधुनिक शास्त्रीय ज्ञान व तंत्र यांच्या साहय्याने तेथील तृणप्रदेशात शेती व पशुपालन हे व्यवसाय अत्याधुनिक पद्धतीने करून उत्तर गोलार्धातील दाट लोकवस्तीच्या देशांस, विशेषतः औद्योगिक यूरोपला, अन्न व वस्त्र या गरजा भागविण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात व त्या व्यापारावर संपत्ती कमविण्यात मोठे यश मिळविले आहे. समान संस्कृतीचे व समान शास्त्रीय प्रगतीचे लोक समान नैसर्गिक परिस्थितीत कसे यशस्वी होतात, याचे हे उदाहरण आहे.

मँचुरियाच्या तृणप्रदेशात चिनी लोकांनी केलेली वस्ती पाश्चात्त्यांच्या नव्या जगातील वसाहतींपेक्षा वेगळी आहे. पाश्चात्त्यांप्रमाणे विरळ लोकवस्तीने मोठमोठे प्रदेश व्यापण्याऐवजी चीनने थोड्या थोड्या प्रदेशात दाट लोकवस्ती केली. त्याने तेथील शेतीत सोयाबीनचे उत्पन्न वाढविले. रशियन मदतीने तेथे ट्रान्स-सायबीरियन रेल्वेचा फाटा आला. रशियानांनाही पॅसिफिकमध्ये जाण्यास पोर्ट आर्थरसारखे हिवळ्यात न गोठणारे बंदर हवेच होते. जपानलाही मँचुरियातील खनिजे हवी होती. परंतु हा प्रदेश काबीज केल्यावरही जपान्यांनी तेथे मोठी वस्ती अशी केली नाही. तथापि मँचुरियाच्या सुपीक भूमीवर व तेथील खनिजांवर चीन, जपान व रशिया तिघांचेही लक्ष आहे.

जगातील गवताळ प्रदेशांत लोकवस्ती अधकाधिक वाढत आहे. त्यांची गरज भासवून जगातील इतर लोकांचीही पुष्कळ, मुख्यतः अन्नाची, गरज हे प्रदेश भागवीत आहेत. सर्व गवताळ प्रदेशांत शिकार, पशुपालन, शेती व कारखाने या क्रमाने विकास होत आहे. प्राण्यांच्या कळपांसाठी गवत व पाणी यांची कायमची व्यवस्था करणे, तृणधान्यांची शेती करणे व त्यासाठी अवश्य तेथे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणे आणि वाढत्या लोकवस्तीसाठी व व्यापारासाठी वाहतुकीच्या जलद साधनांची तरतूद करणे या समस्यांना व हवामानाची तीव्रता, कीटकादिकांचा त्रास आणि अवर्षणासारखे निसर्ग प्रकोप यांना तोंड देणे हे तेथील मानवासमोर नेहमी उभे असलेले प्रश्न आहेत. आपल्या शास्त्रीय ज्ञानाच्या जोरावर हे प्रदेश आपल्या अधिकाधिक उपयोगाचे व फायद्याचे करण्यात मनुष्य दिवसेंदिवस जास्त यशस्वी होत आहे.

संदर्भ : 1. Carter, G. F. Man and the Land, New York, 1968.

    2. Huntington, E. Shaw, E, B. Principles of Human Geography, Bombay, 1959.

    3. James, P. E. A Geography of Man, Boston, 1959.

कुमठेकर, ज. ब.